दिनांक २ मार्च १७०० (जुलिअन दिनांक). सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा स्वर्गवास झाला आणि मराठी राज्य पुन्हा एकदा राजाविना पोरके झाले. शाहू राजे मोगलांच्या कैदेत होते आणि राजाराम महाराजांचे वारस लहान होते. इसवी सन १६८२ पासून स्वराज्यावर मोगलांचे परचक्र आले होते आणि त्यास प्रतिकार करता करता आता तब्ब्ल १८ वर्षे सरली होती. या कालावधीत मराठ्यांनी अतीव पराक्रम करून महत्प्रयासाने राज्य वाचवले होते.
मोगल बादशहा औरंगजेब मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या मोहिमेत गुंतला होता व किल्ले जिंकून त्यांचे वाचवलेले राज्य बुडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे, स्वराज्यकक्षेच्या बाहेर असलेल्या मोगल प्रदेशावरील प्रतिहल्ल्यांमुळे आता मोगलांवर मराठ्यांची सरशी होणार अशी स्थिती येत असतानाच छत्रपती राजाराम महाराज स्वर्गवासी झाले आणि मराठी राज्य पुन्हा निर्नायकी अवस्थेत गेले.
मोगल बादशहा औरंगजेब मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या मोहिमेत गुंतला होता व किल्ले जिंकून त्यांचे वाचवलेले राज्य बुडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे, स्वराज्यकक्षेच्या बाहेर असलेल्या मोगल प्रदेशावरील प्रतिहल्ल्यांमुळे आता मोगलांवर मराठ्यांची सरशी होणार अशी स्थिती येत असतानाच छत्रपती राजाराम महाराज स्वर्गवासी झाले आणि मराठी राज्य पुन्हा निर्नायकी अवस्थेत गेले.
मराठ्यांच्यातील दुही हा तर फारच चिंतेचा विषय निर्माण झाला होता. धनाजी जाधव व संताजीपुत्र राणोजी व संताजीबंधू बहिरजी घोरपडे यांच्यात वैमनस्य होऊन गोष्ट युद्धापर्यंत गेली. या परिस्थितीमध्ये कारभार हाती घेऊन महाराणी ताराबाईंनी मोगलास ७ वर्षे प्रखर झुंज दिली. (करवीर रियासत पृ. ५२)
या अवघड प्रसंगी रामचंद्र पंत अमात्यांनी सर्व सरदारांना पत्रे पाठवून ही बातमी कळवली आणि राज्य रक्षणासाठी सहाय्य्य करण्याचे आवाहन केले. त्यावर सर्व सरदारांनी याचे आश्वासन देऊन त्यांची खातरजमा केली. मराठी राज्य पुन्हा एकदा राजाराम महाराजांच्या निधनाने आता मराठी राज्य आपल्या ताब्यात येईल अशी खात्री झालेल्या बादशहा औरंगजेबाचा प्रतिकार करण्यास सज्ज झाले. (मोगलमर्दिनी ताराबाई पृ. ७७)
आता मराठेशाहीचे नेतृत्व आले छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी ताराबाई यांच्याकडे. त्यावेळी त्यांचे वय होते पंचवीस वर्षांचे. शिवरायांच्या तालमीत शिपायाचे सरदार झालेल्या महापराक्रमी सेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या. त्यामुळे पराक्रम त्यांच्या रक्तातच होता. मोगलांशी चाललेल्या आतापर्यंतच्या लढ्याचा आँखो देखा हाल त्यांना ठाऊक होता. रामचंद्रपंत अमात्यांनी पन्हाळगडावर महाराणी ताराबाईंनी भेट घेतली व पुढील राज्यव्यवस्था लावून दिली. दरम्यान सातारा, परळी (सज्जनगड) असे काही किल्ले ताब्यात घेऊन बादशहा औरंगजेब किल्ले मोहिमेत सर्व जोर लावत होता. लष्करी मोहिमांबरोबरच कपटनीतीचा अवलंब करून मराठ्यांच्यात फूट पडण्याचा उद्योग बादशहा औरंगजेब करत होता. त्याने स्वराज्याचे आधारस्तंभ रामचंद्रपंत अमात्य व परशुराम पंत प्रतिनिधी यांनाही आपल्या बाजूस येण्यासाठी धमकीवजा पत्रे लिहिली. परंतु याचा काहीएक उपयोग झाला नाही. (मोगलमर्दिनी ताराबाई पृ. ७८-८४)
यथाविधी राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी राजे यांची मुंज होऊन पन्हाळगडावर शके १६२० ज्येष्ठमासात राज्याभिषेक झाला. राजांचे वय दहा वर्षे असल्याने सर्व राज्यकारभार महाराणी ताराबाईंच्या अखत्यारीत आला. (मोगलमर्दिनी ताराबाई पृ. ८८)
कारभारास सुरुवात -
मोगलानी मराठ्यांची राजधानी असलेला सातारा किल्ला ताब्यात घेतला आणि इकडे महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर नवी राजधानी स्थापन करून कारभार हाती घेतला. सर्वप्रथम अष्टप्रधानांची नियुक्ती केली. सर्व आधीचे तसेच ठेवून फक्त प्रतिनिधीपद तिमाजी रघुनाथ हणमंते यांच्याकडून परशुराम त्रिंबक यांच्याकडे दिले. आपली सवत राजसबाई व पुत्र सांभाजी राजे याना नजरकैदेत ठेवले. आपण स्वतः स्वराज्यातील किल्ल्यांचा बंदोबस्त करण्याकरता जातीने बाहेर पडल्या. (मोगलमर्दिनी ताराबाई पृ. ९२). ताराबाई जबरदस्त उद्योगी होती. निरनिराळ्या किल्ल्यांवर फिरती राहून तिने ठिकठिकाणच्या बंदोबस्त केला. (मराठी रियासत)
महाराणी ताराबाईंनी राज्यकारभारासाठी प्रधानांच्या नेमणूक केल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडेच अमात्यपद कायम ठेवले गेले. सेनापतिपदावर धनाजी जाधव तर परशुरामपंत त्रिंबक याना प्रतिनिधी आणि शंकराजी नारायण याना सचिवपद देण्यात आले. (करवीर रियासत पृ. ५९)
मोगलांविरुद्ध मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात -
छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे स्वराज्याचा प्राण होता. सह्याद्रीतील एक एक किल्ला म्हणजे जणू एक एक राष्ट्रच होते. मोगलानी हे किल्ले जिंकायची मोहीम सुरु केली. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपल्या युद्धपद्धतीत बदल केला. मोगल जो किल्ला जिंकावयाचा प्रयत्न करतील तो किल्ला जितका वेळ लढवता येईल तितके दिवस लढवायचा, शस्त्र व साधनसामग्री संपत आली वा लढाई अगदीच हातघाईवर आली की आपणहून किल्ला मोगलांच्या त्याब्यात द्यायचा. त्याबदल्यात द्रव्य घ्यायचे आणि मुख्य म्हणजे आपले लोक वाचवायचे. (मराठी रियासत).
मोगलांना किल्ला सुपूर्द करायचा काळ पावसाळ्यात निवडावा या व अश्या धोरणामुळे मोगल फौजेचे जास्तीत जास्त नुकसान झाले. किल्ल्यातील थोडीशीच मराठी फौज, फारफार तर हजार-दीड हजार सैनिक, किल्ल्याबाहेरील चाळीस-पन्नास हजारांच्या मोगल फौजेस तीन-तीन महिने झुंजवू लागली. बाहेरूनही हल्ले करून मराठे मोगलांची रसद मारणे, खजिना पळवणे, छोट्या छोट्या चकमकींनी मोगल सैन्याची कापाकापी करणे असे उद्योग करु लागली. त्यामुळे मोगलांची अर्थ व सैन्यशक्ती कमी झाली तर मराठ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. (मोगलमर्दिनी ताराबाई पृ. ९३)
किल्ले मोहिमेत या धोरणाचा फायदा मराठ्यांना असा झाला "अनेक किल्ल्याना बादशाही सरदार वेढे घालीत. तेथे हल्ले करीत, शौर्य गाजवीत आणि किल्ल्यातील शिबंदीस जेरीस आणीत. पण कालापव्यय झाल्याने शेवटी किल्लेदाराला भरभक्क्म रक्कम देऊन बादशाही सरदार हे किल्ले आपल्या ताब्यात घेत." (करवीर रियासत पृ. ५३)
महाराणी ताराबाईंच्या मोहीम देखील सर्वत्र सुरु झाल्या. सर्वप्रथम त्यांनी मराठे सरदारांना पत्रे पाठवली व राज्यरक्षणासाठी एकत्र होण्याचे आवाहन केले. आपल्या सरदारांना विविध मोहिमांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले.
दि. १७ नोव्हेंबर १७०० (ज्युलियन दिनांक) च्या पत्रात सरदार कान्होजी झुंजारराव व मल्हारराव यांनी मिळून जंजिऱ्याच्या सिद्द्याचा पाडाव करावा असे कळवले. कान्होजी झुंजारराव याना पत्र लिहिताना त्या सूचना देतात की कोकणात हबशाने म्हणजेच सिद्दीने खूप उच्छाद (बहुत वळवळ) मांडला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यास मल्हारराव सात हजार फौजेनिशी कुंभार्ली घाट उतरून चिपळुणास आले आहेत. तेव्हा हे पत्र मिळताच तुम्ही तुमच्या सर्व माणसांसह त्यांना सामील व्हावे. या पत्रातील खालील ओळी वाचल्या असता महाराणी ताराबाईंचा तडफदारपणा दिसून येतो. त्या लिहितात "आजचे प्रसंगी जो मसलत चुकवीलतो म्हणजे गनिंदाखल असे समजोन बहुत सीताबाईने येणे. उजुर केलीय साऱ्या मसलतेची बदनामी तुम्हांवरी होईल. हे समजून लिहिल्याप्रमाणे वर्तणूक करणे." (करवीर रियासत पृ. ६२).
यावरूनच महाराणी ताराबाईंचा हेतू स्पष्ट होतो. तो म्हणजे कोणतीही हयगय न करता शत्रूविरुद्ध आघाड्या उघडाव्यात आणि त्यास सर्वदूर पळवावे. विशेषतः उत्तर व पश्चिम भागात मोहिमा सुरु केल्याने मोगलांचा दक्षिणेकडील फौजेला तेथे जावे लागेल व दक्षिणेकडील जोर कमी होईल. म्हणूनच त्यांनी खानदेश, वर्हाड पासून माळव्यात देखील सैन्ये घुसवली.
महाराणी ताराबाईंचा जातीने सहभाग हे त्यांच्या कारभाराचे महत्वाचे अंग होते. या स्वातंत्र्य युद्धातील लष्करी मोहिमांत महाराणी ताराबाई स्वतः छावण्या, किल्ल्यांवर जात असत. सैन्यात मिसळत असत. याचा सकारात्मक परिणाम युद्धजन्य परिस्थितीत होत असे व सैन्यास प्रोत्साहन मिळत असे.
इथे महाराणी ताराबाईनी कारभार हाती घेतला होता तर तिथे मोगलानी एकापाठोपाठ एक सातारा व परळी किल्ले ताब्यात आणले. पण किल्ले मोहिमेत औरंगजेबाचे खूप नुकसान झाले. लष्करी साहित्य, सामग्री, जनावरे, अवजड तोफा फार नष्ट झाल्या. पाऊस व मराठ्यांचे बाहेरून सतत हल्ले यात मोगल पुरते बेजार झाले. याचा फायदा महाराणी ताराबाईंनी पुरेपूर उचलला. मोगलांच्या खटाव व इंडी (विजापूरच्या जवळ असलेले मोगलांचे एक सधन ठाणे) ठाण्यांवर हल्ले करून दोन्ही ठाणी लुटली. तरीही हट्टाला पेटून बादशहाने आपली मोहीम रेटून पुढे चालू ठ्वली. पुढील चार वर्षात पन्हाळा, चंदन-वंदन, विशाळगड, राजगड, तोरणा, सिंहगड असे १० लहान मोठे किल्ले ताब्यात आणले. (करवीर रियासत पृ. ६३)
या दरम्यान महाराणी ताराबाई प्रतापगडावर राहून मराठा सरदारांना पत्रे लिहून मोहिमेच्या सूचना देत होत्या. बादशहा विशाळगडास छावणी करून असता महाराणी ताराबाईंनी प्रतापराव मोरे याना पत्राद्वारे आज्ञा केली ती अशी की तुम्ही लोक एकदिलाने औरंगजेबास जडून राहणे. बादशहा विशाळगडास बिलगला आहे तेव्हा तुम्ही व संताजी पांढरे यांनी सतत त्याच्या कबिल्यावर हल्ले करावे तरी तो (बादशहा) बलकुबल (घाबरून) राहील. बादशहाचा कबिलबाड मारून त्यास हैराण करणे. म्हणजे तो विशाळगडाचा विचार सोडील. यावेळी तुम्ही औरंगजेबास सोडून इतरत्र न जाणे. राज्य राखणे. (करवीर रियासत पृ ७०) अशारितीने महाराणी ताराबाई आपल्या सरदारांना पत्रे पाठवून केवळ प्रोत्साहनच देत नव्हत्या तर त्यांना कोणत्या वेळी कश्याप्रकारे मोगलांशी लढावे याचे नियोजन देखील करून देत होत्या.
परिणामी मोगलांना महाराष्ट्रात कोठेही टिकाव धरता आला नाही. महाराणी ताराबाईंच्या तडफदार नेतृत्वाने मोगलांना यश मिळू शकले नाही. बादशहाने घेतलेले किल्ले मराठ्यांनी पुढील काही वर्षात बादशहाच्या हयातीतच परत आपल्या ताब्यात घेतले. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यात गुंतला असता महाराणी ताराबाईंनी किती विस्तृत मोगल प्रदेशावर चढाया सुरु केल्या होत्या हे जाणून घेतले असता महाराणी ताराबाईंच्या खंबीर नेतृत्व लक्षात येते.
खाफीखान म्हणतो "ताराबाईंनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की दक्षिणचे सहा सुभे, सिरोज, मंदसोर, माळव्याच्या हद्दीपर्यंत मराठ्यांनी धामधूम उडवून दिली. काफरांचे बळ वाढतच गेले. त्यांचा पराक्रम मर्यादेबाहेर गेला. मराठ्यांनी सुरत व अहमदाबाद मधील नर्मदेच्या बाबाप्यारी घाटापाशी भयंकर पराक्रम केला (सन १७०१)." विशाळगडाचा वेढा सुरु असता मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावर हल्ला करून शहर लुटले. दुसरीकडे गोवळकोंड्यावर हल्ला करून लुटालूट केली. विजापूर हद्दीत लुटालूट केली. (करवीर रियासत पृ ७३).
अशारितीने महाराणी ताराबाईंनी सर्व सरदारांसह योजना अश्याप्रकारे केली होती - एकीकडे आपल्या किल्ल्यास भिडलेल्या मोगल सैन्याचा किल्ल्यातील शिबंदीने सामग्री संपेपर्यंत जास्तीत जास्त दिवस निकराने सामना करायचा. बाहेरून मराठी सरदारांनी किल्ल्यास भिडलेल्या मोगल सैन्यावर छोटे मोठे छुपे हल्ले सतत करायचे. त्यांचे सामान सुमान लुटायचे. त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे व किल्ल्यातील शिबंदीवरचा दाब कमी करायचा. दुसरीकडे मोगल प्रदेशातील सरदारांच्या तसेच बादशहाच्या ठिकठिकाणच्या छावण्या, मुक्कामाची ठाणी, रसदीचे मार्ग यावर हल्ले करून लुटालूट करायची. अधिकाऱ्यांना पकडून सुटकेच्या बदल्यात खंडणी घ्यायची. मोगलांना अन्नधान्य मिळू द्यायचे नाही. तिसरीकडे प्रत्यक्ष मोगल साम्राज्याच्या प्रदेशावर हल्ले करून तिथे लुटालूट करून दहशत निर्माण करायची. इतकी व्यापक योजना आखल्याने मोगलांची पळता भुई थोडी झाली. या काळात मराठ्यांचे शौर्य व संघटनकौशल्य यामुळे औरंगजेब बादशहाची दैना उडाली. यास महाराणी ताराबाई यांचे नेतृत्व कारणीभूत होते.
दिनांक २० फेब्रुवारी १७०७ (जुलिअन दिनांक) रोजी मोगल बादशहा औरंगजेब याचे निधन झाले आणि एक प्रकारे मराठे व मोगल यांच्यातील २५ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याची सांगता झाली. महाराणी ताराबाईंच्या कणखर नेतृत्वाने औरंगजेबाचे मराठेशाही जिंकून घ्यायचे स्वप्न धुळीला मिळवले. पण दुर्दैवाने मराठ्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. औरंगजेबाच्या पश्चात मोगलानी दिल्लीस परतताना छत्रपती संभाजीपुत्र शाहू राजे यांची सुटका केली आणि शाहूराजे महाराष्ट्रात येताच मराठ्यांच्यात भाऊबंदकी उसळून आली.
अधिकाराने ज्येष्ठ शाहूराजे हे मराठयांचे भावी राजे असावेत हे मानणारा एक गट होता तर महाराणी ताराबाईंनी मोगलांशी प्रखर लढा देऊन राज्य वाचवले म्हणून त्यांचे पुत्र शिवाजीराजे हे मराठ्यांचे भावी राजे असावेत हे मानणारा दुसरा गट होता.
महाराणी ताराबाईंनी भूमिका स्पष्ट होती. त्यांनी पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले राज्य छत्रपती संभाजी राजांनी घालवले. अश्या परिस्थितीत राजाराम महाराजांनी कष्ट करून नवे राज्य निर्माण केले. तेव्हा शाहू राजांचा या राज्याशी संबंध नाही. राज्यावर त्यांच्याच वारसाचा हक्क आहे. शाहू राजे मोगलांकडून सुटून आल्यावर देखील बादशहाचे अंकित बनून राज्य करणार होते व महाराणी ताराबाई मात्र मोगलांच्या छत्राखाली न राहता स्वतंत्र राज्य करणार होत्या अशी परिस्थिती झाली होती.
या दुहित मराठामंडळातील परसोजी भोसले, धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ, खंडो बल्लाळ, कान्होजी आंग्रे असे अनेक सरदार शाहू राजांच्या पक्षाला मिळाले तर रामचंद्रपंत अमात्य, परशुराम प्रतिनिधी असे काही सरदार महाराणी ताराबाईंच्या पक्षात राहिले. दरम्यान महाराणी ताराबाईंनी परत आलेले शाहू राजे खरे नसून तोतया आहेत असेही जाहीर करून पाहिले पण शाहू राजे खरेच आहेत याची सर्वाना खात्री पटली.
यानंतर शाहू राजांना बाजूला सारले जावे म्हणून ताराबाईंनीदेखील मोगलांकडे आपल्याला सरदेशमुखी मिळणेबाबत विनंती केली. पण शाहआलमने मंजुरी देताना प्रांताचा निम्मा वसूल शिवाजी राजांना व निम्मा वसूल शाहू राजांना असा हुकूम देऊन मराठ्यांच्यातली दुही कायम ठेवली. यामुळे आता शाहू राजे व शिवाजीराजे - महाराणी ताराबाई यांच्यातील संघर्ष अटळ बनला आणि १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेडच्या मैदानावर भीमा नदीच्या काठी दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. अंतस्थ तडजोडीप्रमाणे ताराबाईंच्या सेनापती धनाजी जाधवांनी लढाई अशी केलीच नाही. खंडेराव दाभाड्याना शाहू राजांनी पकडून नेले. ताराबाई पक्षाचा पराभव झाला.
अखेर सातारा येथे शाहू महाराजा राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही राजधानी बनवली तर आपले पुत्र शिवाजी राजे हेच छत्रपती आहेत असे जाहीर करून कोल्हापूर-पन्हाळा भागात आपला अंमल बसवला. शाहू राजांची "वारणा नदीच्या दक्षिणेचा प्रदेश शिवाजी राजांकडे व उत्तरेचा प्रदेश शाहू राजांच्या ताब्यात असावा" ही सूचना ताराबाईंनी धुडकावली आणि हि यादवी सुरूच राहिली.
ताराबाईंचा संपूर्ण पराभव केल्याशिवाय आपल्याला सनदा मिळणार नाहीत तसेच शाहू राजांचा अडसर दूर केल्याशिवाय आपले वर्चस्व प्रस्थापित होणार नाही याची दोघांनाही खात्री असल्याने शाहू राजे व महाराणी ताराबाई यांच्यातील लढाया १७०७ ते १७१० या कालावधीत सतत होत राहिल्या. साधनसामग्री जमवणे, सरदार फोडणे, इत्यादी राजकारण सुरु झाले. शाहू महाराजांचे स्थान सातारा येथे प्रस्थापित झाले होते तर रामचंद्रपंत अमात्यांच्या धोरणामुळे इसवी सण १७१० मध्ये पन्हाळा येथे छत्रपती शिवाजी राजे-महाराणी ताराबाई यांचे स्थान प्रस्थापित झाले व मराठ्यांच्या दोन सत्ता निर्माण झाल्या. मराठी सत्ता संपवत आली नाही तरी मोगलांचे एकच बलाढ्य मराठी सत्ता कायम होऊ द्यायची नाही हे धोरण या भाऊबंदकीमुळे यशस्वी ठरले.
इसवी सन १७११ ते १७१३ हा कालावधी सातारा व कोल्हापूर यांच्यातील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या राजकारणाचा होता. एकंदरीत ताराबाईसाहेबांच्या कठोर कारभारामुळे त्यांचे बरेचसे कारभारी शाहू राजांना मिळाले. ताराबाईसाहेबांच्या दडपणाखाली असलेल्या सरदारांना काहीशी तुच्छ वागणूक मिळायला लागली. परिणामी सन १७१४ रोजी कोल्हापूरच्या राजवाड्यात सत्तांतर झाले. महाराणी ताराबाई-छत्रपती शिवाजी राजे याना कैदेत पडावे लागले तर त्यांची जागा राणी राजसबाई व पुत्र संभाजी राजे यांना मिळाली. साक्षात 'मोगलमर्दिनी ताराबाई' साहेबाना सत्ता सोडावी लागली व कैदेत पडावे लागले. कोणतेही युद्ध, चकमक, खूनबाजी न होता हे सत्तांतर झाले. महाराणी ताराबाईंना याचा सुगावाही लागला नाही. याविरुद्ध कोणीच काही हालचाल केली नाही. सत्तांतर ही एक अपरिहार्य गोष्ट असल्यासारखे घडले.
हे सत्तांतर होण्यास ताराबाईंचा जुलमी कारभार कारणीभूत आहे असे एका पत्रात संभाजीराजे म्हणतात. प्रजेचे पालन पोषण नीट केले नाही, प्रजारक्षण केले नाही, प्रजेचा छळ केला, अधिकाऱ्यांचा छळ केला या कारणांमुळे त्यांना सत्तात्याग करावा लागला.
अशारितीने मोगलांशी व बादशहा औरंगजेबाशी अत्यंत तडफेने सामना देणाऱ्या महाराणी ताराबाईंना शेवटी सत्ता सोडून कैदेत पडावे लागले व त्यांच्या कारभाराचा शेवट झाला. यानंतरही काही ठिकाणी त्यांचे उल्लेख आढळतात पण ते तेवढे परिणामकारक नाहीत.
इसवी सन १७०० ते १७१४ या १४ वर्षांच्या कार्यकाळात महाराणी ताराबाईंना १७०७ पर्यंत म्हणजे पहिली सात वर्षे औरंगजेब बादशहाशी लढावे लागले. या कारकिर्दीच्या सुवर्णकाळात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन तत्कालीन कवी कवींद्र गोविंद याने त्यांच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे.
तुलजा प्रसन्न झाली ! पातशाही हाती आली !!
जयलक्ष्मी माळ घाली ! शिवाजीस आदरे !!
दिल्ली झाली दीनवाणी ! दिल्लीशाचे गेले पाणी !!
ताराबाई रामराणी ! भद्रकाली कोपली !!
अतिशय आवेशपूर्ण अश्या या वर्णनातून आपल्याला ताराबाईसाहेबांच्या मोगलांविरुद्धच्या पराक्रमाची कल्पना येते.
त्यानंतर मात्र इसवी सन १७०७ ते १७१० ही तीन वर्षे शाहू राजांशी लढून संपूर्ण मराठी सत्तेचा हक्क मिळवण्यात गेली आणि इसवी सन १७१० रोजी आपले स्वतंत्र राज्य स्थापून पुढे १७१० ते १७१४ ही वर्षे ते राज्य शाहू राजे, सावनूरचा नवाब, ठिकठिकाणचे पसरलेले देसाई, तहान मांडून बसलेले मोगल सरदार यांच्यापासून टिकवण्यात गेली आणि अखेरीस १७१४ साली सत्तात्याग करावा लागला व त्यांचा मुक्काम पन्हाळ्यास हलला.
अतिशय अवघड प्रसंगी नेतृत्व स्वीकारून तडफेने व उत्तम संघटनकौशल्याने समस्त मराठामंडळाला एकत्र बांधून ठेवण्याचे व त्यांना मोगलांविरुद्ध राज्यरक्षणासाठी प्रोत्साहन देऊन मराठ्यांची विजयी पताका सतत फडकवत ठेवण्याचे श्रेय शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची स्नुषा, छत्रपती राजाराममहाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांना द्यावेच लागेल !
- राहुल शशिकांत भावे
१०/५/२०१९
संदर्भ ग्रंथ -
१) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई
२) करवीर रियासत - स. मा. गर्गे
३) असे होते मोगल - मनुची अनुवाद श्री. चौबळ
४) मोगलमर्दिनी ताराबाई
No comments:
Post a Comment