रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

‘शियांना मारणारी’ असे नामकरण केलेल्या कट्यारी स्वतःजवळ बाळगणाऱ्या बादशहा औरंगजेबाची स्वारी मार्च १६८५ मध्ये विजापूर व गोवळकॊंड्याकडे वळली. दोन्ही शिया पंथीय राज्ये जिंकून संभाजीस एकाकी पाडावे आणि मग मराठी राज्याचा घास घ्यावा अशी त्याची योजना होती. १६८२ पासून बादशहा औरंगजेब मराठी राज्य जिंकण्याची शिकस्त करीत होता. त्याने आपल्या प्रचंड सेनासमुदायाची आपल्या पुत्रांच्या तसेच विविध सेनाधिकाऱ्यांच्या हाताखाली विभागणी करून, त्यांना मराठी राज्यावर चहुबाजूनी चढाया करण्यास फर्मावले. बादशहा औरंगजेबाची ही मोगली फौज उत्तरेत नाशिक-बागलाण, जुन्नर-कल्याण-भिवण्डी पासून पुणे-शिरवळ- शिवापूर ते सातारा-कोल्हापूर अश्या विस्तृत प्रदेशातून मराठी राज्यावर चढाई करत होती. घाटावरचा भाग ताब्यात घेऊन सह्याद्रीच्या घाटवाटांनी कोकणात उतरून शेवटी रायगडाचा पाडाव करणे या उद्देशाने बादशहा औरंगजेब मराठ्यांवर दबाव टाकत होता. याचवेळी पिछाडीवर वसई, गोवा भागात पोर्तुगीझ, चौल, तळकोकणात सिद्दी मोगलांच्या पाठिंब्याने स्वराज्याचा प्रदेश गिळंकृत करू पाहत होते आणि इंग्रज त्यांना साहाय्य करत होते. अश्या चहुबाजूनी शत्रूंनी वेढल्या गेलेल्या स्वराज्याचा बचाव करण्यासाठी संभाजी राजे, अष्टप्रधान मंडळ आणि सर्व सेनानायक प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. शत्रूला तोंड देण्यासाठी मराठ्यांनी चौल, नागोठणे तसेच घाटावर साताऱ्यापर्यंत फौजा बंदोबस्तास ठेवून दिल्या. सह्याद्रीच्या घाटवाटांनी, निबिड अरण्यांनी आधीच बेजार झालेल्या मोगलांवर गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून छुपे हल्ले करावेत, त्यांची रसद मारावी, त्यांच्याजवळचे धान्य, शस्त्र, सामान लुटावे असा बचाव मराठ्यांनी सुरु केला. मराठ्यांनीही मोगलांवर बुऱ्हाणपूर-धरणगाव- अहमदनगर-औरंगाबाद- फलटण-जालना- सोलापूर-बीदर ते चांद्यापर्यंत प्रतिचढाया करून त्यांचा धनसंपन्न मुलुख लुटून बेचिराख केला. पिछाडीवरच्या पोर्तुगीझ व सिद्दीविरुद्ध अनुक्रमे गोवा आणि जंजिरा मोहिमा करून संभाजीराजांनी त्यांच्या विस्तारवादाला आळा घातला. 

१६८२ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात रामसेज वेढा सुरु होता तेव्हा संभाजीराजांनी कर्नाटक स्वारी केली. कर्नाटकात संभाजीराजांचे मेव्हणे हरजीराजे महाडिक स्वराज्याचा कारभार पाहात होते. कर्नाटकातील स्वराज्यास लागून असलेली इतर राज्ये अशी होती : १) म्हैसूर २) तंजावर ३) इक्केरी ४) मरुवनाड ५)मदुरा. पैकी म्हैसूरचा राज्यविस्तार मोठा होता आणि चिक्कदेवराय त्याचा राजा होता. राज्यविस्ताराची ईर्षा बाळगणाऱ्या चिक्कदेवरायाविरुद्ध काका - पुतण्यांनी अर्थात एकोजीराजे व संभाजीराजांनी युद्ध पुकारले. संभाजीराजांचे सैन्य जबरदस्त होते. त्यांनी व हरजीराजे यांनी चिक्कदेवरायाचा सेनापती कुमारय्या याचा दणकून प्रभाव केला. कर्नाटकात म्हैसूरच्या चिक्कदेवरायाविरुद्ध स्वारी करून त्यास मदुरा आणि त्रिचनापल्लीहून हुसकावले व मदुरेच्या नायकाचा म्हैसूरकरांनी घेतलेला प्रदेश मराठी राज्यात समाविष्ट केला. म्हैसूरवर चालून जाण्यासाठी ‘बाणाकर’ येथे मराठी सैन्य तळ ठोकून बसले असताना चिक्कदेवरायाने हल्ले करून बरेच स्वार मारले. मदतीस आलेल्या एकोजीराजांचा देखील चिक्कदेवरायाने पराभव केला. संभाजीराजांनी आपला तळ त्रिचनापल्ली येथे हलवला. आता म्हैसूरकर चिक्कदेवराय आणि मरुवनाडचा नायक विरुद्ध संभाजीराजे, हरजीराजे महाडिक, कुतुबशहा, एकोजीराजे बसप्पा नाईक असा सामना रंगला. बलाढ्य आघाडीविरुद्ध एकाकी चिक्कदेवरायाने मोगलांची मदत मागण्याचा प्रयत्न सुरु केला. मोगल येण्यापूर्वीच मराठ्यांनी मदुरेजवळचे किल्ले आणि धर्मपुरीभोवतालचा प्रदेश घेतला. अखेर चिक्कदेवरायाचा पराभव होऊन म्हैसूर मराठ्यांचे मांडलिक झाले. तह करून आणि खंडणी बसवून संभाजीराजे १६८३ मध्ये महाराष्ट्रात परतले.

यारीतीने शिवाजी महाराजांच्या पश्चात हाती घेतलेल्या स्वराज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी झुंज घेत रक्षण करण्याचा व ते टिकवण्याचा प्रयत्न संभाजीराजे आणि त्यांचे अधिकारी करत होते.

१६८३ पर्यंत मोगल-पोर्तुगीझ-इंग्रज-सिद्दी या शत्रूंशी मराठे निकराने झुंज देत होते. त्यापैकी पोर्तुंजिग-इंग्रज-सिद्दी यांच्यावर त्यांनी चांगलीच जरब बसवली होती आणि सह्याद्रीस पाठीशी ठेवून मराठी प्रदेशात चालून आलेल्या मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. चुटकीसरशी मराठी राज्य जिंकण्याची मनीषा बाळगून आलेल्या औरंगजेबास व त्याच्या सेनासागरास पहिली तीन वर्षे एकही निर्णायक विजय मिळू शकला नाही आणि बंडखोर शहजादा अकबरही हाती आला नाही. १६८२ च्या नोव्हेंबर - डिसेंबरात संभाजीराजांनी मिरझाराजे जयसिंगपुत्र रामसिहास पत्र लिहून औरंगजेबाशी चाललेल्या तीव्र संघर्षाची कल्पना दिली आणि मोठ्या फौजेनिशी दिल्लीवर जाऊन बादशहा औरंगजेबास दिल्लीच्या बचावास उत्तरेकडे परत जाण्यास भाग पाडण्याचा डाव रचण्यासाठी चुचकारले. परंतु हा डाव फळास येऊ शकला नाही.

औरंगजेबही हताश झाला आणि संभाजीस पकडल्याशिवाय किमॉंश डोक्यावर घालणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली. मराठी राज्याच्या कानाकोपऱ्यात चालू असलेल्या मोगल-मराठा संघर्षास मराठी सैन्य मोठ्या हिमतीने व चिवटपणे तोंड देत होते. मराठे सैनिक धारातीर्थी पडत होते त्या पेक्षा अधिक मोगल सैनिक प्राणास मुकत होते. परंतु मोगल सैनिक संख्येने अधिक असल्याने गमावलेल्या सैनिकांची जागा नवीन सैनिक घेत होते. यारीतीने अव्याहतपणे मोगल सेना पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे मराठी राज्यावर आदळत होती आणि त्यांना थोपवताना मुळातच मोगलांपेक्षा संख्येने कमी असलेल्या आणि नवीन सैन्यभरती न झाल्यामुळे कमी होत चाललेल्या मराठ्यांची शक्ती क्षीण होत होती.

औरंगजेबाने संभाजीवर पुनः मोहीम सुरु केली. ऑक्टोबर - नोव्हेंबर १६८३ रोजी शहाबुद्दीनखानाने पुणे शहरात लुटालूट केली आणि पुढे डिसेंबर महिन्यात राजधानी रायगड परिसरात स्वारी केली आणि पाचाड जाळून निजामपुरात खूप लुटालूट केली. त्यास मराठ्यांनी परतवून लावले.

इकडे मराठी राज्यास ग्रहण लागण्यास सुरुवात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत तत्पर असलेल्या आणि स्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या रघुनाथ नारायण हणमंते आणि जनार्दन नारायण हणमंते यांचे देहावसान झाले आणि स्वराज्यात छन्दोगामात्य कवी कलशास संभाजीराजांनी ‘कुलयेखत्यार’ अर्थात स्वराज्याचा ‘सर्वाधिकारी’ बनवले. शिवाजीराजांनी आपल्या कारकिर्दीत कोणत्याही मंत्र्यास सर्वाधिकार दिले नाहीत. परंतु आता स्वराज्याचे ‘कुलएख्त्यार’ छन्दोगामात्यांकडे गेले होते. याचसुमारास मानाजी मोरे, राहुजी सोमनाथ, गंगाधरपंत, वासुदेवपंत अश्या स्वराज्यातल्या मान्यवर व्यक्तींवर इतराजी झाली आणि त्यांना कैदेत टाकण्यात आले.

औरंगजेबास निर्णायक विजय मिळाला नसला तरी अवाढव्य फौज आणि न संपणारा खजिना या जोरावर औरंगजेबाची चढाई स्वराज्यावर चौफेर चालू होती. आपल्या क्षमतेनुसार सह्याद्री पाठीशी ठेवून सतत मराठी सैन्य आणि सेनाधिकारी त्यास तोंड देत होते. आधीच्या जंजिरा मोहीम तसेच गोवा मोहीम या दोन्ही मोहिमांत संभाजीराजांची देखील बरीच संपत्ती खर्च झाली होती. हजारो सैनिक धारातीर्थी पडले होते. जंजिरा मोहीम तसेच गोवा मोहीम या दोन्ही मोहिमांत पूर्ण यश आले नव्हते. किंबहुना मोगली आक्रमणामुळे या दोन्ही मोहिमा शत्रूचा पूर्ण नि:पात न करता अर्धवट सोडाव्या लागल्या होत्या. त्यांच्याबरोबरचे तह यशस्वी ठरत नव्हते. सिद्दी, प्रोतुगीझ, म्हैसूरकर मोगलांशी संपर्क ठेवून मराठयांच्या विरोधात होते. अश्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी थोरल्या छत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या आणि त्यांच्याबरोबरीने साल्हेर सारख्या युद्धात भाग घेतलेल्या मानाजी मोरेंसारख्या महायोध्यास अटक व्हावी तसेच राहुजी सोमनाथ, गंगाधरपंत, वासुदेवपंत अश्या राजकारणधुरंधर लोकांना कैद व्हावी म्हणजे स्वराज्याचे ग्रहण अधिक गडद होत असल्याची चिन्हे होती. छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य उभारणीत मोलाची कामगिरी बजावलेले अष्टप्रधान मंडळातले जुने-जाणते ‘पंत’ निर्वतले अथवा मारले गेले आणि शाक्तपंथीय कवी कलश ‘कुलयेखत्यार’ झाले. 

कदाचित शाक्तपंथीय अनुष्ठानातून संभाजी राजास पुत्र झाला तसेच औरंजेबासकट पोर्तुगीझ, सिद्दी, इंग्रजांशी निकराचा सामना केला या व याच शाक्तपंथीय अनुष्ठानातून मोगलांचे हे परचक्र परतवता येईल या अंधश्रद्धेतून हे घडले असावे. परंतु मराठी राज्य जिंकावयाचेच या एकमेव ध्येयाने बादशहा औरंगजेब आणि त्याची अवाढव्य सेना महाराष्ट्रात आली होती आणि अश्या कोणत्याही अनुष्ठानाने ती परतणार नव्हती.

औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पश्चात संभाजी राजांनी त्याच्याशी मांडलेला संघर्ष ह्यामध्ये निर्णायक विजय औरंगजेबाचा होणार या शक्यतेमुळे असेल व शेवटी औरंगजेबाकडून आपल्या वतनाचे अथवा काहीतरी बक्षीस पदरात पाडावे या लोभाने असेल वा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये टिकून राहावे म्हणून असेल वा संभाजी राजे आणि कवी कलशाविषयी कुठलातरी पूर्वग्रह असेल किंवा मराठ्यांची आणि एकूणच स्वराज्याची क्षीण होत असलेली शक्ती यामुळे असेल, स्वराज्यात फितुरी सुरु झाली होती. औरंगजेबानेही सैन्यशक्ती वापरून यश येत नाही असे दिसताच द्रव्यशक्तीचा वापर करायचे ठरवले आणि मराठ्यांना वतने, जहागिरी, मनसबदारी, रोख रकमा यांची आमिषे दाखवून फितूर करावयाचे धोरण अवलंबले. यास बळी पडून बरीचशी मंडळी १६८५ च्या आरंभी पासून मोगलास जाऊन मिळाली. कोकणातले सीमेवरचे देसाई दळवी लोक, सावन्तवाडीकर खेम सावन्त, फोंड्याचा देसाई दुलबा नाईक, पेडण्याचा देसाई प्रभुदेसाई, डिचोलीचा देसाई, साखळीचे राणे, रेवाडेचे वतनदार राणे, कुडाळ ते अंकोल्यापर्यंतचे देसाई असे सर्व पोर्तुगीजास मिळाले. 

याआधी १६८४ मध्ये संभाजी राजांचा नोकर खन्डोजी तसेच खासगी सेवेतील परश्या हे दोघे फितूर झाले. काजी हैदर मार्फत भद्रोजी नावाचा सेवक फितवला गेला. अनेक अधिकारी जसे असाजी, पदाजी, एकोजी, सरदार आढळराव किती तरी लोक फितूर झाले. याचबरोबर शहाबुद्दीन खानाच्या रायगड हल्ल्यानंतर सुमारे ५ हजार मराठे स्वार त्याच्याकडे चाकरीस गेले. ही फितुरीची लाट त्सुनामी सारखी स्वराज्यावर आली आणि प्रत्यक्ष संभाजीराजांचे मेव्हणे, येसूबाईंचे सख्खे बंधू गणोजी शिर्के तसेच चुलत बंधू कान्होजी शिर्के देखील १६८२ मधेच औरंगजेबास मिळाले. शिवाजी महाराजांचा मेव्हणा बजाजी व त्याच्यानंतर त्याचा मुलगा महादजी मोगलांकडे मनसबदार झाले. १६८६ च्या सुमारास शिवाजी महाराजांचा जावई अचलाजीस मनसबदार बनविण्यात आले. नाशिक बागलाण प्रांतातले किल्ले नेकनामखानाने फितुरीने जिंकण्याचा सपाटा लावला होता. कोथळा किल्ला घेण्यात गोविंदराव वगैरे मावळ्यांनी मोगलास मदत केली. असोजी हा साल्हेरचा किल्लेदार होता. त्याने फितूर होऊन साल्हेर मोगलांच्या स्वाधीन केला. संभाजी राजे, कवी कलश, हंबीरराव यांनी ही फितुरी रोखण्याचे प्रयत्न कधी विनवणीवजा तर कधी धमकीवजा पत्रे पाठवून केले होते. आश्चर्य बघा..ज्यांच्याकडे निष्ठेसाठी पाहिले ते औरंगजेबाच्या आमिषाला बळी पडून फितूर झाले आणि ज्यांना स्वराज्यद्रोही ठरवले ते मात्र अचल राहिले.

१६८४ च्या नोव्हेंबरात संभाजी राजांचा एक वकील आणि अकबराकडून ‘आगामामा’ नावाची स्त्री व वकील असे लोक बादशहा औरंगजेबाकडे तहाचा प्रस्ताव घेऊन गेले. पण “काफरबच्चशी तह फक्त तलवारीनेच होईल” असे म्हणून औरंगजेबाने तो धुडकावून लावला. 

राज्यरोहणानंतर १६८० पासून १६८४ पर्यंत छत्रपती संभाजी राजे आणि मराठी सैन्य अखंडपणे स्वाऱ्या आणि मोहिमांमध्ये गुंतले होते. पोर्तुगीझ-इंग्रज- सिद्दी आणि औरंगजेब यांच्या एकत्रित परचक्राने मराठ्यांना उसंत मिळू दिली नाही. १६८४ मध्ये पोर्तुगीझ-इंग्रज यांच्याशी तह होऊन जरी त्या आघाड्या बंद झाल्या आणि सिद्दी सुरतेकडे वळला तरी मुख्य शत्रू बादशहा औरंगजेब अवाढव्य सेनेसह आणि खजिन्यासह मराठ्यांवर चौफेर चढाया करत होता. पण आता सैन्यशक्ती कमी होत होती. नवीन सैन्य भरती होत नव्हती. खजिना रिता होत होता. फितुरी वाढत होती. कारभारात जाणत्या, स्वराज्यनिष्ठ कारकुनाची कोंडी होऊन कुलएखत्यारांचा प्रभाव वाढत होता. फितुरांचा लोट वाहत होता. मानाजी मोरे सारखे खंदे वीर गजाआड होत होते. परंतु स्वामिनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ हंबीरराव आणि एकूणच मराठे चिवटपणे आणि जिद्दीने औरंगजेबाचा सामना करत होते. याचाच परिणाम म्हणजे औरंगजेब अजूनही मराठ्यांचा समूळ नाश करण्यात अपयशी ठरत होता.

१६८५ ची सुरुवात अहमदनगर, शिवनेरी, संगमनेर, पुणे, शिरवळ, नवलाख उंबरे, मलठण, नाशिक बागलाण, मुल्हेर, वऱ्हाड खान्देश अश्या विस्तृत प्रदेशातील मराठा मोगल चकमकींनी आणि संभाजीराजांच्या आजोळचे म्हणजेच फलटणकर नाईक या मातुल घराण्यातील बजाजी नाईकांचे मुलगे मुधोजी व इतर नातलग मोगली सेवेत दाखल होण्याने झाली. याचसुमारास मोगलांच्या राजधानी रायगडाजवळ हालचाली वाढल्या होत्या. दरम्यान फेब्रुवारी १६८५ मध्ये मराठ्यांनी मोगलांचे धरणगाव दुसऱ्यांदा लुटले.

आता औरंगजेबाने आपले लक्ष विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळवले. औरंगजेबाला पक्के ठाऊक होते की मराठ्यांचा संभाजीराजा, विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशहा यांचा अंतस्थ स्नेह असून मोगलांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी हे तिघेही एकमेकांना मदत करत आहेत. “दक्षिणेची पातशाही दक्षिणेतच राहिली पाहिजे” या शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार मराठे, विजापूरकर आणि कुतुबशाही यांची पक्की फळी त्यांनी तयार केली होती. आता औरंगजेबाने हाच त्रिकोण मोडण्याचे ठरवले आणि १६८४-१६८५ मध्ये विजापूरची मोहीम सुरु केली. विजापूरचा सिकंदर आदिलशहा याला औरंगजेबाने पत्र लिहिले. त्यात खर्च रक्कम व रसद पोहोचवणे, मुलुखातून जाण्या-येण्याकरता मार्ग मोकळा ठेवणे, आपल्या यशस्वी फौजेस वेळोवेळी मदत करणे, संभाजीशी सख्य टाकून देणे आणि त्याचे पारिपत्य करण्यासाठी आमच्याशी इकडील होणे तसेच आदिलशहाचा कारभारी षर्जाखान याला हाकलून देणे अश्या आज्ञा देण्यात आल्या. यावर सिकंदर आदिलशहाने उत्तर लिहिले : षर्जाखान याला हाकलून दिले म्हणजे तो संभाजीस मिळेल. दिलेरखानाने घेतलेला आमचा मुलुख आम्हास परत द्यावा. संभाजीचे पारिपत्य केल्यावर माझ्या मुलुखात कोणतीही लढाई करू नये. हे वाचून औरंगजेबाचा संताप झाला. त्याने आदिलशहावर संभाजी प्रमाणेच कुतुबशाहाशी देखील सख्य तोडण्याबद्दल फर्मावले. संभाजीराजे देखील स्वस्थ नव्हते. औरंगजेबाची विजापूर मोहीम पाहून त्यांनी आदिलशहास मदतीसाठी मेलगिरी पंडित दिवाण यास व सरदारास पाठवले. संभाजीराजांचे लोक व षर्जाखानाचे लोक लढाईच्या हेतूने मोगल शहजादा आज्जम समोर ठाण मांडून बसले. शहजादा आज्जमने रात्री हला करून अनेकांना मारले आणि १ एप्रिल १६८५ (ज्युलियन दिनांक) रोजी विजापूर किल्ल्यास वेढा घालण्यास सुरुवात केली. आदिलशाही सैन्य किल्ल्यातून सक्षमपणे प्रतिकार करत होते. षर्जाखानाच्या मदतीस संभाजीराजांकडून पन्हाळ्याकडूनही सैन्य येत होते तसेच गोवळकोंड्याचा कुतुबशहादेखील सैन्य पाठवत होता.

अशारितीने सह्याद्रीने अड्वलेली व मराठ्यांनी परतवलेली मोगली वावटळ आदिलशाही गिळंकृत करण्यासाठी घोंघावत आली आणि यात एकटे पडलो तर आपणही पार उडवले जाऊ याची कल्पना असल्याने मराठे, आदिलशाही आणि कुतुबशाहीने एकत्रितपणे सामना करण्याची सिद्धता केली. विजापूरचा वेढा सुरु झाल्याचे कळताच औरंगजेब बादशहाने आपला मुक्काम अहमदनगरहून सोलापुरास हलवला. 

१६८५ मध्ये मोगल विरुद्ध विजापूर, गोवळकोंडा, मराठे असे विजापूरसाठी घनघोर युद्ध सुरु झाले. मैदानावरचे विजापूर लगेच जिंकता येईल अशी आशा औरंगजेबास वाटत होती पण विजापूर, गोवळकोंडा, मराठे या त्रिकुटाची सैन्ये प्रखर प्रतिकार करत होती. विजापूरकर आणि मराठे मोगलांशी झुंझत होते. मोगलांची रसद मारत होते. किल्ल्यातून विजापूरकर मोगलांवर कधी बंदुकांचा मारा करत होते तर कधी अकस्मात हल्ले करत होते. बाहेरून मराठे हल्ले करून मोगलांना बेजार करत होते. किल्ल्यातले विजापूरकर, बाहेरचे मराठे, आणि डोक्यावर मुसळधार पाऊस यामध्ये वेढ्याचे काम इतके रेंगाळले की शेवटी बादशहा सोलापूरहून १४ जून १६८६ रोजी विजापूरजवळ रसूलपूर येथे आला. पावसाळा, विजापूरकरांचा प्रखर प्रतिकार आणि मराठे - कुतुबशाहाची अव्याहत सैनिकी मदत यामुळे आदिलशाही संपायची चिन्हे दिसेनात. दोन्ही बाजूची लढाई सुरूच होती इतक्यात एक गोष्ट घडली. १६८५च्या मे महिन्यात औरंगजेबाच्या हाती कुतुबशहाने त्याच्या वकिलाला लिहिलेले एक पत्र लागले. त्यात कुतुबशहाने लिहिले होते “ बादशहा थोर आहेत पण अनाथ, दुबळा सिकंदर आदिलशहा पाहून त्यांनी विजापूरला वेढा घातला आहे आणि आदिलशहावर कठीण प्रसन्ग आणला आहे. विजापूरचे सैन्य आहेच. राजा संभाजीने आपले अगणित सैन्य धाडावे. मी खलीलुल्लाखान याच्या हाताखाली ४० हजाराचे सैन्य तयार ठेवतो. आम्हीही पाहू बादशहा कुठे कुठे लढेल.” या पत्रातील विजापूर, कुतुबशाही, मराठे यांनी एकत्रितपणे औरंगजेबावर तुटून पडण्याची राजकारणाची भाषा वाचून थोरल्या छत्रपतींनी अवलंबलेल्या आणि संभाजीराजांनी कायम पुढे चालवलेल्या दक्षिणेविषयीच्या धोरणाची स्पष्ट कल्पना येते. हे पत्र हाती पडताच औरंगजेबाने २८ जून १६८५ रोजी (ज्युलियन दिनांक) लगोलग शाहआलमच्या हाताखाली प्रचंड सैन्य भागानगरवर (कुतुबशाहीवर) रवाना केले. वास्तविक बरेच सैन्य महाराष्ट्रात मराठ्यांशी व विजापुरात आदिलशहाशी लढत असताना त्यातला मोठा भाग कुतुबशाहीवर पाठवणे नुकसानकारकच होते पण बादशहाने त्याची पर्वा केली नाही. शाहआलम व इतर सरदार शत्रुसैन्यावर तुटून पडले. कुतुबशाही सैन्य बरेच कापले गेले. मोगलानी येथेही फितुरीचा अवलंब करून कुतुबशहाचा सर सेनापती महंमद इब्राहिम याला फोडले. अखेर विजापूरच्या आधीच अवघ्या ५ महिन्यात ऑक्टोबर १६८५ रोजी मध्ये कुतुबशाहीने शरणागती पत्करली. तरीही आदिलशाही बधत नव्हती. आता औरंगजेब आल्याने वेढ्याच्या कामात गती आली. किल्ल्याभोवतालचा खंदक बुजवायचे ठरले. किल्ल्यातून गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. शेवटी जीवावर उदार होऊन मोगलानी तो खंदक बुजवला. मोगलांकडून दोन महिने बारा दिवस तोफांचा मारा किल्ल्यावर चालू होता. शेवटी तब्ब्ल दीड वर्षांनी १२ सप्टेंबर १६८६ (जुलिअन दिनांक) रोजी विजापूरचा सिकंदर आदिलशहा औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाला आणि आदिलशाही देखील संपुष्टात आली. 

आदिलशाही संपुष्टात आल्यावर औरंगजेबाने आपला मोर्चा परत एकदा शरण आलेल्या कुतुबशाहीकडे वळवला आणि गोवळकोंड्याच्या अतिशय बळकट किल्ल्याला वेढा घालून विजापूरनंतर एका वर्षाने म्हणजे २७ सप्टेंबर १६८७ (ज्युलियन दिनांक) रोजी कुतुबशाही संपुष्टात आणली. याहीवेळी संभाजीराजांनी आपले १२००० सैन्य पाठवून कुतुबशाहाला मदत केली पण मराठ्यांच्या मदतीपेक्षा आणि औरंगजेबाच्या पराक्रमापेक्षाही वरचढ ठरली ती कुतुबशाहीतली फितुरी ! शेख मिनहाज, शेख अब्दुल्ला, शेख निजाम, अब्दुल्ला पन्नी असे नामांकित सरदार औरंगजेबास जाऊन मिळाले. याच १६८५ - १६८६ च्या सुमारास जेव्हा औरंगजेब आदिलशाही-कुतुबशाही मोहिमेत गुंतला होता तेव्हा महाराष्ट्रात देखील संभाजीराजांना उसंत नव्हती. मराठी सैन्य दक्षिणेत मदतीला धावत होतेच शिवाय पुणे, शिरवळ, रोहिडा किल्ला, प्रचंडगड, कोल्हापूर, पन्हाळा, मिरज, सातारा, मंगळवेढा भागात पसरलेल्या मोगलांशी देखील सामना करत होते. या काळात हंबीरराव कोल्हापूर-पन्हाळा भागात मोगलांशी झुंजत होते तर दुसरीकडे बेळगाव-विजापूर भागात मोगलांवर हल्ले करत होते. संभाजीराजांना आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीला तोंड द्यावे लागत होते, विजापूरकर-कुतुबशाहीला मदत द्यावी लागत होती, फितुरीचे पेव फुटले होते, गोव्याच्या बाजूचे तसेच कारवारकर सर्व देसाई, राणे संभाजीराजांविरुद्ध गेले होते. हरजीराजे कर्नाटकात मोगलांना कडवा प्रतिकार करत होते. त्याचवेळी महाराष्ट्रात दोन अश्या घटना घडल्या ज्यांनी स्वराज्यावर लागलेल्या ग्रहणाचे अघटित पडसाद पडले. पहिली घटना म्हणजे ‘जे प्रतापगड संग्रामावेळी आदिलशाही फर्मान लाथाडून शिवाजीराजांच्या पाठीशी सह्याद्रीसारखे उभे राहिले’ त्या कान्होजी जेध्यांचे पुत्र सर्जेराव जेधे देखील मोगलांना भेटले. पुढे त्यांची मनवळवणी संभाजीराजे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून चालूच होती. आणि दुसरी घटना जिने अवघ्या मराठी फौजेला पोरके करून टाकले आणि संभाजीराजांचा लष्करी हातच तुटून पाडला ती म्हणजे सरलष्कर हंसाजी उर्फ हंबीरराव मोहित्यांचं वीरमरण. विजापुरातून फुटलेल्या षर्जाखानाविरुद्ध वाई भागात लढताना तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. संभाजीराजांपाठी मंचकारोहणापासून खंबीरपणे उभे राहणारे, रणांगणावर मोगलांशी सतत अव्याहत लढा देणारे आणि हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवण्याचा शेवट्पर्यंत प्रयत्न करणारे हंबीरराव हरपले. 

आता स्वराज्यावरील ग्रहणाने स्वराज्य गिळले जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. १६८७ साली नाशिक बागलाणातील साल्हेर, रामसेज इ. किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. पुणे, चाकण, भीमा नदीजवळचा प्रदेश, शिरवळ, भोर, शिवापूर, मावळ, जुन्नर, सूप अश्या विस्तृत प्रदेशात मोगलांची ठाणी वसली. फेब्रुवारी १६८७ मध्ये बंडखोर शहजादा अकबर इराणला पळून गेला. फितुरांच्या सहाय्याने औरंगजेबाने १६८८ साली घाटावरचा बराचसा प्रदेश मोगली अमलाखाली आणला. येथपर्यंत त्याने दक्षिणेतील दोन पातशाह्या गिळंकृत केल्या होत्या आणि हिंदुपदपातशाही जिंकण्यास तो सरसावला होता. आता घाटावरून मोगली अधिकारी मराठ्यांचे राहिलेले किल्ले घेण्यास फिरू लागले. शहजादा आज्जम ससैन्य बहादूरगड, नाशिक भागात गेला. फिरोजजंग राजगड परिसरातील किल्ले घेण्यास गेला. मातबरखान नाशिक बागलाणातील तसेच कल्याण भिवंडी भागातील किल्ले घेण्यास निघाला. त्याने पट्टा, अलन्ग, कुलन्ग, रतनगड, हरिश्चन्द्रगड, मदनगड, असे अनेक किल्ले जिंकले. तसेच मोगलानी होलगड, त्र्यंबक, माहुलीगड ताब्यात घेतले. याचसुमारास समुद्रावर सुवर्णदुगावर चकमक होऊन सिद्दीस वेढा उठवणे भाग पडले आणि कान्होजी आंग्रे नावाचे रत्न महाराष्ट्रास सापडले.

स्वराज्याची स्थिती नाजूक झाली होती. घाटावर, बागलाणात मोगलानी बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. मोहीमा खर्चिक झाल्या होत्या. सततच्या युद्धांमुळे मुलुख बेचिराख झाला होता. सेनानायक धारातीर्थी पडले होते. दुष्काळाचा सामना करावा लागत होता. मुत्सद्दी कैदेत पडले होते आणि राजकारणाचा अनुभव नसलेल्या आणि लष्करी ज्ञान बिलकुल नसलेल्या कवी कलशाकडे राज्यकारभार गेला होता. या काळात संभाजीराजांचा मुक्काम रायगडावरून हलून मलकापूर-विशाळगड- पन्हाळा भागात गेला होता. कवी कलशाने स्वराज्यातील एक मातबर घराणे आणि संभाजीराजांचे मेव्हणे शिर्के यांच्याशी भांडण करून त्यांचा आणि त्यांच्या वतनाच्या भागाचा पूर्ण नि:पात केला. याचा परिणाम असा झाला की संभाजीराजांना कैद करण्याची कामगिरी त्यानी स्वीकारली. 

आता मोगली सैन्यांनी स्वराज्याला चहुबाजूनी घेरले होते. मराठ्यांचे धैर्य खचले होते. फितूर झालेले सरदार, नोकर-चाकर, आप्तस्वकीय आता शेवटच्या संघर्षाची जणू वाट पाहत होते. अतिशय कार्यक्षम अश्या औरंगजेबाच्या हेरखात्याने संभाजीराजांची बित्तमबातमी औरंगजेबास पुरवली होती. आणि दोन फितूर - शिर्के आणि शेख निजाम मुकर्रबखान यांच्याकरवी औरंगजेब स्वराज्याला लावलेल्या ग्रहणात स्वराज्याच्या प्रत्यक्ष सूर्यालाच गिळू पाहणार होता....... 


राहुल भावे 
३०/०७/२०१७ 

सन्दर्भ - 
ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे 
रणझुंझार - डॉ. सदाशिव शिवदे 
मराठी रियासत खंड २ - गो. स. सरदेसाई 
रायगडची जीवनकथा - शां. वि. आवळसकर

2 comments:

  1. राहुल,

    आर्टिकल मस्तच झालं आहे...विषय छान समजाऊन सांगितला आहेस...या एवढ्या कालखंडातल्या कितीतरी अपरिचित असलेल्या गोष्टी यानिमित्ताने लोकांना माहित होणार आहेत.

    आपला हा उद्देश तुझ्या लेखामुळे साध्य होणार आहे.

    लोकांना या विषयावर विचार करायला, लिहायला, वाचायला,चिंतन करायला चालना मिळणार आहे...

    प्रबोधना सोबत स्फूर्ती देण्याचं मोठं कार्य या लेखाने साध्य होणार आहे.

    एखाद्या विषयाचे पदर , कांगोरे सोप्या सर्वाना समजेल अशा पद्धतीने उलगडून लिहिण्याचे तुझे कौशल्य वादातीत आहे!

    लेखाचे शिर्षकही अगदी साजेसे आहे...खरोखर तो काळ तुझ्या लेखातून डोळ्यासमोर उभा राहिला!

    संभाजी महाराज अनेक आघाड्यंवर अनेक शत्रूंशी एकाचवेळी लढत असताना आपल्याच स्वकीयांची पिलावळ स्वराज्याशी द्रोह करताना वाचून अतिशय खेद वाटतो..

    *मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या महाभारतातील एक द्रोहपर्व*असेच खरतर या लेखातील घटनांची उजळणी केल्यावर त्या परिस्थितीला हे समर्पक विश्लेषण लागू होते.

    असो.

    राहुल तुझं मनापासून अभिनंदन!

    ReplyDelete
  2. उत्तम लेख.अनेक न वाचलेल्या घडामोडी मांडल्या आहेत. विशेषतः दक्षिणेतील घटना समजून घेता आल्या.

    ReplyDelete