औरंगजेब किल्ले मोहीम भाग २

“न गर्दानद अकीक अज काविशे इल्मास रुइ खुद 

दमे शमशीर माहे ईद बाशद नामजोथारा” 

-हिरा आपल्याला कापीत आहे म्हणून अकीक (लाल रंगाचे एक रत्न) थोडेच आपले तोंड फिरवते, महत्वाकांक्षी वीरांना तलवारीचे पाते पाहिले की ईदचा चांद पाहिल्याचा आनंद होतो. (मासिरे आलमगिरी पृ. ९८) 

१९ ऑक्टोबर १६९९ (ज्युलियन दिनांक) रोजी ब्रह्मपुरी येथील आपल्या छावणीतून कूच करून, औरंगजेब बादशहाने वयाच्या ब्याऐशीव्या वर्षी, मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याची आपली मोहीम सुरु केली. साकी मुस्तैदखानाने मासिरे आलमगिरी या ग्रंथात, फारसी शब्दात वरील वर्णन केल्याप्रमाणे, बादशहाने मराठ्यांचे छापे, हल्ले - प्रतिहल्ले, गनिमी काव्याचे युद्ध सहन करीत पुढील दोन वर्षात वसंतगड, सातारा राजधानीचा किल्ला), सज्जनगड, पन्हाळगड, पावनगड, वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन इत्यादी किल्ले आपल्या ताब्यात आणले. इ.स. १७०१ च्या पावसाळ्यात बादशहाने खटाव येथे आपली छावणी केली. आता, छत्रपती राजाराम महाराज यांचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने, मराठेशाहीचे नेतृत्व त्यांची पत्नी, महाराणी ताराबाई यांच्याकडे होते. 

खेळणा उर्फ किल्ले विशाळगड मोहीम – नोव्हेंबर १७०१ ते जुलै १७०२ 

विशाळगडाकडे कूच केले - 

पावसाळा संपताच औरंगजेब बादशहाने स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला, जो किल्ला आता, सातारा किल्ला मोगलानी जिंकल्याने, मराठ्यांच्या राजधानीचा किल्ला होता, तो " खेळणा " उर्फ " किल्ले विशाळगड " घेण्यासाठी सैन्यासह खटाव येथून कूच केले. 

“ तो गगनचुंबी पर्वत (खेळणा उर्फ विशाळगड) जिंकून घेण्याच्या उद्देशाने बादशहाने जमादिलाखर महिन्याच्या सोळा तारखेस (दिनांक ७ नोव्हेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी) सादिकगडाहून (अर्थात वर्धनगडाहून) कूच केले. बारा टप्प्यात प्रवास पूर्ण करून तो मलकापूर येथे पोहोचला. तेथून पुढे अंबाघाटापर्यंतचा रस्ता आक्रमणास अतिशय अवघड होता. म्हणून बादशहाने मलकापूरला एक आठवडा मुक्काम केला. (मासिरे आलमगिरी पृ. १०१) “ 

“ पावसाळा संपल्यावर त्याने विशाळगड घेण्याच्या उद्देशाने, दिनांक ६ नोव्हेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी खटाव सोडले. रहमतपूर, कऱ्हाड, शिराळा, सातगाव (जिल्हा सांगली) या वाटेने प्रवास करीत बादशहा दिनांक २६ नोव्हेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी मलकापुरास आला. (बहु असोत सुंदर पृ. १४०) “ 

वरील वर्णनावरून आपल्याला समजते की खटाव ते मलकापूर हे आजच्या नकाशाप्रमाणे १३० - १४० किलोमीटरचे अंतर पार करायला औरंगजेब बादशहास व मोगल सैन्यास २० दिवस लागले. 

औरंगजेब बादशहाच्या या किल्ले मोहिमेत बादशाहाबरोबर फक्त त्याचे सैन्य व सरंजाम एवढेच साहित्य नसून साम्राज्य चालविण्याची संपूर्ण यंत्रणाच त्याच्याबरोबर फिरे. मोगल साम्राज्याची फिरती राजधानीच ती. निरनिराळ्या प्रांतातील वेगवेगळ्या खात्यांची प्रकरणे, माणसे, कागदपत्रे, सूचना, हुकूम असा उभ्या हिंदुस्थानच्या मोगल सत्तेचा कारभार चालत असे. (बहु असोत सुंदर पृ. १४२) म्हणूनच अश्या फिरत्या मोहिमा अतिशय वेळकाढू होत असत. 

मलकापूरहून विशाळगड पायथ्याशी येतानाच्या दिवसांत आजूबाजूच्या असलेल्या मुलुखाचे वर्णन साकी मुस्तैदखान असे करतो " डोंगराळ भागात काटेरी जंगले व प्रवेश करण्यास अशक्य अशी घोर अरण्ये आहेत. सर्व आकाश पालथे घालणारा तो सूर्य पण त्यालासुद्धा या अरण्याकडे पाहण्याचे धाडस होत नाही. प्रचंड वृक्ष आपल्या माना उंच करून उभे आहेत. त्यांच्या फांद्या एकमेकात अश्या अडकल्या आहेत की त्यातून मुंगी सुद्धा अतिकष्टाने जाऊ शकेल. त्या अरण्यात वाट असली तर इतकी अरुंद आहे की पायी चालणारा देखील मोठ्या कष्टानेच जाऊ शकेल. जागोजागी प्रचंड दरी व खोल खड्डे आहेत. " (मासिरे आलमगिरी पृ. १०२) 

विशाळगड वेढ्याची तयारी - 

मलकापुरास पोहोचताच औरंगजेब बादशहाने विशाळगडाच्या वेढ्याच्या पाहणीसाठी, मोर्चे बांधणीसाठी रवाना होण्याचे हुकूम फतेहुल्लाखान, बक्षी रहुल्लाखान, सर्फराजखान, राजा जयसिंग, हमीदुद्दीनखान आदी सरदारांना दिले. याच मोहिमेसाठी औरंगजेब बादशहाचा नातू, बादशहाचा मुलगा आज्जम याचा मुलगा शहजादा बेदरबख्त, कोल्हापूरजवळील सामानगड, भुदरगड किल्ले जिंकत बादशहास येऊन सामील झाला. (बहु असोत सुंदर पृ. १४२, मासिरे आलमगिरी पृ. १०१) 

आता मलकापूरहून विशाळगडाकडे कूच करण्यासाठी, गडाकडची वाट व्यवस्थित करावयाचे काम फतेहुल्लाखानाकडे सोपविण्यात आले. त्याने मलकापूर ते गजापूर जवळील घोडखिंड हा घनदाट जंगलाने व्यापलेला मार्ग मोठ्या कष्टाने लष्करास लवाजम्यासह चालण्यास सुकर बनवला. (बहु असोत सुंदर पृ. १४२). साकी मुस्तैदखान वर्णन करतो " मलकापूर मुक्कामात अकाली आलेल्या पावसाने मोगल सैन्याचे खूप हाल झाले. शेवटी फतेहुल्लाखानाच्या प्रयत्नांनी घाट रस्ता साफ केला गेला, इतका की मोगल सैन्याने सर्व सामुग्रीसहित सहजपणे व निश्चिंतपणे तो पार केला." (मासिरे आलमगिरी पृ. १०१) 

रजब महिन्याच्या सोळा तारखेस (६ डिसेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी) औरंगजेब बादशहाची छावणी डोंगराच्या पायथ्याशी एका विस्तीर्ण जागेवर कायम करण्यात आली. येथून खेळणा किल्ला साडेतीन कोसावर आहे (मासिरे आलमगिरी पृ. १०१). येळवण - जुगाई येथे बादशहा पोहोचला. तेथेच त्यास समजले की महाराणी ताराबाई विशाळगडाहून सिंहगडाकडे गेली आहे. (बहु असोत सुंदर पृ. १४२) मोगलांकडून विशाळगड जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली गेली. 

या मोहिमेच्या सुरुवातीच्या कालावधीत, अति दुर्गम अश्या सह्याद्रीच्या बरोबरीनेच, मराठी सैन्याची पथके देखील, मोगल सैन्यावर गनिमीकाव्याने छापे टाकून, त्यास त्रास देत होती. मोगल सैन्यासाठी त्या निबिड अरण्यात वाट तयार करणाऱ्या फतेहुल्लाखानाशी मराठ्यांची रोज चकमक होत होती. एक दिवस शहजादा बेदरबख्त व खानेआलम यांच्यावर विशाळगडातून खाली उतरून मराठ्यांनी छापा घातला व तीस उंट पळवले. मलकापूरहून विशाळगडाकडे येताना बादशहाने पिछाडी सांभाळण्याची जबाबदारी आपला मुख्य प्रधान असदखान, राजा जयसिंग यांच्यावर सोपवली होती. दिनांक ६ डिसेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी संताजी घोरपडे यांचा पुत्र राणोजी घोरपडे याने मलकापूरजवळ मोगलांच्या पिछाडीवरच हल्ला केला व रसदेचे बैल लुटले. बादशहाची छावणी कायम होताच एके दिवशी मराठी पथके विशाळगडाहून खाली उतरून छावणीच्या अर्ध्या कोसावर आली व त्यांनी गोळीबार केला. फतेहुल्लाखान येताच मराठे किल्ल्यात परत गेले. (बहु असोत सुंदर पृ. १४२, १४३, मासिरे आलमगिरी पृ. १०२) 

इकडे विशाळगड जिंकण्यासाठी मोगल वेढ्याची तयारी करत होते तर या विशाळगड परिसरातल्या युद्धाबरोबरच मराठे, मोगलांच्या इतर मुलुखात देखील धुमाकूळ घालत होते. औरंगजेब बादशहा मलकापुरास आला त्यावेळी मराठे उत्तरेत बुऱ्हाणपुरास पोहोचले होते व बुऱ्हाणपूरनजीकच्या एदलाबादचा परिसर उद्धवस्त करून त्यांनी बुऱ्हाणपुरास वेढा घातला होता. औरंगाबाद, भूम, चौसाळा भागात मराठे मोगलांवर हल्ले करत होते. राणोजी घोरपडे मलकापूर पासून सातारा - कऱ्हाड पर्यंत फिरत राहून मोगलांवर छापे टाकत होता व त्यांचे धान्य, रसद लुटीत होता. पश्चिमेत रामचंद्रपंत अमात्य व धनाजी जाधव १५,००० इतक्या मोठ्या संख्येच्या सैन्यासह कोकणात उतरले व त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीशी युद्ध सुरु केले. (बहु असोत सुंदर पृ. १४३, १४५). उत्तरेतील हल्ल्याने मोगलांवर दबाव टाकण्याचा तर कोकणातील हल्ल्याने, तिकडील मोगलांना मिळणारी मदत बंद पाडण्याचा प्रयत्न, या बादशहाच्या विशाळगडमोहिमेदरम्यान मराठे करीत होते. 

विशाळगडाची भौगोलिक रचना - 

विशाळगडाची भौगोलिक रचना साधारण अशी आहे - हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असून आजूबाजूने उंचच उंच डोंगरांनी वेढलेला आहे. किल्ल्यात जाण्यास दोन मार्ग. एक पूर्वेकडून मुख्य दरवाजाचा व दुसरी पश्चिमेकडून कोकणातून वर येणारी पायवाट. पूर्वेला मुख्य वाटेवर पायथ्यालाच, विशाळगडाचा डोंगर व समोरचा डोंगर यामध्ये खंदक खणल्यासारखी खोल दरी आहे. तर पश्चिम बाजूस सह्याद्रीचे तुटलेले कडे आहेत. आजूबाजूचे डोंगर, कडे व दरी यामुळे गडास एकप्रकारे नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. 

मोगल सैन्यरचना पाहता विशाळगडाच्या पूर्व बाजूस म्हणजेच मुख्य दरवाजाच्या बाजूस बादशहा औरंगजेब मोर्चेबांधणी करून होता तर गडाच्या पश्चिम बाजूस, अंबा घाट उतरून, पुढे साखरप्याच्या बाजूने गडाच्या पिछाडीस येऊन कोकणच्या वाटेवरून कोकण दरवाज्यावर हल्ला करण्यासाठी तरबियतखान, मुहम्मद अमीनखान आपापल्या सैन्यासह मोर्चेबांधणी करत होते. (बहु असोत सुंदर पृ. १४४) 

विशाळगडाचे युद्ध - 

इसवी सन १७०१ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विशाळगड मोहिमेस जोराने सुरुवात झाली व पहिल्याच झटक्यात शाबान महिन्याच्या सहा तारखेस (२६ डिसेंबर १७०१ (ज्युलियन दिनांक) रोजी) फतेहुल्लाखानाने गडाच्या पूर्व बाजूचा, मुख्य दरवाजाच्या समोरचा, दरीवरचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशी आजूबाजूचे डोंगरही हस्तगत केले गेले. आता त्या डोंगरांवरून गडावर तोफा / बंदुकांचा मारा करता येणार होता. तेथून भुयारे खणून ती गडाच्या आत नेण्याचे काम मोगलानी सुरु केले. एवढ्या लवकर पुढे सरकूनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा मोर्च्यास उत्तेजन मिळून किल्ला लवकर जिंकून घ्यावा यासाठी औरंगजेब बादशहाने आपली तीन कोसावर असलेली छावणी, शाबान महिन्याच्या सत्तावीस तारखेस (१६ जानेवारी १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) किल्ल्यापासून अर्ध्या कोसावर कायम केली. किल्ल्यातील लोक रात्रंदिवस तोफा, बंदुका यांचा सतत मारा करत होते. याने मोगलांची माणसे मरत होती. मोगलानी भुयारातून वर चढवून तटाच्या भिंतीखाली आणलेल्या शिड्या मराठ्यांनी उद्धवस्त केल्या. मग मोगलानी कजाव्याच्या शिड्या म्हणजेच उंटांवरचे हौदे तयार केले व त्यावर फळ्या टाकण्याचे काम सुरु केले. (बहु असोत सुंदर पृ. १४४, १४५ , मासिरे आलमगिरी पृ. १०४) 

तिकडे गडाच्या पाठीमागे पश्चिम बाजूस, डिसेंबर १७०१ ते फेब्रुवारी १७०२ या कालावधीत, मुहम्मद अमीनखानाने अंबा घाट उतरून माचाळची टेकडी व जवळचे कोतरी गाव घेतले व गडाच्या डोंगरास वळसा घालून पूर्व बाजूस जात येणाऱ्या वाटेवर व मुख्य दरवाजासमोर असलेल्या रेवणी बुरुजाच्या मध्ये असलेल्या टेकडीपाशी पोहोचला. प्रयत्नांची शर्थ करून शेवटी त्याने ४ मार्च १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी टेकडी जिंकली व कोकण दरवाजाशी असलेली मराठ्यांची पायवाट मोडली. नंतर तो आजारी पडल्याने बादशहाने त्याच्याजागी शहजादा बेदरबख्त यास कोकणी दरवाज्याशी नेमले. आता बादशहाने योजना केली की पश्चिमेकडील शहजादा बेदरबख्त, राजा जयसिंग, दंडाराजपुरीचा याकूतखान व पूर्वेकडील मोर्च्याचा प्रमुख फतेहुल्लाखान यांनी त्यांच्या सैन्यासहित एकत्र येऊन कोकणी दरवाजाच्या मार्गाने हल्ला करून किल्ला जिंकावा. त्याप्रमाणे सर्वानी मोर्चे लावले व तोफांचा मारा करून दरवाजा, तट, बुरुज पाडण्याच्या कामास लागले. किल्ल्यातील मराठे मात्र परशुरामपंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांच्या कोणत्याही हल्ल्याला धीटपणे तोंड देत होते. (बहु असोत सुंदर पृ. १४५, १४६ , मासिरे आलमगिरी पृ. १०५, १०६) 

गडाच्या पूर्व बाजूस, डिसेंबर १७०१ ते मार्च १७०२ या कालावधीत फतेहुल्लाखान प्रयत्नांची शिकस्त करत होता. पण यश येत नव्हते. त्याच्याकडील दोन जबरदस्त तोफा देखील विशेष काही करू शकत नव्हत्या. एक होती " शेरदहान " म्हणजे व्याघ्रमुखी व दुसरी " कडक बिजली " साकी मुस्तैदखान म्हणतो " एकेका तोफेच्या माऱ्याने मोठमोठ्या डोंगरांचा पाया हलून गेला असता. पण किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यात आला तेव्हा बुरुजाचे काही दगड ढासळले इतकेच. किल्ल्यातील मराठे मात्र रात्रंदिवस तोफा, बंदुकी, वजनदार मतवाले (दगडाचे मोठे गोळे) यांचा मारा करत होते. रात्री अपरात्री मोर्च्यावर हल्ले करत होते. एके दिवशी एक मोठा धोंडा कजाण्यावर येऊन आदळला. त्या आघाताने फळी तुटली व त्यावरील फतेहुल्लाखानाच्या डोक्यात धोंडा पडला व तो फळीवरून घसरला. त्याच्या कमरेला जबर मर बसला व तो महिनाभर अंथरुणाला खिळला. " (बहु असोत सुंदर पृ. १४६ , मासिरे आलमगिरी पृ. १०६ , १०७) 

यारीतीने, नोव्हेंबर १७०१ ते मार्च १७०२ या ५ महिन्यांच्या कालावधीत, खुद्द औरंगजेब बादशहाच्या नेतृत्वाखाली, साताऱ्यानंतर मराठ्यांची राजधानी असलेला, दुर्गम प्रदेशातील विशाळगड जिंकण्यासाठी, पूर्व बाजूकडून फतेहुल्लाखान तर पश्चिमेकडून मुहम्मद अमीनखान व शहजादा बेदरबख्त यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रेवणी बुरुजाच्या (मुख्य दरवाजाचे रक्षण करण्यासाठी बांधलेला बुरुज) मध्यापर्यंत उंटांवरचे हौदे चढवले. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत बोळ बांधीत नेले. परंतु परशुरामपंतांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यातील मराठे व राणोजी घोरपड्यांच्या नेतृत्वाखाली किल्ल्याबाहेरील मराठी सैन्याची पथके यांनी चिवट प्रतिकार करून, प्रतिहल्ले करून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. ५ महिन्यांच्या प्रयत्नानंतरही मोगलांना विशाळगड जिंकण्यास यश आले नाही. 

मोगलांच्या या स्थितीचे वर्णन साकी मुस्तैदखान किती मार्मिकपणे करतो ते पाहा. तो लिहितो " सब्जा बर संग नरवीदचे गुसहा बारान रा - अर्थ आहे - दगडावर हिरवळ उगवली नाही तर त्यात पावसाचा काय बरे दोष आहे ? " (मासिरे आलमगिरी पृ. १०६). म्हणजेच मोगलानी इतके (पावसासारखे सतत) प्रयत्न करूनही किल्ला हाती येत नाही (इतका पाऊस पडूनही दगडावर हिरवळ उगवत नाही) त्यात मोगलांचा काय दोष. यातूनच आपल्याला मराठी सैन्याने विशाळगड युद्धात किती चिवटपणे व निकराने मोगलांना प्रतिकार केला असेल याची कल्पना येते. 

याचदरम्यान मार्च १७०२ मध्ये, कर्नाटकात गुलबर्गा जिल्हातील एक गढी जिंकून घेण्याच्या युद्धात सरदार राणोजी घोरपडे याचा मृत्यू झाला. विशाळगड मोहीम सुरु झाल्यापासून सतत मोगलांच्या मागावर असलेल्या राणोजींचा संचार, मलकापूर - कऱ्हाड - सातारा - परिंडा - धारूर - कर्नाटक अश्या विस्तृत प्रांतात होता. मोगलांची रसद, साहित्य, अन्नधान्य लुटून त्यांना बेजार करण्याचे तसेच मोगलांवर छापे मारून त्यांची सैन्यशक्ती कमी करण्याचे कार्य राणोजींनी अव्याहत केले. परिणामी खुद्द बादशहाच्या छावणीत खायला अन्न मिळेनासे झाले. जे उपलब्ध होते ते प्रचंड महागले. पैशाचा इतका तुटवडा झाला की सैनिकांचे पगारसुद्धा थकले. (बहु असोत सुंदर पृ. १४६) 

विशाळगड प्रदेशात बादशहाच्या छावणीची ही स्थिती होती तर बाहेरील प्रदेशात राणोजी घोरपड्यांसारखेच, नेमाजी शिंदे खानदेशांत मोगलांवर छापे घालत होते. बारा हजार मराठे सैनिक बुऱ्हाणपूर - सुलतानपूर - नंदुरबार भागात लुटालूट करत होते. माणकोजी नामक सरदार, मोगलांवर संगमनेर भागात हल्ले करत होते तर दादो मल्हार व धनाजी जाधव पुणे भागात छापे घालत होते. (बहु असोत सुंदर पृ. १४६) 

विशाळगड मोगलांच्या ताब्यात - 

किल्ल्यातील मराठे हा वेढा पावसाळ्यापर्यंत ताणायची शिकस्त करत होते. एकदा पाऊस सुरु झाला की त्या धो धो पडणाऱ्या पावसात मोगल पुरते निष्क्रिय झाले असते. हे ध्यानात घेऊनच एप्रिल महिन्यात मोगलानी जोराची शिकस्त केली आणि शहजादा बेदरबख्त, राजा जयसिंग यांनी ९ मे १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी कोकणी दरवाज्यासमोरचा रेवणीचा बुरुज काबीज केला. (बहु असोत सुंदर पृ. १४७) जिल्ह्ज महिन्याच्या दहा तारखेस (२७ एप्रिल १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) रेवणीचा बुरुज हस्तगत केला. (मासिरे आलमगिरी पृ. १०७). आता मोगल, बादशहाच्या हुमूमवरून, दरवाज्यावर तोफांचा मारा करून तो पाडण्याच्या तयारीस लागले. पण त्यास म्हणावे तसे यश येत नव्हते. (मासिरे आलमगिरी पृ. १०८) शेवटी इ.स. १७०२ च्या मे महिन्यात मराठ्यांनी तहाची सुरु केली. सर्वजण सशस्त्र किल्ल्याबाहेर जातील, आम्हास खर्चास रक्कम देणे व मोगल सैन्याने येथूनच माघारी जाणे अश्या अटी ठरवून, बादशहाकडून मान्य करवून घेऊन, परशुरामपंतांनी विशाळगड सोडला. (बहु असोत सुंदर पृ. १४७) 

जेधे शकावलीतील नोंद "ज्येष्ठ वद्य सप्तमी शके १६२४ (५ जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) खेळणा किल्ला दोन लाख देऊन परशुरामपंतांपासून घेतला " (बहु असोत सुंदर पृ. १४७). 

मुहरम महिन्याच्या एकोणीस तारखेस (४ जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) किल्लेदाराने शहजादा बेदरबख्त याचे झेंडे किल्ल्यावर लावले. मुहरम महिन्याच्या बावीस तारखेस (७ जून १७०२ ज्युलियन दिनांक) रात्रीच्या अंधारात (मराठा किल्लेदार) किल्ल्याच्या बाहेर पडला. (मासिरे आलमगिरी पृ. १०८). 

खेळणा उर्फ विशाळगडाचे नाव ' सकरलना ' असे ठेवण्यात आले. (बहु असोत सुंदर पृ. १४७) 

औरंगजेब बादशहाने दिनांक ८ जून १७०२ (ज्युलियन दिनांक) या दिवशी किल्ल्यास भेट दिली (बहु असोत सुंदर पृ. १४७) व पुढील व्यवस्था लावून मुहरम महिन्याच्या पंचवीस तारखेस (दिनांक १० जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) आपल्या सैन्यासह बहादूरगडाकडे कूच केले. (मासिरे आलमगिरी पृ. १०९). यावेळी त्याने सर्व सहभागी सरदार, मनसबदार यांना गौरविले, बक्षिसे दिली, त्यांच्या मनसबीत, हुद्द्यांमध्ये वाढ केली. विशाळगड हस्तगत करून मोगल परत फिरले खरे पण त्यांची विशाळगड मोहीम मात्र अजून संपली नव्हती कारण .... पाऊसकाळ सुरु झाला होता. 

विशाळगड मोहीम व पावसाळा - 

बादशहा विशाळगडावरून सुमारे तीन कोस पुढे आंबा घाटात आला होता. पाऊस सुरु झाला होता. परतीच्या प्रवासाबद्दल साकी मुस्तैदखान लिहितो " घाटाचा रस्ता उन्हाळ्यात पार करण्यास मोगल सेनेला जर कित्येक दिवस लागले असतील, तर रात्रंदिवस पाऊस पडत असता हा रस्ता आक्रमण्यास किती काळ लागला याची कल्पनाच केलेली बरी. सामान वाहून नेणाऱ्या जनावरांची स्थिती काय वर्णावी ! उंटांनी तर जणू शपथच घेतली होती की आम्ही पुन्हा म्हणून या प्रदेशात पाऊल ठेवणार नाही. लष्करातील बैल गुजरातेत तर गाढवे खुरासानात पळून गेली. हत्तीला आपल्या शरीराचा व शक्तीचा फार गर्व. त्या धुंदीत तो चालत असता गाढवाप्रमाणे चिखलात रुतून बसू लागला. लष्कराचे सामान माणसांना वाहून न्यावे लागले. ही माणसे होती ? छे, हे तर बिन शेपटाचे बैल व गाढवे होती. आरामाची सवय असलेली माणसे कशीबशी घाटाच्या पार झाली पण सामान येणे बाकी होते. " कशीद आचे कशीद " म्हणजे मोगलांना जे भोगायचे नशिबी होते ते भोगावे लागले " (मासिरे आलमगिरी पृ. ११०). 

बादशहाने आंबा घाटात आठवडाभर मुक्काम करून १६ जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी पुढे कूच केले. वाटेत एक ओढा लागला. तो बादशहाने पार केला पण बाकीच्या सैनिकांना गिळायला त्याने जबडा उघडला. ज्यांना बुडून मरायचे होते ते बुडून मेले. ज्यांच्या नशिबी वाचणे होते ते वाचले. सैन्यास तेथे खूप वेळ थांबावे लागले. (मासिरे आलमगिरी पृ. १११). सरदार ओढा पार करून आले पण त्यांचे तंबू आदी सामान न आल्याने त्यांची कुचंबणा झाली. पुढे कूच केले असता पुन्हा तोच ओढा समोर उभा ! बादशहास व त्याच्या सामानास त्याने जाऊ दिले पण बाकीच्यांचे सामान मात्र ओढ्यात वाहून गेले. शेवटी दुसऱ्या वाटेने बादशहा मलकापुरास पोहोचला. (बहु असोत सुंदर पृ. १४९). 

याचे वर्णन साकी मुस्तैदखान करतो " तो प्रलयकाळच म्हणावा लागेल. लष्करात धान्याची महर्गता काय वर्णावी ? रुपयाला एक शेर भाव झाला. गवत व सरपण मुळीच मिळेना. पावसाचा शरवर्षाव तर निराधार सैनिकांच्या जीवाला त्रस्त करून सोडत होता. थंड व झोबणारे वारे तर माणसे व जनावरांचे प्राण हरण करत होते. सैन्यातील लोकांचे सर्व सामान नष्ट झाले होते. त्यामुळे त्यांना एक प्रकारची निश्चितता लाभली होती. हे सर्व काय होत आहे म्हणून लोक चकित झाले होते. " (मासिरे आलमगिरी पृ. ११२). मलकापूरहून पुढे चाल करताना आलेल्या ओढ्यावर, सतत पाऊस असल्याने व आलेल्या पुरामुळे बादशहास अडकून पडावे लागले. २७ जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजीची नोंद अशी " बादशहाने विचारले माझ्या निवासस्थानाभोवती चौकी-पहाऱ्यावर सरदारांपैकी कोणी आहे की नाही. उत्तर आले की प्रमुख सरदार ओढ्याकडे आहेत. बरेचसे मागे राहिले आहेत. " (बहु असोत सुंदर पृ. १४९) अखेर ब्रह्मपुरीच्या तळावरून आलेल्या हत्तीवर बसून बादशहाने ४ जुलै १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी ओढा पार केला. छावणीचे सामान, बादशहाच्या पालख्या, मेणे ओढ्यापलीकडे पडले होते. ४ जुलै १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी नोंद आहे " बादशहा हत्तीवरून आला. नोकरांनी मेणा हत्तीजवळ आणला. बादशहास मेण्यात बसायचे होते. हत्तीला खाली बसवण्यात आले व त्यावरून बादशहा मेण्यात बसतो तोच हत्तीवरील अंबारी घसरून मेण्यावर आदळली. मेण्याचा चक्काचूर झाला. सुदैवाने बादशहा वाचला. बादशहास राहण्यास न्यायकचेरीचा लहान तंबू मिळाला. (बहु असोत सुंदर पृ. १५०). 

यापुढे आलेल्या ओढ्याने तर अजून फजिती केली. बादशहाचा एक हत्ती खजिना घेऊन ओढा ओलांडत होता. त्यात ३,००० अश्रफया (सुमारे एक लाख रुपये) होत्या. ओढा ओलांडताना तो खजिना पुराच्या पाण्यात पडला व वाहून गेला. तो शोधण्यासाठी पाणबुड्यानी पाण्यात उतरून तपास केला पण व्यर्थ. पुढे एकूण ८७५ अश्रफया फकीरांकडून मिळाल्या. बाकी वाहून गेल्या. (बहु असोत सुंदर पृ. १५०). ऐन पावसात मोगलांचे हे हाल होत असता मराठे मात्र बादशहाच्या छावणीत घुसून लुटालूट करत होते. मुक्काम हलल्यानंतर पिछाडी सांभाळण्यासाठी तरबियतखानाची नेमणूक झाली होती. त्याने बादशहास लिहून पाठवले " लष्करातील माणसे व सरंजाम मागे राहिला आहे. मराठ्यांनी विलक्षण उच्छाद मांडला आहे आणि आपण कूच करत पुढे चालला आहात. " मागच्या मुक्कामी राहिलेला सरंजाम, सामान मराठे लुटीत होते. आंबा घाटात मागे राहिलेल्या इमामुद्दीन खानावर हल्ला करून त्यास ठार मारून मराठ्यांनी त्याचे जवळील सारे सामान लुटले. (बहु असोत सुंदर पृ. १५१). 

पन्हाळ्याच्या जवळ आल्यावर पावसाने पाठलाग थांबविला. सूर्यदर्शन झाल्याने लोकांचा उदासपणा दूर झाला. अश्या प्रचंड हालअपेष्टा सोसून, दिनांक १० जून १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी विशाळगडाच्या पायथ्यापासून कूच करून, एक महिना व सतरा दिवसांचा चवदा कोसांचा खडतर प्रवास करून, दिनांक २६ जुलै १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी बादशहा आपल्या सैन्यासह पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचला व पुढे रबिलावल महिन्याच्या पंधरा तारखेस (दिनांक २९ जुलै १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) पन्हाळ्याजवळ वडगाव येथे पोहोचला. तेथे त्याने एक महिना वीस दिवस मुक्काम केला. (मासिरे आलमगिरी पृ. ११३). तेथून पुढे रबिलाखर महिन्याच्या चोवीस तारखेस (दिनांक ६ सप्टेंबर १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) बहादूरगडाकडे रवाना झाला. येथेही वाटेत पाऊस सुरु असल्याने कृष्णा नदीस पूर आला होता. बादशहाच्या देखरेखीखाली मोगलानी कृष्णा ओलांडली व ते अकलूज मार्गे बहादूरगडास पोहोचले. तेथे रजब महिन्याच्या तेवीस तारखेपर्यंत (दिनांक २ डिसेंबर १७०२ (ज्युलियन दिनांक) पर्यंत) सैन्याचा मुक्काम होता. (मासिरे आलमगिरी पृ. ११४) 

विशाळगड मोहिमेचा आढावा – 

मोहीम सुमारे ९ महिने चालली. सह्याद्रीचा अतिदुर्गम प्रदेश, मराठ्यांचा पराक्रम व पावसाळा यामुळे मोगलांचे फार नुकसान झाले. समकालीन इटालियन प्रवासी मनुची म्हणतो " खेळण्याच्या वेढ्यात औरंगजेबाचे सहा हजार मनसबदार (लहान - मोठे अधिकारी) मारले गेले. मराठ्यांचे हल्ले, (छावणीतील अन्नधान्याचा) दुष्काळ, प्रचंड पाऊस आणि रोगराईची भयंकर साथ यामुळे मोगलांचे अर्धे सैन्य मोहिमेत नष्ट झाले. मराठ्यांनी त्याचे अधिकाधिक नुकसान केले. शेवटी शस्त्रांचा उपयोग होत नाही हे पाहून पैशांचा उपयोग केला व खेळणा घेतला. " या मोहिमे दरम्यान व एकूणच मोगल सैन्याचा आत्मविश्वास किती खचला होता हे कथन करताना मनुची म्हणतो " बादशहास एक लक्षात आले की मराठ्यांचे यश त्यांच्या चपळ घोडदळामुळे आहे. त्यांना उत्तर म्हणून त्याने १५,००० उंट व त्यावरील सशस्त्र, कसलेले स्वार यांचे सैन्य उभारायचे ठरवले. पण त्याची अडचण एकच होती. एकवेळ सशक्त उंट मिळतील व त्यावर बसणारे तरबेज शिपाई मिळणे कठीण. " (असे होते मोगल पृ. ३२१, ३२२). 

भीमसेन सक्सेना म्हणतो " बादशाही सैन्यातील हत्ती, घोडे, उंट बेसुमार मरण पावले. लष्करात धान्य मिळेनासे झाले. तंबू, डेरे, राहुट्या नष्ट झाली. कित्येक माणसे मरण पावली. मराठ्यांनी अनेकांना पूर्णपणे नागवले. " (बहु असोत सुंदर पृ. १५२) 

विशाळगड मोहिमेदरम्यान महाराणी ताराबाई प्रतापगडावर होत्या व सरदारांना पत्रे लिहून मोगलांविरुद्ध चाललेल्या संग्रामात सहभागी होण्यास प्रोत्साहन देत होत्या. सन १७०२ मधील एका पत्रात महाराणी ताराबाई प्रतापराव मोरे यांना लिहितात " तुम्ही व पांढरे यांनी मलकापुरानजीक औरंगजेबाची चौकी मारली. आता तो विशाळगडास भिडला असता त्याच्या गोटांवर हमेशा हल्ले करावे तरी तो बलकुबल (घाबरून) राहील. अवघे इकडील एक होऊन त्यावर हल्ले कराल तर तो विशाळगडाचा ख्याल सोडील " (करवीर रियासत पृ. ७०) याच आत्मविश्वासाने पुढे अवघ्या पाच वर्षात मराठ्यांनी आपला एकही माणूस न गमावता विशाळगड परत जिंकून घेतला. 

सिंहगड, राजगड आणि तोरणा मोहीम – डिसेंबर १७०२ ते मार्च १७०४ 

रजब महिन्याच्या चोवीस तारखेस (दिनांक ३ डिसेंबर १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) औरंगजेब बादशहाने मोगल सैन्यासह बहादूरगडाहून कूच केले व तो शाबान महिन्याच्या अठरा तारखेस (दिनांक २७ डिसेंबर १७०२ (ज्युलियन दिनांक) रोजी) सुमारे २५ दिवसांचा प्रवास करून कोंडाणा उर्फ किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचला. तरबियातखानाच्या नेतृत्वाखाली तोफखान्याच्या लोकांनी तट, बुरुज यावर मारा करून मराठ्यांना पिटाळले. (मासिरे आलमगिरी पृ. ११५). सेनापती धनाजी जाधव व बालाजी विश्वनाथ भेट यांनी सिंहगडाच्या बचावासाठी प्रयत्न केले. शेवटी किल्लेदारास ५०,००० रुपये देऊन सिंहगड मोगलानी ताब्यात घेतला. (करवीर रियासत पृ. ६९). सुमारे ३ महिन्यांच्या लढाईनंतर, जिल्हज महिन्याच्या दोन तारखेस (दिनांक ८ एप्रिल १७०३ (ज्युलियन दिनांक) रोजी) सिंहगड ताब्यात घेतला. किल्ल्याचे नाव " बक्षींदाबक्ष " ठेवण्यात आले. (मासिरे आलमगिरी पृ. ११५) 

पुरंदर हस्तगत करून बादशहाने त्यास नाव दिले अजमगड. (मराठी रियासत २ पृ. २७२) 

सिंहगडानंतर राजगड जिंकून घ्यावा अशी बादशहाची इच्छा होती. पण पावसाळा आल्याने त्याने पुणे उर्फ मुहियाबाद येथे, मे १७०३ ते ऑक्टोबर १७०३ असा सहा महिने मुक्काम केला. रजब महिन्याच्या बारा तारखेस (दिनांक १० नोव्हेंबर १७०३ (ज्युलियन दिनांक) रोजी) औरंगजेब बादशहाने मोगल सैन्यासह पुण्याहून कूच केले व तो राजगड जिंकण्यासाठी मार्गक्रमण करू लागला. वाटेतील गगनचुंबी डोंगर व भयंकर चढ - उतार असलेला घाट ओलांडून रजब महिन्याच्या तीस तारखेस (दिनांक २८ नोव्हेंबर १७०३ (ज्युलियन दिनांक) रोजी) तो ससैन्य राजगडाच्या पायथ्याशी पोहोचला. (मासिरे आलमगिरी पृ. ११६) 

साकी मुस्तैदखान राजगडाचे वर्णन करताना म्हणोत " राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यात श्रेष्ठ होय. त्याचा घेर बारा कोसाचा. त्याच्या मजबूतीची व उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच वाट मिळू शकते. शिवाजीने आदिलशाही सुलतानाच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून त्याभोवती तीन तट बांधले. हे तीन तट म्हणजे तीन किल्लेच आहेत. सुहेली, पद्मावत, सेजोली (सुवेळा, पद्मावती, संजीवनी या तीन माच्या) या तीन किल्ल्यांची व भक्कम तटबंदीने हा किल्ला जिंकणे अशक्य आहे. " (मासिरे आलमगिरी पृ. ११६) 

बादशहाने दिनांक २ डिसेंबर १७०३ (ज्युलियन दिनांक) रोजी हमीदुद्दीनखान बहादूर व मीर आतिश तरबियतखान यांच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्यास किल्ला जिंकण्यास सांगितले. दोन्ही सेनापतींनी पद्मावतीच्या बाजूने किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली. बाजूच्या सोंडेवर तटाएवढ्या उंचीचा दमदमा बांधून त्यावरून तोफांचा मारा सुरु केला. सुमारे तीन महिने ही धुमश्चक्री सुरु होती. ६ फेब्रुवारी १७०४ (ज्युलियन दिनांक) रोजी मोगल बुरुजावर चढले व चिलखती भिंतीपर्यंत गेले. किल्ल्यातून मराठ्यांनी तोफा, बंदुका, बाण, दगडधोंडे याचा सतत मारा केला. यात मोगलांचे अनेक लोक ठार झाले. शेवटी रहुल्लाखानाच्या मध्यस्थीने बादशहाने मराठ्यांशी वाटाघाटी केल्या व १६ फेब्रुवारी १७०४ (ज्युलियन दिनांक) रोजी राजगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. किल्ल्याचे नाव " नबिशाहगड " असे ठेवण्यात आले. (मासिरे आलमगिरी पृ. ११७). 

राजगड घेताच मोगल लगेच तोरण्याकडे वळले व २३ फेब्रुवारी १७०४ (ज्युलियन दिनांक) रोजी त्यांनी तोरण्याजवळ छावणी केली. मोगलानी तोरण्यास वेढा घालायला सुरुवात केली. तरबियतखान किल्ल्याच्या दरवाजासमोर मोर्चेबांधणी करत होता तर महंमद अमीन खानबहादूर याने किल्ल्याबाहेर पडणाऱ्या वाटा रोखून धरल्या. अमानुल्लाखान याने सांगितल्याप्रमाणे १० मार्च १७०४ (ज्युलियन दिनांक) च्या रात्री २० - २५ सैनिक दोराच्या सहाय्याने तटावर चढून किल्ल्यात दाखल झाले व त्यांनी लढाईस सुरुवात केली. पाठोपाठ इतर सैनिकही चढले व तोरणा किल्ला मोगलानी आपल्या पराक्रमाने, लढून जिंकला. तोरणा किल्ल्याचे नाव " फुतूहुलगैब (दैवी विजय) " असे ठेवण्यात आले. (मासिरे आलमगिरी पृ. ११८). 

आता प्रमुख किल्ले बादशहाने आपल्या ताब्यात आपणले होते. 

या कालावधीत मराठ्यांचे इतर शत्रू काय करीत होते. कोकणपट्टीत जंजिऱ्याचा सिद्दी मोगलांना सैन्याची मदत करत होता. त्याचेही ३ - ४ हजार सैनिक या किल्लेमोहिमेत मराठ्यांविरुद्ध सामील झाले होते. तसेच मोगलांच्या गलबताना संरक्षण देणे, त्यांचे साहित्य एका बंदरातून दुसऱ्या बंदरात पोहोचवणे अशी मदत तो मराठ्यांविरुद्ध करत होता. परंतू रामचंद्रपंत व धनाजी जाधव मोठ्या फौजेसह कोकणात उतरून सिद्दीशी लढाया करत होते. कान्होजी आंग्रे आपल्या आरमारी शक्तीने पोर्तुगीज, सिद्दी, मोगल याना त्रस्त करत होते. 

या दरम्यान पोर्तुगीजांचे धोरण मात्र धूर्तपणाचे होते. दिखाव्यासाठी ते मराठ्यांना विरोध करत होते पण अंतस्थपणे मराठ्यांशी सबुरीने घेत होते. गोव्याच्या व्हॉईसरॉयच्या पत्रव्यव्हारात याविषयी बरीचशी कल्पना येते. त्याचा आशय असा - एकीकडे ते " मराठ्यांशी तह करू नका. ते बादशहाचे शत्रू आहेत. औरंगजेब बादशहा हा आशिया खंडातील सर्वात बलाढ्य राजा आहे. त्यास दुखवू नका. " असे म्हणत व मोगलांकडून, मराठ्यांविरुद्ध आलेल्या दारुगोळा व सैनिकांच्या मागणीस " बादशहाच्या मदतीस जाण्यास आम्हास आनंदच झाला असता. पण सर्वत्र शत्रू (मराठे) पसरला असल्याने कुमक पाठवू शकत नाही " असे उत्तर देत. तर दुसरीकडे मराठ्यांना पाठवलेल्या पत्रात " शत्रूवर (मोगलांवर) मोठा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन ! असेच मोठे यश मिळो " तसेच " उभय पक्षामध्ये (मराठे व पोर्तुगीज) सलोखा व्हावा अशीच आपली इच्छा आहे व त्यास आमची कोणतीही आडकाठी नाही. नवीन तह न होताच (नवीन तह केला व तो औरंगजेबास कळला तर ते महागात पडेल म्हणून) जुन्या तहाप्रमाणेच मैत्रीचे संबंध जुळत असतील (मराठे व पोर्तुगीज) तर ते फायद्याचे आहे. कारण, मोगलानी मराठ्यांची जी ठाणी घेतली होती ती त्यांनी परत घेण्यास प्रारंभ केला आहे " असे म्हणत. यारीतीने तळकोकणात मराठे, मोगल, पोर्तुगीज, खेमसावंत भोसले यांच्या सतत कुरबुरी चालू असल्या तरी मराठे व पोर्तुगीज यांनी एकमेकांशी सलोखा ठेवला होता. (ताराबाई कालीन कागदपत्रे पृ. १६४, १६५, १६९, १७०) 

औरंगजेब बादशहाच्या इ.स. १७०० ते इ.स. १७०४ या चार वर्षातील किल्ले मोहिमेचा कालपट असा - 

२५ नोव्हेंबर १६९९ - मोगलानी वसंतगड किल्ला घेतला. नामकरण केले – किली दे फतह 

२१ एप्रिल १७०० - मोगलानी सातारचा किल्ला घेतला. नामकरण केले - आझमतारा 

९ जून १७०० - मोगलानी परळीचा किल्ला (सज्जनगड) घेतला. नामकरण केले - नवरसतारा 

२८ मे १७०१ - मोगलानी पन्हाळा किल्ला व पावनगड घेतले. नामकरण केले - बनीशाहदुर्ग व शाहबनीदुर्ग 

६ जून १७०१ - मोगलानी वर्धनगड घेतला. नामकरण केले - सादिकगड 

जुलै १७०१ - मोगलानी नांदगिरीचा किल्ला घेतला. नामकरण केले - नामगीर 

ऑक्टोबर १७०१ - मोगलानी चंदन व वंदन किल्ले घेतले. नामकरण केले - मिफ्ताह व मफ्तह 

४ जून १७०२ - मोगलानी विशाळगड घेतला - नामकरण केले - सकरलना 

८ एप्रिल १७०३ - मोगलानी सिंहगड घेतला. नामकरण केले – बक्षींदाबक्ष 

मार्च - एप्रिल १७०३ - मोगलानी पुरंदर घेतला. नामकरण केले – अजमगड (मराठी रियासत २ पृ. २७२) 

१६ फेब्रुवारी १७०४ - मोगलानी राजगड घेतला - नामकरण केले - नबिशाहगड 

१० मार्च १७०४ - मोगलानी तोरणा घेतला - नामकरण केले – फुतूहुलगैब 

मार्च - एप्रिल १७०४ - मोगलानी लोहगड घेतला. (मराठी रियासत २ पृ. २७२) 

वरील पैकी राजगड, वसंतगड, पन्हाळा, लोहगड, सिंहगड, पावनगड, सातारा असे किल्ले १७०४ - १७०५ सालात शंकराजी नारायण , परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी व सरदारांनी मोगलांकडून फिरून परत जिंकून घेतले. (मराठी रियासत २ पृ. २७३) 

किल्ले मोहिमेची फलश्रुती - 

या किल्लेमोहिमेत, औरंगजेबाने इ.स. १७०० ते इ.स. १७०४ या चार वर्षांच्या कालावधीत लहान-मोठे असे १५ किल्ले ताब्यात घेतले. पैकी फक्त तोरणा मोगलानी लढून घेतला. बाकीचे वेढा घालून, सैन्यास दमवून व शेवटी मोठ्या रकमा देऊन कबजात आणले. सर्वात महत्वाचे म्हणजे ते सर्व किल्ले बादशहाची पाठ वळताच हातचे गेले. मराठ्यांनी फिरून जिंकून घेतले. बादशहाला कोठेही टिकाऊ यश मिळू शकले नाही. (करवीर रियासत पृ. ७०). 

भीमसेन सक्सेना, मनुची, खाफीखान या समकालीन व बादशहाच्या मोहिमेत त्याच्याबरोबरीने वावरलेल्या व्यक्तींनी त्यांची मते आपापल्या ग्रंथात पुढीलप्रमाणे लिहली आहेत - " बादशहा काफरांचे किल्ले घेण्यात गुंतला होता पण मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी याचा काहीच उपयोग झाला नाही. मराठ्यांनी मात्र तो दुर डोंगराळ मुलुखात (अडकला) आहे हे पाहून मोठमोठी सैन्ये घेऊन त्याच्या प्रदेशात आक्रमणे केली. बादशहाच्या या हट्टापायी त्याचे राज्यकारभाराकडे, प्रजाहिताकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे देशाची (मोगल साम्राज्याची) स्थिती भयंकर झाली. मराठ्यांचा जोर वाढला. त्यांना अडवणे कुणाच्यानेही होत नाही. मराठे धाडसाने बादशहाच्या छावणीभोवती आक्रमण करू लागले. (करवीर रियासत पर. ७६) 

या किल्ले मोहिमेत मोगलांचे सैन्य, अधिकारी व बादशहा एकेका किल्ल्यासमोर अडकून पडले. त्यामुळे कर्नाटक, विजापूर, गोवळकोंडा, विदर्भ, खानदेश, वऱ्हाड, गुजरात, माळवा असा प्रचंड मोठा दक्षिणोत्तर मुलुख मराठ्यांना संचारासाठी मोकळा पडला. या मुलुखात मराठ्यांना थोपवण्यास मोगलांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी मराठ्यांनी खंडणी, चौथ, सरदेशमुखी वसूल करायचा सपाटा लावला. मराठे मोगलांच्या मुलुखात सैन्यासह ठाण मांडून बसू लागले. ताब्यात आलेले किल्ले बादशहाच्या डोळ्यादेखत परत मराठ्यांच्या ताब्यात जाऊ लागले. (श्री छत्रपती नी त्यांची प्रभावळ पृ. १७४). 

मराठ्यांचे खूप सरदार आहेत. त्यांची सैन्ये तोफा, धनुषय बाण, बंदुका, हत्ती, उंट यांनी युक्त आहेत. त्यांची संख्या आता दोन लाखाच्यावर असावी. ते मोगलांशी सतत व आत्मविश्वासाने लढत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. ते मोगलांची भीती न बाळगता त्यांच्या साम्राज्यात विजेत्याप्रमाणे मोहीम करत आहेत व भरपूर संपत्ती हस्तगत करत आहेत. (इ. स. १७०४ चा सुमार. इकडे औरंगजेब तोरणा घेत होता तर तिकडे) मराठे ग्वाल्हेर किल्ल्याच्या जवळ गेले होते. ते आग्रा घेतील की काय अशी बादशहास भीती वाटली. मराठे माळवा प्रांतातून परत फिरले. (असे होते मोगल पृ. ३२७) 

महाराणी ताराबाई व समस्त मराठा अधिकाऱ्यांच्या मुत्सद्दी धोरणांमुळे मोगलांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. जसे - किल्ल्यातील रसद संपेपर्यंत मोगलांना अडकवायचे, दमवायचे आणि शेवट भारी भक्कम रक्कम घेऊन शरण यायचे व किल्ला देऊन टाकायचा. यामुळे मोगलांचे, युद्धसाहित्य, मनुष्यबळ, पैसा व सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचे अतोनात नुकसान झाले. मोगलानी तो किल्ला जिंकून तेथे रसद पुरवठा, युद्धसाहित्य पुरवठा करून किल्ला सज्ज केला की मराठे तो फिरून परत घ्यायचे. तोही वेळ व माणूस जाया होऊ न देता. गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून मोगलांच्या पिछाडीवर हल्ले करून त्यांचे साहित्य, सरंजाम, खजिना, रसद लुटायची व त्यांना हतबल करायचे. - यामुळे एकीकडे मराठ्यांचे बळ वाढत गेले तर मोगलांची शक्ती क्षीण होत गेली. 

अशारितीने, जिल्काद महिन्याच्या तेवीस तारखेस, १७ एप्रिल १७०४ (ज्युलियन दिनांक) रोजी बादशहाने आपली सिंहगड - तोरणा - राजगड किल्ले मोहीम संपवली आणि तो जुन्नरकडे रवाना झाला. खेड येथे त्याने पाऊसकाळात साडेसात महिने मुक्काम केला. नंतर तेथून तो " वाकिनखेडा " येथील मोहिमेसाठी रवाना झाला. (मासिरे आलमगिरी पृ. ११९). 

भीमसेन सक्सेना याने एकूणच मोगलांची झालेली भयानक दैना खालील शब्दात व्यक्त केली आहे 

" न रुये मर्दी , न जाये सतेज 

न इन्कान बूदन , न पाये गुरेज ! 

-- शौर्य दाखवण्याची संधी नाही , लढण्याला अवसर राहिला नाही. टिकून राहणे शक्य नाही आणि पळण्यास शक्ती नाही. " (करवीर रियासत पृ. ७७) 

लेखन सीमा 

-- राहुल शशिकांत भावे / २१ डिसेंबर २०१८ 

संदर्भ ग्रंथ - 

१. मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान (अनुवाद - सर जदुनाथ सरकार) 

२. बहु असोत सुंदर - सेतू माधवराव पगडी 

३. मराठी रियासत खंड २ - उग्रप्रकृती संभाजी व स्थिरबुद्धी राजाराम - गोविंद सखाराम सरदेसाई 

४. करवीर रियासत - स. मा. गर्गे 

५. शिवछत्रपती नि त्यांची प्रभावळ - सेतू माधवराव पगडी 

६. ताराबाई कालीन कागदपत्रे - डॉ. अप्पासाहेब पवार

1 comment: