मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – संभाजी पर्व- एक आढावा !



जनसेवा समिती,विलेपार्ले संचालित “इतिहास कट्टा-गौरव इतिहासाचा” या ब्लॉगवर आपण दि १० मे २०१७ पासून “मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - सन १६८२ ते सन १७०७” या नावाने या कालखंडात औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली स्वराज्यात ठाण मांडून बसलेल्या बलाढ्य मोगली आक्रमकांच्या विरुद्ध मराठ्यांनी देव-देश आणि धर्म यांच्या प्रतिष्ठा आणि सन्मान यासाठी सलग पंचवीस वर्षे अप्रतिहत आणि आर-पारचा जो लढा दिला त्याचा अभ्यासपूर्ण आढावा मराठी व इंग्रजी लेखमालेतून घेत आहोत.

अमोल मांडके, उमेश जोशी, केतव चाफेकर, राहुल भावे, अदिती काजरेकर आणि जान्हवी दातार या आमच्या सहा युवा प्रतिभावान कार्यकर्त्यांच्या लेखणीतून उतरलेले हे लेख वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. हा ब्लॉग सुरु झाल्यापासून चार महिन्यांच्या काळात ब्लॉगने ९००० वाचक संख्येचा टप्पा पार करून दशसहस्त्र टप्प्याच्या दिशेने या ब्लॉगची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

या ब्लॉगचा केंद्रबिंदू-विषय असलेलले ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ मोगल सम्राट औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील आगमनाने म्हणजेच सन १६८२ पासून सुरु होते. हा रणसंग्राम औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत म्हणजेच सन १७०७ पर्यंत २५ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळाकरता चालला. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासात इतका प्रदीर्घ दुसरा कोणताही लढा झाल्याची नोंद आढळत नाही. सर्व गोष्टी प्रतिकूल असतानाही मोगलांच्या अन्यायी आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून औरंगजेब आणि मोगली सेनेला विरोध झाला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’अक्षरश: अशी परिस्थिती त्याकाळी स्वराज्यात निर्माण झाली होती. या २५ वर्षांच्या कालखंडाचे ढोबळ मानाने तीन भाग करता येतील. ते असे आहेत ...

· संभाजी पर्व-सन १६८२ ते १६८९ 

· राजाराम पर्व-सन १६८९ ते १७०० 

· ताराराणी पर्व-सन १७०० ते १७०७ 

या ब्लॉग सिरीजच्या पहिल्या टप्प्याच्या म्हणजेच संभाजी पर्वाच्या अंतिम चरणावर आपण आता येऊन पोचलो आहोत.

आतापर्यंत या ब्लॉगवर आपण सन १६८२ ते १६८९ या सात वर्षातील संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचा तसेच मोगल आणि मराठे यांचा युद्धभूमीवरील संघर्षाचा, दोन्ही बाजूंकडील घडामोडींचा आणि संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने शेवट झालेल्या “संभाजी पर्वाचा” थोडा दुर्लक्षित, उपेक्षित आणि अपरिचित परंतु प्रेरणादायी आणि जाज्वल्य इतिहास एकूण १२ मराठी-इंग्रजी लेखांच्या माध्यमातून यथामती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

सन १६८२ ते १६८९ या कालखंडात घडलेल्या घटना, घडामोडी, युद्ध आणि हर्षमार्षाचे प्रसंग यांची नुसती यादी जरी करायची ठरवली तरी ती खूप मोठी होईल. या कालखंडावर आणि तात्कालीन देश-समाज परीस्थितीवर ठसा उमटवणाऱ्या ज्या घटना ठळकपणे पुढे येतात त्या अशा.. 

· छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत संभाजी महाराजांचे रायगडी झालेले आगमन व त्यांचा राज्याभिषेक.

· त्यावेळी जुन्या, ज्येष्ठ मंत्रीगणाकडून झालेला अंतर्गत विरोध, कट–कारस्थाने आणि त्यावर संभाजी राजांनी केलेली यशस्वी मात व स्वराज्याची घडी पूर्ववत करण्यासाठी केलेले प्रयत्न.

· त्याच दरम्यान औरंगजेबपुत्र अकबराचे बापाविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे झालेले आगमन. त्यानी अकबराला दिलेला राजाश्रय व अभय.

· या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या मोगल सम्राट औरंगजेबाचे ही योग्य संधी आहे असे पाहून महाराष्ट्राच्या सह्य-मंचावर (पुढे अर्थात ते त्यासाठी अ-सह्य ठरले) भविष्यातील रण-नाट्याची जणू नांदीच ठरलेले आगमन.

· इये महाराष्ट्र देशी त्यामुळे उद्भवलेली युद्धजन्य परिस्थिती.औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्यासाठी केलेले चौफेर हल्ले.अननवयीतअत्याचार.

· भूमिपुत्रांना फितवण्यासाठी त्याने सढळ हस्ते दिलेली आमिषे, वतनाचे देकार. त्यांना बळी पडून स्वराज्याशी गद्दारी करणारे आपलेच आप्त आणि स्वकीय.

· या अश्या प्रतिकूल परिस्थितीत मोगल, पोर्तुगीज, हबशी इतक्या शत्रूंना एकाचवेळी अंगावर घेऊन विविध आघाड्यांवर संभाजी महाराजानी त्यांना धीरोदात्तपणे दिलेला लढा. 

· आपल्या पार्थ पराक्रमाने पायबंद घालणारे संभाजी राजांचे कणखर, आक्रमक नेतृत्व.

· सरते शेवटी या नरकेसरीला संगमेश्वर मुक्कामी झालेली दुर्दैवी अटक. मृत्युंजय शिवपुत्राची, महाराष्ट्राच्या छत्रपतीची त्यानंतर औरंगजेबाकडून झालेली अप्रतिष्ठा व संभाजी महाराज आणि कवी कलश यांची त्याने केलेली क्रूर हत्या.

संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर निर्माण झालेल्या अतिशय गंभीर परिस्थितीतून पुढे राजाराम महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसा मार्ग काढला व जिंजी येथून मोगलांविरुद्ध सुरु असलेला संघर्ष कश्या प्रकारे धगधगता ठेवला याचा परामार्ष “राजाराम पर्व-सन १६८९ ते सन १७००”या ब्लॉग सिरीजमधील आगामी लेखांमधून आपण घेणार आहोतच. 

स्वातंत्र्यसमरातील संभाजी पर्वाच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर एकूणच या संपूर्ण कालखंडाचा एक धावता आढावा घेण्याचा एक छोटा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.

स्वातंत्र्यसमराचा ओनामा औरंगजेबाच्या आगमनाने झाला.यथावकाश या संघर्षाची तीव्रता वाढत गेली. त्यातून अनेक घडामोडी घडल्या.मोगल-मराठा संघर्ष पुढे केवळ महाराष्ट्राच्याच रणभूमीपर्यंत मर्यादित न राहता तो दक्षिणेकडील कर्नाटक-जिंजी इतक्या विस्तृत प्रदेशातपसरला. नऊ वर्षांची संभाजी राजांची झंझावाती आणि वादळी कारकीर्द, त्यांचे हौतात्म्य, तद्पश्चात जिंजीवरून राजाराम महाराजांनी मोगलांशी सुरु ठेवलेला संघर्ष, इकडे महाराष्ट्रात निर्नायकी–पोरक्या झालेल्या राजकीय परिस्थितीत संताजी-धनाजी या वीरांनी आणि रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण सचिव हया मुत्सद्दी आणि धोरणी मंडळीनी न थकता, चिकाटीने रेटलेला आणि यशस्वी करून दाखवलेला लढा, राजारामांच्या नंतर मोगलांशी सुरु असलेल्या संघर्षाची धार आणखी तिखट करणाऱ्या ताराराणी...स्वातंत्र्यसमरातील या सर्व घटना आपण जेव्हा तटस्थपणे पाहतो, त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करतो तेव्हा राहून राहून एका गोष्टीचे नवल वाटते की मोगलांच्या रूपाने महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसूर्याला अंध:कराचे ग्रहण लागलेले असताना, भविष्याची कोणतीही शाश्वती नसताना उभा महाराष्ट्र कोणत्या अनामिक शक्तीच्या जोरावर औरंगजेबाशी न थकता लढत होता? मोगलांशी संघर्ष करायला कोणतीप्रेरणा त्यांना स्फुरण देत होती? अशी कोणती गोष्ट होती की जी या सर्वांना समान ध्येयाने प्रेरित करून एकजुटीने लढण्याची उर्मी आणि चेतना देत होती?...

या प्रश्नांचे उत्तर शोधू जाता आपल्याला या कालखंडाच्या मागील काही वर्षांचा आणि घटनांचा मागोवा घ्यावा लागतो. तसे केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते आणि ती म्हणजे लौकिकार्थाने मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात आपण १६८२ सालापासून मानत असलो तरी या संघर्षाची बिजे थेट १६६६ सालापासून रोवली गेल्याचे ध्यानात येते. 

मोगलांच्याविरुद्ध लढलेल्या या आणीबाणीच्या युद्धाचे जनकत्व आणि श्रेय छत्रपती शिवाजी महाराजाकडे जाते. मोगालाच्या विरुद्ध उभ राहायची शक्ती आणि विजयी होण्याचा आत्मविश्वास आणि प्रेरणामंत्र महाराजांनीच मराठ्यांना दिला. मोगली तक्ताला हादरे आणि सुरुंग लावण्याची,अतर्क्य कोटीत गणली गेलेली गोष्ट प्रत्यक्षात साकारण्याची ‘न भूतो न भविष्यति’ कामगिरी पुढे घडली ती केवळ महराजांच्या दृष्ट्या धोरणांमुळे !

मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर आणि त्यातील लक्षणीय घटना, प्रसंग यांवर अंतत: परिणाम करणारे व निर्णायक ठरले ते महाराजांचे द्रष्टे नेतृत्व ! खालील मुद्द्यांमधून ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

· सप्टेंबर १६६६ साली औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आल्यावर पुढे जवळ जवळ ४ वर्षे महाराजांनी वरवर शांततेत घालवली असे दिसते. या कालखंडात महाराजानी मोगलांशी तह केला आणि ती बाजू आश्वस्त करून झाल्यावर भविष्यात मोगलांशी होऊ घातलेल्या सर्वंकष युद्धाच्या दृष्टीने विविध आघाड्यावर जोरदार तयारी करायला सुरुवात केली. एक थोडा वेगळा विचार केला तर आजच्या म्यानेजमेंटच्या परीभाषेत ज्याला SWOT Analysis म्हणतात ते महाराजांनी या ४ वर्षात अभ्यास करून केले असण्याची शक्यता आहे. 



आपली शक्तीस्थळे कोणती?आपण कोठे कमकुवत आहोत? आपले शत्रू कोण कोण आहेत? शत्रूची मर्मस्थळे कोणती?शत्रूची शक्ती कोठे एकवटली आहे? भविष्यात त्यांच्याकडून स्वराज्याला कोणता व कसा धोका निर्माण होऊ शकतो? अस्तित्वात असलेले स्वराज्य वृद्धिंगत करण्यासाठी कोणत्या संधी व मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहेत? अश्या अनेक मुद्द्यांवर साकल्याने, विविध शक्यतांचा खोलवर विचार करून पुढील किमान २५ ते ३० वर्षांकरिता एक Strategic Plan-व्यूहात्मक योजनात्यांनी तयार केलेली असावी. यापुढे जाऊन त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने त्यानी या चार वर्षात त्यावर आवश्यक कार्यवाही केलेली असणार. शिवरायांच्या या संकल्पित योजनेतील गोष्टी नक्की काय होत्या ते १६७० नंतरच्या कालखंडातील खालील घटनांमधून आपल्या लक्षात येते.



· आपल्या व्यूहात्मक योजनेनुसार तयारी झाल्यावर त्यांनी दि ४ फेब्रुवारी १६७० (ज्युलियन दिनांक) या दिवशी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याकरवी रात्रीच्या अंधारात सिंहगडावर अचानक छापा मारून औरंगजेबाशी निर्णायक युद्धाचा जणू बिगुलच फुंकला. पुढे सन १६८२ ते सन १७०७ असे २५ वर्षे सलग मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर म्हणून जे युद्ध लढले गेले त्याची ठिणगी किंवा सुरुवात खऱ्या अर्थाने या दिवशी पडली असा निष्कर्ष काढला तर तो चूक ठरणार नाही. 

· सन १६७० ते १६७४ या पुढच्या चार वर्षात महाराज आणि त्यांच्या सैन्याने जराही उसंत घेतली नाही आणि शत्रूच्या प्रदेशात खोलवर चढाया करून आपले गेलेले किल्ले परत मिळवायला सुरुवात केली. शिवरायांचा आणि त्यांच्या मराठी सैन्याचा हा झंझावात आणि तडाखा इतका जबरदस्त होता की सन १६७० साली शिवरायांच्या ताब्यात असलेल्या १८ किल्ल्यांच्या संख्येत एका मागोमाग एक अशी भर पडून पुढच्या आठ वर्षात ही संख्या २५०च्या आसपास पोचली. 

· ‘भविष्यात एक न एक दिवस खासा औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करायला दक्षिणेत येईल. त्यावेळी माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल. दक्षिण जिंकायला औरंगजेबाला ३५० वर्षांचे आयुष्य लागेल’अशी भविष्यवाणी महाराजांनी वर्तवली होती असे आपल्याला बखरीमधील एका नोंदीमध्ये आढळते. या नोंदीला ऐतिहासिक संदर्भ किती आहे ते सांगण्यास प्रत्यवाय नाही परंतु या दृष्टीने महाराजांनी विचार करून त्यावर उपाययोजना निश्चितच केली होती हे पुढे दिसून आले. भविष्यात मोगल दक्षिणेत आले तर त्यांचा सर्व भर किल्ले जिंकण्यावर राहील हे महाराजांनी जाणले होते. किल्ले हेच औरंगजेबाच्या दृष्टीने विजयाच्या किल्ल्या ठरू शकतात आणि म्हणूनच त्यानी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या डागडुजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने दीड कोटी होनांचे अंदाजपत्रक तयार केले होते याचे इतिहासात व कागदोपत्री दाखले मिळतात. 

महाराजांची ही कथित भविष्यवाणी महाराजांच्या निधनानंतर दोनच वर्षात खरी ठरली. औरंगजेब प्रचंड सैन्य (त्यात सुमारे ५ लक्ष सैनिक, प्रचंड घोडदळ, सुमारे साडेतीन हजाराचे ह्त्तीदल होते), खजिना, दारुगोळा घेऊन महाराष्ट्रात आला. त्याने महाराजांच्या होऱ्यानुसार किल्ले जिंकायची मोहीम काढली. महाराजांना अटी-तटीच्या युद्धात त्यांचा किल्ला औरंगजेबाशी किमान १ वर्ष झुंजावा असे अभिप्रेत होते. अश्या परिस्थितीत पुढे काय घडले ते आपण संभाजी पर्वातील “रामशेजच्या युद्धात” वाचलेच आहे. रामशेजच्या किल्याने साडेपाच वर्षे मोगलांना दाद दिली नाही. 

इतकेच काय पुढे २५ वर्षे औरंगजेब महाराजांचे हे अभेद्य किल्ले जिंकण्यासाठी जंग जंग पछाडत होता पण याच किल्ल्यांनी आणि त्यांना राखणाऱ्या महाराजांच्या मर्द मावळ्यांनी मोगलांना दाद दिली नाही. औरंगजेबालाच शेवटी धोबी पछाड घालून मराठ्यांनी इथल्याच मातीत सपशेल लोळवले.

· स्वातंत्र्यसमरातील मराठ्यांच्या अंतिम विजयाचे श्रेय महाराजांच्या द्रष्टेपणाला कसे जाते याचे अजून एक उदाहरण आपल्याला महाराजांच्या दक्षिण दिग्विजय अर्थात कर्नाटक स्वारीमध्ये दिसून येते.

विशाळगडाच्या दक्षिणेकडे कर्नाटक व थेट जिंजी पर्यंतचा प्रदेश व त्यातील किल्ले या मोहिमेत आपल्या ताब्यात आणण्याचा महाराजांचा प्रमुख उद्देश होता. या मागची योजना अशी होती की सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील किल्ले आणि किनारी जलदुर्ग या द्विस्तरीय दुर्ग-संरक्षण शृंखलेमध्ये दक्षिण प्रांतातील किल्ले जोडून, संभाव्य मोगली आक्रमणापासून संरक्षणासाठी एक त्री-स्तरीय दुर्ग-शृंखला उभी करायची.

महाराजांनी कर्नाटक स्वारीत आपला आणखी एक हेत साध्य केला. नवनिर्मित स्वराज्याला या मोहिमेतून अत्यंत आवश्यक अशी, आजच्या सामरिक परिभाषेत ज्याला Strategic Depth-व्यूहात्मक खोली, म्हणतात ती मिळवून दिली. पुढे मागे औरंगजेब दक्षिणेत येणार ही महाराजांनी अटकळ आधीच बांधली होती. मोगली सैन्याने उत्तरेकडून स्वराज्यात खोल मुसंडी मारली आणि या मोगली रेट्यापुढे त्यावेळच्या राज्यकर्त्यांना जर तक्ताच्या गडावरून, रायगडावरून माघार घ्यावी लागली तर मागे सरकायला सुरक्षित प्रदेश उपलब्ध व्हावा याकरता त्यानी विशाळगडाच्या दक्षिणेपासून हिंदुस्थानच्या अगदी थेट दक्षिण टोकापर्यंत म्हणजेच जिंजी पर्यंतचा प्रदेश आणि त्यातील किल्ले जिंकून त्यावर आपला अंमल बसवला.

भविष्यातील घडामोडीची जाण महराजांना किती होती आणि त्यादृष्टीने त्यांनी पुढील योजना कशी तयार केली होती हे यातून लक्षात येते.

महाराजांच्या दूरदृष्टीला जे दिसले होते तसेच पुढे घडत गेल्याचे आपल्याला स्वातंत्र्यसमरातील “राजाराम पर्वात” दिसून येते. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर रायगडाचा पाडाव होतोय असे दिसताच राजाराममहाराज रायगडावरून निसटले आणि जिंजीवर पोचले. यथावकाश तेथे आपली राजधानी स्थापन करून त्यांनी मोगलांविरुद्धचा संघर्ष जारी ठेवला. पुढे हा संघर्ष जवळजवळ ९ वर्षे चालू होता. 

स्वराज्याचा छत्रपती परागंदा होऊन दक्षिणेतून जिंजीवरुन लढत असल्याने मोगलांनी आपल्या आक्रमणाचा मोहरा जिंजीकडे वळवला. त्यामुळे इकडे महाराष्ट्रातही मराठ्यांना थोडी उसंत मिळाली आणि या सर्व प्रकारात मोगली ताकद महाराष्ट्र आणि जिंजी अशी दुहेरी विभागली जाऊन उत्तरोत्तर क्षीण होत गेली. 

महाराजांच्या यशस्वी युद्धनीती, ध्येय-धोरणे आणि द्रष्ट्या नेतृत्वाची परिणीती पुढे स्वराज्याचे मराठ्यांच्या साम्राज्यात रुपांतरीत होण्याने झालेली दिसते.मराठे-मोगल यांच्यातील २५ वर्षांच्या संघर्षाची अंतिम फलनिष्पत्ती हीच होती असा निष्कर्ष काढायला त्यामुळे हरकत नाही. 

मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराचे मूळ थेट सन १६६६ पर्यंत मागे कसे जाते आणि या संभाव्य संघर्षाची व्याप्ती आणि परिणाम काय असतील यावर अटकळ बांधून त्यावर उपाययोजना म्हणून शिवरायांनी कोणत्या गोष्टी अमलात आणल्या हे वरील विवेचनावरून अधोरेखित होते. 

दूरदृष्टी ही शिवरायांना लाभलेली देवदत्त देणगी होती. एक लोकोत्तर आणि द्रष्टा नेता म्हणूनच शिवरायांचे नाव यामुळे इतिहासात ख्यातकीर्त झाले आहे.

आजवर “इतिहास कट्टा-गौरव इतिहासाचा” या लेखमालेत संपन्न झालेल्या संभाजी पर्वाचा विचार करता अजून काही मुद्दे जे एकूणच या कालखंडातील घटनांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव टाकतात ते असे आहेत.

· शिवरायांशी एकनिष्ठ असलेले, स्वराज्यस्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून कार्यरत असणारे, कलम आणि तलवार हे दोन्ही तितक्याच समर्थपणे चालवणारे आणि आपल्या केवळ अंगभूत गुणांच्या जोरावर अष्टप्रधनात मानाचे स्थान प्राप्त केलेले मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो हे मंत्री आणि ज्यांचे वर्णन बखरकार “महाराजांचे बहिश्चर प्राण” असे करतात त्या बाळाजी आवजी, राहुजी सोमनाथ आणि हिरोजी फर्जंद या ज्येष्ठ कारभाऱ्यानी संभाजी महाराजांना शिवरायानंतर स्वराज्याचे वारस म्हणून स्विकारण्यास विरोध का केला असावा?याचे आकलन होत नाही. 

· कट-कारस्थाने केली म्हणून क्रोधीत होऊन संभाजी राजांनी या सर्वांना पाली जवळील परळी गावच्या हद्दीत हत्तीच्या पायखाली घालून देह-दंडाची शिक्षा दिली. या सर्व घटनांचा मागोवा घेता हे अतर्क्य वाटते. दुर्दैवाने आपण या मंडळीना स्वराज्याचे घोर गुन्हेगार म्हणून सरसकट संबोधून मोकळे होतो. शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या या ज्येष्ठ मंडळींकडून इतका मोठा द्रोह व्हावा व त्यांच्या हातून इतके आततायी कृत्य का घडावे याचे कारण समजत नाही. दुर्दैवाने इतिहास या विषयात मुग्ध राहणेच पसंत करतो.

· स्वराज्याच्या कदीम सेवकांचा नरसंहार आणि करूण अंत झाल्यावर संभाजी राजांना समर्थ रामदासस्वामींचे उपदेशपर पत्र येते. येसूबाईसाहेबही संभाजी राजाना बोल लावतात आणि त्यानंतर या सर्व घडामोडीतून योग्य बोध घेऊन संभाजी राजे एका वेगळ्या ध्येयाने आणि जिद्दीने प्रेरीत होऊन स्वराज्याच्या शत्रूंशी विविध आघाड्यांवर आणि रणांगणावर झुंजताना दिसतात.

· संभाजी राजांचे हे रौद्र रूप शत्रूंना एखाद्या प्रलयासारखे न भासले तरच नवल. मोगल, हबशी, पोर्तुगीज अशा शत्रूंशी लढताना संभाजी राजांचे क्षात्रतेज एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे युद्धभूमीवर तळपताना दिसते. अनेक संग्रामात संभाजी राजांच्या शौर्यापुढे हतवीर्य झालेले हे शत्रूगण आपले प्राण वाचवण्यासाठी रणभूमीवरून इतस्तत: पळताना दिसतात.

· एका अंदाजानुसार हबशी, पोर्तुगीज आणि मोगल या शत्रूंशी संभाजी राजांनीआणि त्यांच्या सेनेने या कालखंडात वेगवेगळ्या आघाड्यांवर ज्या लढाया केल्या त्याची संख्याच मुळी ९० च्या घरात जाते. नऊ वर्षांची कारकीर्द आणि मातब्बर शत्रूशी ९० लढाया ही बाब संभाजी राजांच्या विविध युद्धभूमींवरील झंझावाती संचाराचे आणि त्यांच्यातील एका कुशल, लढवय्या योद्ध्याचे गुण दर्शवते.या लेखाच्या शेवटी छत्रपती संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यानी विविध आघाड्यांवर ज्या लढाया केल्या त्याची एक समग्र सूचीच दिली आहे.

· ‘दक्षिण्यांची पातशाही दक्षिण्यांनी राखावी’ हे शिवाजी महाराजांचे धोरण पुढे संभाजी राजांनीही चालवले. औरंगजेबाने महाराष्ट्रात यश येत नाही हे पाहून आपला मोहरा विजापूर आणि गोवळकोंड्याकडे वळवला आणि त्यांच्याविरुद्ध मोर्चे लावले.यावेळी वरील धोरणाला अनुसरून संभाजी राजांनी यथाशक्ती आदिलशाही आणि कुतुबशाही वाचवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले.

· संभाजीराजांचा सुरवातीपासूनच शाक्तपंथाकडे ओढा होता. छत्रपती झाल्यानंतर कवी कलशाचे एकूणच राजकारणात वाढलेले वजन आणि महत्व, त्याला छन्दोगमात्य अथवा कुलअखत्यार म्हणून मिळालेली बढती यासर्व गोष्टी या पर्वातील अनेक घटनांवर प्रभाव टाकणाऱ्या आणि परिणाम करणऱ्या ठरल्या आहेत.

· आपली सर्व शक्ती पणाला लावूनही हिंदूंचे सार्वभौम राज्य संपवता येत नाही यामुळे हतबल झालेला औरंगजेब यावर मग नामी शक्कल शोधून काढतो आणि वतनाचे, जहागिरीचे आमिष मराठा सरदारांना ,वतनदारांना दाखवून फितुरीचे राजकारण मांडतो. वतनाची, जहागीरीची जी पद्धत महाराजांनी जाणीवपूर्वक बंद केली होती त्या धोरणाला सोयीस्कर विसरून मग आपलेच आप्तस्वकीय संधी चालून आल्यावर हरताळ फासताना आणि प्रसंगी स्वराज्याशी फितुरी करताना दिसतात. फंद-फितुरी, वतानासक्ती हे महाराष्ट्र्भूमीला लाभलेले दुर्दैवी शापच आहेत. संभाजी महाराजांच्या काळातमानवी स्वभावाचे आणि हव्यासाचे हे दोष पुन्हा उफाळून प्रकर्षाने पुढे आल्याचे दिसतात.

· मोगली आक्रमणाच्या रेट्यात सर्वदूर महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती आणि फितुरी माजली असताना शम्भूराजेंच्या समवेत समरभूमीवर आपल्या क्षात्रतेजाने तळपणारी हंबीरराव मोहिते, येसाजी-कृष्णाजी कंक आणि म्हाळोजी घोरपडे यांच्यासारखी नररत्ने आणि खंडो-बल्लाळ सारखी प्रसंगी छत्रपतींसाठी आपले प्राणही धोक्यात घालणारी स्वामीनिष्ठ मंडळी या कालखंडात आपल्या कर्तृत्वाने आणि प्रकर्षाने चमकताना दिसतात.

· संभाजी राजांना झालेली दुर्दैवी अटक आणि त्यांनतर बहादूरगडच्या छावणीत औरंगजेबाने त्यांचे केलेले हाल, छावणीतून काढलेली त्यांची अपमानास्पद धिंड व पुढे तुळापूर येथे फाल्गुनी अमावस्येला संभाजीराजांचा झालेला क्रूर वध हे सारेच क्लेशदायक आहे. शारिरीक छळ आणि हाल यांना मोठ्या धीराने तोंड देणारे आणि आपल्या देव-देश आणि धर्मासाठी हौतात्म्य स्वीकारणारे छत्रपती संभाजी महाराज अवघे सूर्यमंडळ भेदून गेले. त्यांचे बलिदान पुढे व्यर्थ गेले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे मेलेल्या मराठी मनात राष्ट्रप्रेमाची चेतना जागृत झाली. कचरलेला मराठी भाला पुन्हा एकवार दिल्लीद्राच्या छाताड्यावर रोवला गेला. घराघरातून मराठे सरसावले आणि आग्यामाश्यांचे मोहोळ उठावे तद्वत एकवटून मोगलांवर घसरले. संभाजी राजांचा करूण अंत पुढे मराठे-मोगल संघर्षाला निर्णायक कलाटणी देणारा ठरला.



छत्रपती संभाजी राजांच्या वधानंतर काफिरांचे राज्य नक्कीच हाती येईल या वेड्या आशेपायी पुढे औरंगजेब आपल्या अंतापर्यंत या महाराष्ट्र्भूमीवर गावोगावी, रानोमाळ, दऱ्या-खोऱ्यातून आपल्या सैन्याला घेऊन किल्ले जिंकण्याच्या आणि या भूमीवर ताबा मिळवण्याच्या इर्षेपोटी भटकत राहिला. परंतु शिवाजी महाराजांचे हे किल्ले आणि ही महाराष्ट्रभू त्याच्यासाठी अजेयच राहिली. अप्राप्यच राहिली.

मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमरातील संभाजी पर्वाचे विश्लेषण करताना एकच आणि एकच निष्कर्ष पुढे येतो. त्यात थोरले कैलासस्वामी शिवाजी महाराज आणि ज्वलज्ज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराज हेच खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमरातील सन १६६६ ते सन १६८९ या कालखंडाचे निर्विवाद महानायक ठरतात. 

पराग लिमये 

दि २१ सप्टेंबर २०१७ 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती संभाजी राजे यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी

विविध आघाड्यांवर लढलेल्या युद्धांची कालसूची

(सर्व इंग्रजी दिनांक ज्युलियन कालगणनेनुसार)

श्री अनिश गोखले यांच्या www.aneeshbookscom या ब्लॉगवरून साभार 



मराठे – जंजिरेकर सिद्दी संघर्ष 

· उंदेरी किल्ला – दि १८ ऑगस्ट १६८० 

· पुन्हा उंदेरी किल्ला – जुलै १६८१ 

· जंजिरा किल्ल्याचा वेढा – डिसेंबर १६८१ ते ऑगस्ट १६८२ 

· जैतापूर येथील सिद्दी बरोबरची चकमक – १६८७ 



मराठे-पोर्तुगीज संघर्ष

· ठाणा प्रांतातील दोन किल्ले – जानेवारी १६८३

· तारापूर किल्ला संघर्ष –एप्रिल १६८३ 

· दमण-वसई प्रांतातील स्वारी – एप्रिल १६८३ 

· चौल मोहीम – जून १६८२

· रेवदंडा मोहीम – जूलै १६८२ 

· कोर्लई किल्ला – जुलै १६८२ 

· अंजूर – सप्टेंबर १६८३ 

· निळोपंतांची चेंबूर-तळोजे-कोळवे मोहीम -१६८३ 

· करंजा-घारापुरी मोहीम – १६८३-८४ 

· किल्ले जीवधन – ऑगस्ट १६८५

· किल्ले कामणदुर्ग संघर्ष – सप्टेंबर १६८५ 

· फोंडा किल्ल्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तर – नोव्हेंबर १६८३ 

· गोवा-जुवे बेटावरील स्वारी – नोव्हेंबर १६८३ 

· मार्मागोवा प्रांतातील धामधूम – डिसेंबर १६८३

· बारदेश(गोवा) मोहीम – डिसेंबर १६८३ 



मराठे-मोगल संघर्ष

· अहिवंतगड –बहादूरखान – जून १६८० 

· शहाबुद्दीनखान –साल्हेर संग्राम – नोव्हेंबर १६८१ 

· मुझफ्फरखान – धर्मापुर येथील चकमक – एप्रिल १६८१ 

· रामशेजचा लढा – शहाबुद्दीनखान – एप्रिल ते सप्टेंबर १६८२ 

· रुपाजी भोसले-शहाबुद्दीन खान युद्ध –गणेशगाव(नाशिक)- एप्रिल १६८२ 

· बहादूरखान रामशेज वेढा – ऑक्टोबर १६८२ ते १६८४ 

· मराठे-अक्रमखान नाशिक संघर्ष – डिसेंबर १६८४ 

· सिन्नर-मुहम्मद खलिल, गोविंदराव चकमक – जानेवारी १६८५ 

· औंढा- पट्टा किल्ल्यासाठी संघर्ष – जून १६८२ 

· सोनगड येथे असादुल्लाखन बरोबर लढाई –जुलै १६८२ 

· मोगल-मराठे संघर्ष –त्र्यंबकगड – १६८२-८३ 

· अहमदखान-कांचनगड – १६८३ 

· मातब्बरखान आणि तेलंगराव लढाई –त्र्यंबकगड -१६८८-८९ 

· मोगल –मराठे यांचा औंढा-पट्टा परिसरात लढाई – १६८८ 

· हंबीरराव मोहिते-बुऱ्हाणपूर मोहीम – डिसेंबर १६८० 

· मुकर्रम खान विरुद्ध नागोजी बल्लाळ –दारवाह,यवतमाळ –एप्रिल १६८२ 

· सरोंदा येथे मोगलांशी युद्ध – १६८३ 

· शेख जहान –जामोदा -,अकोला – १६८३ 

· रणमस्तखान –औरंगाबाद इथे लढाई – १६८१

· जालना मोहीम – एप्रिल १६८२

· किल्ले अंतुर येथे लढाई – ऑगस्ट १६८२ 

· मुझफ्फरखान – वैजापूर लढाई – ऑक्टोबर १६८२ 

· मोगल-मराठे जालना संघर्ष – फेब्रुवारी १६८३

· मुझफ्फरखान –सारंगपूर,अहमदाबाद – १६८४ 

· बुऱ्हाणपूर स्वारी – १६८५ 

· मुल्तीफतखान – कादिराबाद – जानेवारी १६८५ 

· तळकोकण स्वारी- नोव्हेंबर १६८१ 

· शहाबुद्दीन खानची तळकोकण स्वारी- नोव्हेंबर १६८२ 

· कल्याण-भिवंडी- हुसैनअलीखान चकमक – नोव्हेंबर १६८१ 

· कल्याण स्वारी -रुस्तुमखान – १६८१

· रुस्तुमखान विरुद्ध रुपजी भोसले आणि निळोपंत लढाई – कल्याण -१६८१ 

· रुस्तुमखान,याकूतखान विरुद्ध तुकोजी सरदार– कल्याण -१६८१ 

· छत्रपती संभाजी विरुद्ध रुस्तुमखान – कल्याण -१६८१ 

· हंबीरराव मोहिते-कल्याण भिवंडी स्वारी – १६८३ 

· रोहिला खान विरुद्ध रुपाजी भोसले –टीटवाळा -१६८३

· सय्यद अब्दुल्लाह विरुद्ध मराठे –बागलाण -१६८८ 

· कादिरखान विरुद्ध नागोजी त्रिंबक- पेठ कोथळीगड – नोव्हेंबर १६८४ 

· मुअज्जुदिन विरुद्ध मराठे –पुरंदर –डिसेंबर १६८२ 

· मराठे विरुद्ध मोगल –शिरवळ -१६८५ 

· मामुरखान, फकृद्दीनखान –सुपे -१६८४ 

· हंबीरराव मोहिते, विठोजी विरुद्ध कूलिज खान – भीमा परिसर -१६८२

· शहाबुद्दीनखान –लोहगड –डिसेंबर १६८२ 

· शहाबुद्दीनखान –विसापूर- डिसेंबर १६८२ 

· शहाबुद्दीनखान –कुसुरपूर –जुन्नर - डिसेंबर १६८३ 

· फकृद्दीनखान –लोहगड- १६८४

· अझीझखान- जुन्नर-१६८४ 

· छत्रपती संभाजी विरुद्ध रौदखान, फक्रुद्दीनखान –सिंहगड परिसर - १६८५ 

· मोगलांची रोहिडा स्वारी- नोव्हेंबर १६८५ 

· हंबीरराव मोहिते, रुपाजी भोसले विरुद्ध गाजीउद्दिनखान – रायगड – जानेवारी १६८५ 

· बहादूरखान –सातारा – १६८१ 

· नारोजी भोसले विरुद्ध मोगल- सातारा १६८४ 

· अमानुल्लाखान –चंदन-वंदन मोहीम – फेब्रुवारी १६८५ 

· हंबीरराव मोहिते आणि सर्जाखन – वाई -१६८७ (हंबीररावांचा लढाईत मृत्यू)

· मराठे विरुद्ध इंद्र्सिंह कछवाह आणि मुजफ्फरखान संगमनेर 

· मराठे विरुद्ध मोगल -अहमदनगर -१६८२-८३ 

· छत्रपती संभाजी विरुद्ध मिर्झाखान – पारनेर -१६८४ 

· माणकोजी बल्लाळ विरुद्ध दुर्गासिंग –पेडगाव – १६८२

· तिमाजी विरुद्ध आझमशाह – पेडगाव -१६८४ 

· हसनअली खान विरुद्ध मराठे – सांगोला-१६८२ 

· मराठे विरुद्ध मोगल –मंगळवेढा – १६८६ 

· मराठे आणि मोगल संघर्ष –सांगोला- १६८७ 

· मराठे आणि मोगल संघर्ष –सोलापूर – डिसेंबर १६८० 

· राणा जयसिंग विरुद्ध मरह्म्मतखान –परांडा -१६८५ 

· कासीम खान विरुद्ध माणकोजी बल्लाळ – नळदुर्ग -१६८३

· हंबीरराव मोहिते विरुद्ध आझम शाह –पन्हाळा -१६८२ 

· हंबीरराव मोहिते विरुद्ध आझम शाह –कोल्हापूर -१६८३ 

· छत्रपती संभाजी व अकबर विरुद्ध मोगल –कोकण प्रांत -१६८३ 



संदर्भ –

· स्वर्गीय निनादराव बेडेकर यांचे या विषयावरील व्याख्यान 

· रणझुंजार – डॉ.सदाशिव शिवदे

· स्वमिनिष्ठांचा करूण अंत आणि मृत्युंजयाचा अखेरचा प्रवास हे लेख –पराग लिमये

No comments:

Post a Comment