इसवी सन १७०५ च्या पूर्वार्धात मोगल बादशहा औरंगजेब याने आपली शेवटची किल्ले मोहीम हाती घेतली. ती म्हणजे उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील वाकीनखेडा हा किल्ला जिंकायची मोहीम. आपला हट्ट न सोडता तसाच पुढे रेटला की होणाऱ्या नुकसानाबरोबरच किती टिंगल होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बादशहाची ही मोहीम.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य आपल्या कब्जात आणण्यासाठी मोगल बादशहा औरंगजेब जंग जंग पछाडत होता. उपलब्ध असेल त्या कोणत्याही पर्यायाचा वापर करून मराठ्यांविरुद्ध कारवाई करत होता. मराठ्यांची जी काही शक्ती एकवटली आहे ती या किल्ल्यांमध्ये. मराठ्यांना संपवायचे असेल तर हे किल्ले घेतले पाहिजेत म्हणून मराठेशाही संपवण्यासाठी सह्याद्रीतील मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची मोहीम औरंगजेब बादशहाने इसवी सन १७०० ते इसवी सन १७०४ या चार वर्षाच्या कालावधीत हाती घेतली. यासाठी तो स्वतः या मोहिमेत सामील झाला व स्वतःच्या नेतृत्वाखाली त्याने ही मोहीम राबवली.
पण या मोहिमेत बादशहास व त्याच्या सैन्यास चिवट प्रतिकार करणारे मराठे, सह्याद्री व सह्याद्रीत कोसळणारा पाऊस यांच्या एकत्रित फटकाऱ्याने खूप कष्ट सोसावे लागले. मोगलांची सैन्य, साधनसामग्री, संपत्ती याची अपरिमित हानी झाली. शिवाय सैन्य व लष्करी अधिकाऱ्यांची मने खचली. सह्याद्रीतील पावसाने चार वर्षांच्या या मोहिमेत मोगलांना इतका त्रास दिला की " या संकटमय प्रदेशात पावसाळा सुरु झाला की लोकांचा सर्वनाश झाला असे समजावे (मासिरे आलमगिरी)" मोगलांना खात्रीच पटली.
शेवटी मार्च १७०४ मध्ये तोरणा जिंकून औरंगजेब बादशहाने पावसाळ्यासाठी जुन्नर भागात खेड येथे छावणी केली. साडेसात महिने तेथे राहून पावसाळा काढून बादशहाने २२ ऑक्टोबर १७०४ (जुलिअन दिनांक) रोजी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील वाकीनखेडा जिंकण्यासाठी कूच केले. सुमारे साडेतीन महिन्यांचा प्रवास करून संपूर्ण लवाजम्यासहित बादशहा ८ फेब्रुवारी १७०५ (जुलिअन दिनांक) रोजी वाकीनखेड्याजवळ पोहोचला. इसवी सन १७०५ सालातल्या फेब्रुवारी महिन्यात औरंगजेब बादशहाने वाकीनखेडा या किल्ल्यास वेढा दिला.
आपल्या राज्यरोहणाच्या ४९ व्या वर्षात आणि वयाच्या ८७ व्या वर्षी मोगल बादशहा औरंगजेबाची आयुष्यातील ही शेवटची मोहीम दक्षिणेत सुरु झाली.
वाकीनखेड्याचे भौगोलिक व ऐतिहासिक स्थान
वाकीनखेडा (म्हणजे आताचे शोरपूर असावे ज्यास पूर्वी सुरपूर असेही म्हणत) हे ठिकाण विजापूरच्या पूर्वेस सगर जवळ असून उत्तरेस भीमा नदी व दक्षिणेस कृष्णा नदी यांच्या दुआबातील प्रदेशात आहे. बेडर / बेरड जमातीतील लोकांचे हे मुख्य ठाणे म्हणून ओळखले जायचे. एका गढीवजा असलेल्या किल्ल्यास जिंकण्यासाठी बादशहाने मोहीम काढली.
वाकीनखेडा मोहिमेची कारणमीमांसा
औरंगजेब बादशहाने मराठ्यांविरुद्धच्या विशाळगड-राजगड-तोरणा या महाराष्ट्रातील किल्ले मोहिमेनंतर थेट दक्षिणेत कर्नाटकातील वाकीनखेडा हा किल्ला जिंकून घेण्याची मोहीम का बरं हाती घेतली असावी.
उत्तर कर्नाटकातील बेडर जमत आधीच अतिशय लढवय्यी. पटाईत बर्कंदाज. त्यात ते मराठ्यांना सामील झाले म्हणजे आगीला वाऱ्याची साथ मिळाल्यासारखे झाले. याच युतीमुळे त्याच्या झळा विजापूरला लागण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणूनच बादशहाने स्वतःच्या नेतृत्वाखाली या अभद्र युतीविरुद्ध वाकीनखेड्याची मोहीम काढली. (मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर)
वाकीनखेडा हा किल्ला कर्नाटकातील बेडर या लढाऊ जमातीतल्या शूर लोकांचे मुख्य ठाणे होते. या बेडर सरदारांनी एकेकाळी विजयनगर साम्राज्यात सीमाभागांचे रक्षण करण्यासाठी मोठी जबाबदारी पेलली होती. तसेच मोगलांच्या विजापूर, गोवळकोंडा मोहिमेत बेडरांनी मराठ्यांशी संगनमत करून ते मोगलांविरुद्ध लढले होते. मोगलांविरुद्धच्या मोहिमांत सुरक्षित ठिकाण म्हणून मराठ्यांनी आपले कबिले या किल्ल्यात ठेवले होते. घोरपडे घराण्यातील संताजी, राणोजी, बहिर्जी उर्फ हिंदुराव यांच्याशी त्यांचे विशेष सख्य होते. (मासिरे आलमगिरी). धनाजी जाधवांची मुले-माणसे वाकीनखेड्यास होती. (मराठी रियासत खंड २) म्हणूनच बादशहाने ही मोहीम आखली.
"वाकीनखेड्याच्या भागात मराठ्यांच्या घोडदळाला आश्रय मिळतो तो त्यांना मिळू नये असा औरंगजेबाचा बेत आहे" (असे होते मोगल). म्हणजेच मराठे व बेडर यांची मोगलांविरुद्ध असलेली युती तोडावी यासाठी औरंगजेब बादशहाने ही मोहीम आखली.
थोडक्यात मोगलांविरुद्ध केलेल्या लढायांचा वचपा काढण्यासाठी व मराठ्यांशी असलेले संगनमत तोडण्यासाठी बादशहाने वाकीनखेड्याची ही मोहीम राबवली.
वाकीनखेड्याचे नाईक व मोगल
बादशहाच्या आदिलशाही-कुतुबशाही मोहिमेदरम्यान डिसेंबर १६८७ मध्ये बेडर सरदार पामनाईक बादशहास भेटला. त्याचा पुतण्या पिडनाईक हा बादशहाच्या सेवेत आधीपासूनच म्हणजे १६८३ पासून होता व त्यास मनसब होती. पुढे पामनाईक वारल्यानंतर बादशहाने १६८९ मध्ये इकडे महाराष्ट्रात मराठ्यांचे युद्ध सुरु असताना तिकडे कर्नाटकात रायचूर जिंकण्यासाठी रहुल्लाखानास पाठवले. यावेळी रहुल्लाखानाने पिडनाईक यास तो त्याच प्रांतातील असल्याने बरोबर घेतले व रायचूर जिंकले.
रायचूर जिंकल्यावर पिडनाईकाने खानाजवळ "एक आठवडा वाकीनखेडा येथे जाऊन येतो व माझा सरंजाम, सैन्य सामग्री व्यवस्थित करून येतो (मासिरे आलमगिरी)" असे सांगून परवानगी घेतली. खानाने परवानगी दिली. आणि सन १६८९ मध्ये पिडनाईक खानाकडून वाकीनखेडा येथे गेला. तेथे त्याने काही हजार बंदूकच्यांचे सैन्य उभे करून प्रतिकाराची तयारी केली. खानाने त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण कधी बाळाच्या तर कधी खंडणी देऊन पिडनाईकाने आपला बचाव केला. त्याने युद्धसामग्री जमवली. पायदळ सैन्य उभारले. तटबंदी बांधली आणि वाकीनखेडा एक मजबूत किल्ला तयार केला. मोगलांविरुद्ध मराठ्यांना तो पूर्णपणे मिळाला.
औरंगजेब बादशहाने त्याच्या या बंडखोरीचे पारिपत्य करण्यासाठी त्याच्यावर एकदा शहजादा आज्जम यास धाडले. त्यावेळी ७ लाख खंडणी देऊन पिडनाईकाने आपली सुटका केली. तर दुसऱ्यांदा गाजीउद्दीन फिरोजजंग यास ९ लाखांची खंडणी देऊन स्वतःस वाचवले.
यारीतीने पिडनाईक मोगलांपासून स्वतःची सुटका करून घेऊनही स्वस्थ बसत नसे. तर अशी सुटका झाल्यानंतर पुन्हा मोगलांविरुद्ध कधी एकट्याने तर कधी मराठ्यांबरोबर मिळून लढाया करत असे. आणि म्हणूनच मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याची मोहीम संपल्यानंतर औरंगजेब बादशहा पिडनाईकाविरुद्ध उठला व त्याचा मुख्य किल्ला जिंकण्यासाठी वाकीनखेडा येथे आला.
दक्षिणेत कृष्णा व भीमा नद्यांच्या मधल्या प्रदेशात वाकीनखेडा किल्ला आहे. हा पेम नाईक नावाच्या लढवय्या पाळेगाराच्या (जमीनदाराच्या) ताब्यात होता. याने औरंगजेबाविरुद्ध कुतुबशहाला मदत केली होती. त्याचा पुतण्या पुनापा नाईक बादशहाकडे मनसबदार होता. त्याने बादशहाकडून वाकीनखेडा किल्ल्याचा ताबा घेऊन बादशहाला नम्रतेने पत्रे लिहून, लाच देऊन व युक्त्या योजून इकडे आपले सामर्थ्य वाढवले. फौज, दारुगोळा जमवला. वाकीनखेडा किल्ला तटबंदीने इतका मजबूत केला की ते एक छोटे ठाणे न राहता एक बलाढ्य किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. अशारितीने सामर्थ्यवान बनून पुढे तो उघडपणे मराठ्यांस मिळाला. (मोगलमर्दिनी ताराबाई)
पुनापा नाईकचा चुलत बंधू, काका पेम नाईक याचा मुलगा जग नाईक यास बादशहाने वाकीनखेडा किल्ल्याचा वारस नेमले व अधिकार दिले. परंतु बलशाली बनलेल्या पुनापा नाईकाने त्यास दाद दिली नाही. म्हणून बादशहाने त्याचा बिमोड करण्यासाठी प्रथम शहजादा आझमशहा व नंतर गाजीउद्दीन फिरोजजंग याना पाठवले. पण दोघांनाही पुनापा नाईकाने लाच देऊन वाटेल लावले व आपले उद्योग सुरु ठेवले. म्हणूनच महाराष्ट्रातील किल्ले मोहीम संपवून औरंगजेब पुणे प्रांतातून कर्नाटकात वाकीनखेडा येथे स्वतः मोहिमेसाठी आला. (मोगलमर्दिनी ताराबाई)
या मोहिमेत सामील झालेल्या मोगल सरदारांमध्ये, विजापूर प्रांताचा तत्कालीन सुभेदार खान गाजीउद्दीन फिरोजजंग याचा मुलगा चीनकिलीचखानबहादूर हा देखील होता जो पुढे निजामुल्मुल्क म्हणून पेशव्यांचा मुख्य शत्रू होता. त्याच्याबरोबर शहजादा कामबक्ष, महंमद अमीनखान बहादूर, तरबियतखान बहादूर, सुलतान हुसेन, बाकरखान असे इतर सरदार होते.
वाकीनखेडा मोहिमेतील लढाया
फेब्रुवारी १७०५ मध्ये बादशहाच्या हुकुमाप्रमाणे साली बंदरांच्या मुख्य ठाण्याला अर्थात वाकीनखेड्याला वेढा दिला गेला आणि दोन्ही बाजूनी युद्धे सुरु झाली. बादशहाचा तोफखाना, सैन्य मोर्चेबांधणी करण्यास सज्ज झाले. पिडनाईकानेही जोराची तयारी केली. तोफखाने मारा करू लागले. बेडरही मराठ्यांप्रमाणे रोज किल्ल्याबाहेर पडून मोगल सैन्यावर छापे घालीत व त्यांचे नुकसान करीत. किल्ल्यातून दगड-धोंड्यांचा प्रखर मारा करीत. पिडनाईकाने किल्ल्यावरून अहोरात्र बाण, गोळे यांचा मारा केला. यामुळेच काही दिवसात जिंकलेली लालटेकडी नामक किल्ल्याजवळची एक टेकडी मोगलांना सोडून द्यावी लागली. शहजादा कामबक्ष व सैनिकांनी आसपासच्या टेकड्यांवर ताबा मिळवून किल्ला जिंकण्याची शर्थ चालवली होती. या माऱ्यामुळे मोगलांचे अनेक सैनिक ठार झाले. शेवटी खुद्द बादशहाच्या उत्तेजनाने मोगलानी शर्थ केली आणि महिन्याभरात किल्ला जिंकण्याची चिन्हे दिसू लागली.
आणि इतक्यात बेडरांच्या मदतीसाठी ८ मार्च १७०५ (जुलिअन दिनांक) रोजी धनाजी जाधव व (संताजीपुत्र) हिंदुराव घोरपडे सहा हजार स्वर घेऊन वाकीनखेड्यावरील मोगलांवर चाल करून आले. मोगलात गोधळ उडाला. त्यांनी मोगलांना बाहेरून युद्धात गुंतवून ठेवले आणि दुसऱ्या बाजूने आपले किल्ल्यातील काबिले काढून नेले. मोगल सैन्याभोवती धामधूम केली. साकी मुस्तैदखान लिहितो "मराठ्यांनी बेडरांना सल्ला दिला की तुम्ही बादशहाशी लढू शकणार नाही. त्याच्यासमोर टिकू शकणार नाही. आपला देश उद्धवस्त करू नका. मालमत्तेची नासाडी करू नका (मासिरे आलमगिरी)" यावरून मराठ्यांनी महाराष्ट्रात जे धोरण अवलंबले होते तेच धोरण मराठे बेडरांना अवलंबायला सांगत होते असेच दिसते. यानुसार मराठे बेडरांना सांगत होते तुम्ही किल्ला सोडा पण मालमत्ता, देश (आपली माणसे) वाचवा.
मराठ्यांनी देखील बाहेर तळ दिला आणि ते बाहेरून मोगलांवर हल्ले करू लागले. अशारितीने वाकीनखेडा या छोट्या किल्ल्यातील मोहिमेत आतून बेडरांच्या तर बाहेरून मराठ्यांच्या हल्ल्यात मोगल सापडले आणि बादशाही सैन्यात दहशत निर्माण झाली.
वाकीनखेडा मोहिमेतील तहाची गोष्ट
त्यासुमारास बेडरांनी एक कारस्थान केले. मोगल सैन्यातील व्यापारी अब्दुलगनी याच्या मार्फत पिडनाईकाने तह करण्यासाठी पत्र पाठवले. अब्दुलगनीने ते वाकेनवीस हिदायत कैश यांच्याकडे दिले व हिदायत कैशने ते बादशहास दिले. बादशहास विश्वास बसे ना. पण मराठ्यांचा जोर पाहून बादशहाने बोलणी करण्यास सांगितले व बादशहातर्फे शहजादा कामबक्ष व पिडनाईकातर्फे त्याचा भाऊ सोमसिंग वाटाघाटी करू लागले. सोमसिंगने आपल्या भावास माफ करावे व आपणास मनसबदारी व जमीनदारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. एक आठवड्यात किल्ला रिकामा करून दिला जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे बादशहाने मनसबदारी व जमीनदारी देऊ केली.
बाद्शहातर्फे मुहतशीमखान किल्ल्यात गेला. किल्ल्यातील बेडरांनी त्यास बनवण्याकरता किल्ल्यातील म्हातारी माणसे व सामान बाहेर नेण्यास सुरुवात केली. इकडे किल्ल्यातील लोकांनी वदंता उठवली की पिडनाईकास ताप आला आहे, त्यास तापामुळे भ्रम झाला आहे. भ्रमामुळे त्यास वेड लागून तो किल्ल्याबाहेर पडला आहे. पिडनाईकाच्या आईने बादशहाकडे निरोप धाडला की मुलाचा पत्ता लागताच मी किल्ला रिकामा करून देईन. तुम्ही सोमसिंगास सनद देऊन किल्ल्यात पाठवा. तो जमीनदारी पाहील व किल्ला रिकामा करून दिला जाईल.
बादशहाने सोमसिंगास किल्ल्यात पाठवले. गोळीबार थांबवला आणि वेढ्यातील सैन्य, सरदारास परत बोलावले. सोमसिंगने किल्ला ताब्यात देण्यास विलंब चालवला व प्रतिकाराची तयारी केली. या काळात वेढा तहकूबच झाल्यासारखा होता. यामुळे पिडनाईकास बादशहा वाकीनखेडा सोडून जाईल असे वाटले. पण तसे झाले नाही.
दरम्यान बादशहाच्या छावणीत झुल्पिकारखान बुऱ्हाणपूरहून खजिना व फौज घेऊन आला. दाऊदखान पन्नी मोठे सैन्य घेऊन आला. कर्नुलहून युसूफखान व गुलबर्ग्याहून कामयाबखान सैन्यासह दाखल झाले. आता मोगलास जोर आला. किल्ला जिंकण्यासाठी बादशहाने झुल्पिकारखानाला नेमले.
या एका महिन्यात (मार्च १७०५) मोगलांची स्थिती दयनीय झाली होती तर छावणीत लोक बादशहाची "इतक्या बुद्धिमान व धोरणी बादशहास दुष्ट बेडरांनी फसवले" म्हणून कुत्सितपणे मजा उडवीत होते. एकूणच तहाचे केलेले नाटक बादशहास कळले व बादशहाने झुल्पिकारखानास किल्ला जिंकण्याची आज्ञा केली.
वाकीनखेड्याचा निर्णायक लढा
नवी फौज आल्याने लढाई पुन्हा सुरु झाली. मोगलानी लालटेकडी, पेठ ताब्यात घेतले. बेडरांच्या पाणीपुरवठ्याच्या काही विहिरी मोगलानी ताब्यात घेतल्या. झुल्पिकारखानाने मोगल सैन्यासाठी आडोसे तयार करून शत्रूच्या गोळ्या, बाण यापासून वाचण्याची सोय केली. त्यामुळे मोगल सैन्यास पुढे सरकता आले. मोगलांच्या या आक्रमकतेपुढे बेडर सैन्याचा टिकाव लागला नाही. अखेर बेडरांनी किल्ल्यातील इमारतींना आगी लावल्या आणि असलेल्या मराठयांना घेऊन ते सामनसुमानासकट वाकीनखेड्याबाहेर पडले.
वाकीनखेडा जिंकल्यावर औरंगजेबाने तेथील गोपालस्वामींचे देवालय फोडले व तेथे मशीद बांधली. (मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर उत्तरार्ध)
“वाकीनखेडा जिंकण्यासाठी आपले मुत्सद्देगिरीचे डावपेच कमी येत नाहीत हे बादशहास कळून चुकले. त्याने किल्ल्यावर हल्ला चढवण्याचा हुकूम दिला. या हल्ल्यात १२ अधिकारी व ७ हजार सैनिक मरण पावले. पण म्हणून औरंगजेबाने वेढा अधिक कडक करून किल्ला ताब्यात आणला. किल्ला हातचा गेल्यावर बेडरांचा नेता मराठ्यांना मिळाला व नेहमीप्रमाणे धामधूम करू लागला. (असे होते मोगल)”
मुहरम महिन्याच्या चवदा तारखेस म्हणजेच २७ एप्रिल १७०५ (जुलिअन दिनांक) रोजी मोगलानी वाकीनखेडा किल्ला जिंकून घेतला. किल्ला जिंकण्याचे श्रेय झुल्पिकारखानास मिळाले (मासिरे आलमगिरी). अनेक सरदारांना मनसबी, बक्षिसे, बढत्या मिळाल्या. विजयोत्सव साजरा करण्यात आला. किल्ल्याचे नाव "रहमानबक्षखेडा" असे ठेवण्यात आले. यारीतीने सुमारे अडीच महिने चाललेली वाकीनखेड्याची ही मोहीम संपुष्टात आली.
वाकीनखेडा जिंकल्यानंतर
प्रांताच्या बंदोबस्ताचे काम चीनकिलीचखानबहादूर यांच्याकडे सोपवण्यात आले. आणि ही मोहीम संपवून बादशहा औरंगजेबाने तीन कोसांवर कृष्णेकाठी देवापुर येथे छावणी केली. देवापुर छावणीतच बादशहास आजारपण आले. त्याची प्रकृती फार बिघडली. देवापुर मुक्कामी बादशहाचे दुखणे इतके वाढले की त्याच्या मृत्यूची बातमी पसरली. शेवटी हकिमांच्या उपचाराला यश येऊन बादशहा २३ ऑक्टोबर १७०५ (जुलिअन दिनांक) रोजी तेथून बहादूरगडाकडे रवाना झाला आणि ६ डिसेंबर १७०५ (जुलिअन दिनांक) रोजी बहादूरगडास पोहोचला.
वाकीनखेड्याच्या मोहिमेतील पराभवानंतरही बेडर स्वस्थ बसले नव्हते. बादशहाच्या दरबारातील १७०६ सालच्या बातमीपत्रावरून पुढील माहिती कळते "बेडरांचे ३००० पायदळ रहमानबख्शखेडा म्हणजेच वाकीनखेड्यावर चालून आले. येथून सहा कोसांवरची ह्ळसंगीची गढी त्यांनी घेतली असून त्यांचा जमाव वाढत आहे." यावर बादशहाने चीनकुलीचखान (भावी निजामुल्मुल्क) यास त्यांचे पारिपत्य करण्यास सांगितले व पुढील अहवाल देण्यास सांगितले. (अहकामे आलमगिरी)
मोहीम आटोपून बादशहा बहादूरगडाकडे जाताच इकडे बेडरांनी पुन्हा किल्ला हस्तगत केला. त्याचा अहवाल बादशहास मिळाला तो असा "६००-७०० कर्नाटकी मावळे किल्ल्यावर आले. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत शत्रू आला (बहिर्जी घोरपडे असावा). शेजारील रायदुर्गच्या जमीनदाराने पिडनायकाकडे २००-३०० स्वार व ५०० पायदळ पाठवले." यावर बादशहा सांगतो "शत्रू स्थिर झाला नाही तोपर्यंत किल्ला परत जिंकून घ्या" (अहकामे आलमगिरी)
यावेळी बादशहाने विजापूरच्या सुभेदारास हुकूम केला "एका विशिष्ट दगडाचे चार तुकडे पाठवा. हे तुकडे किल्ल्याच्या चारही बाजूनी पुराल तर किल्ल्यावर परक्यांचा ताबा होणार नाही. किल्ला आक्रमणापासून सुरक्षित राहील. या तुकड्याना रहमानबख्शखेडा (वाकीनखेडा) किल्ल्याच्या चारही कोपऱ्यांवर पुरावे आणि परमेश्वर किल्ल्यांचे रक्षण करील अशी आशा बाळगावी.” ह्यावर अधिकाऱ्यांनी "दगडाचे चार तुकडे रहमान बक्ष (वाकिनखेडा) किल्ल्याच्या चारही बाजूनं पुरण्यासंबंधीची आज्ञा झाली व त्याची अमलबजावणी झाली." (अहकामे आलमगिरी). यावरून समजते की नुसता किल्ला अथवा मुलुख जिंकून मोगलांना काहीही फळ मिळत नव्हते. जिंकलेल्या मुलुखावर मोगल जम बसवू शकत नव्हते.
इसवी सन १७०५ मध्ये बादशहाने वाकीनखेडा जिंकला असला तरी त्याची पाठ वळताच पिडनाईक व मराठे यांनी रायदुर्ग, चित्रदुर्ग या इतर जमीनदारांच्या सहाय्याने किल्ला परत हस्तगत केलाच. त्याची हकीकत मोगलांचा तेथील अधिकार किफायतखान बादशहास कळवतो "दुष्ट शत्रू (मराठे) व दुष्ट पिडीया (पिडनायक) रात्री चालून आले. किल्ल्यातील सैनिकांशी संगनमत करून किल्ल्याच्या मागील बाजूने ते आत घुसले. कोणतीही लढाई न करता, वेढा न घालता त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. इकडील पाळेगार (जमीनदार) यांनी मराठ्यांशी हातमिळवणी केली आहे. मराठे व या जमीनदारांच्या सहकार्यामुळे प्रदेशातील (मोगल) किल्लेदारांची स्थिती विलक्षण झाली आहे." यावर बादशहाची प्रतिक्रिया झाली "धन्य तुमची सरदारी आणि धन्य तुमची खबरदारी. आता हि बातमी मिळताच तुमची पथके किल्ल्यावर पाठवा व किल्ला पुन्हा जिंकून घ्या" (अहकामे आलमगिरी).
वाकीनखेडा मोहिमेचे फलित
एकूणच वाकीनखेडा मोहिमेवेळची मोगलांची स्थिती बातमीपत्रातून अशी कळते "वाकीनखेडा जिंकून घेणे महत्वाचे होते. त्याच्यावर सर्व शक्ती खर्च करणे आवश्यक होते. धन्य परमेश्वराची, कार्य सफल झाले. परंतू ह्यात खर्च बराच झाला व होत आहे. याचा सगळं भार उत्तरेतील खजिन्यावर आहे. असे समजते की कर्नाटकात प्रचंड खजिने दडलेले आहेत. तंजावर का म्हणून त्यांच्याकडे राहावे ? ते घेण्याची दिरंगाई व आळस तो (दाऊदखान) काय म्हणून करीत आहे? (अहकामे आलमगिरी).
म्हणजेच या एका छोट्या मोहिमेत नामांकित सरदार भरपूर सैन्यासहित सामील झाले तरी देखील किल्ला जिंकण्यास अडीच महिन्याचा कालावधी लागला. भरपूर पैसे खर्च झाला. शेवटी किल्ला जिंकूनही बेडरांनी किल्ल्यास आगी लावल्याने मोगलांच्या हाती काहीही लागले नाही. मोगलांचा किल्ल्यावर अमलही बसू शकला नाही. बादशहा बहादूरगडाकडे जाताच म्हणजेच पुढील ६ महिन्यातच बेडरांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
वाकीनखेडा व मराठे
वाकीनखेडा हे कर्नाटकातील बेडर लोकांचे मुख्य ठिकाण होते. हे जरी कर्नाटकात असले तरी मराठ्यांशी यांचे एकंदरीत संबंध चांगले होते असेच दिसून येते. छत्रपती शिवरायांच्या दूरदर्शी धोरणामुळे दक्षिणेतील शाह्यांची मोगलांविरोधात किती घट्ट एकी झाली होती हे मराठ्यांनी वाकीनखेड्याच्या मोहीमेत बेरडांना केलेल्या सहाय्यातून दिसून येते. याच लेखात वर उल्लेखल्या प्रमाणे संताजी, राणोजी, हिंदुराव घोरपडे यांचे पिडनाईकाशी चांगले सख्य होते.
ताराबाईंकडून धनाजी जाधव, बहिर्जी (हिंदुराव) घोरपडे व इतर मराठे सरदारांची वेळोवेळी मदत पुनापा नाईकास होत होती. (मोगल मर्दिनी ताराबाई)
हे बेरड लोक देखील मराठ्यांना मोगलांविरुद्ध तितक्याच जोराने मदत करीत होते. दरबारातील बातमीपत्रात नोंद आहे "सातारा-कऱ्हाड भागात धनाजी, बहिर्जी आणि पिडनायक यांची भयंकर वर्दळ आहे (अहकामे आलमगिरी)"
औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रात नोंद आहे - "बहिर्जी (अर्थात हिंदुराव घोरपडे) यांनी वाकीनखेड्याकडे २०० स्वार व ५०० पायदळ पाठवले आहेत. यामुळे बादशाही फौजांना अडचण होऊ शकेल" यावर बादशहाने आज्ञा केली "लवकर फौज नेमल्या तर मराठे व जमीनदारांचे सैन्य किल्ला सोडून निघून जातील व किल्ला रिकामा होईल. (अहकामे आलमगिरी)"
१७०३ सालात औरंगजेबाची महाराष्ट्रात किल्ले मोहीम सुरु असताना तिकडे कर्नाटकात मिरज-सोलापूर-गोकाक-विजापूर प्रांतात हल्ले करून धुमाकूळ उडवून द्यायचा असे धनाजी जाधवांनी योजिले. या कामी त्यांनी तेथील पाळेगारांची व वाकीनखेड्याच्या पिडनाईकाची मदत घेण्याचे ठरवले होते. (अहकामे आलमगिरी)
बादशहा हुकूम देतो "वाकीनखेड्याची माणसे जिंजीकडे शत्रूला मिळण्यासाठी जातात त्यांना रोखावे. थारा देऊ नये. ही ताकीद लक्षात ठेवावी. (अहकामे आलमगिरी)" म्हणजेच जिंजी वेढ्याच्या वेळी सुद्धा वाकीनखेड्याच्या बेडरांनी राजाराम महाराजांना साहाय्य केले.
बादशहाची वाकीनखेड्याची मोहीम व मराठ्यांच्या इतर मुलुखातील हालचाली
इसवी सन १७०५-१७०६ मध्ये बादशहा वाकीनखेड्याच्या परिसरात होता त्यावेळी दक्षिणेत काय स्थिती निर्माण झाली होती हे पहा. ज्या हेतूने २४ वर्षांपूर्वी बादशहा औरंगजेब प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत उतरला तोच हेतू बादशहावर उलटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आपले प्रचंड सैन्य हिंदवी स्वराज्यावर विविध मुलुखात पसरवायचे आणि मराठ्यांना घेरून, त्यांची कोंडी करून अल्पावधीत स्वराज्य गिळंकृत करावयाचे अशी योजना बादशहाने आखली. पण मराठ्यांनी आपल्या स्वपराक्रमाने ही योजना उधळून लावली. बादशहालाच किल्ले मोहीम व कर्नाटकात अडकवून मराठ्यांनी मोगल साम्राज्यात चढाया केल्या.
वाकीनखेड्याच्या मोहिमेच्या वेळी बादशहा दूर कर्नाटकात अडकला आणि इकडे बादशहाने जिंकलेले किल्ले एकामागोमाग एक परत घेण्याचा सपाटा मराठ्यांनी लावला. आपला मुलुख परत मिळवलाच पण दुसरीकडे उत्तरेत नर्मदा ओलांडून मोगल साम्राज्यात गुजरात, ओरिसा, माळव्यात आक्रमणे केली. तर दक्षिणेत कर्नाटक, आंध्रप्रदेशात मुलुख जिंकून संपत्ती जमवली. यावेळी मराठ्यांकडे सुमारे २ लक्ष सैन्य होते व ते चारही दिशांनी सतत मोहीम करून मोगलांना त्रस्त करून सोडत होते.
वाकीनखेड्यावरील औरंगजेब बादशहाच्या मोहिमेमुळे पुणे व परिसरातील मोगलांचा ताण कमी झाला व हीच संधी साधून मराठ्यांनी पुणे परिसरातील किल्ले मोगलांकडून परत घेण्यास सुरुवात केली. बादशहाने इकडे वाकीनखेडा किल्ला जिंकला तर तिकडे सिंहगड गमावला. अशी त्याची शोचनीय स्थिती झाली. (मोगल मर्दिनी ताराबाई)
या कालवधतीत मराठ्यांचा जोर किती वाढला होता. महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठे २०-३० हजारांच्या संख्येने गुजरात, माळवा, ओरिसा, वर्हाड-खानदेश, आंध्र-कर्नाटक अश्या विस्तीर्ण प्रदेशात संचार करत होते. प्रदेश उद्धवस्त करत होते. मोगलांना मिळेल तेथे लुटत होते. त्यांच्याकडून खंडण्या घेत होते. तर दुसरीकडे मोगल औरंगजेबाच्या हाताखाली लढेनासे झाले होते. बादशहाचे हुकूम मानेनासे झाले होते. बादशहाने काही हुकूम केल्यास त्यास कारणे सांगत होते. (मोगल मर्दिनी ताराबाई).
वाकीन खेड्याचा एक छोटा किल्ला बेडर लोकांकडून घ्यायला मोगलांना जे कष्ट पडले त्याचे आणि या मोहिमेदरम्यान मोगलांची झालेली अवस्था त्याचे सर जदुनाथ सरकारांनी वर्णन केली आहे "It supplies the most graphic illustration of the utter decline and weakness of the (Mughal) state.”
यावरूनच २४ वर्षात मराठ्यांनी औरंगजेबाची व मोगलांची किती दारुण अवस्था करून ठेवली होती हे कळते. जिहाद पुकारून दक्षिण आपल्या टापांखाली आणण्यासाठी आलेल्या औरंगजेबास शेवटी रिकाम्या हातानेच परतावे लागले.
दक्षिण दिग्विजयावेळी बांधलेली दक्षिणेतील लोकांची मोट मोगलांचे अवाढव्य परचक्र आले तरी मजबूतपणे टिकून राहिली व शेवटी बादशहास हताशपणे परतावे लागले यातच छत्रपती शिवरायांची महानता दिसून येते !
- राहुल शशिकांत भावे
२०/७/२०१९
संदर्भ :
मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर उत्तरार्ध - पुराणिक
मासिरे आलामगिरी - पगडी
अहकामे आलमगिरी - पगडी
मोगल मर्दिनी ताराबाई
मराठी रियासत खंड २ - सरदेसाई
मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध – पगडी
असे होते मोगल - मनुची
No comments:
Post a Comment