“हे राजन, तुव तप तेज निहारके तखत त्यजो अवरंग’’ म्हणजे हे शंभूराजा तुला पाहताक्षणी तुझ्या तेजाने दिपलेल्या औरंगजेबाने आपले तक्त त्यागून तुला ताजीम देण्यासाठी आपली मान खाली झुकवली आहे’. कविकलशाचे हे उत्स्फूर्त परंतु तितकेच गंभीर शब्द कडाडले आणि मोगली छावणीवर सन्नाटा पसरला संभाजी राजांना पकडल्याच्या आनंदात जल्लोष साजरा करणारी मोगली सेना बादशाहाचा उपमर्द करणाऱ्या या काव्यपंक्ती ऐकून सुन्नच झाली होती. स्तब्ध झाली होती. कवि कलशांची शेरेबाजी ऐकून औरंगजेबाचाही सहाजीकच संताप अनावर झाला होता. त्याने कलशाला ताबडतोब कैदखान्यात नेवून त्याची जीव्हा छाटण्याची शिक्षा सुनावली. अर्थातच शिक्षेची लगेच तामिलीही झाली. भिमा नदीच्या काठावर बहाद्दूरगडाच्या छावणीत ही घटना घडली तो दिवस होता, दि.15 फेब्रुवारी 1689. दि. 4 फेब्रुवारी 1689 या दिवशी एका बेसावध क्षणी शेख निजाम उर्फ मुकर्रबखानाने संभाजीराजांना संगमेश्वर मुक्कामी देसायांच्या वाडयात कसे पकडले ते मागच्या लेखात आपण विस्ताराने वाचले असेलच.
संभाजीराजांना आणि कविकलशांना अटक केल्यावर खानाने त्यांना हत्तीवर घातले आणि मोठया त्वरेने औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे तो भिमा नदीच्या काठावर असलेल्या पेडगावच्या बहाद्दूरगडाकडे निघाला. संगमेश्वर ते बहाद्दुरगड हे सुमारे 250 मैलांचे अंतर वेगाने कापून, दि. 15 फेब्रुवारी 1689 या दिवशी तो बहाद्दुरगडाच्या छावणीत पोहोचला. अकलूजवरून बादशाहाही त्याच दिवशी छावणीत डेरेदाखील झाला. औरंगजेब अत्यंत आनंदीत झाला होता. त्याला आपल्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. महाराष्ट्राच्या राजाचे स्वागत आपल्या छावणीत अगदी वेगळया पध्दतीने करायचे त्याने आधीच योजले होते. गेली नऊ वर्षे संभाजीराजे औरंगजेबाशी झुंज घेत होते. हर प्रकारे यत्न करूनही सिंहाचा हा छावा औरंगजेबाला वश होत नव्हता. म्हणूनच त्याचा पुरेपुर बदला औरंगजेबाला आता घ्यायचा होता. छावणीतून संभाजीराजांची वाजतगाजत धिंड काढून त्यांचा पाणउतारा करायचे त्याने ठरवले होते. त्यानुसार छावणीपासून अर्धा कोस अंतरावर संभाजीराजे आणि कविकलश यांच्या अंगावर विदूषकी झगे चढवण्यात आले. इराणमध्ये गुन्हेगारांना घालतात तशा लांबुडक्या आणि निमुळत्या लाकडी टोप्या त्यांच्या डोक्यावर चढवण्यात आल्या. त्यांना म्हणायचे ‘तक्ते कुलह’. माना व दोन्ही हात लाकडी खोडयात अडकवण्यात आले. हातापायात साखळदंड बांधलेले अशा अवस्थेत मग त्यांना उंटावर बसवण्यात आले. ढोल, ताशे, कर्णे जोरजोरात वाजवले जात होते. छावणीभर धिंड फिरवली जात होती. ढाण्या वाघ आता जेरबंद असल्याने त्याला डिवचायला सारी छावणीच उतावीळ झाली होती. संभाजीराजांना मग कोणी दगड मारीत होते. तर कुणी त्यांच्यावर थुंकत होते. कोणी शिव्या देत होते. तर कोणी त्यांना भाल्याने टोचत होते. बेहोष झालेल्या छावणीला आनंदाचे उधाण आले होते. संभाजीराजांची आणि कविकलशांची अशी पुरेपुर विटंबना करून झाल्यावर ही मिरवणूक अखेर औरंगजेबाच्या तंबूपाशी येवून थांबली.
उंटावरून खाली उतरवून आलमगीरासमोर दोघांनाही पेश करण्यात आले. जखडलेल्या अवस्थतेतील संभाजीराजांना पाहून औरंगजेबाला कृतकृत्य झाल्यासारखे त्यावेळी वाटले असेल. तो सिंहासनावरून खाली उतरला आणि गालिचाच्या एका टोकापाशी बसून अल्लाचे आभार मानू लागला. हाच तो क्षण होता जो जखडलेल्या अवस्थेतील कविकलशांनी नेमका हेरला होता. औरंगजेबाची ही कृती पाहून त्या प्रतिभासंपन्न कविच्या तेजस्वी वाणीतून तद्क्षणिच ते ओजस्वी उदगार बाहेर पडले होते,“तुव तप तेज निहारके तखत त्यजो अवरंग”. कविकलशांच्या या प्रमादाबद्दल अर्थातच त्यांची जीभ छाटण्यात आली. त्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेवरून बक्षी रूहुल्लाखानाने संभाजीराजांना त्यांची संपत्ती, जडजवाहीर आणि खजिना आदी त्यांनी कोठे ठेवले आहेत याची विचरणा केली. परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी औरंगजेबाकडे जळजळीत कटाक्ष टाकून रूहुल्लाखानाला अशी काही तिरस्कारपूर्ण आणि उडवाइडवीची उत्तरे दिली की केवळ त्याचा नुसता आशयच ऐकल्यावर औरंगजेबाचा संताप इतका अनावर झाला की त्याकडे रोखून बघणारे ते तेज:पुंज नेत्रच ताबडतोब फोडण्याची त्याने आज्ञा दिली. त्याच रात्री तापलेली सळर्इ डोळयात घालून संभाजीराजांना ‘नवी दृष्टी’ देण्यात आली. त्या क्षणापासून संभाजीराजांची अंधारयात्रा सुरू झाली.त्यांनी अन्नपाणीही सोडले. महाराष्ट्राच्या राजाला उपास पडू गले. संगमेश्वर मुक्कामी अटक झाल्यापासून औरंगजेबाच्या छावणीतील अपमानास्पद धिंड आणि त्यानंतरची अमानुष शिक्षा. या सबंध काळात संभाजीराजे आणि कविकलशांना आत्यंतिक शारिरिक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या.
त्या सर्व दु:खद यातनांचा साक्षिदार आहे भिमेकाठचा बहाद्दुरगड संभाजीराजांचा अखेरचा निर्णय घेण्याचा दिवस जवळ आला आहे याची आता आलमगीराला खात्री पटली होती. संभाजीराजांच्या देहाचे हालहाल करून अखेर त्यांना देहान्ताची शिक्षा द्यायची असा निर्णय त्याने आधीच करून ठेवलेला होता. फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी होती. त्या दिशेत पुढचे पाऊल म्हणून औरंगजेबाने आपला मुक्काम हलवला आणि तो भिमा, भामा आणि इंद्रयणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील तुळापूर गावी निघाला. मजल दरमजल करीत दि. 3 मार्च 1689या दिवशी तो तुळापूर मुक्कामी पोहोचला. त्याच्या मनातल्या योजनेनुसार बहाद्दुरगड ते तुळापूर या प्रवासात संभाजीराजे आणि कविकलश यांचे आतोनात शारिरिक हाल करण्यात आले. बादशाहाची छावणी त्रिवेणी संगमाच्या उत्तरेला मैदानात पडली आणि बरोबरच्या सैन्याची बाजारपेठ वढू या गावी लागली.
त्रिवेणी संगमावरील संगमेश्वराच्या मंदीरामुळे तीर्थक्षेत्राचे महत्व पूर्वापार तुळापूर गावाला लाभलेले होते. तुळापूर गावाचे मूळचे नाव होते नागरगाव. परंतु या नागरगावचे नाव बदलून तुळापूर कसे झाले याची हाकिकत वाचण्यासारखी आहे. दि. 23 सप्टेंबर 1663 च्या भाद्रपद अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग साधून या त्रिवेणी संगमावर एक आगळी वेगळी तुळा झाली. विजापूरचे सरदार मुरार जगदेवांनी ग्रहणाची पर्वणी साधून हत्तीची तुला करायचं ठरवलं होतं. हत्तीच्या वजनाएवढे तुलादान करायची त्यांना इच्छा होती. पण त्यात एक अडचण होती. ती म्हणजे या महाकाय हत्तीचे वजन कसे काय करायचे याची. या प्रसंगी मुरार जगदेवांचे मित्र आणि निजामशाहीचे वजीर शहाजीराजे तेथे उपस्थित होते. त्यांनी मुरार जगदेवांना एक युक्ती सुचवली. संगमाच्या पाण्यात दोन होडया उभ्या करण्यात आल्या. त्यावर दोन आडव्या फळया टाकून त्यावर हत्तीला उभे करण्यात आले. हत्तीच्या वजनाने पाण्यात जेथवर या होडया बुडाल्या त्या पाण्याच्या पातळीवर होडयांवर खूणा करण्यात आल्या. मग त्या हत्तीला उतरवून त्या खुणेपर्यंत त्या होडया पुन्हा एकवार पाण्यात बुडेपर्यंत दानराशी ओतण्यात आल्या. अश्याप्रकारे शहाजी राजांनी सुचवलेल्या या युक्तीमुळे हत्तीची तुला करून तेवढे दान करायची मुरार जगदेवांची इच्छा पूर्ण झाली. या अनोख्या तुळेची याद म्हणून नागरगावचे नाव बदलून तुळापूर ठेवण्यात आले.
नियतीच्या लहरीपणाचा फटका भल्या भल्यांना कसा बसतो बघा. ज्या शहाजी राजांच्यामुळे नागरगावचे तुळापूर झाले त्याच शाहाजी राजांच्या नातवाला, संभाजीराजांना 26 वर्षांनंतर त्याच तुळापूर गावी आलमगीराची कैद आणि असंख्य यातना नशिबी आल्या होत्या. तुळापूरला छावणी आल्यानंतर आठच दिवसांनी दि. 11 मार्च रोजी दृष्टीहीन संभाजीराजांना आणि जिव्हा छाटण्यात आलेल्या कविकलशांना छावणीच्या बाजारात आणण्यात आले. त्यांच्या अंगावर विदूषकाचे झगे,डोक्यावर तक्ते कुलाह आणि हातापायात बेडया घालण्यात आल्या होत्या. उद्या हिंदूंचा गुढी पाडव्याचा सण होता. तेव्हा आजच संभाजीराजांना देहान्ताची सजा देवून त्यांच्या प्रजेला खिजवायचे असा बेत औरंगजेबाने योजला होता. आपल्या सैनिकांना अखेरचा आदेश त्याने दिला. संभाजीराजे आणि कविकलशांचे हातपाय तलवारीने तोडण्यात आले. शरिराचा एक एक अवयव धडावेगळा करण्यात येवून त्याचे मांस कोल्हे कुत्र्यांपुढे फेकण्यात आले. शेवटी त्यांचा शिरच्छेद करून व मस्तकात पेंढा भरून ते सबंध छावणीत वाजत गाजत फिरवण्यात आले आणि नंतर छावणी बाहेर फेकून देण्यात आले.
एक वादळ शांत झाले. तुळापूरच्या छावणीत मृत्युंजयाची अखेरची यात्रा संपली आणि त्याचबरोबर यातनापर्वही संपले.संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसात औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या अमानुष अत्याचारांचे नुसते वर्णन वाचले तरी आपल्या अंगावर काटा उभा राहातो. मग त्या मरण यातनांना संभाजीराजांनी धिरोदात्तपणे कसे तोंड दिले असेल याचा अंदाजही आपल्याला बांधता येणार नाही.तुळापूरला मारल्या गेलेल्या संभाजीराजांच्या पार्थीव शरिराचे तुकडे काही मंडळीं नी गोळा करून नंतर ते वढू येथे आणले. तेथेच त्याच्यावर अंतीम संस्कार केले गेले आणि त्यावर वृंदावन बनवण्यात आले. अखेरच्या श्वासापर्यंत संभाजीराजांना साथ देणाऱ्या कविकालशांच्या प्रेतावरही समोरच्या बाजूला अग्निसंस्कार करून त्यावरही वृंदावन बांधले.
संभाजी राजांच्या निर्घुण हत्येमुळे आणि त्यांना प्राप्त झालेल्या हौतात्म्यामुळे सारा महाराष्ट्र, ढवळून निघाला. मरगळलेल्या मनगटात आणि मनांत नवचैतन्य जागे झाले. शंभू छत्रपतिंच्या बलिदानामुळे अवघा महाराष्ट्र, एक झाला आणि म्लेंच्छांवर तुटून पडला. स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या दिल्लींद्राला आता पुरता धडा शिकवायचाच या इराद्याने प्रत्येक मावळा पेटून उठला.स्वराज्याची इंच इंच भूमी लढवायला घरोघरीचे हात सरसावले, गवताला असंख्य भाले फुटावेत आणि आग्या माशांचे मोहोळ उठावे तदवत
मराठे मोगलांवर घसरले. अप्रतिहत धगधगणारे रणकुंडच महाराष्ट्राच्या समरांगणी प्रज्वलीत झाले आणि शेवटी त्या आलमगीराची आहुती घेवूनच ते थंड झाले. संभाजीराजांच्या बलिदानानंतर मोगलांविरूध्द सुरू झालेले मराठयांचे स्वातंत्र्यसमर आलमगिराला याच भूमीत मूठमाती देऊन अखेरीस संपले. शंभूराजांच्या हौतात्म्याने इतिहास घडवला. खऱ्या अर्थाने त्यांचे बलिदान कारणी लागले.
दि. 4 फेब्रुवारी 1689 या दिवशी संगमेश्वर मुक्कामी शंभूराजांना अटक झाली आणि दि. 11 मार्च 1689 रोजी तुळापूरच्या छावणीत त्यांनी हौतात्म्य पत्करले. केवळ सव्वामहिन्याचा अत्यंत वेगवान घटनांनी भरलेला हा कालखंड संभाजीराजांच्या आयुष्यातला सर्वात कठीण कसोटीचा, प्रखर अग्निदिव्याचा परंतु तितकाच तेजस्वी ठरला. संगमेश्वरस्थीत देसायांचा वाडा, भिमातटाकी वसलेल्या पेडगावचा बहाद्दुरगड, त्रिवेणी संगमावरचे मृत्युस्थळ−तुळापूर आणि दहनस्थळ वढू ही ठिकाणे त्या सर्व इतिहासाला साक्षीदार आहेत. ही स्मरणतीर्थे म्हणजे मृत्युंजयाचा अखेरच्या प्रवासातील मैलाचे दगडच आहेत. म्हणूनच या ठिकाणांना भेटी देणे आणि तो सारा परिसर पाहाणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्याहून निघून एका दिवसात तुळापूर आणि वढू येथील अनुक्रमे मृत्युस्थान आणि दहनस्थानांवर उभारलेल्या स्मारकांना भेटी देता येणे सहज शक्य आहे. पुणे−नगर रस्त्यावर पुण्यापासून अवघ्या तीस कीमी अंतरावर तुळापूर हे गाव आहे. पी.एम.टी. च्या अनेक बसेस या मार्गावर नियमित धावत असतात.
भिमा−भामा−इंद्रायणी यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या तुळापूरची प्राचीन ओळख म्हणजे संगमेश्वराचे घडीव आणि नेटके मंदीर. या मंदीरापासून संगमापर्यंत नदीकाठी दगडी पायऱ्यांचा सुरेख घाट बांधलेला आहे. संगमेश्वर मंदीराच्या बाहेरील अंगास एक सुबक अष्टकोनी बांधकाम आपले लक्ष वेधून घेते. तेथे शंभु छत्रपतिंच्या तेजस्वी बलिदानाची याद म्हणून या ठिकाणी अत्यंत देखणे असे प्रतिकात्मक समाधीस्थान उभारले आहे. या परिसराचे मूळचे सौदर्य आणि त्याचा आता झालेला कायापालट पाहून आपले डोळे निश्चितच सुखावतात. संभाजीराजांच्या मृत्युस्थानाला भेट दिल्यावर पुन्हा एकवार मुख्य रस्त्याला येवून जवळच असलेल्या वढू गावी यायचे. ज्या ठिकाणी संभाजीराजे आणि कविकलश यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते त्याठिकाणी पूर्वी उभारण्यात आलेल्या वृंदावनांचा 1977 साली जिर्णोध्दार करण्यात आलेला आहे. शंभूमहाराजांचा एक आवेशपूर्ण पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आजूबाजूचा परिसर सुशोभित करून त्याचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. वढू गावातील संभाजी महाराज आणि कविकलश यांच्या समाध्यांचे दर्शन घेतल्यावर सर्वांगी रोमावळी दाटून येतात. संभाजीराजांच्या हौतात्म्याची आणि करूण अंताची आठवण होते. देव−देश आणि धर्मासाठी त्यांनी सोसलेल्या यातना आणि अमानुष अत्याचारांचा तो सर्व घटनाक्रम डोळयांसमोर उभा राहतो. डोळयात टचकन पाणी दाटून येते आणि शाहीर योगेश यांच्या त्या अजरामर ओळी ओठावर येतात..
“ देश, धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था
महापराक्रमी, परमप्रतापी एकही शंभूराजा था”
शौर्य आणि धैर्य यांचे मूर्तीमंत प्रतिक असलेल्या त्या दिव्य अन तेजस्वरूप मृत्युंजय शंभू छत्रपतिंना कोटी कोटी प्रणाम...
पराग लिमये (अतिथी लेखक)
१२ सप्टेंबर २०१७
उत्कृष्ठ लेख!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसुन्न व्हायला होतं वाचून.. अंगावर शहारे येतात.. अप्रतिम लिखाण पराग दादा...
ReplyDeleteसुन्न व्हायला होतं वाचून.. अंगावर शहारे येतात.. अप्रतिम लिखाण पराग दादा...
ReplyDelete