"सर्व काही गमवा .. परंतु गमावलेले परत मिळवण्याची ऊमेद गमावू नका" - स्वामी विवेकानंद.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, परकीय सत्तांशी तसेच स्वकीय विरोधकांशी झगडून, मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिवरायांनी उभारलेले 'हिंदवी स्वराज्य' आता लोप पावते की काय अशी भावना सन १६८९ मध्ये सुरुवातीस केवळ परकीय शत्रूंच्या मनातच नव्हे तर स्वकीयांच्या मनात देखील उत्पन्न झाली होती. त्याला कारणेही तशीच होती. सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर, सन १६८२ मध्ये मोगल बादशहा औरंगजेब याने मराठेशाही नष्ट करण्याच्या सूडभावनेने, सर्व लष्करी ताकदीनिशी स्वराज्यावर आक्रमण केले. पुढची ६ वर्षे, छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात मोठे रण-कुंड पेटले होते आणि मोगल-मराठे यांच्यात अखंड युद्धे, हल्ले-प्रतिहल्ले सुरु होते.
यामुळे एकूणच स्वराज्याची घडी विस्कटली होती, लढायांचे खर्च फुगले होते, फितुरीचे प्रमाण वाढले होते. तरीही राजाच्या नेतृत्वाखाली छोटे मोठे सरदार, शिलेदार, सैन्य, प्रजाजन स्वराज्य वाचवण्याचे प्रयत्न जीवात जीव असेपर्यंत करत होते. मात्र सन १६८९ साली औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीस, छत्रपती संभाजी राजास जिवंत पकडले आणि स्वराज्यात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तसेच दुसरा कोणीही आपल्या विरोधात जाऊ नये आणि गेल्यास त्याचे काय परिणाम होतील हे दाखवण्याच्या हेतूने, अतिशय क्रूरपणे त्यांचा वध केला. छत्रपती संभाजी राजांच्या पश्चात राजधानी रायगडसह स्वराज्यावर चहुबाजूनी मोगली आक्रमण झाले आणि प्रत्यक्ष राजधानी मोगलांच्या ताब्यात गेली व इतरत्रही मोगलांचे विजय होत गेले. छत्रपती संभाजीराजांचे राजकुटुंब अर्थात महाराणी येसूबाई आणि शाहू राजे कैद झाले. तिसरे छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज यांना महाराष्ट्र सोडून दक्षिणेत जिंजीमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि यामुळेच सन १६८९ साली सुरुवातीस मराठी राज्य संपते की काय अशी भावना सर्वांच्या मनात उत्पन्न झाली. जिंजीमध्ये गेलेल्या छत्रपती राजाराम महाराजांचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने जंग जंग पछाडले. त्याआधी रायगड ते जिंजी या खडतर प्रवासातदेखील छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती जिंजीस पोहोचण्यात यशस्वी ठरले. म्हणूनच सन १६९० साली मोगल सेनापती झुल्फीकारखानाच्या नेतृत्वाखाली जिंजी काबीज करण्याची मोहीम सुरु झाली आणि मराठे - मोगल संघर्ष महाराष्ट्रातील नाशिक-बागलाण पासून कर्नाटकमधील जिंजीच्या पायथ्यापर्यंत विस्तीर्ण प्रदेशात सुरु झाला. औरंगजेबानेही महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही आघाड्यांवरील मोहिमांवर जातीने लक्ष्य ठेवण्यासाठी आपला मुक्काम महाराष्ट्रातून हलवला. तो कर्नाटकात विजापूर प्रदेशातील गलगले या ठिकाणी राहू लागला आणि मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतीस पकडून, राजघराणे नष्ट करून, स्वराज्य संपवण्याच्या तयारीस लागला.
यामुळे एकूणच स्वराज्याची घडी विस्कटली होती, लढायांचे खर्च फुगले होते, फितुरीचे प्रमाण वाढले होते. तरीही राजाच्या नेतृत्वाखाली छोटे मोठे सरदार, शिलेदार, सैन्य, प्रजाजन स्वराज्य वाचवण्याचे प्रयत्न जीवात जीव असेपर्यंत करत होते. मात्र सन १६८९ साली औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीस, छत्रपती संभाजी राजास जिवंत पकडले आणि स्वराज्यात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तसेच दुसरा कोणीही आपल्या विरोधात जाऊ नये आणि गेल्यास त्याचे काय परिणाम होतील हे दाखवण्याच्या हेतूने, अतिशय क्रूरपणे त्यांचा वध केला. छत्रपती संभाजी राजांच्या पश्चात राजधानी रायगडसह स्वराज्यावर चहुबाजूनी मोगली आक्रमण झाले आणि प्रत्यक्ष राजधानी मोगलांच्या ताब्यात गेली व इतरत्रही मोगलांचे विजय होत गेले. छत्रपती संभाजीराजांचे राजकुटुंब अर्थात महाराणी येसूबाई आणि शाहू राजे कैद झाले. तिसरे छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज यांना महाराष्ट्र सोडून दक्षिणेत जिंजीमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि यामुळेच सन १६८९ साली सुरुवातीस मराठी राज्य संपते की काय अशी भावना सर्वांच्या मनात उत्पन्न झाली. जिंजीमध्ये गेलेल्या छत्रपती राजाराम महाराजांचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने जंग जंग पछाडले. त्याआधी रायगड ते जिंजी या खडतर प्रवासातदेखील छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती जिंजीस पोहोचण्यात यशस्वी ठरले. म्हणूनच सन १६९० साली मोगल सेनापती झुल्फीकारखानाच्या नेतृत्वाखाली जिंजी काबीज करण्याची मोहीम सुरु झाली आणि मराठे - मोगल संघर्ष महाराष्ट्रातील नाशिक-बागलाण पासून कर्नाटकमधील जिंजीच्या पायथ्यापर्यंत विस्तीर्ण प्रदेशात सुरु झाला. औरंगजेबानेही महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही आघाड्यांवरील मोहिमांवर जातीने लक्ष्य ठेवण्यासाठी आपला मुक्काम महाराष्ट्रातून हलवला. तो कर्नाटकात विजापूर प्रदेशातील गलगले या ठिकाणी राहू लागला आणि मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतीस पकडून, राजघराणे नष्ट करून, स्वराज्य संपवण्याच्या तयारीस लागला.
आता इकडे राजाराम महाराजांनी नव्याने अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. नवे छत्रपती राजाराम महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, प्रल्हादपंत, खंडो बल्लाळ, स्वराज्यातील इतर सरदार यासह 'ममलकतमदार' अर्थात स्वराज्याचा आधारस्तंभ संताजी घोरपडे आणि 'जयसिंगराव' धनाजी जाधव, बलाढ्य मोगलांशी संघर्ष करून राज्य वाचवण्याची ऊमेद बाळगून होते. या उमेदीतूनच चमत्कार घडावा तशी परिस्थिती पालटू लागली. मोडलेले राज्य सावरू लागले. रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव या चार 'प्रमुख राष्ट्रचालकांनी' छत्रपती राजाराम महाराज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रास नवसंजीवनी देण्यास सुरुवात केली. लष्कर संघटित केले. कारभार रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण सचिव यांनी चोख सांभाळला तर संताजी-धनाजी दहा दहा हजारांच्या फौज घेऊन गनिमीकाव्याने मोगल सरदारांवर हल्ले करू लागले. त्यांना पराभूत करू लागले. त्यांच्याकडून खंडणी वसूल करू लागले. मोगलांच्या ताब्यात गेलेले स्वराज्यातील गडकोट पुन्हा हस्तगत करण्यास मराठ्यांनी सुरुवात केली. यामध्ये दोन सेनानायकांची अतुलनीय कामगिरी विशेष कारणीभूत होती. ते म्हणजे 'संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव’
संताजी घोरपडे - वंशावळ - उदयपूरच्या शिसोदे राजघराण्याच्या एकाच वंशवृक्षाच्या दोन शाखा म्हणजे भोसले घराणे आणि घोरपडे घराणे. शिसोदे राजघराण्यातील कर्णसिंहापासूनच्या पुढील पिढयांना घोरपडे हे उपनाव प्राप्त झाले तर शुभकृष्णापासूनच्या पुढील पिढयांना भोसले हे उपनाव प्राप्त झाले. सन १४६९ साली बहामनी वजिरासह कर्णसिंह सहभागी झाला होता. त्यांना कोकणातील राजा शंकरदेव मोरे याच्या ताब्यातील खेळणा उर्फ विशाळगड जिंकायचा होता. किल्ला दुर्गम असल्याने जिंकता येत नव्हता. तेव्हा कर्णसिंहाने घोरपडीच्या सहाय्याने कडा चढून किल्ला हस्तगत केला. या पराक्रमावर खुश होऊन बहामनी सुलतानाने मुधोळ जहागिरीसह राजा घोरपडे बहाद्दर हा 'किताब बहाल केला व घोरपडे घराणे उदयास आले. घोरपडे घराण्यास मुधोळची जहागिरी व इतर वतने, फौजफाटा प्राप्त झाला होता. या दोन्ही घराण्यातील फरक म्हणजे घोरपडे घराण्याने यवनी शाह्यांची चाकरी केली तर भोसले घराण्याने आपली स्वतंत्र बाण्याची वृत्ती विकसित केली. कर्नाटकात भोसल्याना घोरपड्यानी विरोध केला आणि यवनी चाकरीत धन्यता मानली तर महाराष्ट्रात घोरपडे घराण्यातून फुटून वास्तव्यास असलेल्या वल्लभजी घोरपडे यांनी भोसले घराण्याची साथ दिली व इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवला. यातील म्हाळोजी घोरपड्यानी शहाजी राजांबरोबर सुरुवात करून त्यानंतर शिवरायांना स्वराज्य उभारणीत मोलाची साथ दिली. पन्हाळ्याच्या मुक्कामी युवराज संभाजीवर लक्ष ठेवण्याची नाजूक कामगिरी देखील त्यांना पार पाडावी लागली. शेवटी संगमेश्वरमुक्कामी संभाजी राजांवरील शेख निजामाच्या छाप्यात यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांची पुढची पिढी म्हणजे राजारामकालीन सर्वश्रेष्ठ सेनानी संताजी घोरपडे.
घोरपडे घराण्याची वंशावळ –
राणा कर्णसिंह (पहिला) राजा घोरपडे बहाद्दर
राजा भीमसिंह घोरपडे बहाद्दर
राजा खेलोजी घोरपडे बहाद्दर
राजा मालोजी (पहिला) घोरपडे बहाद्दर
राजा अखैजी घोरपडे बहाद्दर
राजा कर्णसिंह (दुसरा) घोरपडे बहाद्दर
राजा चोलराज घोरपडे बहाद्दर
(मुधोळकर घोरपडे) (महाराष्ट्रातील घोरपडे)
बहिर्जी
म्हाळोजी
संताजी बहिर्जी मालोजी
(सेनापती)
शिवकाळात संताजी घोरपडे हंबीरराव मोहितेंच्या हाताखाली लष्करी मोहिमेत सहभागी होत. हंबीररावांनी संताजीच्या अंगी असलेले लष्करी कर्तृत्व अचूक ओळखले होते. त्यांच्याच शिफारशीने शिवरायांनी संताजीस घोडदळाची जुमलेदारी दिली. शिवरायांच्या पागांचे शिलेदार असणाऱ्या नामवंत पराक्रमी सेनानींमध्ये आनंदराव, उदाजी पवार, संताजी जगताप, गणोजी शिर्के, नेतोजी पालकर, मानाजी मोरे, येसाजी काटकर यांच्या बरोबरीने धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांचाही उल्लेख आढळतो. सन १६७७ साली शिवाजी महाराजांनी कर्नाटक प्रांत जिंकण्याची मोहीम सुरु केली. या मोहिमेत तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कोप्पळ प्रांत जिंकण्यासाठी हंबीररावांना ससैन्य रवाना केले. हंबीररावांनी सुभेदार हुसेनखानास पराभूत करून मोठा विजय मिळवला. हंबीररावांसोबत संताजी घोरपडे यांनी देखील चांगलीच तलवार चालवली.
यानंतर जालन्याच्या मोहिमेत, जी शिवरायांची अखेरची मोहीम ठरली, मराठ्यांनी जालना शहर लुटले व संपत्ती लुटली. ही लूट घेऊन परतत असताना मोगलानी मराठ्यांच्या पिछाडीवर हल्ला केला. महाराजांनी चपळाईने माघार घेतली व ते पट्टा किल्ल्यावर पोहोचले. यात बरीच लूट शत्रूच्या हाती पडली व चार हजार घोडेस्वार धारातीर्थी पडले. या मोहिमेत संताजी घोरपड्यानी लढाई करताना उतावळी केली म्हणून त्यास व मानाजी मोऱ्यास मुजऱ्यास न येण्याची शिक्षा दिली. त्यांनी काय उतावळी केली याची नोंद मिळत नाही परंतु शिवरायांच्या तालमीत "गनिमी काव्याने लढताना अचूक हालचाली, सुरक्षित व शिस्तबद्ध माघार याचे महत्व जाणणे आणि एखादी लहानशी चूक संपूर्ण लष्कराला कशी महागात पडू शकते याची जाणीव ठेवणे" याचे धडे मात्र त्यांना मिळाले आणि पुढील आणीबाणीच्या काळात 'गनीमीकाव्याची युद्धपद्धती परिणामकारकरीत्या अवलंबणारा महान सेनानी' ही स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली.
छत्रपती संभाजी राजांच्या काळात सन १६८२ सालात संताजींवर कर्नाटकातील पठाण, बेरड यांच्याविरोधातील मोहिमेची कामगिरी सोपवली होती. त्यासाठी संताजीने बारा हजार सैन्यानिशी तीन महिने संघर्ष केला आणि शत्रूचा पराभव केला आणि तुंगभद्रेपर्यंत मुलुख काबीज केला. पुढे औरंगजेबाचे परचक्र आले आणि त्यास तोंड देता देता संताजीस आणखी एका भयंकर धक्कादायक प्रसंगास तोंड द्यावे लागले. संभाजी राजांच्या संगमेश्वर मुक्कामी मोगल सरदार शेख निजाम याने अचानक छापा टाकला आणि मराठ्यांच्या छत्रपतीस कैद केले. या छाप्यात म्हाळोजी घोरपडे ठार झाले. संभाजी महाराज व कवी कलश कैद केले गेले आणि संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ इ. कसेबसे रायगडी पोहोचले.
धनाजी जाधव - वंशावळ - सिंदखेडकर जाधवांपासून धनाजी जाधव यांचा वंश उगम पावला. लखुजी जाधवराव यांचा पणतू शंभूसिंह जाधव शिवरायांबरोबर होता. त्याचा मुलगा धनाजी जाधव हा १६५० मध्ये जन्मला आणि पुढे प्रतापराव गुजरांच्या हाताखाली लष्करी मोहिमेत सहभागी होऊ लागला. उंबराणी व नेसरीच्या लढायात धनाजी जाधवांचा पराक्रम शिवरायांच्या ध्यानी आला. छत्रपती संभाजीकाळात ते सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या लष्करात युद्धभूमीवर आपली तलवार चालवीत होते. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात यांचा विशेष पराक्रम दिसून आला. त्यांनी सेनापती संताजी घोरपडे यांच्या खांद्याला खांदा लावून मोगल सेनेविरुद्ध चढाया करून त्यांना जर्जर करून सोडले. शिवरायांच्या पागांचे शिलेदार असणाऱ्या नामवंत पराक्रमी सेनानींमध्ये आनंदराव, उदाजी पवार, संताजी जगताप, गणोजी शिर्के, नेतोजी पालकर, मानाजी मोरे, येसाजी काटकर यांच्या बरोबरीने धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांचाही उल्लेख आढळतो.
जाधव घराण्याची वंशावळ -
लखुजी जाधवराव
अचलोजी जाधवराव
संताजी जाधवराव
शंभूसिंह जाधवराव
धनाजी जाधवराव
(सेनापती)
संभाजी राजांचे भवितव्य औरंगजेबाच्या कैदेत पडल्यामुळे निश्चित झाले होते. ह्या बिकट प्रसंगी येसूबाईंनी ठाम निर्णय घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने राजारामांचे मंचकारोहण केले व त्यास छत्रपती घोषित केले (जुलिअन दि. ९ फेब्रुवारी १६८९) आणि यानंतर एका महिन्यांनी (जुलिअन दि. ११ मार्च १६८९) संभाजी राजांना हौतात्म्य प्राप्त झाले. संभाजी राजांचे हौतात्म्य उभ्या महाराष्ट्राला भयंकर चटका लावून गेले आणि यानंतर अक्षरश: महाराष्ट्रातल्या गवताच्या पात्यांचेही भाले तयार झाले. सर्व प्रमुख मंडळींनी येसूबाईंच्या अखत्यारीत निर्णय घेतला आणि छत्रपती राजारामांना घेऊन जिंजीकडे प्रयाण केले. येथूनच संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांचे कर्तृत्व उजळले. याआधी दुय्य्म स्थानावरील हे लष्करी अधिकारी या नव्या जबाबदारीमुळे प्रल्हादपंत, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यासारख्या प्रथम श्रेणीच्या अधिकाऱ्यांमध्ये गणले जाऊ लागले.
येसूबाई व स्वराज्यातील प्रमुख मंडळींनी ठरविलेल्या धोरणानुसार महाराणी येसूबाई व युवराज शाहू रायगडावर राहून मोगलांचा सामना करणार होते आणि छत्रपती राजाराम महाराज आणि इतर सरदार मंडळी प्रतापगड-विशाळगड-पन्हाळगडावरून अथवा वेळ पडल्यास दूरच्या जिंजी किल्ल्यातून स्वराज्याचा कारभार पाहणार होते. छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले हे समजताच मोगलही त्याना पकडण्यासाठी मागोमाग आले. छत्रपती राजाराम महाराजांच्या मागोमाग जात मोगलांनीही प्रतापगड-पन्हाळगडास तसेच स्वराज्यातील इतर गडासही वेढा दिला. राजाराम महाराज ज्या गडावर जात तेथे मोगली फौज त्यांना पकडण्यासाठी धावे. म्हणूनच शेवटी पन्हाळगडावरून निसटून छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात गेले. या कालावधीत संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी ठिकठिकाणी हिंडत राहून मोगलांवर गनिमीकाव्याने हल्ले करून त्यांना स्वराज्याचा प्रदेश काबीज करण्यापासून परावृत्त करण्याचे धोरण अंगिकारले. पहिली तीन वर्षे रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव या कारभारी-सेनानायकानी एकचित्ताने मोगलांना तोंड दिले.
यातील ऑगस्ट ते नोव्हेंबर १६८९ सुमारास घडलेल्या प्रमुख घटना अश्या आहेत. राजाराम महाराजांच्या पन्हाळा मुक्कामात औरंगजेबाचा सरदार शेख निजाम - ज्याने संभाजी राजांना पकडले - आता राजाराम महाराजांना पकडण्यासाठी पन्हाळ्यावर चालून आला. म्हणून रामचंद्रपंतानी संताजी आणि धनाजी याना मोगलांवर छापे घालण्यास पाठवले. संताजी व शेख निजाम यांच्यात एक प्रहर आणि चार घटिका घनघोर युद्ध होऊन दोघांनीही मोठा पराक्रम केला. संताजीने त्यास जबर जखमी केले व त्यास साफ लुटले आणि हा हल्ला परतवून लावला.
नंतर खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला. संभाजी राजांचा वध केल्यापासून औरंगजेबाची छावणी कोरेगाव तुळापूर येथे होती. या छावणीवरच थेट हल्ला करून मोगलांच्या केंद्रस्थानावरच घाव घालावा असे संताजी-धनाजी यांनी ठरवले. कदाचित यामागे शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानावर केलेल्या स्वारीची प्रेरणा होती. त्यासाठी त्यांनी लष्कर गोळा केले व ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे आले. तेथे त्यांनी ठरविले की बादशहाच्या छावणीवर संताजीने हल्ला करावा आणि त्याचवेळी फलटण-बारामती भागात धनाजीने छापा मारून रणमस्तखान आणि शहाबुद्दीनखान यांचा समाचार घ्यावा. संताजीने धनाजीच्या फौजेतून विठोजी चव्हाण या सरदारासह दोन हजार स्वार घेतले. त्यांच्याबरोबर बहिर्जी आणि मालोजी घोरपडे देखील होते. सर्व मंडळी जेजुरीचे दर्शन घेऊन दिवे घाटाखाली मुक्काम करून राहिले. तेथून मध्यरात्री तुळापूरास जायला निघताच वाटेत त्यांना रात्र पहाऱ्याच्या (छबिन्याच्या) लोकांनी हटकले. तेव्हा आम्ही बादशहाच्या शिर्के, मोहिते वगैरे हिंदू सरदारांकडे छबिन्यास गेलो होतो आता बदलीस आले म्हणून लष्करास माघारी जातो अशी बतावणी करून पुढे निघाले. त्यांनी छावणीत लाखोंची फौज असूनही मोठ्या हिमतीने छापा घालून बरीच हानी करून बादशहाच्या डेऱ्याचे तनावे तोडून, सोन्याचे दोन्ही कळसही तोडले. ते घेऊन सिंहगडाच्या जंगलात आश्रय घेतला. तेथे दोन दिवस मुक्काम करून सैन्यासहित संताजी रायगडाच्या दिशेने धावला आणि तेथे गडास वेढा देऊन बसलेल्या झुल्फीकारखानाच्या लष्करावर हल्ला केला आणि मोगलांचे मोठे नुकसान करून त्यांचे पाच हत्ती पकडून त्वरेने पन्हाळ्यास आला आणि राजाराम महाराजांच्या समोर पाच हत्ती आणि बादशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस सादर केले. यावर खुश होऊन महाराजांनी संताजीस 'ममलकतमदार' (राज्याचा आधार) हा किताब दिला. दुसरीकडे धनाजी जाधवांनी फलटण परिसरात रणमस्तखान आणि शहाबुद्दीनखान यांचा पराभव केला आणि या दोन घटनांनी मराठ्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले.
यानंतर राजाराम महाराजांच्या पन्हाळा ते जिंजी या प्रवासादरम्यान महाराजांनी बिदनूरच्या राणीकडे आश्रय घेतला. हे बादशहास कळताच त्याने जाननिसारखान, मतलबखान आणि सर्जाखान याना कर्नाटकात पाठवले. संताजीस समजताच त्वरेने निघाला आणि मोगल बिदनूरला पोहोचायच्या आधीच त्यांच्यावर हल्ला करून त्यांची धूळधाण उडवली. संताजी धावून गेल्याने बिदनूरच्या राणीचे राज्य वाचले. परंतु यावेळी कर्नाटकात तुंगभद्रेच्या तीरावर राजाराम महाराजांना देखील मोगलानी पकडले अशी बातमी पसरली आणि रायगडपर्यंत पोहोचली. परिणामी रायगडावरील येसूबाईंनी गड अधिक भांडवत न ठेवता मोगलांना स्वाधीन करण्याच्या दृष्टीने झुल्फीकारखानाशी वाटाघाटी सुरु केल्या. आणि राजकुटुंबास प्रतिष्ठेने वागविले जाईल असे वचन घेऊनच महाराणी येसूबाई, युवराज शाहू आपल्या सर्व सहकाऱ्यानिशी रायगड सोडून मोगलांच्या स्वाधीन झाले (जुलिअन दि. ३ नोव्हेंबर १६८९). याच्या एक दिवस आधीच (जुलिअन दि. २ नोव्हेंबर १६८९) छत्रपती राजाराम महाराज जिंजीस पोहोचले होते. यानंतर स्वराज्यातील इतर किल्ले आणि ठाणी मोगलांसमोर भराभर मोगलांच्या ताब्यात जायला सुरुवात झाली.
औरंगजेब आणि मोगल सरदारांनाही आता मराठ्यांची सत्ता संपली, दक्खनची मोहीम संपली असे वाटले. साहजिकच होते. मराठ्यांचा एक राजा पकडून ठार मारला. त्याची राणी व पुत्र अर्थात स्वराज्याचा वारसदार कैदेत सापडला. त्यानंतरचा राजा राजधानीवरून निसटून दूरदेशी गेला. थोड्या कालावधीत तोही पकडला जाईल व उरलेसुरले देखील नष्ट होईल. राजधानीसह सर्व प्रमुख किल्ले, मुलुख, ठाणी ताब्यात आली. मराठ्यांबरोबरच दक्षिणेतील दोन प्रमुख शाह्या आदिलशाही व कुतुबशाही यांचाही पराभव केला. यामुळेच बादशहाने तर दिल्लीतील आपला प्रासाद आपल्या स्वागतासाठी सज्ज करण्याचे हुकूम पाठवले.
म्हणूनच सन १६८९ मध्ये मराठी स्वराज्य लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या भूमीवर मराठ्यांच्या स्वतंत्र राज्याला मोगलानी पुसण्याचा प्रयत्न चालवला होता पण सुदैवाने मराठी मनातून स्वातंत्र्याची भावना पुसली गेली नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये सर्वच मराठी लोक जसे जमेल तसे, जमेल त्या मार्गाने मोगलांना झुंज देत होता. जेव्हा जसा प्रसंग येईल तेव्हा शक्य त्या उपायांनी आपला निभाव मराठ्यांना लावावा लागे. सगळेच धनी व सगळेच नोकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण अल्पावधीतच चित्र पालटले आणि मराठे पुन्हा जोमाने मोगलांविरुद्ध उभे ठाकले. राजाराम महाराजांच्या मंचकारोहणानंतर सुरवातीस महाराज जिंजीच्या वाटेवर असताना संताजी-धनाजी-रामचंद्रपंत-शंकराजी नारायण यांनी मिळवलेले हे विजय ही पुढील पराक्रमाची नांदीच ठरली.
सन १६९० - मराठ्यांनी परत एकदा मोगलांच्या ताब्यात गेलेले आपले किल्ले व मुलुख जिंकून घेण्याचा सपाटा लावला. मोगलांच्या सेनानींना गनिमी काव्याच्या तडाख्याने पराभूत केले, त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. संताजी घोरपडे यांच्या विशेष पराक्रमाने औरंगजेबाचे दिल्लीस परत जाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
१६९० च्या सुरवातीस बादशहाने सातारचा किल्ला जिंकून घ्यायला सर्जेखान - ज्याने हंबीररावांना ठार मारले - या सरदारास पाठवले. हे समजताच रामचंद्रपंत-शंकराजी नारायण-संताजी-धनाजी अश्या चौघांनी मिळून त्यावर स्वारी करायचे योजिले व त्याप्रमाणे फौजेसह ते सातारा भागात आले. मोहिमेचे नेतृत्व संताजी घोरपड्यांकडे होते. मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर लढाईचे वर्णन करतो "लढाई चालू झाली. मराठ्यांनी बंदुकीचा मारा चालू केला. मोगल सैन्याच्या आघाडीवर हत्ती होते. बंदुकीचा मारा सुरु होताच ते हत्ती आपल्याच फौजेत सैनिकांना तुडवीत पळू लागले. हे पाहून रुस्तुमखान आपल्या सैनिकांसह पुढे आला. इतक्यात मराठ्यांच्या गजदलाने हल्ला केला. ते पाहून मोगल स्वरांचे घोडे उधळले. ते तिथे टिकेनात. तरीही रुस्तुमखानाने शौर्याने लढाई केली. यामुळे मराठ्यांची आघाडीची पथके मागे हटली. मग रुस्तुमखानाने मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला ज्यात संताजी होते. मोगलांच्या हल्ल्याने मराठी सैन्य पळू लागले. मोगलानी पाठलाग करून मराठ्यांवर हल्ला केला. तेव्हा मराठ्यांच्या दुसरी तुकडीने मोगलांवर हल्ला केला व मोगलांचे झेंडे हस्तगत केले. चिडून रुस्तुमखानाने आपला हत्ती पुढे नेला. हत्तीवर बसलेल्या खानाच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला व तो जखमी अवस्थेत मराठ्यांच्या हाती सापडला. मराठ्यांच्या आघाडीची पथके मोगलांवर तुटून पडली. अनेक मोगल जखमी झाले, कामी आले. हे चालू असता मराठी सरदार हंबीरराव सातारच्या किल्ल्यातून पाच हजार स्वार व पायदळ घेऊन बाहेर आला व त्याने मोगलांवर जोराचा हल्ला केला आणि त्यांनी रुस्तुमखानाच्या छावणीवर हल्ला करून खानाची आई, बायकामुले यांनाही पकडले. शेवटी एक लाख रुपय खंडणी कबूल करून खानाने आपली सुटका करून घेतली."
या मोहिमेचे संपूर्ण नियोजन संताजीने केले आहे. सैन्याची दोन भागात विभागणी करून शत्रूला गोंधळवून टाकायचे. एका तुकडीने घाबरल्याचे दाखवून पळ काढायचा आणि शत्रूला आपल्या पाठलागावर घ्यायचे. शत्रू कैचीत सापडला की सर्व बाजूनी त्यास घेरायचे हे गनिमी तंत्र संताजीने अवलंबले. या लढाईत अखेरचा घाव घालण्यास हंबीररावाचे येणे हासुद्धा योजनेचाच भाग होता. सर्जेखानाचा पराभव करून मराठी फौज वाई भागात आल्या व वाईचा कोट घेऊन पुढे प्रतापगडावर चढाई करून तोही ताब्यात घेतला. यानंतर अल्पावधीत रोहिडा, राजगड, तोरणा असे मुख्य किल्ले जिंकून घेतले. मे १६९० पर्यंत पन्हाळ्यापासून राजगडपर्यंत स्वराज्याचा गाभा मराठ्यांनी परत आपल्या ताब्यात घेतला. रुस्तुमखानाचा पराभव झालेला ऐकताच बादशहाने फिरोजजंगास रवाना केले. रुपाजी भोसल्याने त्यांचा प्रतिकार केला आणि फिरोजजंगच्या मदतीस असलेल्या सिद्दी अब्दुल कादिर यास जखमी करून लुटले. हे ऐकताच लुत्फुल्लाखानास बादशहाने मोठी फौज देऊन रवाना केले. तो खटाव येथे आला. लगेच संताजीने त्यावर एकदम छापा घातला. अल्पावकाशात संताजी, धनाजी यांनी वीस हजार सैन्यानिशी म्हसवडजवळ लुत्फुल्लाखानावर स्वारी केली व त्याचा पराभव करून त्यास पळवून लावले.
आता सन १६९० च्या मध्यापासून संताजी-धनाजी यांच्या फौजा महाराष्ट्रात सह्याद्रीच्या आश्रयाने महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात धुमाकूळ घालत होत्या तसेच कर्नाटक प्रांतातही मोहीम काढून शत्रूचा बिमोड करत होत्या. तिकडे राजाराम महाराजही जिंजीमध्ये स्थिरस्थावर झाले होते. राजाराम महाराजांचा जिंजीवरून सुरु झालेला अंमल, स्वराज्यात परत येणारे किल्ले, एकूणच मराठ्यांचा वाढलेला जोर पाहून मराठ्यांत नवचैतन्य निर्माण झाले. बदललेली परिस्थिती पाहून बादशहाकडे चाकरीस गेलेले अनेक जण स्वराज्यात परतू लागले. छत्रपती राजारामांकडे दक्षिणेतील हिंदू राजे येऊ लागले आणि एकूणच मराठ्यांचे बळ पुन्हा वाढू लागले. याचसुमारास महाराजांनी कर्नाटकमध्ये हिंदू नायकांची एक आघाडी तयार केली होती व त्यांची चाळीस हजार घोडदळ आणि एक लक्ष पंचवीस हजार पायदळ असलेली संयुक्त फौजही उभारली. २२ मार्च १६९० (जुलिअन दि.) रोजी लिहिलेल्या एका मराठी पत्रात नोंद आहे "छत्रपतींनी कर्नाटकात चाळीस हजार गोद्दल आणि एक लक्ष पंचवीस हजार पायदळ उभारले असून केसो त्रिमल (जिंजीचा सुभेदार) यास १५००० घोडदळ व २५००० पायदळ आणि एक लाख होणं खजिना देऊन महाराष्ट्रात पाठवले आहे." यावरून राजाराम महाराजांनी जिंजीमध्ये आपले स्थान किती बळकट केले होते याची कल्पना येते.
दरम्यान राजाराम महाराजांचा पाडाव करण्यासाठी ऑगस्ट १६९० मध्ये झुल्फिकारखान मोठी फौज घेऊन जिंजीस आला व त्याने किल्ल्यास वेढ्याचे काम सुरु केले. महाराजांनी सुद्धा मुत्सद्देगिरीने खानाच्या छावणीतच भेदनीतीचा वापर करण्यास सुरुवात केली आणि राजपूत व मराठी सैन्याचा भरणा असलेल्या मोगल फौजेतून नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने इ मराठा सरदार आपल्या पथकांसह जिंजित महाराजांकडे दाखल झाले (२३ नोव्हेंबर १६९० जुलिअन दि.) तरीही मोगलांचा वेढा सुरूच राहिला. तिकडे महाराष्ट्रात एक प्रकारचा आत्मविश्वास जागृत झाला होता. आता मराठी राज्य बुडत नाही याची प्रत्येकाला खात्री पटत चालली होती. याबाबत मावळच्या सुभेदार महादजी श्यामराज याने लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे (२४ सप्टेंबर १६९० जुलिअन दि.) त्यात तो लिहितो "मोगलांची धामधूम आज आपल्या राज्यात ३० वर्षे होत आहे. यामुळे मुलुख वैराण झाला. मुलुखात मोगलाईचा अमल चालला. श्रीकृपेने आता राज्याचा मामला थाटात चालला आहे."
या पत्रावरून समजते की वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर १६८९ मध्ये रायगड पडला आणि राजाराम महाराज जिंजीस निसटले तेव्हा महाराष्ट्रात नाजूक स्थिती निर्माण झाली होती आणि अवघ्या वर्षभरात मराठे आत्मविश्वासाने लिहीत होते "राज्याचा मामला थाटात चालला आहे." याचे श्रेय मोगलांवर नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या संताजी-धनाजी याना जाते तसेच छत्रपतींच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार करणाऱ्या रामचंद्रपंत-शंकराजी नारायण याना जाते.
राजाराममहाराजांनी सन १६९१ च्या सुरुवातीस, शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या, तापट व करड्या शिस्तीच्या, पराक्रमी आणि खुद्द बादशहाच्या छावणीचे कळस कापून मोगलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या आणि मराठी फौजेचा नावलौकिक वाढवणाऱ्या संताजी घोरपडे याना "सेनापतिपद" दिले.
-
राहुल
भावे
२८/११/२०१७
संदर्भ -
मराठी रियासत खंड २ - गो. स. सरदेसाई
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
सेनापती धनाजी जाधव - डॉ. सदाशिव शिवदे
Very informative and exhaustive account of battles faught by Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav.
ReplyDeleteव्वा...जबरदस्त लेखमाला!!
ReplyDeleteसंताजी व धनाजी याच्यांबद्दल संदर्भपुर्ण लेख!!