छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दोनच वर्षात १६८२ साली आलमगीर औरंगजेब दख्खनेत उतरला. संपूर्ण दख्खन काबीज करून इस्लामची हिरवी पातला सबंध हिंदुस्थानभर फडकविण्याची त्याची मनीषा होती. शिवरायांच्या पश्चात नवे टीचभर हिंदवी स्वराज्य चटकन खिशात टाकू असा त्याचा आडाखा होता, पण मराठ्यांनी त्याचे मनसुबे सफल होऊ दिले नाहीत. पहिल्या चार वर्षात १६८२, १६८३, १६८४ व १६८५ साली त्याला म्हणावं तेवढं यश प्राप्त करता आलं नाही. मराठ्यांच्या चिवट प्रतीकारापुढे औरंगजेब हतबल झाला, म्हणून त्याने त्याचा मोर्चा दक्षिणेतील इतर दोन शियापंथीय मुस्लीम पातशाह्यांकडे वळविला. विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही.
शंभर वर्षांहूनही जुन्या असणाऱ्या या शाह्या आतून पूर्ण पोखरल्या होत्या. केवळ एका जोरदार प्रहराची आवश्यकता होती. झालंही तसचं. औरंगजेबाच्या वावटळीपुढे या दोन्ही शाह्या जेमतेम एकेक वर्ष तग धरू शकल्या. १६८६ साली आदिलशाही औरंगजेबाने गिळंकृत केली तर त्याच्या पुढील वर्षी १६८७ साली त्याने कुतुबशाही संपविली. दोन्ही ठिकाणी त्याने साम दाम दंड भेद वापरून सफलता प्राप्त केली. दोन्ही शाह्यातील अनेक सरदार औरंगजेबाला फितुरीने सामील झाले. यातील सर्वात प्रमुख होता कुतुबशाहीचा सेनापती खानजमान शेखनिजाम. याला औरंगजेबाने सहा हजार जात व पाच हजार स्वारांची मनसब दिली, तसेच ‘मुकर्रबखान’ हा किताबही दिला. यास मराठी बखरकार इलाचीबेग या नावाने संबोधतात तर फारसी साधनात तो शेखनिजाम हैद्राबादी खानजमान शेखनिजाम या नावाने ओळखला जातो. कुतुबशाहीवरील मोहिमेत औरंगजेबाला गवसलेले हे सर्वात अनमोल रत्न होते. हाच शेखनिजाम येणाऱ्या काळात संभाजी महाराजांचा कर्दनकाळ ठरणार होता.
दक्षिणेतील दोन पातशाह्या संपवल्यावर औरंजेबाने आपली पूर्ण ताकद मराठ्यांविरुद्ध वापरायची ठरवलं. एकदा का मराठे शरण आले कि औरंगजेबाची इच्छा पूर्ण होणार होती. औरंगजेब विजापूर व गोवळकोंडा परिसरात असला तरी त्याचे सरदार व मराठे यांच्यात संघर्ष सुरूच होता. मोगली वावटळ मराठी मुलुखात सर्वदूर पसरली होती. बराचसा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात गेला होता. मराठे डोंगरी किल्ले, सह्याद्री, कोकण व समुद्र यांच्या सहाय्याने लढत होते. औरंगजेबाने आपले संपूर्ण लक्ष मराठ्यांविरुद्ध एकवटल्यावर आपले अमोघ अस्त्र बाहेर काढले ते म्हणजे कुटनीती – फितुरी.
मराठ्यांची अंतर्गत परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. सतत पाच सहा वर्ष युद्ध सुरु होते. त्यात पराभूत जरी झाले नाही तरी हानी पुष्कळ झाली होती. आर्थिक बाजू कमकुवत होऊ लागली होती. आदिलशाही व कुतुबशाही मोगली घशात गेल्याने तिकडून मिळणारी आर्थिक व धान्य रसद बंद झाली होती. याच काळात मराठ्यांच्या पोर्तुगिज, सिद्दी, इंग्रज यांच्याशीही मोहिमा सुरु होत्या. मराठ्यांची ताकद अनेक आघाड्यांवर विखुरली गेली होती, तर औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांसमोर उभा ठाकला होता.
शिवरायांच्या काळातील मंत्री व इतर मानकरी यांचे संभाजी राजांशी खटके उडाले होते. जुनी माणसे नाराज होती. कवि कलशाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच होते. त्यास गोवा मोहिमेनंतर ‘कुलएख्त्यार’ केले होते. सर्वाधिकार त्याच्या स्वाधीन होते. शिवाय त्यास ‘छंदोगामात्य’ हे पद देऊन प्रशासनात मानाचे स्थान देण्यात आले होते. वास्तविक संस्कृत व व्रज भाषेचा जाणकार, कवि व शकत पंथाचा उपासक याउपर कवि कलशाचा खूप मोठा वकूब होता असे नाही. पण संभाजीराजांना राज्य प्राप्तीच्या वेळेस मंत्रीमंडळाशी जो संघर्ष करावा लागला त्यात कवि कलश खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा होता. तसेही थोरल्या स्वामींच्या शेवटच्या दोन तीन वर्षांच्या काळात संभाजी राजे महाराजांपासून दूर व कवि कलशाच्या सानिध्यात जास्त वावरत होते. त्यामुळे नकळत त्यांच्यावर कलशाची मोठी छाप होतीच. इकडे मराठ्यांचे अनेक मातब्बर असामी दुखावले जाऊ लागले होते तर तिकडे अशा व्यक्तींसाठी औरंगजेब गळ टाकूनच काय पण जाळ टाकून वाट बघत बसला होता.
कुतुबशाहीचा पाडाव केल्यावर औरंगजेबाची छावणी विजापुरास होती. इथून त्याने अनेक नामवंत सरदार प्रचंड सैन्य व संपत्तीसह मराठी मुलुखावर धाडण्यास सुरुवात केली. शहजादा महंमद आज्जम बहादूरगड व नाशिक परिसरात घोडदौड करीत होता. पुणे प्रांतातील किल्ले घेण्यासाठी फिरोजजंगाला रवाना केले होते. कोल्हापूर पन्हाळा प्रांतात शेखनिजाम ठाण मांडून बसला होता. बागलाणातील किल्ले घेण्याच्या मोहिमेवर मातबरखानाची नेमणूक करण्यात आली. रायगड परिसरात इतियादखान होता.
साल्हेर मुल्हेर पूर्वीच मोगलांकडे होते आता उर्वरित त्र्यंबकगड, पट्टा, औन्धा, माहुली, प्रबळगड, कुलंग, रतनगड, हातगड, कोहोज असे किल्ले एकापाठोपाठ एक मोगलांना मिळू लागले. बहादूरखान व मुल्तफतखान माणदेशात मोहिमेवर होते. येथील वारुगड किल्ला ताब्यात घेताना नागोजी माने हा सरदार मोगलांना मिळाला. त्याची रवानगी शेखनिजामाच्या फौजेत करण्यात आली. औरंगजेबाचा मुक्काम विजापुरात होता, पण १६८८ च्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात तिथे प्लेगची साथ आली. त्यामुळे औरंगजेबाने आपला मुक्काम अकलूज येथे हलविला.
एकीकडे कवि कलशाचे प्रस्थ वाढत होते तर दुसरीकडे अनेक मराठे फितूर होऊन मोगलांना सामील होत होते. गोव्याचे सामंत, देसाई, सावंतवाडीचे खेमसावंत, लखमसावंत हेच नव्हे तर संभाजी राजांचे नातलग जसे कि कान्होजी शिर्के, निंबाळकर, मातब्बर सरदार जेधे मोगलांना सामील होऊ लागले होते.
शिवाजी महाराजांनी १६६१ साली संगमेश्वर जवळील शृंगारपुर हे सुर्व्यांचे राज्य जिंकले. त्याच वेळेस शिर्क्यांचे वतन दाभोळ हे देखील स्वराज्यात सामील झाले. हि दोन्ही वतने महाराजांनी खालसा केली. शृंगारपुरचे सूर्यराव सुर्वे यांची मुलगी पिलाजीराव शिर्के यांस दिली होती. पुढे या शिके घराण्याच्या ताब्यात सुर्व्यांचे जुने वतन म्हणजेच संगमेश्वर, शृंगारपुर हा परिसर आला. आता तो शिरकाण या नावाने ओळखला जाऊ लागला. शिर्के घराण्याची सोयरिक भोसाल्यांशी जमली. शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई पिलाजींचा मुलगा गणोजी शिर्केस दिली तर पिलाजींची मुलगी येसूबाई संभाजीराजांस दिली. यावेळेसही वतन शिर्क्यांना मिळाले नाही. हा तिढा पुढे शंभूकाळातही सुरूच होता. इतरांप्रमाणेच गणोजी शिर्के यांनाही कवि कलशाचे वाढते प्रस्थ खुपत होते.
खेळणा उर्फ विशाळगड व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश कलशाच्या अखत्यारीत आला. त्याच्या पागा या परिसरात होत्या. हा प्रदेश शिर्क्यांच्या शिरकाण प्रदेशाला म्हणजेच संगमेश्वर, शृंगारपुर, प्रचीतगड, भैरवगड, जंगली जयगड, वासोटा या प्रदेशाला लागून होता. खुद्द संगमेश्वरात कलाशाचा वाडा व बागा होत्या. शिरकाणातील अनेक प्रशासकीय बाबींवर कलशाची ढवळाढवळ सुरु होती. अनेक गोष्टींवर कलश न्याय निवाडे करू लागला होता. त्यामुळे तेथील जनता नाराज होती. ती कलशाविरुद्ध शिर्क्यांकडे तक्रार करू लागली. पण कलशापुढे त्यांची डाळ शिजत नव्हती. खुद्द संभाजी महाराज कलशाच्या कलाने वागू लागले होते. त्यामुळे शिके त्यांच्यावर खप्पामर्जी बाळगून होते. पूर्वी संभाजी राजांविरुद्ध कट केल्याच्या संशयावरून अनेक मातब्बर लोकांना तुरुंगवास व देहदंडाची शिक्षा झाली होते. यामागे कवि कलशाचा हात असावा या संशयावरून या व्यक्तींचे नातलग सुद्धा कलशावर रुष्ट होते.
कवि कलश व त्यायोगे संभाजी महाराज यांच्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे किंवा कवि कलशाचे संभाजी महाराजांवरील नियंत्रण कमी केले पाहिजे. कलशाच्या कारवायांचा अतिरेक झाला आहे. तो कमी केला पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास त्यास ठार मारावे. याकामी संभाजी महाराजांचा अडथळा येत असल्यास त्यांना पदावरून बाजूला सारून धाकट्या शाहू महाराज यांना अथवा बंधू राजाराम महाराज यांना गाडीवर बसवून कारभार आपल्या हाती घ्यावा व कलशाचे प्रस्थ येनकेन प्रकारे कमी करावे असा विचार अनेकांच्या मनात घोळू लागला. तत्प्रमाणे काही कटदेखील शिजला. याचा सुगावा कलशास लागला. त्याने त्याप्रमाणे संभाजी राजांस कळविले. प्रत्यक्षात असा कट शिजला होता अथवा नाही याबाबत ठोस पुरावे नाहीत. किंवा अशीही शक्यता आहे कि असा कट शिजतोय याबाबत अफवा पसरवून त्याप्रमाणे संभाजी महाराजांचे कान भरावयाचे असा कलाशाचा बेट असावा.
एकंदरीतच घडल्या प्रकारात कवि कलश यशस्वी झाला. तो यावेळी खेळण्यावर होता. त्याच्याकडून बातमी मिळता संभाजी महाराज रायगडावरून शृंगारपुरावर चालून गेले कारण या प्रकारात शिर्क्यांची फूस असावी अशी त्यांची समजूत करून दिली गेली. आपल्या फितूर नातलगांचा नाश करण्यासाठी संभाजी महाराजांनी शिरकाणात अनेक शिर्के मंडळींना ठार मारले. या पळापळीत बरेच जण निसटले. गणोजी शिर्के झाल्या प्रकाराने मोगलांना जाऊन मिळाले व शेखनिजामाच्या छावणीत दाखल झाले.
औरंगजेबाचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. पन्हाळा, मलकापूर, विशाळगड, संगमेश्वर, शृंगारपुर, शिरकाण, शिर्के व कवि कलश यांचे भांडण, संभाजी महाराजांची शिरकाण मोहीम यावर हेरांचे बारील लक्ष होते. सर्व घडामोडींची बित्तंबातमी बादशाहाला मिळत होती. बादशाहने आसदखानाला पत्र लिहिले..
“मुकर्रबखानाला पन्हाळा घ्यावयास पाठविला आहे, त्यास पत्र लिहा आणि ताबडतोब कळवा की, त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालून जावे. तो जहागिरदार (संभाजी) रायरीहुन एकटाच खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण शिर्क्यांशी भांडण देणे हे आहे. बहुतेककरून खान त्या जमिनदाराला कैद करू शकेल आणि मुसलमानांची छळणूक करणारा दुराचारी यावर सूड घेईल. ईश्वर आम्हाला क्षमा करो. खान काय करणार? जे करावयाचे ते ईश्वर करतो. ईश्वर फक्त मनुष्याच्या पापकृत्यांचे प्रायश्चित्त करतो”
संभाजी महाराज शिर्क्यांचे पारिपत्य करून खेळणा उर्फ विशाळगडावर आले. तेथे काही दिवस राहून ते परत रायगडावर जाणार होते. खेळण्याहून रायगडावर जाण्याचे दोन मार्ग होते
१) खेळणा – मलकापूर – संगमेश्वर – खेड – महाड – रायगड
२) खेळणा – कराड – सातारा – वाई – प्रतापगड – रायगड
यातील दुसऱ्या मार्गावरील कराड, सातारा, वाई हा प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. तिथे त्यांची ठाणी होती. तर पहिला मार्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेजवळ होता व सर्वथा मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे संभाजी महाराजांनी हाच मार्ग निवडला. शिवाय विशाळगडाजवळ कलशाच्या पागा होत्या तसेच चिपळूणजवळ मोठे घोडदळ होते. संभाजीराजे विशाळगडावरून निघाले व १ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी संगमेश्वर इथे आले, त्यांच्या समवेत सरसेनापती मालोजी घोरपडे, त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ असे सरदार होते. कवि कलश कदाचित मागाहून दुसऱ्या दिवशी आले. त्यामुळे महाराजांचा संगमेश्वर मुक्काम दोन तीन दिवस असणार होता. सोबत चारशे ते पाचशे भालाईत स्वर होते. इतके कमी सैन्य बरोबर ठेवणे हे संकटाला आमंत्रण देणारेच ठरले. वास्तविक छत्रपतींसमवेत सदैव चार ते पाच हजार सैन्य असणे आवश्यक होते. एकतर हि शिरकाण मोहीम घाईघाईने ठरली असावी किंवा हा फाजील आत्मविश्वास असावा. फितुरीची लागण झालेल्या प्रदेशातून प्रवास करताना संभाव्य धोके टाळणे गरजेचे होते. पण काय होते संभाव्य धोके. एकंदर मोगली सैन्याच्या हालचालींचा वेग, त्यांची चपळता पाहता अशा निबिड, घनदाट अरण्यातील कराल दऱ्या उतरून घाटावरून अकस्मात कोणी कोकणात उतरणे शक्य नव्हते. पण अशा अशक्य गोष्टी शक्य करून दाखवूनच इतिहासाला कलाटणी मिळते. याही वेळी असेच काहीसं होणार होतं कारण दैव मोगलांच्या बाजूने होतं.
शेखनिजामाकडे हेरांकारवी बातम्या सतत येत होत्या. त्याआधारेच त्याने संगमेश्वर इथे छापा घालण्याचा धाडसी बेट आखला. शिवाय त्याच्यासमवेत हा प्रदेश तळहाताच्या रेषांप्रमाणे ओळखणारा गणोजी शिर्के व त्याचं सैन्य होतं. त्यांच्या जोरावरच शेखनिजामाने त्या घनदाट अरण्यात पाऊल टाकण्याचा निश्चय केला. त्याच्याकडे पंचवीस हजारी मनसब व मुलांकडे एकवीसहजारी मनसब होती. शिवाय शहजादा महंमद आज्जम याच्याबरोबरचे चाळीस हजार सैन्यपण होते. त्यातील निवडक दोन हजार घोडेस्वार व एक हजार पायदळ यांना सोबत घेऊन त्याने संगमेश्वराकडे कूच केले.
संभाजी महाराज विशाळगड येथून निघून १ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी संगमेश्वर इथे पोहोचले. हि बातमी शेखनिजामास त्याच दिवशी दुपारी समजली असावी. त्याने तातडीने सल्लामसलत करून छाप्याचा निर्णय घेतला असावा व लगबगीने हालचाली करून दुसऱ्या दिवशी पहाटेच कूच केले असावे. तो कोल्हापूर – पन्हाळा – खेळणा – अणुस्कुरा घाटमार्गे संगमेश्वर असा गेला असावा कारण हाच मार्ग सर्वात जवळचा होता. शिवाय यामार्गाने मळा घाटाखाली शिर्क्यांच्या जहागिरीचा भाग होता. तेथील सावर्डे गावाच्या पश्चिमेस कोळतुक व वेळंब येथे शिर्क्यांच्या पागा होत्या. घोडे बदलण्याच्या दृष्टीने हे गरजेचे होते. शिवाय हा मार्ग मुचकुंदी व काजळी या नद्यांजावळून जातो. त्यामुळे सैन्य व घोड्यांची पाण्याची सोय होणार होती. निघतानाच त्याने कोल्हापूर, कराड व सातारा येथील मोगली ठाण्यांकारवी मोठी कुमक घाटमाथ्यापर्यंत आणण्याचे आदेश देऊन ठेवले असणार जेणेकरून परतीच्या अथवा बचावाच्या प्रसंगी त्यांचे संरक्षण होईल. २ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी पहाटे शेखनिजाम निघाला व अणुस्कुरा घाटाखाली उतरून कोकणात शिरला. ३ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी सकाळी तो मुचकुंदी, काजळी, बाव, शास्त्री या नद्यांच्या बाजूने निबिड अरण्यातील आडमार्गाने संगमेश्वर येथे दाखल झाला.
इकडे संगमेश्वर येथील मराठी छावणी गाफील व निर्धास्त होती. आजूबाजूस सर्व मराठी मुलुख असताना तिथे मोगल येण्याचे धाडस करतील असे कोणाच्या स्वप्नातही नसेल. कलशाच्या वाड्यात सर्वांचा मुक्काम होता. जवळच कसबा संगमेश्वर येथे सरदेसाई यांचा वाडा होता. संगमेश्वर निबिड अरण्यात असले तरी गावाभोवती कोट किंवा तट नव्हता. गावं चहूबाजूंनी उघडेच होते. मराठे एकंदर बेसावध होते. त्यांचे सैन्यही तुटपुंजे होते. कवि कलश व संभाजी महाराज संकट विमोचनार्थ अनुष्ठान करीत होते.
शेखनिजामाने अत्यंत धाडसाने, चपळाईने येकायेक छापा घातला. बेसावध मराठ्यांची पांगापांग झाली. आधीच तुटपुंजे बळ, त्यात मोगलांच्या नजेरच्या टप्प्यात त्यांचे सावज होते त्यामुळे ते त्वेषाने पुढे सरकत होते. सुरुवातीच्या चकमकीतच एक बाण कवि कलशाच्या हाताला लागून त्याचा उजवा हात निकामी झाला तर तिकडे दुसऱ्या धुमश्चक्रीत सरसेनापती मालोजी घोरपडे यांना वीरमरण आले. मराठ्यांची पळापळ सुरु होती. संभाजी महाराजदेखील थोड्या वेळाने युद्धातून पळ काढून कलशाच्या वाड्यात लपून बसले. वास्तविक त्यांनी मागे हटून रायगडाच्या दिशेने अरण्यात शिरणे गरजेचे होते. मोगलांनी वाड्याभोवती गराडा घालून त्याची नाकेबंदी केली. मुकर्रबखानाचा मुलगा इखालासखान हा त्याच्या साथीदारांसोबत वाड्यात शिरला. त्याने संभाजी राजांचे केस धरून त्यांना ओढत मुकर्रबखानाच्या जवळ आणले व काही कळायच्या आत मराठ्यांचा दुसरा अभिषिक्त छत्रपती कैदेत अडकला. सोबत कवि कलश व इतर पाच पंचवीस माणसेही कैदेत पडली. संताजी घोरपडे व खंडो बल्लाळ मात्र रायगडाच्या दिशेने निसटू शकले.
एवढा मातब्बर राजकैदी हाती आल्यावर शेखनिजामाला अत्यानंद झाला पण त्याच बरोबर त्याची जबाबदारीदेखील प्रचंड वाढली होती. त्याला त्वरित हालचाली करून लवकरात लवकर मोगली प्रदेश जवळ करणे भाग होते. त्याने तातडीने या अटकेची खबर बादशाहाकडे रवाना केली. अटकेची बातमी फुटण्याअगोदरच तो लगेचच दुपारी संगमेश्वर येथून निघाला. त्याचा संभाव्य मार्ग कराडच्या दिशेने असावा कारण जवळचे प्रबळ मोगली ठाणे तिथेच होते. त्यासाठी तो तिवरा घाट ओलांडून घाटमाथ्यावर आला. आता त्याचा प्रवास बादशहाच्या छावणीच्या दिशेने सुरु झाला.
अकलूज येथे औरंगजेबास शेखनिजामाच्या खंडूजी या दूताकरवी संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी समजली. त्याच्या आनंदास पारावर राहिला नाही. संपूर्ण हिंदुस्थान इस्लाममय करण्याचे त्याचे स्वप्न दृष्टीक्षेपात येऊ लागले. त्याने तातडीने आपला मुक्काम अकलूज येथून बहादूरगड इथे हलविण्याचे ठरविले व शेखनिजामाला आज्ञा केली कि कैद्यांना बहादूरगडावर घेऊन ये.
शेखनिजाम कराड येथे मोगली ठाण्यावर दाखल झाला, आता येथून पुढे त्याचा बहादूरगडापर्यंतचा प्रवास मोगली मुलुखातून निर्धोकपणे होणार होता. शिवाय या मैदानी प्रदेशात मराठ्यांच्या गनिमी काव्याची धास्ती उरली नव्हती. बहादूरगडापर्यंत त्याचे दोन संभाव्य मार्ग असावेत.
१) कराड – पुसेसावळी – वडूज – दहिवडी – वारुगड – फलटण – बारामती – श्रीगोंदा – बहादूरगड
२) कराड – मसूर – रहिमतपूर – कोरेगाव – फलटण – बारामती – श्रीगोंदा – बहादूरगड
शेखनिजाम वायुवेगाने बहादूरगड जवळ करत होता. १४ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी तो बहादूरगडास पोहोचला. वाटेतील मोगली ठाण्यांचा त्यास घोडे बदलण्यासाठी उपयोग झाला असावा. तसेच कृष्णा, वारणा, माण, नीरा, भीमा या नद्यांचा पाण्याच्या दृष्टीने उपयोग झाला असावा. बहादूरगड हा आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पेडगाव या गावी भीमा नदीच्या काठावर आहे. औरंगजेबाचा दुधभाऊ मुज्जफरजंग कोकलताश खानजहान बहादूरखान याने हा किल्ला बांधला व त्यास स्वतःचेच नाव दिले.
संभाजी महाराजांना मोगली कैदेतून सोडवण्याचा काहीच प्रयत्न झाला नसेल का? आजतरी कागदपत्रांच्या अभावी इतिहास याबाबत मौन आहे. संभाजी महाराजांना सोडवण्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे त्यांचा संगमेश्वर ते कराड व त्यापुढील काही प्रवास हाच. कारण हा भाग सह्याद्रीच्या गाभ्यातून जातो. इथे अचानक छापा घालून गनिमी काव्याची लढाई करून महाराजांना सोडविणे शक्य होते. जसजसे मोगल मैदानी प्रदेशाकडे सरकत होते तसतसे सुटकेच्या संभाव्य प्रयत्नांवर व आशेवर पाणी फिरत होते. पण हे खरंच शक्य होतं? संभाजी महाराजांची तुकडी संगमेश्वर इथेच गारद झाली होती. त्यातील संताजी घोरपडे व खंडो बल्लाळ यांनी जरी राजांना अटक होताना पहिले असले तरी त्यांना राजांना सोडविणे शक्य होते का? संगमेश्वरच्या आसपास एखादी मोठी मराठ्यांची तुकडी असण्याची ठिकाणे म्हणजे चिपळूण, खेळणा उर्फ विशाळगड, मलकापूर. पण हि सर्व ठिकाणं वीस पंचवीस कोसांहून दूर होती. तिथे त्वरित बातमी पोहोचवून त्यांनी शेखनिजामाचा संभाव्य मार्ग हेरून त्याचा पाठलाग करणे जवळजवळ अशक्य होते. शिवाय खान पूर्ण तयारीनिशी सावधपणे पण अत्यंत जलद सर्व हालचाली करत होता. मराठ्यांनी धक्क्यातून सावरून पाठलाग केलाही असेल तरी त्यांच्यातील व मोगालांतील अंतर क्षणोक्षणी वाढतच जात होते. एकदा का मोगल या राजबंद्यांसह घाटमाथ्यावरून मैदानी प्रदेशात आपल्या प्रभावक्षेत्रात आले कि पाठलाग अवघड होत जाणार होता. एकंदरीतच वेळ व अंतर या दोन्ही गोष्टी मराठ्यांना अनुकूल नव्हत्या.
शेखनिजाम राजबंद्यांसह बहादूरगडावर पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी १५ फेब्रुवारी १६८९ (ज्युलिअन दिनांक) रोजी औरंगजेबदेखील बहादूरगडावर पोहोचला. मराठ्यांचा दुसरा छत्रपती अलगद त्याच्या तावडीत सापडला होता. एकदा हाती आलेला शत्रू सहसा औरंगजेबाच्या कचाट्यातून सुटत नसे. अपवाद केवळ एकच तो म्हणजे शिवाजी महाराजांची आग्राहून विस्मयकारी सुटका. त्याघटनेने झालेली नामुष्की पुरेपूर वसूल करण्याची संधी नियतीने औरंगजेबासमोर आणली होती. संभाजी महाराज व कवि कलश यांचा मृत्युच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु झाला होता. त्यातील क्रौर्य काळाच्या उदरात व औरंगजेबाच्या ठाव न लागणाऱ्या मनात दडले होते.
अमोल मांडके
१९ ऑगस्ट २०१७
संदर्भ
१. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे
२. शिवपुत्र संभाजी – डॉ. सौ. कमल गोखले
३. छत्रपती संभाजी – एक चिकित्सा - डॉ. जयसिंगराव पवार
No comments:
Post a Comment