"घरात जैसा उंदीर तैसा महाराजांचे राज्यास सिद्दी" हे सभासदाने केलेले वर्णन असो वा राज्यास सन्निधवासी शत्रू म्हणजे केवळ उदरातील व्याधी" ही अमात्यांच्या आज्ञापत्रातील नोंद असो यातून असे समजते की जंजिरेकर सिद्द्यांचा उपद्रव मराठी राज्यास प्रथमपासूनच होत होता. उपद्रव देणाऱ्या या शेजाऱ्याचा उपराळा थांबविणे आणि त्याला कायमची अद्दल घडविणे हे संभाजीराजांचे परम-कर्तव्य झाले होते. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली या काळ्या कातळरूपी वारुळातल्या सिद्दीला ठेचण्यासाठी जंजिरा मोहीम केली. आणि चहुबाजूनी समुद्राने वेढलेल्या, तोफांच्या माऱ्यालाही थोपवून धरणाऱ्या या चिलखतात बसलेला सिद्दी संभाजीराजांना या अभेद्य कोटातून आत प्रवेशकरण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होता.
जंजिरा भौगोलिक -
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकण भागात आताच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून सुमारे ५५ किलोमीटरवर राजपुरीच्या खाडीमुखाशी, दण्डा राजपुरीच्या समोर भर समुद्रात जंजिरा किल्ला वसलेला आहे. जंजिऱ्याच्या प्रांताला हबसाण असे म्हणतात. यात जंजिरा किल्ला, मुरुड, नांदगाव, श्रीवर्धन, पंचायतन, म्हस्के (म्हसळे), गोवळ, मांडले असा साधारण ३२५ चौरस मैलांचा प्रदेश येतो. उत्तरेला कुंडलिका नदी अर्थात रोह्याची खाडी, दक्षिणेला सावित्री नदी अर्थात बाणकोटचा खाडी, पूर्वेला रोहा, माणगाव, महाड, अवचितगड, तळागड, घोसाळगड हा हबसणातील प्रदेश आणि पश्चिमेला अरबी समुद्र असे याचे भौगोलिक वर्णन करता येईल. पश्चिम किनारपट्टीवरील उत्तर बाजूकडील सुरत, मुंबई तसेच दक्षिण बाजूकडील गोवे व कारवार प्रांतातून समुद्रमार्गे जो व्यापार चाले त्याची लुटालूट करून त्यावर वचक ठेवण्यासाठी आणि एकूणच समुद्रावर सत्ता गाजवण्यासाठी जंजिरा हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून सिद्द्यांना फारच सोयीचे होते. अतिशय मोक्याच्या जागेवर वसलेल्या या जंजिऱ्यामधून सिद्द्यांचे आरमार मुंबईतील माझगाव तसेच सुरत बंदरापर्यंत आणि दक्षिणेला गोव्यापर्यंत बिनविरोध मुक्त संचार करीत असे.
जंजिरा इतिहास -
जंजिऱ्याच्या इतिहासाकडे पाहिल्यास बहामनी काळापासून याचे उल्लेख सापडतात आणि असे लक्षात येते की तेव्हापासून जंजिरा अभेद्य व अजिंक्यच राहिला. दण्डाराजपुरीजवळच्या बेटावर मासेमारी करून गुजराण करणारे कोळी लोक राहत असत. अरबी समुद्रात मलबारी व अरबी अश्या उत्तम दर्यावर्दी लोकांचा वावर असे व हे मोक्याच्या जागेवरील बेट तसेच राजपुरी हे ठिकाण आपल्या ताब्यात असावे असे त्यांना वाटे. या बेटाच्या रक्षणार्थ तेथील कोळी लोकांनी बेटावर एक लाकडी कोट बांधला होता. त्यास "मेढेकोट" म्हणत व त्याचा प्रमुख रामाकोळी होता. त्याने समुद्रातील अरब व मलबरींना दाद दिली नाही तसेच बहामनी सरदार मलिक अहमद याने १४८५-१४८६ मध्ये मेढेकोटला घातलेला वेढा उठ्वावयास लावला. १४९० मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि दण्डाराजपुरीला आपले आरमारी ठाणे उभे केले. सुरुवातीला रामा कोळ्याने निजामशहाच्या मिरझा अली व कलब अली या ठाणेदाराना दाद दिली नाही. निजामशहाने रामाकोळ्यास पेरीमखानाकरवी युक्तीने पकडले. त्याचे असे झाले. पेरीमखानाने आपल्या सैनिकांना सुरतच्या व्यापाऱ्यांची सोंगे दिली आणि रामा कोळ्याकडे आश्रयास धाडले. त्यांनी रामाकोळ्यास आपल्याजवळच्या मालाच्या पेट्या मेढेकोटात ठेवण्यासाठी विंनती केली. विंनती मान्य होताच त्यांनी कोळ्यांना दारू पाजली व कोळी नशेत पूर्ण बुडाल्याचे पाहून त्या पेट्यातून नेलेल्या सशस्त्र सैनिकांनी बाहेर येऊन कोळ्यांची कत्तल केली. रामाकोळ्यास कैद केले व त्याचे धर्मांतर केले. पुढे पेरीमखानाने दगाबाजीने त्यास ठार मारले व तो किल्लेदार बनला. यारीतीने स्थानिकांकडून सर्वप्रथम निजामशाहीकडे मेढेकोट हस्तांतरित झाला. पुढे निजामशाहीत बुऱ्हाणखान याने १५६७ ते १५७१ या काळात मेढेकोट पाडून या बेटावर किल्ला बांधला. या किल्ल्याच्या पायाभरणीचा मुहूर्त नांदगावकर जोशी यांच्याकडून काढून घेतला होता. नाव ठेवले जझीरा मेहरुब. अतिशय भक्कम बांधणीतला, २५ मीटर व्यासाचा एक असे १९ बुरुज असलेला आणि पूर्वेकडे सावजाची वाट पाहणारा प्रचंड दरवाजा असलेला चंद्रकोरीच्या आकारासारखा असलेला जलदुर्ग - जझीरा मेहरुब ! बुऱ्हाणखानानन्तर त्याचा मुलगा अलीखान, अलीखानानन्तर त्याचा मुलगा इब्राहिमखान व त्यानन्तर सन १६१८ पासून जंजिऱ्यावर हबशांचा अमल सुरु झाला आणि निजामशाहीकडून सिद्द्यांकडे आलेली जंजिऱ्याची सत्ता निजामशाहीच्या अस्तानन्तर १६३६ मध्ये सिद्द्यांकडे हस्तांतरित झाली. वास्तविक यावेळी जंजिरा विजापूरकरांच्या ताब्यात गेला होता. परंतु सिद्दी अंबरने आपण मोगलांचे चाकर आहोत असे जाहीर करून विजापूरकरांची सत्ता झुगारून दिली आणि स्वतंत्र अमल सुरु केला.
सिद्दी हे मूळचे आफ्रिकेतील अबेसिनियामधले. आफ्रिकन मुसलमानांना अरबीत आणि फारसीत सय्यिदी म्हणत. मराठीत याचा सिद्दी झाला. अबेसिनियाला अरबीत हबश म्हणत. या प्रदेशातील लोकांना हबश वा हबशत वा हबशी म्हणत. म्हणूनच सिद्द्यांना हबशी असे म्हणत. (निजामशाहीतील मलिक अंबर, आदिलशाहीतील सिद्दी जौहर, सिद्दी मसूद, रुस्तम-ए- जमान असे सर्व सिद्दी वा हबशीच होते). जंजिऱ्याच्या सिद्द्यांच्या ताब्यातील प्रदेशाला हबसाण असे म्हणत. हे लोक भारतात आले आणि वेगवेगळ्या शाह्यांमधे सरदारांच्या हाताखाली काम करू लागले. पुढे काही जण स्वतः सरदार झाले. सिद्दी सुरूलअब्दुल्लाखान हा जंजिऱ्याचा पहिला सिद्दी सुभेदार झाला आणि सिद्दी अंबर हा राजपुरीचा पहिला सिद्दी सुभेदार झाला. शहाजीमहाराजकालीन, शिवाजीमहाराजकालीन आणि संभाजीमहाराजकालीन सिद्द्यांची हबसणातील कारकीर्द पुदिलाप्रमाणे होती : सिद्दी सुरुलब्दुल्लाखान - १६२० ते १६२६, सिद्दी अंबर - १६२६ ते १६४२, सिद्दी युसूफ - १६४२ ते १६४८, सिद्दी फत्तेखान - १६४८ ते १६६७, सिद्दी खैरात - १६६७ ते १६९६. सन १६३९ ते १६४६ पर्यंत मोगलांच्या अमलाखाली सिद्दी राज्य करीत होते. या सुमारास शिवाजीमहाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक बाळाजी आवजी चिटणीस यांचे वडील आवजी हरी चित्रे हे सिद्दीचे दिवाण होते. जंजिऱ्यातील सिद्दी हबननीखान हा १६३५ मध्ये वारल्यानन्तर त्याच्या पत्नी व लहान मुलांच्या नावाने ते कारभार पाहत होते. इतर सिद्दीच्या मनात त्यांच्याविषयी आकस असल्याने त्यांना विष घालून मारले व त्यांच्या पत्नी व तीन मुले यांचा राजापुरात लिलाव केला. त्यांचे बंधू खन्डेराव याना पेटीत घालून समुद्रात बुडवले. त्यांच्या मुलास म्हणजेच बाळाजी आवजी चिटणीस याना राजापूर मोहिमेवेळी सुंदर हस्ताक्षर पाहून शिवाजीमहाराजांनी स्वराज्यसेवेत घेतले व नन्तर अष्टप्रधानमंडळात समाविष्ट करून घेतले.
सिद्दी कार्यपद्धती -
हे सिद्दी मुळातच खूप उद्दाम, खुनशी, अतिशय दगाबाज आणि जंजिऱ्याच्या जोरावर मराठ्यांना वा कुणालाही न जुमानणारे असे होते. सिद्दीचे लोक किनारपट्टीवरील मराठी मुलुखात जाळपोळ करणे, लुटालूट करणे, प्रजेवर अनन्वित जुलूम करणे, स्त्रियांची अब्रू लुटणे, स्त्रिया व मुलांना गुलाम म्हणून विकणे, कुणाचाही संशय आला तरी कत्तल करणे, धर्मान्तरासाठी छळ करणे असे भयानक प्रकार बिनधास्तपणे करीत असत. किनारपट्टीवर या विरोधात कुणाचा हल्ला आला तर होईल तेवढा प्रतिकार करून परत जंजिऱ्याच्या आश्रयास जात असत आणि तह करून मोकळे होत. जंजिऱ्याच्या अभेद्यपणामुळे सिद्दीस समूळ उखडून टाकणे मराठ्यांना जमले नाही. जंजिऱ्यास पाठीशी ठेवून यांचे आरमार अरबी समुद्रात मुक्त संचार करीत असे आणि पावसाळ्यात मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास जाऊन बसत असे. आलमगीर औरंगजेबाच्या अंकित असलेली आणि मुंबईच्या इंग्रजांचा आश्रय लाभलेली हबशी सिद्दीची सत्ता म्हणजे स्वराज्याच्या मजबूत वास्तूस एका बाजूला लागलेली आणि सतत उपद्रव देणारी वाळवी होती. सिद्द्यांचे मुख्य ठाणे म्हणजे जंजिरा किल्ला राजधानी रायगडच्या जवळ होता आणि म्हणूनच हे सिद्दी रायगडास शह देऊ शकत होते. अश्या सिद्द्यांचा कायमचा बंदोबस्त करायच्या इराद्याने संभाजीराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जंजिरा मोहीम हाती घेतली.
शिवकालीन जंजिरा मोहिमा – आपल्या मुलुखातील प्रजेवर अन्नवित अत्याचार करणाऱ्या, अरबी समुद्रावरील आपल्या आरमारी शक्तीच्या आणि सत्तेच्या उभारणीला अडथळा ठरणाऱ्या, ज्याच्यासमवेत अंतिम युद्ध होणार आहे त्या औरंगजेब बादशहाच्या अंकित असलेल्या या सिद्दीच्या सत्तेला उखडून टाकण्याच्या उद्देशाने
शिवाजीराजांनी जंजिऱ्यावर पाच वेळा आक्रमण केले होते.
१- १६५७ मध्ये श्यामजीपंत आणि घोलप यांनी जंजिऱ्यास वेढा घातला. आपला पराभव होतो असे दिसताच सिद्दी खैरात ने श्यामजीपंतांना वाटाघाटीसाठी बोलावले आणि दगा करून अटक केली. पंतांना माघार घ्यावी लागली.
२- १६५८ मध्ये निळो मुजुमदारानी जंजिऱ्यावर स्वारी केली. परंतु अफझलखान स्वारीमुळे माघार घ्यावी लागली.
१- १६५७ मध्ये श्यामजीपंत आणि घोलप यांनी जंजिऱ्यास वेढा घातला. आपला पराभव होतो असे दिसताच सिद्दी खैरात ने श्यामजीपंतांना वाटाघाटीसाठी बोलावले आणि दगा करून अटक केली. पंतांना माघार घ्यावी लागली.
२- १६५८ मध्ये निळो मुजुमदारानी जंजिऱ्यावर स्वारी केली. परंतु अफझलखान स्वारीमुळे माघार घ्यावी लागली.
३- १६६३ मध्ये रघुनाथपंत अत्रे यांनी जंजिरा स्वारी केली. सिद्दीने थ करून सर्व अति मान्य केल्या पण जंजिरा सोडला नाही. तो अजिंक्यच राहिला.
४- १६६७ साली मोरोपंतांसह खासा महाराज जंजिऱ्यावर गेले. या मोहिमेत महाराजांविरुद्ध टिकाव धरणे शक्य नाही असे दिसताच सिद्दी औरंगजेबाचा मांडलिक झाला. मोहिमेत सिद्दीचा पाडाव झाला नाही.
५- १६७६ सालात लायपाटलाने एका रात्री प्रत्यक्ष जंजिऱ्यास शिड्या लावून तो घेण्याचा यत्न केला परंतु मोरोपंतांना त्यात यश आले नाही. अशारितीने शिवकाळात सिद्दीच्या सत्तेला चांगलाच पायबंद बसला असला तरी त्याची सत्ता समूळ नष्ट करणे मराठ्यांना जमले नाही.
सिद्दी आणि इतर आरमारी सत्ता -
त्याकाळी पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात सिद्दीचे आरमार, इंग्रजांचे आरमार, पोर्तुगीज आरमार, मराठ्यांचे आरमार अश्या नाविक शक्तींची प्रबळ स्पर्धा होती. नाही म्हणायला डच व्यापारी होते तसेच औरंगजेबाचे छोटे आरमार सुरतेच्या बंदरात होते. त्याचे मुख्य आरमार आसाम, ढाका, बंगाल सुभ्यात होते. शिवाजीमहाराजांनी अरबी समुद्रावर सत्ता स्थापन करण्यासाठी जलदुर्ग बांधणे ( ८ ते १० वर्षात ५८ जलदुर्ग स्वराज्यात आले), पठाण, युरोपीय, कोळी, भंडारी इ लोकांस भरती करून घेणे, लढाऊ नौकांची निर्मिती करणे अश्या कार्यास प्रारंभ केला आणि पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी ह्या सागरी शत्रुंना धाक निर्माण केला. इतका की १६७९ च्या खांदेरी - उंदेरी लढ्यात 'शिवाजीची गलबते अगदीच भिकार आहेत. आमचे एक गलबत त्यांची १०० गलबते एका झटक्यात उडवून देईल' अश्या गमजा मारणाऱ्या इंग्रजांना देखील अखेर नमते घ्यावे लागले आणि कबूल करावे लागले की 'आम्ही दीर्घ काळ त्यांच्याशी विरोध करू शकणार नाही. त्यांच्या छोट्या सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात'. पोर्तुगीज आर्म्स म्हणतो "एकटे राजापूरचे मराठी आरमार गोव्याच्या पोर्तुगीज आरमारास भारी होते". मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्दी याना नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराजांनी खांदेरी बांधला. त्यानन्तर इंग्रजांशी तह करून त्यात सिद्दीला दारुगोळा, शिधासाहित्य तसेच कुठलीही मदत न करण्याचे कलम घातले. शिवाजीराजांच्या पश्चात इंग्रज हा तह विसरले आणि त्यांनी सिद्दीस मदत करणे सुरु केले. शिवाजीराजांच्या पश्चात इंग्रज हा तह विसरले आणि त्यांनी सिद्दीस मदत करणे सुरु केले. अशारितीने याकाळात अरबी समुद्रात इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, मराठे या चार आरमारी शक्ती असल्या आणि यांचे एकमेकांशी खटके उडत असले तरी अंतस्थपणे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी हे एकत्र होते आणि खरी लढाई मराठे विरुद्ध इंग्रज, पोर्तुगीज,
सिद्दी अशीच होती.
संभाजीराजांची जंजिरा स्वारी – पार्श्वभूमी –
शिवाजीमहाराजांच्या महानिर्वाणानंतर १६८० साली राज्यकारभार हाती घेत असतानाच संभाजीराजांचे या त्रिकूटाकडेही लक्ष होतेच. इंग्रज तह पाळत नाहीत म्हणून त्यांनी इंग्रजांना खडसावले आणि उंदेरीस हल्ला करून सिद्दीला नमवायचे ठरवले. सिद्दी मुंबईतील इंग्रजांचा आश्रय आणि औरंगजेबाचा सक्रिय पाठिंबा या जोरावर मराठी मुलुखात पनवेलपासून चौलपर्यंत लुटालूट, जाळपोळ करून तो प्रदेश उद्धवस्त करत असे. आता सिद्दीची हि प्रकरणे मर्यादेबाहेर गेली होती आणि एकंदरीतच तो मराठ्यांच्या मुंबईनजीकच्या कुर्ला, कल्याण प्रांतापासून पनवेल, चौल पर्यंत मुलुखात संचार करून आपल्या प्रदेशाची सीमा वाढवू पहात होता आणि महाडवरून प्रत्यक्ष राजधानी रायगडास शह देत होता. १८ ऑगस्ट १६८० रोजी रात्री मराठ्यांच्या २०० सैनिकांनी उंदेरीवर हालचाली केल्या. अंधाराचा फायदा घेऊन सिद्द्यानी मराठ्यांची कत्तल केली आणि ८० मराठ्यांची शिरे जहाजावर लटकवून मुंबईत आणली आणि सर्वाना दाखवली. याबद्दल संभाजीराजांनी मुंबईकर इंग्रजास जाब विचारला. सुरतकर इंग्रजांना हे समजताच त्यांनी मुंबईकरांना सिद्दीशी सलोखा न ठेवता संभाजीराजांशी ठेवण्याबद्दल कळवले. इंग्रज उघडपणे नाही पण अंतस्थपणे सिद्दीस मदत करत होते आणि त्यांचे दुटप्पीपणाचे धोरण होते. इकडे सिद्दीच्या हालचाली सुरूच होत्या. राजापूरजवळ इंग्रजांवर दडपण ठेवण्यासाठी व सिद्दीस प्रतिकार करण्यासाठी राजांनी ५० गलबते आणि ४,००० सैन्य दौलतखानाच्या हाताखाली ठेवले होते. इकडे सिद्दीच्या हालचाली सुरूच होत्या. वेंगुर्ल्याच्या बाजूस सिद्दी कासीम लुटालूट करण्यास गेले होते त्यावेळी सिद्दी आणि दौलतखान यांच्यात चकमकी झाल्या. संभाजीराजे व मुंबईकर इंग्रज यांच्यात सिद्दीसन्दर्भात वाटाघाटी सुरु असताना वेंगुर्ल्यास गेलेला सिद्दी मुंबईस परतला. तेथून सुरतेस जाताना त्याने ५०० माणसे व ६ गलबते उंदेरीवर आणि ३०० माणसे माझगाव बंदरात ठेवली. या माणसांनी केलेले सर्व तह विसरून पूर्वीप्रमाणेच लूटमार चालू केली. १६ मार्च १६८१ रोजी सिद्दीने मराठ्यांची २ गलबते व ४ माणसे पकडली. मुंबईकर इंग्रजांनी सिद्दीकडून ती परत मिळवून दिली. इंग्रजांच्या सहकार्याने मुंबई व उंदेरीवर राहून सिद्दी मराठी मुलुखाची नासधूस करीतच होता. म्हणून ऑगस्ट १६८० च्या अयशस्वी मोहिमेनंतरही सिद्दीकडून उंदेरी घेण्याची अजून एक योजना संभाजीराजांनी आखली. त्यामागची कारणे म्हणजे एकतर उंदेरी ताब्यात आल्यास जंजिरा आणि मुंबई दोहोंवर लक्ष ठेवणे सोपे जाणार होते आणि त्यायोगे इंग्रजांना काबूत ठेवून जंजिऱ्यावर हल्ला करणे सोपे जाईल ही होत. नागोठण्यास मराठ्यांची २२ गलबते आणि ३००० नौसैनिक सज्ज होते. त्यांना सहा महिन्यांचा पगार आगाऊ दिला गेला. १८ जुलै १६८१ रोजी पहाटे मराठ्यांनी उंदेरीवर हल्ला केला. चार तास लढाई चालू होती. सिद्दीच्या लोकांनी हा हल्ला परतवून
लावला. काही कारणाने इंग्रज आणि सिद्दीचे थोडे बिनसले. डिसेंबर १६८१ च्या दरम्यान सिद्दीने नागोठणे, आपटे, चौल या मराठी मुलुखात लूटमार, जाळपोळ असे अन्याय सुरु केले होते. मराठ्यांना तो जुमानीत नव्हता. इंग्रजांच्या दुटप्पी वागण्यामुळे इंग्रजांतर्फे सिद्दीला शह देणे जमत नव्हते. औरंगजेबाचे परचक्र स्वराज्य संपवण्यास उभे ठाकले होते. त्याच्या पाठिंब्यामुळे सिद्दी अजून मुजोर झाला होता. यासाठी सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःच्या नेतृत्वाखाली संभाजीराजांनी जंजिऱ्यावरच मोठी मोहीम उघडण्याचे ठरवले.
संभाजीराजांची जंजिरा स्वारी – मराठा वीराचा प्रयत्न –
संभाजीराजांची जंजिरा स्वारी – मराठा वीराचा प्रयत्न –
संभाजीराजांचा जंजिरास्वारीचा विचार सुरु असतानाच कोंडाजी फर्जंद नावाचा एक मराठी वीर संभाजीशी आपले वैर आहे असे भासवून किल्ल्यात शिरला. किल्ल्यातील कोठारांना आगी लावण्याचा त्याचा मानस होता. त्याने सिद्द्याची नोकरी पत्करली. तेथे त्याने एक बटीक खरेदी केली आणि दारू कोठारास आग लावण्याचा बेट रचला. परंतु त्याचा हा कावा एका दासीमार्फत उघडकीस आला आणि सिद्द्याने त्यास ठार मारले. हे कळताच संभाजीराजांनी जंजिरा कसेही करून घ्यावा ही ठरवले.
संभाजीराजांची जंजिरा स्वारी – स्वतःकडे नेतृत्व –
संभाजीराजांची जंजिरा स्वारी – स्वतःकडे नेतृत्व –
प्राप्त परिस्थितीत राज्याभिषेकांनंतरची कोकण प्रांतातील पहिली मोहीम संभाजीराजांनी सिद्द्यांविरुद्ध सुरु केली आणि मोहिमेचे नेतृत्व स्वतः कडे घेतले. शहजादा अकबरास बरोबर घेऊन संभाजीराजांनी सिद्द्यावर स्वारी केली. यावेळी संभाजीराजांकडे १५० लहानमोठी गलबते असून त्यावर ५,००० कसलेले खलाशी होते. महाडचा दादाजी रघुनाथ प्रभू त्यांच्याबरोबर असून त्यास त्या प्रांताची चांगलीच माहिती होती. संभाजी राजांनी त्यास वचन दिले होते कि 'तुम्ही सिद्द्याचा पाडाव करा म्हणजे तुम्हाला अष्टप्रधानमंडळात स्थान देऊ' दादाजीने आरमारासह जंजिऱ्यास वेढा सुरु केला. सतत १५ दिवस जंजिऱ्यावर तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे दण्डा राजपुरीच्या कोटाच्या भिंती ढासळल्या. सिद्दीस निवारा उरला नाही. तो आणि त्याचे लोक खडकांच्या मागे बचावासाठी लपून राहिले. त्याला तेथून निसटणे भाग पडले. यावेळी जंजिऱ्यावर पाच तोफा लावल्या गेल्या. सतत दारुगोळा पाठवला जात होता. किल्लेदाराबरोबर मुकाबला केला. तोफांची सरबत्ती सुरु झाली. दारूचे गोळे किल्ल्यात डागले जात होते. प्रत्येक गोळ्याचे वजन पावणेचार शेर होते. जंजिऱ्यावर तोफांचा मारा सुरूच होता. सिद्दी खैरात आणि सिद्दी कासीम एका लहान टेकडीच्या आश्रयास बसले होते. त्यांच्या होड्या मात्र जंजिऱ्याभोवती गस्त घालीत होत्या. ही गस्त भेदणे जमत नव्हते. त्यामुळे ती गस्त भेदून जोवर मराठी आरमार पुढे जात नव्हते तोवर जंजिऱ्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचणे शक्य नव्हते आणि सैन्य किल्ल्यात घुसवून सिद्दीस ठेचून जंजिरा ताब्यात घेणे अशक्य होते. नुसते किनाऱ्यावरून अथवा इतर जहाजातून तोफा डागून उपयोगाचे नव्हते. किल्ल्यात प्रवेश केल्यासच यशाची खात्री होती. आणि याचसाठी संभाजीराजांनी एक अतिशय कल्पक तेवढीच धाडसी योजना आखली. प्रभू रामचंद्रांनी लन्केत प्रवेश करण्यासाठी जे केले तोच मार्ग संभाजीराजांनी जंजीऱ्यात प्रवेश करण्यासाठी निवडला - सागरी सेतू बांधण्याचा मार्ग; किनारपट्टीवरून जंजिऱ्याची खाडी बुजवून तिच्यावर रस्ता करायचे ठरले. त्यासाठी ८०० चौरस वार ( सुमारे ७५० मीटर) रुंद, ३० वार (सुमारे २७ मीटर) लांब अशी खाडी बुजवण्याचे काम सुरु झाले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, लाकडाचे ओंडके, कापसाचे गट्ठे, माती तसेच ज्या वस्तू मिळतील त्या
खाडीत टाकण्यास सुरुवात झाली. थोडाफार रस्ताही तयार झाला. तेवढ्यात समुद्रास भरती आली आणि सारे काही वाहून गेले. याचसुमारास औरंगजेबाचा सरदार हसन अलीखान कल्याण भिवण्डीला येऊन मुलुखात जाळपोळ करीत होता. तो तसाच पुढे कोकणातून राजधानी रायगडास जायची शक्यता निर्माण झाल्याने संभाजीराजांना जंजिरा मोहीम दादाजी रघुनाथ प्रभू यांच्याकडे सोपवून माघारी निघावे लागले. दादाजी जंजिरा लढवत होते. जंजिऱ्यावर स्वारी करून धामधूम माजवली. आरमारास जंजिऱ्याभोवताली फिरते ठेवून सिद्दीस कोंडले. एक दोन वेळा शिड्या लावून फळल्याचा प्रयत्न केला. पण साध्य झाले नाही. खूप लोक कापले गेले. हरप्रकारे प्रयत्न करून यश येत नव्हते. मराठे नामोहरम झाले. माघार घेतली. आरमारही उठून गेले. यापरिस्थितीत सिद्द्याने स्वारी करून दादाजींचा कबिला महाडवरून धरून नेला. चौलवर स्वारी करून लोक पकडून नेले. मराठ्यांच्या आरमारातील सिद्दी मिस्त्री, दौलतखान, मायनाक भांडारी इ सरदार नागोठणे आपटे इथे आरमार घेऊन गेले. तेथे उरणच्या खाडीनजीक हबश्यांच्या आरमाराशी गाठ पडली. मोठी लढाई झाली. मराठ्यांची १५ गलबते आणि सिद्दी मिस्त्री पाडाव झाले. कित्येक गलबते मराठ्यांनीच बुडवली. संभाजीराजांनी जंजिरा जिंकण्याचे शर्थीने प्रयत्न केले. स्वतः नेतृत्व केले, आगाऊ पगार दिले, बक्षिशी लावली, सागरी सेतू बांधण्याचा अजब प्रयोग केला, सिद्दी-इंग्रजांविरोधात अरबांशी सख्य केले, इंग्रजांकडून गुप्तपणे दारुगोळा विकत घेतला. पण जंजिरा हाती आला नाही. तरी सिद्द्यास नमते घ्यावे लागले. शेवटी संभाजीराजांनी सिद्दी आणि इंग्रज यांच्याकडे प्रल्हादपंत निराजी याना पाठवून तहाचा प्रयत्न केला. यामुळे सिद्दी नरमला आणि मुंबईकर इंग्रजही सिद्दीस मदत न करता त्यास दूर ठेवावे असे सुरतकरांना सुचवीत होते. या मोहिमेत पोर्तुगीजही सिद्दीस मदत करतात ही गोष्ट संभाजीराजांना कळून चुकली होती. सिद्द्याचा हा उपद्रव मराठी राज्याला पहिल्यापासूनच हानिकारक होता आणि सिद्दी कितीही तह केले, आक्रमणे केली तरी हा उपद्रव सोडणाऱ्यातला नव्हता. सिद्दी किती त्रासदायक आहे याची कल्पना इंग्रजांना देखील आली आणि त्यांनी पूर्वीच सिद्दीस अटकाव केला असता तर सिद्दीचे इतके स्तोम माजले नसते.
जंजिऱ्याच्या मोहिमेचे फलित –
जंजिऱ्याच्या मोहिमेचे फलित –
जरी सिद्दी समूळ नष्ट झाला नसला तरी त्यास संभाजीराजांपुढे नमते घ्यावे लागले. या निमित्ताने संभाजीराजांनी आपल्या नाविक दलात वाढ केली. या लढ्यातून मराठ्यांस 'कान्होजी आंग्रे' नावाचा अमूल्य हिरा सापडला. याचदरम्यान मोगल रुपी वावटळ मराठी मुलुखात घोंगावू लागली होती. मुंग्या पसराव्यात तशी मोगल फौज चहुबाजूनी मराठी मुलुखात पसरली होती. आणि संभाजीराजे आणि हंबीररावांनी स्वपराक्रमाने आक्रमणाची ही पहिली धार पार बोथट करून टाकली होती.
- राहुल भावे
२ जुलै २०१७
सन्दर्भ -
१. रणझुंजार - डॉ सदाशिव शिवदे
२. शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले
३. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ सदाशिव शिवदे
४. शिवछञपतींचे आरमार - ग. भा. मेहेंदळे
५. दर्याराज कान्होजी आंग्रे - डॉ सदाशिव शिवदे
No comments:
Post a Comment