महाराष्ट्रभूमी नव्हे रणभूमी...!


संकटे येतात तेव्हा एक एक येत नाहीत. सगळीकडून एकत्र येतात. अशी काहीशी मराठीमध्ये म्हण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूमुळे अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाचा पर्वतच कोसळला होता. पण शोक करत बसण्यास येथे उसंत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांचे हिंदवी स्वराज्य मार्गस्थ झाले. त्यांच्या जागी युवराज संभाजी राजे माघ शुद्ध सप्तमी रौद्र नाम संवत्सर जानेवारी १४, १५, १६ इ. स. १६८१ (जुलियन दिनांक) या दिवशी सिंहासनाधीश्वर झाले.



छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सूत्रे हातात घेतल्यावर लगेच त्यांना रणांगणावर उतरणे भाग पडले. त्या दरम्यान झालेल्या अनेक घडामोडी याकरिता कारणीभूत होत्या. महाराष्ट्रासाठी हा काळ मोठ्या धामधुमीचा ठरला. १६८० ते १६८९ या काळात काही घटना अशा घडल्या कि त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे अस्तित्व धोक्यात आले त्या घटना म्हणजे, शाहजादा अकबर याचे महाराष्ट्रात आगमन, आणि त्याच्या मागावर त्याला पकडण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत उतरलेला धर्मांध क्रूरकर्मा औरंगजेब, मराठी राज्यातील अंतर्गत कलह, त्यातून शिवकालापासून स्वराज्य सेवेत असलेल्या मंत्र्यांना झालेला देहदंड, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रूंनी स्वराज्याची केलेली कोंडी. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्वातून धीरोदात्तपणे मार्ग काढून या सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले. १६८० ते १६८९ या कालखंडात सर्व बाजूंनी स्वराज्यावर होणारे हल्ले पाहिले की वाटते महाराष्ट्र भूमीचे एका सैनिकी छावणीत रुपांतर होऊन ती रणभूमी मध्ये बदलून गेली होती. अवघा महाराष्ट्र धगधगते अग्निकुंड झाले होते.

मुघलांनी प्रथम उघडलेली रामसेज मोहीम तसेच जंजिरेकर सिद्द्याविरुद्ध संभाजी महाराजांनी उघडलेली मोहीम आपण वेगळ्या लेखांमधून पाहिल्याच आहेत. पण त्याच काळात उरलेल्या प्रांतांवर मुघलांची आक्रमणे येतच होती. मुघलांच्या आलेल्या या टोळधाडीला समर्थपणे तोंड देऊ असा इशारा वजा संदेश संभाजी महाराजांनी बहादूरखान कोकल्ताश यास दिला होता.

७ नोव्हेंबर १६८१ च्या दरम्यान हसनअलीखान थोरली फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या रोखाने निघाला. त्याच्या जवळ २०००० स्वार आणि १५००० पायदळ होते. वाटेत येणारी गावे खेडी, लहान पाडे, लुटत जाळपोळ करत तो कल्याणकडे गेला. त्यावर त्याला रोखण्यासाठी मराठी फौजा चालून गेल्या. हातघाईची लढाई झाली त्यात हसनअलीखानाचा पराभव झाला.

मराठ्यांवर अंकुश बसवण्यासाठी त्यांच्यावर आलेला बहादूरखान कोकल्ताश, औरंगजेबाचा दूध भाऊ अर्थात कोका बहादुरगडावर ठाण मांडून बसला होता. त्यालादेखील मराठ्यांनी चांगलाच हात दाखवला. नाशिक, बागलाण, नगर, औरंगाबादच्या आसमंतात मराठ्यांच्या अनेक तुकड्या संचार करीत होत्या. धुमाकूळ घालीत होत्या. मुघलांना गनिमी काव्याने या लहान लहान तुकड्यांनी चांगलेच जेरीस आणले. हा बहादूरखान कोकल्ताश या मराठी तुकड्यांचा इकडून तिकडे नुसताच पाठलाग करीत राहिला. हाती काहीही आले नाही.

एप्रिल, मे १६८१ मध्ये मराठी फौजांनी एक धाडस केले. त्यांनी थेट औरंगाबादवर चाल केली. हे शहर म्हणजे साक्षात आलमगीराचे नाव धारण केलेले शहर. फौजा औरंगाबादेत घुसल्या. मराठी फौजांनी शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रचंड लूट सुरु झाली. बहादूरखान कोकल्ताश याचा तळ जवळच १६ कोसांवरील बाभूळगाव येथे होता. मराठ्यांची धाड औरंगाबादवर आली आहे ही खबर मिळताच तातडीने तो औरंगाबादकडे निघाला पण मराठ्यांनी तोवर त्यांचा कार्यभाग उरकला होता. बाईपुऱ्यापर्यंत मराठी तुकड्या पोचल्या. त्यावेळी तेथे मुघलांकडून व्यवस्थेवर राजा अनुपसिंग होता. मराठी झंझावाताला तोंड देण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तो त्याच्या पुऱ्यातच दडून बसला. बहादूरखान औरंगाबादमध्ये पोहोचेपर्यंत मराठी फौजा निघून गेल्या होत्या. या हल्ल्यामुळे औरंगाबाद शहरावर चांगलीच दहशत बसली. भीमसेन सक्सेना ‘तारीख-ए-दिलकुशा’ मध्ये म्हणतो,‘मी मध्यान्हीच्या वेळी औरंगाबाद मध्ये दाखल झालो मला जे दृश्य दिसले ते विलक्षण होते. लोकांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद केले होते. बाजारात गल्ल्यातून एकही मनुष्य दिसत नव्हता.’ त्यावरून आपल्याला अंदाज येईल की या हल्ल्यामुळे शहरामध्ये कसे भयभीत वातावरण होते.

दक्षिणेत उतरताच प्रथम नाशिक बागलाण प्रांतावर मुघलांचे आक्रमण झाले. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील किल्ले हस्तगत करण्यासाठी मोहिमा आखल्या. मुघलांची साल्हेर मोहीम हीपण त्यापैकीच एक. साल्हेर हा बागलाणातील एक प्रमुख किल्ला. सटाण्यापासून वायव्येस ८ मैलावर हा किल्ला आहे. साल्हेर मुल्हेर ही एक अत्यंत उंच आणि अजिंक्य अशी दुर्गद्वयी. त्यापैकी मुल्हेर हा मुघलांकडे होता. त्यावर देवीसिंग नावाचा किल्लेदार होता. बादशाहने या देवीसिंग यास बंदोबस्ताचे आदेश दिले होते. शाहबुद्दीनखान नोव्हेंबर १६८१ मध्ये साल्हेर च्या मुलखात शिरला. मराठ्याबरोबर त्याची एक मोठी चकमक त्या दरम्यान झाली. त्यात दोन्हीकडच्या लोकांचे नुकसान झाले. साल्हेर किल्ला लढून जिंकणे केवळ अशक्य. या शाही फौजांना हे रांगडे मराठी सैन्य आवरता येत नाही असे दिसल्यावर औरंगजेबाने फितुरीचे हत्यार उपसले. त्याने अनेक किल्ले फितुरीने, आमिषे दाखवून, वतनाचा लोभ दाखवून, बक्षिसे, नजराणे पाठवून जिंकण्याचा प्रयत्न सुरु केला. साल्हेर जिंकण्यासाठीही त्याने असाच डाव टाकला. तरीही १६८३ पर्यंत साल्हेर ताब्यात आला नव्हता. पुढे नेकनामखानाने साल्हेरचा गडकरी असोजी (येसोजी?) यास सोने नाणे, घोडे, भेटवस्तू वगैरे देऊन फितवले. त्यानंतर हा किल्ला असोजीने मुघलांच्या हवाली केला. नेकनामखानाच्या शिफारसीने या असोजीस औरंगजेबाकडून ३००० जात आणि २००० स्वार अशी मनसब देण्यात आली. तसेच नेकनामखानाच्या मनसबीत वाढ करण्यात आली. मिर्झा फारुख बेग याची साल्हेरवर किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. आणि साल्हेरचे नाव सुलतानगड ठेवण्यात आले.

असाच एक प्रसंग घडला त्र्यंबकगडावर. त्र्यंबकगडाचे किल्लेदार होते केसो त्रिमल, हे तेच केसो त्रिमल ज्यांनी रामसेज किल्ल्याला वेढा पडलेला असताना रामसेजवर रसद पुरवठा याच त्र्यंबकगडावरून सुरु ठेवला आणि मुघलांना रामसेज जिंकणे अशक्य करून टाकले होते. रामसेजला वेढा पडलेला असताना त्र्यंबकगडही घेण्याच्या प्रयत्नात मुघल होते. १६८२ डिसेंबरमध्ये एक मराठी फौज त्र्यंबकगडाच्या दिशेने गेली असल्यामुळे खानजहानचा मुलगा मुझफ्फर खान याला त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. राघो खोपडे यांनी फितुरी करून किल्ला मुघलांना मिळवून देण्याची तयारी दाखविली या बदल्यात त्याला ७०० जात व २०० स्वराचा मान मिळून शिवाय रोख रक्कमही बक्षीस मिळाली. हे सर्व घेऊन राघो खोपडा केसो त्रिमल यांना गडावर येऊन भेटला पण केशव (केसो) त्रिमल एकनिष्ठ निघाले आणि त्यांनी गड देण्यास नकार दिला. त्यामुळे राघो खोपडे याचा गड औरंगजेबाला मिळवून देण्याचा मनसुबा धुळीस मिळाला. म्हणजे मुघलांचे पैशापरी पैसे गेले आणि गडही ताब्यात आला नाही. त्यांची फजिती झाली. आपण गड देऊ शकलो नाही म्हणजे आपल्याला धोका आहे हे जाणून राघो खोपडे पळून गेला. अशाप्रकारे फितवा करून त्र्यंबकगड घेण्याचा मुघलांचा डाव फसला. यावरून एक लक्षात येते की प्रत्येकवेळी फितुरीचा प्रयत्न यशस्वी झालाच असे नाही. हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ गडकऱ्यानी हा फितुरीचा डाव उधळून लावल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुढे १६८४ ला पण हा किल्ला घेण्याचा प्रयत्न झाला. अखेरीस १६८८ मध्ये मातबरखानाने ऑगस्ट १६८८ साली पुन्हा त्र्यंबकगडाला वेढा दिला. यावेळी परिस्थिती जास्त बिकट होती. अवघा महाराष्ट्र मुघलांनी व्यापला होता. वेढा आवळण्यात आला. नाईलाजाने ८ जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव आणि शामराय यांनी गडाचा ताबा सोडला.

एकूणच १६८१, १६८२,१६८३ या कालखंडात कल्याण भिवंडी घेण्याचा प्रयत्न औरंगजेब करत होता. रहूल्लाखान, रणमस्तखान, हसनअलीखान यांच्यासारख्या कसलेल्या सरदारांना भरपूर युद्ध साहित्य, कुमक देऊन या ३ वर्षात कल्याण भिवंडी घेण्यासाठी वेगवेगळ्या वेळी तैनात केले. परंतु यश आले नाही. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात स्वतः हंबीरराव मोहिते, रुपाजी भोसले, मानाजी मोरे वगैरे मंडळी २०००० अश्वदळ, १०००० पायदळ घेऊन कल्याण भिवंडीच्या बचावास गेले. रणमस्तखानास मराठी फौजा त्रास देऊ लागल्या. रसद अडवली जाऊ लागली. अखेर दोन्ही फौजा कल्याणच्या ईशान्येस सव्वा चार मैलावर एकमेकांस भिडल्या हातघाईची लढाई सुरु झाली. मराठ्यांचा आवेश इतका प्रचंड होता कि पद्मसिंह यास ३५ जखमा झाल्या आणि तो ठार झाला. रतनसिंह राठोड याचा मुलगा रामसिंह राठोड आजारी होता तरी अंगावर चिलखत चढवून मराठ्यांवर चालून आला. पण त्याचा निभाव लागला नाही. तोही मारला गेला. मुघल सेना उधळली गेली. हरिसिंह राठोड कैद झाला. अशाप्रकारे अनेक आघाड्यांवर लहान मोठ्या चकमकी कधी मोठ्या लढाया होत होत्या. मराठी फौजा या जुलमी आक्रमणाला तोंड देत होत्या. येथे वर्णन केलेल्या लढाया किंवा प्रसंग हे केवळ १६८१,८२,८३ मधले काही मोजके प्रसंग वर्णन केले आहेत. पण वास्तविक हे असे प्रकार १६८९ किंवा त्याही पुढे सुरूच होते आणि ते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किंवा एकाच वेळी घडत होते. ज्याप्रमाणे पाण्यातील हिमनगाचा काहीच भाग आपल्या दृष्टीस पडतो त्याप्रमाणे या लेखातील वर्णन तर केवळ मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा अगदीच लहानसा भाग आहे.


मुघल दक्षिणेत उतरल्यापासून म्हणजे साधारण १६८० /८१ पासून ते अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत राज्यभर अनेक आघाड्यांवर चकमकी, लढाया सुरु होत्या. अगदी कल्याण भिवंडी, तळकोकण, नाशिक, बागलाण, अहमदनगर, औरंगाबाद, जंजिरा, कोकण किनारपट्टी, गोवा, गोकाक, गदग, विजापूर ते अगदी चंदी (जिंजी) पर्यंत. तसेच मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, प्रसंगी आप्त स्वकीय यांच्या विरुद्ध अनेक आघाड्यांवर युद्धजन्य परिस्थिती होती. अनेक चकमकी, छापे, लढाया तसेच फंद फितुरीला ऊत आला होता. या धर्मांध औरंग्याच्या आगमनामुळे अवघा महाराष्ट्र खऱ्या अर्थी दूषित झाला होता. होय दूषितच.. कारण सर्वत्र अशांतता, सतत मुघलांचे भय, अनन्वित अत्याचार, रयतेचे होणारे हाल, त्यांचे होणारे नुकसान याला काही मोजमाप उरले नाही. मराठे या धर्मांध आक्रमणाला थोपवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य या औरंग्यारुपी दैत्याचा सामना करत होते. त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून आजही अंगावर काटा येतो. कोणत्या अग्नीदिव्यातून महाराष्ट्र जात होता याची कल्पनाच करवत नाही. अखेर या महाराष्ट्राच्या पावन भूमीत हा पापी औरंग्या बुडाला. गाडला गेला. त्या आलेल्या अक्राळ विक्राळ संकटाला धीराने तोंड देणाऱ्या, अखेरीस या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या नाम-अनाम वीरांस मानाचा मुजरा.



लेखन सीमा
उमेश जोशी
१७.०७.२०१७

संदर्भ:
मराठी रियासत खंड २
शिवपुत्र संभाजी: डॉ. कमल गोखले
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६
ज्वलज्वलंतेजस संभाजी: डॉ. सदाशिव शिवदे
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे
राजा शंभू छत्रपती: श्री. विजयराव देशमुख
संभाजीकालीन पत्रासार संग्रह
जेधे शकावली करीना
छत्रपती संभाजी महाराज: वा. सी. बेंद्रे
मराठ्यांचे स्वातंत्र्य समर (पूर्वार्ध)
मासीर-ए-आलमगिरी
तारीख-ए-दिलकुशा
समग्र सेतू माधवराव पगडी खंड ३
छत्रपती संभाजी व थोरले राजाराम महाराज (मल्हार रामराव चिटणीस बखर)

3 comments:

  1. 1682-1687 या कालखंडातील वेगवान घडामोडींचा आढावा उत्तम प्रकारे घेतला आहे.रणभूमीची यथार्थ मांडणी लेखात केली आहे.

    ReplyDelete
  2. संभाजी राजे यांचा कालखंड छान मांडला आहे, हे दिसून येते की संभाजीराजे यांना औरंगजेबाने उसंत मिळुदिलीनही, तसेच संभाजीराजे सुध्दा कडवे योद्धे आणी ते आक्रमक वृत्तीचे होते.
    लेख आणि लेखन दोन्ही आवडले.
    अभिनंदन
    सचिन भोपळे

    ReplyDelete
  3. अप्रतिम👌👌👌🙏🚩

    ReplyDelete