रायगड ते जिंजी..... एक खडतर प्रवास...!

आदिलशाही व कुतुबशाही एकेका वर्षाच्या अंतराने गिळंकृत केल्यावर आलमगीर बादशाह औरंगजेबाची भूक प्रचंड वाढली होती. आता त्याच्यासमोर मराठ्यांशिवाय एकही शत्रू दख्खनेत उरला नव्हता. पूर्ण ताकदीनिशी त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली. स्वराज्य चहुबाजूने वेढले गेले होते. छत्रपती संभाजी महाराज निकराची झुंज देत होते. पण औरंग्यारूपी काळाने आपला डाव साधला.
१ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी शेख निजामाने संगमेश्वर इथे संभाजी महाराजांना अटक केली. तो त्यांना त्वरेने घाटमाथ्यावर नेऊन पुढे औरंगजेबाच्या छावणीकडे दौडत होता. इकडे मराठ्यांच्या गोटात हाहाकार उडाला होता. त्या चकमकीत सेनापती म्हाळोजी घोरपडे ठार झाले तर त्यांचे पुत्र संताजी घोरपडे व त्यांचे दोन बंधू तसेच खंडो बल्लाळ चिटणीस आदी मातब्बर असामींनी रायगडाच्या दिशेने पळ काढला. एक दोन दिवसातच राजधानी रायगडावर छत्रपतींच्या अटकेची बातमी विजेच्या लोळाप्रमाणे येऊन कोसळली. 


यावेळी रायगडावर मराठ्यांची राणी येसूबाईसाहेब आपल्या सात वर्षांच्या युवराज शाहू समवेत होती. त्याशिवाय शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र युवराज राजाराम व त्यांचा कुटुंबकबिला देखील गडावर होता. पण राजाराम यासमयी नजरकैदेत होते. संगमेश्वर येथील अचानक पडणारा छापा, छत्रपतींची अटक व त्यानंतरची मुघलांची व खासकरून शेख निजामाची तत्परता याने सर्वच जण दिग्मूढ झाले होते. संभाजी राजांच्या सुटकेची शक्यता दिवसागणिक मावळत चालली होती. मराठा मंडळापुढे पुढील राज्यव्यवस्था लावणे क्रमप्राप्त होते. येसूबाईनी खाजगी सुखदुखांचा विचार न करता अत्यंत धैर्याने व धोरणीपणाने एकेक पाऊल उचलण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांनी रायगडाचे हवालदार चान्गोजी काटकर व येसाजी कंक यांच्या मदतीने राजारामांना नजरकैदेतून मुक्त केले. सर्व मुत्सद्द्यांच्या सल्ल्यानुसार राजाराम महाराजांचे ९ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी मंचकारोहण करून त्यांना मराठी राज्याचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. यावेळेस ते फक्त १९ वर्षांचे होते, तर हा निर्णय घेणाऱ्या येसूबाईचे वय २७-२८ च्या आसपास होते. त्यांचा हा निर्णय अत्यंत दूरगामी परिणाम करणारा ठरला. वास्तविक आपला मुलगा शाहू यास राजा घोषित करून सर्व कारभार आपल्या हाती घेणे त्यांना सहज शक्य होते, पण त्यांनी उदारमनाने राजारामांना सत्ता दिली व कौटुंबिक कलह टाळला.

तिकडे औरंगजेबाच्या छावणीत संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार होत होते व महाराज अत्यंत धैर्याने त्याला तोंड देत होते. औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर चौफेर हल्ला चढवत होता. त्याचे मुख्य लक्ष्य होते राजधानी रायगड. मराठ्यांचा छत्रपती आधीच त्याच्या कबज्यात होता, आता राजधानी जिंकली कि आपली दख्खन मोहीम यशस्वी झालीच याबाबत त्याच्या मनात शंका नव्हती. त्याने इतिकदखानाला रायगड जिंकण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले. इतिकदखान पूर्ण तयारीनिशी रायगड जिंकण्याच्या मोहिमेवर रुजू झाला. मराठ्यांचे एकामागून एक किल्ले मोगली वरवंट्याखाली भरडले जात होते. रायगडाच्या आजूबाजूच्या प्रदेशात मोगली फौजा संचार करू लागल्या होत्या. हळूहळू रायगड संकटात सापडणार अशी चिन्हे दिसू लागली होती.घाटावरील बरेचसे किल्ले मोगलांनी जिंकले होते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील किल्ले व कोकणातील प्रदेश इतकेच मराठी राज्य शिल्लक होते. याशिवाय सुदूर दक्षिणेत जिंजी, वेल्लोर यांच्या आजूबाजूचा तसेच कर्नाटक प्रांतातील काही एकसलग व काही तुटक असा प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली होता. शिवकाळात आजचे कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश, तामिळनाडू ह्या राज्यांचा प्रदेश कर्नाटक प्रांत म्हणून ओळखला जात होता. जिंजी येथे शिवाजी महाराजांचे जावई व अंबिकाबाईंचे पती हरजीराजे महाडिक कारभार पाहत होते. त्यांच्या कडक देखरेखित मराठी राज्याची व्यवस्था चोख होती.

रायगडावर मराठ्यांच्या तमाम मुत्सद्दी मंडळींची खलबतं सुरु होती. रायगडाला पूर्ण वेढा पडण्याआधी त्वरित हालचाल करणे भाग होते. किमान पावसाळा सुरु होईपर्यंत मोगलांना थोपविणे आवश्यक होते. पावसाळ्यात रायगडाला भिडण्याची हिम्मत मोगली मनगटात नव्हती. त्यातच संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येची बातमी रायगडावर येऊन धडकली. या बातमीने राजकारणाचा नूर पालटून गेला. मोगलांचे बळ अजून वाढले होते. या सर्व बाबींचा विचार करता रायगडावर एक थोरली मसलत झाली. यात सर्वात प्रमुख सहभाग हा येसूबाईंचा होता. येसूबाईंनी असा विचार मांडला कि रायगडावर संपूर्ण राजकुटुंबाने एकत्र राहणे धोक्याचे आहे. यदा कदाचित रायगडचा पाडाव झाला तर सगळेच मोगलांच्या तावडीत सापडतील व राज्याचा विनाश अटळ होईल. याकरिता येसूबाई, शाहूराजे यांनी गडावरच मुक्काम करून शर्थीने गड झुंजवायचा. तर दुसरीकडे राजाराम महाराज त्यांचा कुटुंबकबिला व इतर मुत्सद्दी व जाणत्या मंडळींनी गड सोडायचा व पन्हाळा, विशाळगड, रांगणा आदी मजबूत किल्ल्यांचा आश्रय घ्यायचा व मोगलांना जोरदार झुंज द्यायची. रायगडानजदीक येऊ पाहणाऱ्या मोगली सैन्यावर बाहेरून हल्ले करायचे. कालांतराने रायगडाबाहेर एखादे सुरक्षित स्थान निर्माण करून येसूबाई व शाहू राजांना सोडवून न्यायचे. गरज पडल्यास आणखी दक्षिणेकडे सरकत जिंजी गाठायची. यामुळे मोगलांचा रायगडावरील दबाव कमी होऊन मोगली सैन्याचा पसारा विस्तृत प्रदेशात वळवून त्यांना गनिमी काव्याने जेरीस आणता येईल. 

हि मसलत व त्याची अंमलबजावणी हि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाला कलाटणी देणारी ठरली. २५ मार्च १६८९ (ज्युलिअन दिनांक) या दिवशी इतिकदखान रायगड परिसरात आला व त्याने गडाला वेढा घालण्यास सुरुवात केली. पण प्रत्यक्षात हे काम अत्यंत जिकीरीचे व जवळजवळ अशक्य होते. गडाची उत्तर व पश्चिम बाजू एकवेळ वेढा घालण्याजोगी होती पण पूर्व व दक्षिण दिशेस घनदाट जंगल होते ज्यातून वेढा घाणले महाकर्मकठीण . याच संधीचा फायदा राजाराम महाराजांनी घेतला. वेढा घालण्याचे काम सुरु झाले होते पण त्यात ढिलाई असताना ५ एप्रिल १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी राजाराम महाराजांनी रायगड सोडला. त्यांनी भवानी टोकावरील बुरुजावरून अथवा वाघ दरवाज्यातून पळ काढण्याची शक्यता आहे. राजाराम महाराज प्रतापगडाच्या आश्रयास गेले. या दिवसापासून राजाराम महाराज व मोगल यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरु झाला.

तत्पूर्वी अशा एका घटनेचा वेध घेऊ जी इतिहासाच्या पानात हरवून गेली आहे. इतिकदखानाने रायगड जिंकण्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरु केली व आपल्या सरदारांना रायगड परिसरात उतरण्याचे आदेश दिले रायगडाच्या खोऱ्यात उतरण्यासाठी घाटमाथ्यावरून अनेक वाट कोकणात उतरतात. अशीच एक वाट पुण्याहून पानशेत घोळ मार्गे घाटमाथ्यावरील गारजाईवाडी इथे येते व इथून कावल्या बावल्या खिंडीतून कोकणात सांदोशी या गावात उतरते. या खिंडीला लागुनच कोकणदिवा हा किल्ला आहे. रायगडाच्या संरक्षण व्यवस्थेत त्याच्या भोवती जी किल्ल्यांची शृंखला आहे त्यातील एक महत्वाचा किल्ला. रायगडावरील टकमक टोकासमोरील काळ नदीच्या खोऱ्यात हा किल्ला आहे. इतिकदखानाचा सरदार शहाबुद्दीन खान हा पठाणांची फौज घेऊन कावल्याबावल्याच्या खिंडीतून उतरणार असल्याची बातमी सांदोशी गावातील गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांना कळली. त्यांनी ताबडतोब मराठ्यांची एक निवडक तुकडी जमवून खिंडीत दबा धरून बसण्याचे ठरविले. शहाबुद्दीन खान खिंडीजवळ आल्यावर मराठे अत्यंत त्वेषाने पठाणांवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश पाहुन मोगलांनी माघार घेतली. अनेक पठाणांची कत्तल करण्यात आली. या वीरांनी धाडसी निर्णय घेऊन मोगलांना थोपविले नसते तर रायगड या अगोदरच वेढला गेला असता व संपूर्ण राजमंडळ अडकले असते. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या त्या दोन मराठी सरदारांना व त्यांच्या वीर तुकडीला मानाचा मुजरा.

इकडे राजाराम महाराज वेढ्यातून निसटल्याची बातमी समजताच इतिकदखानाने आपला एक सरदार त्यांच्या मागावर पाठविला. पण त्यास यश आले नाही व राजाराम महाराज सुखरूप प्रतापगडावर पोहोचले. जवळजवळ एक दीड महिना ते प्रतापगडावर मुक्काम करून होते. या दरम्यान इतिकदखानाने एक तुकडी प्रतापगडावर रवाना केली. त्यांच्याशी राजाराम महाराजांनी प्रतापगडावाहेर पडून झुंज दिली. पण मोगली जोर जास्त आहे हे पाहून त्यांनी माघार घेतली. आता लवकरच प्रतापगडालाही वेढा पडणार हे निश्चित होते. राजाराम महाराज तिथून निसटून वासोटा किल्ल्यावर गेले. मोगली पाठलाग सतत सुरु होता. त्यामुळे वासोट्यावरून साताऱ्याचा किल्ला – सज्जनगड – वसंतगड या मार्गे भर पावसाळ्यात राजाराम महाराज जून अखेरीस पन्हाळा किल्ल्यावर आले. 

एकीकडे इतिकदखानाने रायगडचा वेढा करकचून आवळला होता, तर दुसरीकडे एकेक करून मराठ्यांचे किल्ले पडत होते. सिंहगड, पुरंदर, राजगड, तोरणा, प्रतापगड एकेक करत मोगलांच्या स्वाधीन झाले. हळूहळू मराठ्यांचा मुलुख आक्रसत चालला होता. पावसाळ्यामुळे मराठ्यांना थोडी उसंत मिळाली होती. ठिकठिकाणी मराठी फौजा मोगलांना भिडल्या होत्या. ऑगस्ट १६८९ मध्ये धनाजी जाधवांनी फलटण परिसरात हल्ले चढवून शहाबुद्दीनखान व रणमस्तखान पन्नी यांचा पराभव केला. तर संताजी, बहिर्जी, मालोजी हे घोरपडे बंधू व विठोजी चव्हाण यांनी एक धाडसी बेत आखला. त्यांनी औरंगजेबाच्या तुळापुर येथील छावणीवरच हल्ला केला. औरंगजेबाचे छावणीतील निवासस्थान म्हणजेच गुलालबार इथवर मराठ्यांनी मुसंडी मारली. मुघलांची दाणादाण उडाली. नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब वाचला, पण संताजींनी त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. यापुढे संताजींनी आपला मोर्चा रायगडाकडे वळवला व इतिकदखानाच्या वेढ्यावर बाहेरून हल्ले चढवले. खानाचे खूप नुकसान झाले या हल्ल्यात. त्याचे पाच हत्ती व अगणित संपत्ती मराठ्यांना लुट म्हणून मिळाली. या सर्व विजयी वीरांचा पन्हाळ्यावर राजाराम महाराजांनी यथोचित सन्मान केला. संताजी घोरपडे यांना ‘ममलकतमदार’ म्हणजे राज्याचा आधारस्तंभ हा किताब दिला तर धनाजी जाधवांना ‘जयसिंगराव’ हा किताब दिला. बहिर्जी घोरपडे यांना ‘हिंदुराव’, मालोजी घोरपडे यांना ‘अमीरूलउमराव’ तर विठोजी चव्हाण यांना ‘हिम्मतबहाद्दर’ अशा किताबांनी सन्मानित केले. येणाऱ्या काळातील संताजी धनाजी या जोडगोळीच्या महापराक्रमाची हि नांदीच ठरली.

पावसाळ्यानंतर मराठा मोगल संघर्षाला नव्याने सुरुवात होणार होती. संताजी धनाजींनी मोगलांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले असले तरी मराठ्यांचे बळ अपुरे होते. मोगली सेनासागर स्वराज्य गिळंकृत करू पाहत होता. औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा घालण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. पन्हाळ्यावर मराठी मुत्सद्द्यांची खलबते सुरु होती. पन्हाळगडावर रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, निळो मोरेश्वर पेशवे, खंडो बल्लाळ चिटणीस, जनार्दनपंत हणमंते, कृष्णाजी अनंत सभासद, बहिर्जी घोरपडे, मानाजी मोरे, रुपाजी भोसले, विठोजी चव्हाण, हंबीरराव मोहिते (दुसरे) सरलष्कर अशी मातब्बर मंडळी जमा झाली होती. राजाराम महाराजांसाठी पन्हाळा, विशाळगड, रांगणा असे मोजकेच बळकट डोंगरी किल्ले आश्रयासाठी उरले होते. पण लवकरच या ठिकाणी मोगली वेढ्याची शक्यता होती. राजाराम महाराज आता महाराष्ट्रात सुरक्षित राहू शकत नव्हते. त्यामुळे सर्व मुत्सद्द्यांनी अशी मसलत दिली कि राजाराम महाराजांनी पन्हाळ्याबाहेर पडून महाराष्ट्र सोडून दूर कर्नाटक प्रांतातील जिंजी किल्ल्याच्या आश्रयास जावे. तेथे मराठ्यांची नवी राजधानी बसवावी व मोगलांविरुद्ध लढा सुरु ठेवावा. अन्यथा लवकरच सर्वांना शरणागती पत्करावी लागेल. या प्रदेशातील हिंदू पाळेगारांची लहान लहान संस्थाने मराठ्यांना अनुकूल होती. पूर्वी शहाजी राजे व शिवाजी राजे यांनी या सर्वांना मदत केली होती. औरंगजेबाची वक्र दृष्टी एक ना एक दिवस आपल्यावर पडणार याची या संस्थानिकांना कल्पना होतीच. सर्व बळ एकवटून ते मराठ्यांच्या पाठीशी उभे राहिले. जिंजी हा बुलंद व बेलाग किल्ला होता. राजगिरी, कृष्णगिरी व चंद्रायणदुर्ग या तीन बालेकील्ल्यांचा मिळून हा किल्ला अभेद्य झाला होता. मराठ्यांच्या नव्या राजधानीच्या दृष्टीने हा सर्वथा योग्य होता. शिवाय मोगलांना पाठलाग करत जिंजीपर्यंत येणे भाग होते जेणेकरून त्यांची महाराष्ट्रावरील पकड ढिली पडणार होती. मोगलांचे बळ विभागले जाणार होते.

राजाराम महाराजांनी कर्नाटक प्रांतात जाण्यापूर्वी रामचंद्रपंत अमात्य यांना ‘हुकुमतपन्हा’ हा किताब दिला, तर शंकराजी नारायण यांना ‘राजाज्ञा’ हा किताब दिला. संपूर्ण स्वराज्याचा कारभार त्यांच्या सुपूर्द केला. हे किताब नाममात्र नव्हते तर अधिकारदर्शक व सत्तादर्शक होते. स्वराज्यातील जनतेने यापुढे दोन्ही पंतांची आज्ञापत्रे म्हणजे खुद्द छत्रपतींची राजपत्रे आहेत असे समजावे असे जाहीर केले. हि एक अतिशय विलक्षण घटना होती. रामचंद्रपंत व संताजी घोरपडे यांनी पन्हाळगड विशाळगड परिसरात राहून आणि शंकराजी नारायण व धनाजी जाधव यांनी लोहगड राजमाची परिसरात राहून मोगलांविरुद्ध संघर्ष सुरु ठेवावा असे ठरले. 

अशाप्रकारे स्वराज्याची व्यवस्था मुत्सद्द्यांच्या हाती सोपवून राजाराम महाराजांनी दसऱ्यानंतर शके १६११ अश्विन वद्य अष्टमी, २६ सप्टेंबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी पन्हाळगड सोडला. त्यांच्याबरोबर प्रल्हाद निराजी, सेनापती खंडूजी नाईक पानसंबळ, खंडो बल्लाळ, कृष्णाजी अनंत सभासद, उद्धव योगदेव, नीलकंठ कृष्ण पारसनीस, मानसिंग मोरे, बहिरव मोरेश्वर, खंडोजी कदम, बाजी कदम, संताजी जगताप अशी निवडक पण निष्ठावान माणसे होती. जिंजीपर्यंतचा प्रवास अत्यंत गुप्तपणे करायचा होता. वाटेत अनेक धोके होते. महाराजांचा कुटुंब कबिला विशाळगड येथे पाठविला गेला. राजांच्या खजिन्याची जबाबदारी गिरजोजी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. सुरुवातीला ते राजाराम महाराजांच्या समवेत होते पण नंतर संभाव्य धोके पाहता त्यांनी एका तुकडीसह स्वतंत्र मार्गाने जिंजी गाठायची असे ठरले. मोगली सरदार रुहुल्लाखान पन्हाळ्यास वेढा घालण्याच्या तयारीत होता, पण वेढा पूर्ण होण्याच्या आतच राजाराम महाराज तिथून निसटले. 

राजाराम महाराजांच्या पदरी केशवपंडित नामक एक ब्राह्मण होता त्याने जिंजी येथे राजारामचरितं नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांच्या पन्हाळा ते जिंजी या प्रवासाचे साद्यंत वर्णन आढळते. हे वर्णन इतर साधनांशी तंतोतंत जुळते. त्यातील बारीकसारीक विवेचनावरून हा केशवपंडित राजाराम महाराजांसोबत या संपूर्ण प्रवासात असावा असा निष्कर्ष काढता येतो. हा ग्रंथ जिंजी येथे पोहचल्यानंतर काही दिवसातच लिहिला गेला आहे.

राजाराम महाराजांनी दुसऱ्या दिवशी कृष्णा नदी पार केली. वाटेत त्यांना काही सरदार येऊन मिळत होते. बहिर्जी व मालोजी घोरपडे असेच त्यांना वाटेत येऊन मिळाले. राजाराम महाराजांच्या पलायनाची बातमी समजल्यावर औरंगजेबाने आपल्या सरदारास त्यांच्या पाठलागावर सोडले. त्याने अब्दुल्लाखान बाऱ्हा यास राजारामास कैद करण्याची आज्ञा केली. तो यावेळेस विजापूर प्रांतातील दोन किल्ले जिंकण्याच्या कामगिरीवर होता. ते सोडून तो राजारामाच्या मागे लागला. कृष्णेच्या तीरावरून सर्व मंडळींचा घोड्यावरून प्रवास सुरु झाला. ते अत्यंत शिताफीने लांब लांब मजला मारत होते. साधारण तीस पस्तीस दिवसात त्यांनी हा पाचशे मैलांचा प्रवास पूर्ण केला. आता गोकर्ण, गोकाक, सौंदत्ती मार्गे ते तुंगभद्रेच्या दिशेने प्रवास करीत होते. येथील एक नदी, बहुदा वर्धा, ओलांडताना मोगल पाठलाग करीत अत्यंत जवळ आले. तिथे बहिर्जी व मालोजी घोरपडे यांनी निकराची लढाई केली पण त्यांचे बळ कमी पडू लागले. त्यासमयी रूपसिंह भोसले व संताजी जगताप मदतीला धावले. या लढाईत मोगलांचे सिद्दी अब्दुल कादिर व सय्यद अब्दुल्लाखन हे सरदार जखमी झाले. रूपसिंह भोसले व संताजी जगताप यांनी मोगलांना अडवून ठेवले व मराठे नदीपल्याड गेले. आता ते बिदनूरच्या दिशेने निघाले. हा संग्राम लक्ष्मेश्वरच्या आसपास झाला. यात संताजी जगताप यांच्यासहित ७० मराठे मोगलांच्या तावडीत सापडले.

अब्दुल्लाखान बाऱ्हा व त्याचा मुलगा हसनअलीखान यांनी बिदनूरच्या दिशेने कूच केले. सतत तीन दिवस व तीन रात्र घोडदौड करीत ते सुभानगड व जिरा (किंवा हिरा) या किल्ल्यानजिक बिदनूरच्या हद्दीत तुंगभद्रा नदीकाठी पोहोचले. या ठिकाणी तुंगभद्रा नदीच्या पात्रात एक बेट होते. तेथे राजारामांनी आश्रय घेतला होता. अब्दुल्लाखानाने रात्रीच तेथे हल्ला केला. तुंबळ चकमक झाली. अनेक मराठा सरदार कैद झाले, पण या धुमश्चक्रीत देखील अत्यंत शिताफीने राजाराम महाराज निसटले. त्यांनी आपली शस्त्रे, वस्त्रे, पागोटे, पादत्राणे वगैरे सगळे काही टाकून दिले. बहिर्जी घोरपडे यांनी आपल्या खांद्यावर राजाराम महाराजांना बसवून नदी पार केली. पुढील काही प्रवास त्यांनी पायी केला. या पळापळीत काही काळाने शंभर मराठ्यांना कैद झाली. यात बहिर्जी घोरपडे पण होते. अब्दुल्लाखानाने उत्साहाच्या भरात बादशाहाकडे खबर पाठवली कि राजारामास कैद केले आहे. मग खूष होऊन राजारामला आणण्यासाठी बादशाहने हमिदुद्दिनखानाला रवाना केले. पण नंतर अब्दुल्लाखानास आपली चूक कळून आली व त्याने नवी खबर पाठवली कि राजाराम पळून गेला पण त्याची माणसे कैद झाली आहेत. यावर बादशाहने सर्व कैद्यांना विजापूर येथील अर्क या किल्ल्यात डांबले. पण आश्चर्य म्हणजे बहिर्जी घोरपडे व इतर असे वीस मराठे या कैदेतून निसटून राजाराम महाराजांकडे परतले. इकडे हि खबर मिळताच बादशहा प्रचंड चिडला. उर्वरित कैद्यांना बादशाहाकडे पाठवण्यात आले. तिथे सर्वांना ठार मारण्यात आले. झाल्या प्रकारचा ठपका अब्दुल्लाखान बाऱ्हा याची मनसब कमी करण्यात आली व विजापुराहून त्याची बदली करण्यात आली.

आता राजाराम महाराजांनी बिद्नुरची राणी चेन्नम्मा हिच्याकडे आश्रय घेतला. आपल्या या कृतीने आपण औरंगजेबाचा रोष ओढवून घेऊ हे जाणूनही राणी चेन्नाम्माने हे धाडस केले. अर्थात यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई होती. पूर्वी एकदा तिमण्णा नावाच्या सरदाराने राणीची सत्ता उलथवून तिला कैद करण्याचा घाट घातला होता. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी तिला मदत केली होती. आज त्यांचा पुत्र अडचणीत आल्यावर राणीने आपल्यावरील उपकारांची परतफेड करण्याची संधी साधली. राणीच्या या धाडसाला प्रत्युत्तर देण्यासाठी औरंगजेबाने जाननिसारखान, शर्जाखान विजापुरी, मतलबखान व तहव्वूरखान यांना बिद्नुरवर रवाना केले. पण ते बिदनूर राज्यात पोहोचण्यापूर्वीच मागून त्यांच्यावर संताजी घोरपडे यांनी तुफान हल्ला केला व मोगलांची दाणादाण उडवली. मोगल अधिकाऱ्यांनी राणीकडे राजाराम यांच्याविषयी चोकशी केली. पण राणीने त्यांना दाद लागू दिली नाही. संताजी घोरपडे यांच्या हल्ल्यामुळे बिदनूर राज्यावरील संकट टळले. त्याचप्रमाणे राजाराम महाराजांचा प्रवासही सुखरूप पार पडला. पुढे औरंगजेबाने बिदनूरकडून झाल्या प्रकाराबद्दल आठ लाख रुपये खंडणी व पंचवीस हजार वार्षिक नजराणा वसूल केला.

बिदनूर राज्यातून राजाराम महाराज आता हिंदू पाळेगार संस्थानिकांच्या प्रदेशात शिरले. या प्रदेशात त्यांचा पाठलाग त्यामानाने कमी झाला. पण इथेही मोगली गुप्तचर त्यांच्या मागावर होतेच. राजाराम महाराज व त्यांचे सहकारी एकत्रित प्रवास न करता गटागटाने प्रवास करू लागले. तसेच त्यांनी वेषांतरदेखील केले. कोणी कापडी म्हणजे यात्रेकरूंचा वेष तर कोणी भिकाऱ्यांचा वेष धारण केला, कोणी व्यापारी तर कोणी बैरागी बनून फिरू लागले. बंगळूर येथील मुक्कामी काही लोकांना या मंडळींचा संशय आला. कारण दिसताना सर्व यात्रेकरू असले तरी ते त्यांच्यातीलच एकाला म्हणजे राजारामांना विशेष वागणूक देत होते. राजाराम महाराज पाय धुताना एक जण पाणी घालतो, एक जण पाय धुतो तर एक जण पाय पुसतो. हा प्रसंग बघून काही कानडी व्यक्तींना संशय येऊन ते मोगली ठाण्यावर तक्रार करण्यास निघाले. ते समयी खंडो बल्लाळ चिटणीस यांनी सांगितले कि सर्व मंडळींनी निरनिराळ्या गटाने त्वरित बाहेर पडून विविक्षित ठिकाणी मुक्काम करावा. ते स्वतः व इतर काही व्यक्ती मागे थांबून चौकशीस सामोरे जातील. त्याप्रमाणे मोगली सैनिकांच्या अटकेत खंडो बल्लाळ व इतर मराठे पडले. पण त्यांनी तीन चार दिवसांपर्यंत आपले तोंड उघडले नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही यात्रेकरू आहोत, रामेश्वरास यात्रेस निघालो आहोत, सोबतची मंडळी आता दुसऱ्या क्षेत्री यात्रेस गेली आहेत अशी बतावणी केली, परंतु आपले खरे रूप उघडकीस आणले नाही. मोगलांनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, खंडो बल्लाळ यांचे तोंडी राखेचे तोबरे भरवले. अंती त्यांना सोडून देण्यात आले. पूर्वी ठरवल्याप्रमाणे ते राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. या संपूर्ण प्रवासात बहिर्जी घोरपडे यांनी राजाराम महाराजांची अगदी आपल्या मित्राप्रमाणे काळजी घेतली. कधी दाइचे, सेवकाचे, मित्राचे, नातेवाईकाचे असे सर्व प्रकारचे काम करून राजारामांची सेवा केली.

मजल दरमजल करीत सर्वजण पालार नदीकाठी अंबुर या ठिकाणी पोहोचले. तेथील एका देवळात सर्वांनी मुक्काम केला. इथून पुढे मराठी मुलुख सुरु होत होता. याजवळच बाजीराव काकडे हा मराठा सरदार छावणी करून होता. त्याला बहिर्जी घोरपडे यांनी महाराजांच्या आगमनाची वार्ता कळवली. तो तडक महाराजांच्या भेटीला आला. त्याने महाराजांचा यथोचित सत्कार केला. आता काही प्रमाणावर मराठी सैन्य राजाराम महाराजांना उपलब्ध झाले. राजारामांनी वेल्लोरच्या भुईकोटात मुक्काम केला. राजाराम महाराजांनी पन्हाळा सोडल्यावर काही दिवसातच २९ सप्टेंबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी हरजीराजे महाडिक यांचे निधन झाले व जिंजीचा सर्व कारभार शिवरायांची कन्या अंबिकाबाई यांच्याकडे आला. राजारामांचे दक्षिणेतील आगमन त्यांच्या अधिकारावर गदा आणणारे ठरले. त्यामुळे त्यांनी आपल्या सावत्रभावाला विरोध करायचा ठरवले. २८ ऑक्टोबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी राजाराम वेल्लोरच्या कोटात पोहोचले. तेथून त्यांनी आपल्या सावत्रबहिणीकडे आपला वकील पाठवला व जिंजीचा किल्ला स्वाधीन करण्याविषयी निरोप दिला. परंतु उलट अंबिकाबाईंनी राजारामांविरुद्ध लढण्याचा पावित्रा घेतला. त्या वेल्लोरच्या दिशेने ससैन्य निघाल्या. पण वाटेत त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. आपली लंगडी बाजू बघता त्यांनी माघार घेतली. राजाराम महाराजांना दक्षिणेतील विविध मराठी किल्लेदार, ठाणेदार, मुलकी, प्रशासनिक व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वराज्याचे छत्रपती म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंबिकाबाईंचा विरोध पूर्णपणे निष्प्रभ ठरला व त्यांनी जिंजी किल्ला राजारामांच्या स्वाधीन केला. २ नोव्हेंबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात दाखल झाले. 

यावेळी महाराष्ट्रात मोगल मराठा संघर्ष तीव्र झाला होता. रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी एकदिलाने लढा देऊन चिवट प्रतिकार करत होते. तिकडे इतिकदखानाने रायगडाचा वेढा चोख ठेवला होता. रायगडहि मोगली वेढ्याला दाद देत नव्हता. पण तुंगभद्रा नदीकाठी झालेल्या संग्रामानंतर राजाराम महाराजांच्या अटकेच्या बातमीने सर्व नूर पालटला. रायगडावर भीतीचे ढग जमा होऊ लागले. दक्षिणेतून उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे रायगडावरून येसूबाईंच्या सुटकेची आशा मावळत चालली होती. मोगलांची सरशी झाल्यास गडावरील राजकुटुंबास धोका होता. मोगली आक्रमणात त्यांची हत्या झाली असती किंवा कैदेत विटंबना झाली असती. त्यामुळे मोगलांशी सन्मानपूर्वक बोलणी करून वाटाघाटी करण्याकडे येसूबाईंचा कल झुकू लागला. त्याप्रमाणे त्यांनी इतिकदखानकडे निरोप पाठवला. इतिकदखानाने आलेल्या संधीचा फायदा उठवला. रायगड आपल्या ताब्यात आल्यास आपण संभाजी महाराजांच्या कुटुंबास सन्मानाने वागवू असा निरोप त्याने पाठविला. वाटाघाटीना हळूहळू यश येऊ लागले. ३ नोव्हेंबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. योगायोगाने याच्या एकच दिवस अगोदर राजाराम महाराज सुखरूप जिंजीत पोहोचले होते. येसूबाईसाहेबांचा धोरणीपणा पुन्हा एकवार दिसून येतो. स्वराज्याचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्या स्वतःहून कैदेत गेल्या. यावेळी त्यांच्या बरोबर युवराज शाहू, शिवरायांच्या पत्नी सकवारबाईसाहेब व रायगडावरील इतर प्रमुख अधिकारी व त्यांचे कुटुंबकबिले मोगलांच्या कैदेत गेले.

रायगड पडल्याच्या बातमीने औरंगजेब बेहद्द खुश झाला. त्याने त्वरित इतिकदखानास सर्व कैद्यांसह आपल्या छावणीत बोलावले. औरंगजेबाने सर्व कैद्यांचा यथोचित सन्मान केला. शाहुराजांना ७००० जात व ७००० स्वार अशी हफ्तहजारी मनसब दिली. संभाजीराजांचे रक्षापुत्र मदनसिंग व मानसिंग यांना मनसबी दिल्या. सकवारबाई व येसूबाई यांना उंची वस्त्रे व अलंकार दिले. त्यांच्या राहण्यासाठी छावणीतील गुलालबार या स्वतःच्या निवासस्थानाजवळ व्यवस्था केली. सर्वांच्या सरंजामाचा खर्च व्यवस्थित चालवा यासाठी कारभारी नेमले. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेल्या व तुळापुर च्या छावणीत संभाजी महाराजान्चू हालचाल करून हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे हे वर्तन चक्रावून टाकणारे आहे. येसूबाईंच्या प्रदीर्घ कैदेची हि सुरुवात होती. पुढे औरंगजेबाबरोबर हे कैदीही संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडत होते. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्युनंतर सर्व मुघल उत्तरेत जाताना वाटेत त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली परंतु येसूबाईसाहेब यांना दिल्लीतच कैदेत राहावे लागले. पुढे १७१९ साली पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या दिल्लीवारीत त्यांची सुटका झाली. अशा तऱ्हेने ३० वर्षे त्या मोगली कैदेत होत्या.

इतका मोठा विजय मिळवल्याबद्दल इतिकदखानवर बक्षिसांचा वर्षाव झाला. त्याला तीन हजारी मनसब दिली गेली. खिलतीची वस्त्रे, घोडा, धनुष्य बाण, रोख ३०००० रुपये व रायगडावरून आणलेली संभाजी महाराजांची माहीमरातबाची चिन्हे व ध्वजपण देण्यात आले. शिवाय त्याला ‘झुल्फिकारखान बहादूर’ हा किताबही देण्यात आला. औरंगजेबाने रायगडाचे नामांतर करून त्यास ‘इस्लामगड’ हे नाव दिले. रायगडावरील शिवाजी महाराजांचे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन इतिकदखानाने घणाचे घाव घालून फोडले. याशिवाय अगणित संपत्तीची लुट मोगलांना रायगडावर मिळाली. 

जिंजीत राजाराम महाराज हळूहळू स्थिरस्थावर होत होते. गिरजोजी यादव मोगली पहाऱ्यातून वाचवत त्यांची संपत्ती घेऊन जिंजीत आले. काही दिवसांनी राजाराम महाराजांचा कुटुंब कबिलाही सुखरूप जिंजीत पोहोचला. राजारामांचे जिंजीत आगमन हा औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेला कलाटणी देणारा प्रसंग होता. आता त्यास महाराष्ट्रावरील आपला दाब कमी करून जिंजीपर्यंतच्या विस्तीर्ण मुलुखात मोहीम उघडणे भाग होते. त्याप्रमाणे त्याने झुल्फिकारखानची त्याने जिंजी मोहिमेवर रवानगी केली. सुमारे एक लाखाच्या आसपास सैन्य दक्षिणेकडे रवाना झाले. जागोजागी चौक्या, ठाणी, पहारे, डाकव्यवस्था, रसदव्यवस्था उभारणे आवश्यक ठरले. दोन स्वतंत्र स्वार्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता औरंगजेबाने आपली भीमा कोरेगावची छावणी विजापुरकडे हलवली व तो १८ डिसेंबर १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी विजापुरात दाखल झाला.

राजाराम महाराजांचे रायगडावरून यशस्वी पलायन, जिंजीचा खडतर प्रवास व तेथील सुखरूप आगमन यामुळे मराठी मंडळींना एक वेगळाच हुरूप आला. रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण यांच्या मुत्सद्देगिरीने आणि संताजी धनाजी यांच्या चढत्या पराक्रमाने नाराज, निराश, मरगळलेल्या मराठी सरदारात नवचैतन्य पसरू लागले. अनेक सरदार, वतनदार मंडळी पुन्हा एकवार मराठ्यांना सामील होऊ लागली. वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रावर मोगली आक्रमणाचे काळे कुट्ट ढग जमा झाले होते. त्यातच संभाजी महाराजांची अनपेक्षित अटक व नंतर त्यांची क्रूर हत्या यामुळे हे ढग अधिकच गडद झाले व महाराष्ट्रावर पारतंत्र्याचा काळोख पसरू लागला. पण या निर्घृण हत्येमुळेच मराठी मन व समाज पेटून उठला. संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने एक तेजस्वी किरण शलाका प्रवर्तित झाली व वर्ष संपता संपता ते काळे कुट्ट ढग सरून चैतन्याच्या, पराक्रमाच्या, त्यागाच्या, स्वाभिमानाच्या, स्वदेशप्रेमाच्या, स्वधर्माच्या दिव्य सूर्यप्रकाशाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान तळपू लागला. 

अमोल मांडके
२४ सप्टेंबर २०१७

संदर्भ

१. मराठी रियासत – खंड २ – उग्रप्रकृती संभाजी व स्थिरबुद्धी राजाराम – गोविंद सखाराम सरदेसाई
२. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) – छत्रपती राजाराम व ताराबाई – प्रा. श. श्री. पुराणिक
३. राजारामचरितं अथवा जिंजीचा प्रवास – वा. सी. बेंद्रे
४. औरंगजेब – जदुनाथ सरकार (अनुवाद – श. गो. कोलारकर)
५. महाराज्ञी येसूबाई - डॉ. सदाशिव शिवदे
६. छत्रपती राजाराम व ताराराणी – डॉ. सदाशिव शिवदे
७. किल्ले जिंजी – महेश तेंडूलकर

1 comment:

  1. उत्तम लेख. उत्कृष्ट भाषाशैली!

    ReplyDelete