सन १६९९ चा पावसाळा औरंगजेबाचा मुक्काम सोलापूरनजीक ब्रह्मपुरी येथे भीमा नदीच्या काठी होता. बादशाही छावणी गेले चार साडे चार वर्षे इथेच होती. औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेला आता सतरा वर्षे उलटून गेली होती. अनेक जय पराजय झाले होते, पण मोहिम यशस्वी म्हणता येईल का? मराठ्यांविरुद्ध मोहिमेला १६८२ साली सुरुवात झाली होती. पण पहिल्या रामसेज किल्ल्यानेच पाच वर्षे झुंजविले. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे औरंगजेब विजापूर गोवळकोंड्याकडे वळला. एकेका वर्षात त्याने आदिलशाही व कुतुबशाही गिळंकृत केली. पण इकडे मराठे दाद देत नव्हते. पण १६८९ साली एका बेसावध क्षणी छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हाती लागले. त्यांच्या दुर्दैवी अंताने मोहिम यशस्वी झाली असे वाटत असतानाच राजाराम महाराज जिंजीला निसटले व मोहिमेची व्याप्ती दख्खन प्रांतातून सुदूर कर्नाटक प्रांतापर्यंत वाढली. जिंजीला नऊ वर्षे वेढा दिला पण हाती म्हणावं असं यश आलंच नाही. जितक्या सुखरुपतेने राजाराम महाराज जिंजीस पोहोचले तितक्याच सुखरुपतेने ते परत महाराष्ट्रात आले व त्यांनी सातारा येथे नवी राजधानी स्थापन केली.
औरंगजेब प्रयत्नांची शर्थ करत होता, पाण्यासारखा पैसा ओतत होता, पण त्याचे सैन्य मनाने खचले होते. त्यांना उत्तरेची आस लागली होती. तुरळक अपवाद वगळता त्याचे सरदार कामचुकार, लाचखाऊ झाले होते. सैन्य लढण्याची प्रेरणा गमावून बसले होते. ती प्रेरणा केवळ औरंगजेबाच्या मनात घर करून होती. तो अजूनही हार मानायला तयार नव्हता. त्याची जिद्द पहिल्या दिवसाइतकीच प्रबळ होती. या मोहिमेच्या अनुभवातून त्यास कळून चुकले होते कि मराठ्यांचे मर्मस्थान म्हणजे त्यांचे किल्ले. हे किल्ले काबीज केल्याशिवाय मराठे शरण येणार नाहीत. आजूबाजूच्या मरगळलेल्या वातावरणातही औरंगजेबाच्या मनाने उभारी घेतली होती आणि तो मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या मोहिमेवर निघाला. १९ ऑक्टोबर १६९९ या दिवशी त्याने ब्रह्मपुरी येथून कूच केले. त्यावेळी त्याचे वय होते ब्याऐंशी वर्षे.
वसंतगड
औरंगजेब पन्हाळ्याच्या दिशेने आगेकूच करीत होता कारण पन्हाळा हे मराठ्यांचे रायगडाखालोखाल सर्वात बळकट ठाणे होते. पण मिरज येथील मुक्कामी त्याचा विचार बदलला व त्याने आपला मोर्चा साताऱ्याच्या दिशेने वळवला, कारण सातारा हि मराठ्यांची राजधानी होती. मराठ्यांनी मोगलांविरुद्ध वऱ्हाड प्रांतात मोठी मोहिम उघडली होती. खुद्द राजाराम महाराज जालन्याच्या दिशेने निघाले होते. हि वेळ साधून सातारा काबीज करायचा औरंगजेबाचा मनसुबा होता. कराडवरून तो मसूर इथे आला. तेथून जवळच वसंतगड हा किल्ला होता. तो जिंकून घ्यायची आज्ञा आलमगीराने केली. तरबियतखान या सरदाराने मोर्चे लावले. गडावरून तिखट प्रतिकार होत होता. मोगली तोफगोळ्यांची बरसात होत होती. त्यातच औरंगजेबाने किल्ल्यानजीक कृष्णा नदीकाठी मुक्काम केला. त्याच्या तंबूनजीकच किल्ल्यावरून येणारे तोफगोळे पडत होते. पण औरंगजेब मागे हटायला तयार नव्हता. त्याच्या निर्धारापुढे किल्ल्यातील लोकांनी शरणागती पत्करली व अवघ्या चार दिवसात २५ नोव्हेंबर १६९९ या दिवशी किल्ला सर झाला. आपल्या मोहिमेला हा शुभशकून झाला अशी औरंगजेबाची खात्री पटली. त्याने किल्ल्याचे नाव बदलले व नवे नाव ठेवले ‘किलीदे फतह’ म्हणजे यशाची किल्ली. तेथून बादशाहाने साताऱ्याकडे कूच केले व ८ डिसेंबर १६९९ रोजी मोगल साताऱ्याच्या पायथ्याशी आले.
सातारा
बादशाहाची छावणी किल्ल्यापासून दोन मैल अंतरावर करंजा या गावी होती. मराठ्यांच्या या राजधानीला मोगलांचा विळखा पडला. औरंगजेबाने जातीने सर्वांच्या नेमणूका केल्या. किल्ल्याच्या पश्चिमेकडचा भाग शाहजादा आझम व खुदाबंदाखान यांच्याकडे होता. मंगळाई दरवाज्यासमोर होता तरबियतखान. त्याच्या उजवीकडे मुनामखान होता. दक्षिणेकडील दरवाज्यासमोर रहुल्लाखान बक्षी होता. त्याच्या बाजूला दख्खनी तोफखान्याचा प्रमुख मन्सूरखान होता. मोगलांनी ठिकठिकाणी तोफांचे मोर्चे उभारले व मारा सुरु केला. पण गोळे किल्ल्याच्या डोंगरावर आदळत होते व निकामी ठरत होते.
सुभानजी लावघरे हा किल्लेदार होता तर प्रयागजी प्रभू फणसे हा हवालदार होता. राजधानी असल्याने किल्ल्यावर भरपूर शिबंदी, तोफा, दारुगोळा, रसद होती. किल्ल्यावरून रात्रंदिवस कडवा प्रतिकार होत होता. त्याचप्रमाणे मोगलांच्या छावणीभोवती मराठे बाहेरून घिरट्या घालत होते व त्यांचे लचके तोडत होते. मोगलांच्या आक्रमणाचा अंदाज घेऊन मराठ्यांनी आधीच किल्ल्याभोवतीचा चाळीस मैलाचा प्रदेश जाळून उध्वस्त करून ठेवला होता. त्यामुळे मोगलांना चारा, वैरण, रसद मिळताना मारामार होती. त्यांची निम्मी शक्ती या कामीच खर्च होत होती व वेढ्याच्या कामात ढिलाई पडली. रसद गोळा करण्याच्या कामी रवाना झालेल्या मोगली तुकड्यांवर मराठे घाला घालत होते. किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मोगली सरदारांच्या आपापसातील दुहीचा फायदा उचलून मराठ्यांनी किल्ल्यावरपण एक दोनदा रसद पोहोचवली.
तरबियतखानाने चोवीस गज उंचीचे लाकडी दमदमे तोफांसाठी किल्ल्यासमोर उभे केले. त्यासाठी परिसरातील सगळी झाडे कापून ते लाकूड वापरले गेले. किल्ल्यावर तोफांचा भडीमार होऊ लागला. पण बऱ्याचदा तोफांचा नेम चुके व ते मोगलांवरच आदळत. ‘कडकबिजली’ नावाची मोगलांची एक तोफ होती. तिचा पल्ला इतका मोठा होता कि गोळे किल्ल्यावरून वळसा घेऊन मागील बाजूस मोगली छावणीवरच बरसू लागले. या भागात शाहजादा आझमची छावणी होती. तोफांचा प्रसाद मराठ्यांऐवजी मोगलांनाच मिळू लागला. त्यामुळे तोफांची सरबत्ती थांबवावी लागली. वसंतगडाप्रमाणे यावेळेसही बादशहा किल्ल्याजवळ छावणीत मुक्कामी होता. पण त्याच्या उपस्थितीनेही मोगलांना बळ येत नव्हते. तीन महिने झाले वेढा रेंगाळतच होता. त्यात एकच बातमी मोगली गोटात आनंद पसरवू शकली, ती म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूची. ५ मार्च १७०० या दिवशी सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. पण त्यांची पत्नी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी याच्या नावे राज्यकारभार हाती घेऊन मोगलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला.
वेढ्याला चार महिने उलटून गेले तरी काहीच प्रगती नव्हती. किल्ल्यावरून मराठे रात्रंदिवस बाण, बंदुका व दगड यांचा पाऊस पाडत होते. रात्री बेरात्री किल्ल्यावरून उतरून खाली येत व मोगलांचे मोर्चे मारत. बाहेरून मराठे लचके तोडत होते ते वेगळेच. औरंगजेबाने ठरविले कि सुरुंग लावून तट उडवून द्यायचा. त्याप्रमाणे तरबियतखानाने कामास सुरुवात केली. मंगळाई बुरुजाखाली चार गज लांब व दहा गज रुंद अशा दोन खोल्या तयार केल्या. त्यात ठासून दारू भरण्यात आली. हमिदुद्दिनखान बहादूर व मुखलीसखान बक्षी यांच्या नेतृत्वाखाली मोगली सैन्याच्या तुकड्या सुरुंगाच्या स्फोटाने उध्वस्त तटबंदीतून आत हमला करण्यासाठी सज्ज झाल्या. १३ एप्रिल १७०० या दिवशी सकाळी पहिल्या खोलीतील सुरुंगाला बत्ती दिली. कानठळ्या बसवणारा आवाज झाला. तटाची भिंत कोसळून किल्ल्याच्या आत पडली. अनेक मराठे ठार झाले. मोगलांना हे पाहून चेव चढला व ते किल्ल्याच्या दिशेने झेपावले. पण घात झाला. थोड्यावेळाने दुसऱ्या खोलीतील सुरुंगाचा स्फोट झाला व अजून तटबंदी ढासळली पण यावेळेस किल्ल्याची भिंत बाहेरील बाजूस कोसळली व हल्ला करण्यास सज्ज असलेली मोगलांची तुकडी त्याखाली गाडली गेली. दोन हजार सैनिक न लढताच मारले गेले. तटबंदीला खिंडार पडूनही मोगलांकडून हल्ला होईना कारण झाल्याप्रकाराची सर्वांना धास्ती बसली होती. तरीही काही मोगल पुढे सरसावले, पण एव्हाना सावध झालेल्या मराठ्यांच्या तावडीत सापडले. सुरुंगाच्या स्फोटातून वाचलेल्या मोगलांना मराठ्यांच्या तलवारींचा प्रसाद मिळू लागला. सर्व मेहनतीवर पाणी पडले.
यावेळी मात्र किल्ल्यावरील मराठ्यांचेही फार नुकसान झाले होते. दोन्ही स्फोटांनी सत्तर गज लांबीचा तट कोसळला होता. मनुष्यहानीही मोठी होती. दैव बलवत्तर म्हणून हवालदार प्रयागजी प्रभू फणसे बचावले. स्फोटातून उडालेले तीन दगड अशा रीतीने त्यांच्यावर कोसळले कि त्यांची एक नैसर्गिक पोकळी तयार झाली व त्यात हवालदार सुखरूप राहू शकले. नंतर झालेल्या शोधाशोधीत त्यांच्या अंगरख्याचा शेव दगडातून फडफडताना दिसला व त्यांना सुखरूप वाचवता आले.
दोन्ही बाजूंचे फार नुकसान झाले होते. आता किल्ला भांडवण्यात फार अर्थ उरला नव्हता. परशुराम त्र्यंबक यावेळी सज्जनगडावर होते. त्यांनी व किल्लेदार सुभानजी लावघरे यांनी शाहजादा आझमच्या मार्फत बोलणी सुरु केली. २१ एप्रिल १७०० या दिवशी पैशाच्या मोबदल्यात गड मोगलांच्या स्वाधीन झाला. किल्ल्यावरील शिबंदीला जीवदान देण्यात आले. आझमच्या मध्यस्थीने किल्ला सर झाला म्हणून बादशाहाने किल्ल्याचे नामकरण केले ‘आझमतारा’. किल्ला जिंकण्याचे शर्थीचे प्रयत्न केले तरबियतखानाने पण शेवटी श्रेय मिळाले शाहजादा आझम याला. राजधानी ताब्यात येऊनही मोगलांना किल्यावर फारशी लुट मिळाली नाही. मराठ्यांची एकेक राजधानी औरंगजेब जिंकला होता. अकरा वर्षांपूर्वी १६८९ साली त्याने रायगड ताब्यात घेतला. मग सात वर्षे वेढा घालून जिंजी जिंकली व आता चार पाच महिन्यांच्या वेढ्यानंतर सातारा. पण मराठ्यांचे राज्य मात्र शाबूतच होते. आता औरंगजेबाचा मोर्चा वळला जवळच्याच परळीच्या किल्ल्याकडे अर्थात सज्जनगड.
सज्जनगड
सज्जनगड काबीज करण्यासाठी बादशहाने रहुल्लाखान यास मीर मोर्चात म्हणजे वेढ्याचा सेनापती नेमले. त्याजसोबत चिनकिलीजखान फतेऊल्लाखान या सरदारांनी सज्जनगडाला वेढा घातला. पण मोगलांच्या दुर्देवाने या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली. गवत, चारा, सर्पण, धान्य यांची टंचाई निर्माण झाली. पण मोगलांनी निकराने वेढा सुरु ठेवला. किल्ल्याच्या लहान दरवाज्यासमोर एक खडक होता. तो ताब्यात आल्यास तेथून दरवाज्यावर तोफा डागता येतील असा बेत होता. त्यादृष्टीने
फत्तेऊल्लाखानाने खडकास शिड्या लावल्या. तेथे मराठे व मोगल यांची धुमश्चक्री सुरु झाली. मराठ्यांनी माघार घेतली व ते किल्ल्यात गेले. फतेउल्लाखानाला खडकाचा ताबा मिळाला. तेथे तोफा लावण्यासाठी सामानाची जमवाजमव सुरु झाली. त्यावेळी मराठ्यांनी किल्ल्यावरून बंदुकीचा मारा सुरु केला. त्यावाटेवर दारू भरून ठेवली होती. मराठ्यांनी त्याला आग लावली. त्या कल्लोळात साठ सत्तर मोगल कामी आले. नाईलाजाने मोगलांना खडकाचा ताबा सोडावा लागला. पुढे ७ जून १७०० रोजी मोगलांनी एक निकराचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मराठे व पाऊस यांजसमोर त्यांची डाळ शिजली नाही.
पाऊस आता कोसळू लागला होता. पण बादशहाही इरेला पेटला होता. या संधीचा फयदा घेऊन परशुराम त्र्यंबकने शाहजादा आझमशी बोलणी सुरु केली. पेसे घेऊन त्या मोबदल्यात किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. पण तत्पूर्वी त्यांनी एक महत्वाचे काम केले. सज्जनगड म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे स्थळ. येथील मंदिरात त्यांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या राम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती होत्या. त्या परशुराम त्र्यंबक यांनी ताब्यात घेतल्या व समर्थांच्या समाधीची जागा दगडांनी चिणून टाकली. जेणेकरून औरंगजेबाकडून त्याची विटंबना होऊ नये. औरंगजेबाने प्रथेप्रमाणे मुख्य देवळाला उपद्रव दिलाच व किल्ल्याला नवीन नावही दिले ‘नवरसतारा’
पावसापासून बचाव व्हावा या दृष्टीने औरंगजेबाने आपला मुक्काम भुषणगडाच्या पायथ्याशी हलवला. या भागात कमी पाऊस होतो. त्यामुळे मोगलांना आवश्यक असलेला आराम मिळाला. सज्जनगड ते येथील प्रवासात मोगलांचे प्रचंड हाल झाले. वाटेतील नद्यांनी रौद्र रूप धारण केले होते. त्या ओलांडताना मोगलांची तारांबळ उडाली. पाऊस उघडल्यावर मोगलांचा मुक्काम एका कोरड्या नदीपात्रात होता. ओक्टोबर महिन्यात एके रात्री वरच्या डोंगरात व खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला. पहाटे पाण्याचा लोंढा कोरड्या नदीपात्रात शिरला. निद्राधीन सेन्य सरळ प्रवाहात वाहून गेले. जे जागे झाले ते आरडाओरडा करत सेरावेरा पळू लागले. तंबू, डेरे, राहुट्या पाण्यावर तरंगू लागले. जनावरे, दाणा, वेरणे वाहून गेले. औरंगजेबाच्या कानावर हा आक्रोश आला. त्यास वाटले कि रात्रीच्या अंधाराचा फयदा घेऊन मराठ्यांनी छावणीवर हल्ला केला आहे. तो घाइघाईने बाहेर येऊ लागला. त्यासरशी पाय घसरून पडला व त्यास जबर मार लागला. या दुखण्याने तो कायमचा लंगडू लागला. अखेरच्या दिवसापर्यंत हे लंगडणे काही थांबले नाही. स्वतःला तेमूरलंगाचा वंशज म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या या बादशहाला महाराष्ट्राच्या रौद्र निसर्गाने खरोखरीचा तेमूरलंगाचा वंशज करून टाकले. तो तेमूरलंग लंगडा होता व हा त्याचा वंशजही अखेरीचे आयुष्य लंगडतच राहणार होता.
पन्हाळगड
पावसाळा ओसरल्यावर औरंगजेबाचा रोख पन्हाळगडाच्या दिशेने झाला. त्याने आपला नातू बेदारबखत व झुल्फिकारखानाला पन्हाळ्यावर रवाना केले. तरबियतखान, राव दलपत बुरेला यांनी किल्ल्याच्या दरवाज्यापाशी मोर्चेबांधणी केली. औरंगजेब जानेवारी १७०१ मध्ये मिरज मुक्कामी होता. तेथे धनाजी जाधवाने बादशाही छावणीवर मोठा हल्ला चढवला. तुंबळ युध्द झाले. मोगलांचे भरपूर नुकसान करून करून मराठे माघारी वळले. याचा वचपा म्हणून हमिदुद्दीनखानाने मराठ्यांवर हल्ला केला. पण त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. फेब्रुवारी १७०१ मध्ये मराठ्यांनी पन्हाळ्याला वेढा घालून बसलेल्या मोगलांवर बाहेरून हल्ला केला. मोगलांची बरीच रसद मारली गेली. अनेकप्रकारे त्यांचे नुकसान झाले. मार्च १७०१ मध्ये औरंगजेबाने आपला मुक्काम मिरजेहून हलवला व कोल्हापूर मार्गे तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला. आता वेढ्याला अधिक जोम आला. या वेढ्यात ठिकठिकाणी चौक्या, पहारे, ठाणी नव्याने बसविण्याचे फर्मान सोडले गेले. याची नीट अंमलबजावणी होते कि नाही हे बादशहा स्वतः जातीने पाहू लागला. बादशहा तख्ते खांवर बसून सेपूर्ण वेढ्यातून हिंडू लागला.
इकडे मराठेही स्वस्थ बसले नव्हते. रात्री अपरात्री त्यांचे छापेसत्र सुरूच होते. किल्ल्यातून रात्रीबेरात्री खाली येऊन मराठे तोफांचे नुकसान करीत. किल्ल्याबाहेरील मराठे वेढ्याच्या बाहेरून घिरट्या घालून मोगलांची रसद मारत होते. त्यांच्या बंदोबस्तावर मोगली सरदार रवाना झाल्याने वेढा सेल पडत होता. मराठे दाद देत नव्हते. पण जसजसा पाऊस जवळ येत गेला तसा मोगलांनी वाटाघाटींचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली. पंचावन्न हजार रुपयांचा मोबदला घेऊन मराठ्यांनी पन्हाळगड व पावनगड मोगलांच्या हवाली केला. २८ मे १७०१ रोजी किल्ले मोगलांकडे आले. त्यांची नवी नवे दिली गेली. ‘बनीशाहदुर्ग’ व ‘शाहबनीदुर्ग’. दोन पावसाळ्यादरम्यानची हि मोहिम पूर्णपणे पन्हाळ्यावरून केंद्रित झाली होती. अर्थात पन्हाळा आहेच तेवढा तालेवार . सात आठ महिन्यांच्या प्रदीर्घ मोहिमेंनंतर पराक्रमाने नव्हे तर पैसें चारून का होईना पन्हाळा ताब्यात आलाच.
पन्हाळा ताब्यात आल्यावर औरंगजेब त्वरेने खटावकडे निघाला. पाऊस सुरु व्हायच्या आत त्याला त्या परिसरातून बाहेर पडायचे होते. पण पावसाने त्याला गाठलेच. प्रचंड मोठ्या वादळात संपूर्ण छावणी अडकली. तेथून कसेबसे सगळे बचावले. खटाव मुक्कामी कमी पावसाच्या प्रदेशातही औरंगजेब स्वस्थ बसला नव्हता. ६ जून १७०१ या दिवशी फतेउल्लाखान याने वर्धनगड जिंकून घेतला. त्या सरदाराला ‘सादिक’ हि पदवी देऊन वर्धनगडाचे नामकरण केले ’सादिकगड’. बख्शी बहरामंदखानाने जुलैमध्ये नांदगिरी जिंकला. त्याच बारस झालं ‘नामगीर ‘ तर पुढे ओक्टोबरमध्ये त्याने चंदन वंदन हि किल्ल्यांची जोडगोळी जिंकली. त्यांची नवी नावे ठेवली गेली ‘मिफ्ताह व मफ्तह ‘. अर्थात हे किल्लेही मोगलांनी मनगटाच्या जोरावर न जिंकता पैशाच्या जोरावरच हासील केले होते.
दोन वर्षाच्या मोहिमेत औरंगजेब घाटावरच्या कमी खडतर व बऱ्याचशा सपाटीवरील मुलूखातून घोडदौड करीत होता. आता पावसाळा ओसरल्यावर त्याच्या नजरेसमोर होता खेळणा उर्फ विशाळगड कारण सातार्यानंतर विशाळगड हि मराठ्यांनी आपली राजधानी केली होती. पण हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य डोंगरधारेत आहे. निबिड अरण्याने वेढलेल्या अक्राळविक्राळ मुलुखात मोगल आता पाऊल टाकणार होते. पुढील काळच त्यांची कसोटी पाहणार होता.
अमोल मांडके
२४ नोव्हेंबर २०१८
संदर्भ
१. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) – छत्रपती राजाराम व ताराबाई – प्रा. श. श्री. पुराणिक
२. मराठी रियासत – खंड २ – उग्रप्रकृती संभाजी व स्थिरबुद्धी राजाराम – गोविंद सखाराम सरदेसाई
३. महाराज्ञी येसूबाई - डॉ. सदाशिव शिवदे
४. छत्रपती राजाराम व ताराराणी – डॉ. सदाशिव शिवदे
No comments:
Post a Comment