छत्रपती संभाजी महाराज आणि अकबर प्रकरण..

१६५७ हे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण घेऊन आले. याच वर्षी या दोन्ही राज्यकर्त्यांना पुत्ररत्ने प्राप्त झाली.१४ मे १६५७ (ज्युलियन) रोजी पुरंदरवर संभाजी राजे यांचा जन्म झाला आणि दिनांक ११ सप्टेंबर १६५७ (ज्युलियन) रोजी अकबर याचा जन्म झाला. योगायोग असा की हे दोघेही चौथे अपत्य होते. संभाजी राजे यांच्या आधी सईबाई यांना ३ कन्यारत्ने प्राप्त झाली होती.त्यांची नावे सखुबाई,राणूबाई,आणि अंबिकाबाई अशी होती. एकाच वर्षी जन्मास आलेल्या या दोन युवराजांमध्ये आणखी एक साम्य होते ते म्हणजे या दोघांच्या माता हे दोघेही युवराज लहान असतानाच वारल्या.
दिलरसबानू ही अकबर शहजादा याची आई,अकबर २ महिन्यांचा असताना निवर्तली, तर संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाई साहेब यांची तब्येत संभाजी महाराजांच्या जन्मानंतर जरा नाजूकच झाली. अशक्तपणा आला आणि याच आजारपणात सईबाई साहेब यांचा मृत्यू झाला दिनांक ५ सप्टेंबर १६५९ (ज्युलियन) दोन वर्षांनी. असे लहानपणीच आईचे छत्र हरपल्यावर साहजिकच वडिलांकडे यांचा ओढा अधिक होता.



शहजादा अकबर मोठा होऊ लागला तसे त्यास राजकारणाचे धडे देण्याच्या हेतूने विविध मोहिमांवर पाठवलेले दिसते. १६७२ मध्ये राजपुताण्यातील सतनाम्याचे बंड मोडण्यासाठी (इतर सरदारांबरोबर) राजपुताण्यात पाठवण्यात आले तेव्हा तो १५ वर्षांचा होता. त्याच वर्षी अकबराचा एक निकाह लावण्यात आला. पुढे १६७४ मध्ये आसदखानाबरोबर त्यास काबूल येथे स्वारीवर पाठवण्यात आले. १६७६ मध्ये काबूलमधून परत आल्यावर त्याचा दुसरा निकाह करण्यात आला. त्याच वर्षी त्याला माल्व्याची सुभेदारी मिळाली. तेथेदेखील अकबराने काही विशेष कर्तृत्व गाजवलेले दिसत नाही. किसनसिंह हाडा १६७७ मध्ये खटके उडाले. व यानंतर किसनसिंह हाडा याचा मृत्यू झाला. काही संशोधकांचे असे मत आहे की त्याने जीव दिला.या प्रकरणानंतर अकबराला पुन्हा दिल्ली येथे बोलावण्यात आले. १६७८ मध्ये त्याला मुलतानची सुभेदारी मिळाली. १६७९ मध्ये त्याला लाहोरच्या सुभेदारीवर पाठवण्यात आले. या काळातदेखील त्याची पाच ठिकाणी बदली करण्यात आली. सारांश, अकबराने सक्रीय राजकारणात, मोहिमात, लढायांत भाग घेतल्यापासून कोणत्याच आघाडीवर त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही, उल्लेखनीय कर्तृत्व गाजवता आले नाही.


तोरणा ताब्यात घेऊन सुरु झालेला हिंदवी स्वराज्याचा डाव चांगलंच रंगात येत असताना १६५७ मध्ये मे महिन्यात संभाजी राजांचा जन्म झाला. हा काळ अतिशय धामधुमीचा होता. संभाजी महाराजांच्या अगदी बालपणापासूनच त्यांनी हिंदवी स्वराज्यावर येणारी संकटे अनुभवली होती. १६५९ मध्ये अफझलखान विजापूरवर चालून आला तेव्हा संभाजी महाराज केवळ दोन वर्षांचे होते. त्यानंतर स्वराज्यावर अनेक संकटे आली. महाराज पन्हाळ्यात अडकून पडले. मध्ये काही काल सरतो तोच १६६५ मध्ये मिर्झा राजाच्या रूपाने मोठे मुघली आक्रमण आले तेव्हा संभाजी महाराज ८ वर्षांचे होते. जून १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला. त्यानंतर सप्टेंबर १६६५ मध्ये संभाजी राजांना मुघलांची मनसब मिळाली. पुढे संभाजी महाराज आग्र्याला गेले. सही सलामत परत आले. महाराजांनी संभाजी महाराजांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. शस्त्रविद्या, घोड्यावर बसणे, तालीम, तिरंदाजी असे परिपूर्ण शिक्षण त्यांना मिळाले.

१६७८-७९ च्या काळात उत्तरेत राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा अनेक घटना घडत होत्या. अकबर आणि राठोडांनी उत्तरेत उठाव केल्यामुळे औरंगजेबाचे धाबे दणाणले होते. हे समरवीर राजपूत आणि अकबर एकत्र आले तर औरंगजेबाचे दिल्लीचे तख्त धोक्यात येईल हे औरंगजेब चांगलेच जाणून होता. त्यामुळे त्याला कसेही करून हे बंड मोडून काढणे गरजेचे होते. मुळात हि परिस्थिती निर्माण झाली जसवंत सिहांच्या मृत्यूमुळे. जसवंत सिंह हे मारवाड चे राजे, बडी असामी, अतिशय शूर. राजपूत सरदारांमधील सर्वश्रेष्ठ सरदार मानले जाणारे राज जसवंत सिंह मात्र या दिल्लीच्या मुघली तख्ताची चाकरी करण्यातच आपली धन्यता मानत होते. हेच तर दुर्दैव की या जुलमी सत्ताधीशांसमोर हत्यार उगारण्याची क्षमता असूनही तसे करण्याची इच्छाशक्ती त्यांच्या मनात जागली नाही. औरंगजेबाने हिंदुंवर जिझीया कर लादला आणि हिंदू प्रजेचे अतोनात हाल सुरु केले. तेव्हा मात्र मारवाड उदयपूर येथून त्याला कडवा विरोध होऊ लागला. त्यात १० डिसेंबर १६७८ (ज्युलियन) ला खैबर खिंडीत पेशावर जवळ जामरूद येथे राजा जसवंत सिंहाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे औरंगजेबाला मारवाड खालसा करण्याची आयती संधी चालून आली. कारण राजा जसवंत सिंह यांना पुत्र नव्हता. मारवाडला उत्तराधिकारी नव्हता. परंतु त्याच्या दोन राण्या गरोदर होत्या, त्यांना अपत्य होऊन मारवाडला त्यांचा पुढचा राजा मिळण्याआधीच हे राज्यसंस्थान खालसा करण्यासाठी औरंगजेब मोठया लगबगीने गेला. त्याची फौज मारवाडात घुसली. राठोडांनी बंड पुकारले. औरंगजेबाचे हे कृत्य कळताच काबूलकडे असणारी राठोड मंडळी संतापली.

जसवंत सिंह यांना दोन्ही पुत्र झाले, परंतु त्यातील रणमंथन लहानपणीच वारला. अजितसिंहाला गादी मिळावी यासाठी दुर्गादास राठोड प्रयत्न करत होते. औरंगजेबाने मारवाडची गादी अजितसिंगाला देण्यासाठी अतिशय जाचक अटी घातल्या त्या धुडकावून दुर्गादासाने लढयाची तयारी केली. अजितसिंह याची आई चितोडच्या राजसिंह यांची कन्या. आपल्या मुलीवर आलेले संकट पाहून उदयपूरकर मारवाडच्या बाजूने उभे राहिले. 

औरंगजेबाला ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच झाले, उदयपूर, मारवाड एकत्र आले. धर्मांध औरंगजेबासमोर उभे राहिले. त्याच वेळी औरंगजेबावर आणखी एक संकट आले. त्याचा पुत्र शहजादा अकबर याच्याशी आतून बोलणी करून बादशाह बनवण्याचे आमिष त्यास राजपुतांनी दाखवले. पण वाटेतला सर्वात मोठा अडसर होता तो म्हणजे औरंगजेब. त्याला वाटेतून दूर केल्यासच हे शक्य होते. अकबर फितला आणि राजपूतांना येऊन मिळाला. वास्तविक आपला बाप आणि भाऊ यांच्यावर कुरघोडी करूनच औरंगजेब गादीवर बसला होता. त्याचप्रमाणे येथे इतिहासाची पुनरावृत्ती होत होती. यावेळी औरंगजेबाचा मुलगा अकबर स्वतःच्या बापावर कुरघोडी करून राजगादी मिळवण्यासाठी राजपुतांना मिळाला होता.

दिनांक ११ जानेवारी १६८१ (ज्युलियन) रोजी अकबर याने स्वतःला बादशाह घोषित केले. औरंगजेबाला ही सर्व खबर मिळत होती. राजपूत आणि अकबर हे एक झाल्यामुळे आता त्यांची बाजू खूपच वजनदार झाली. जर लढाई झाली तर आपल्याला महाग पडेल हे औरंगजेबाला स्पष्ट दिसत होते. औरंगजेबाकडे अकबर व राठोड यांच्या एकत्रित सैन्यापेक्षा कमी सैन्य होते. तो पेचात सापडला. रणांगणावर पराभव निश्चित दिसत होता.आता औरंगजेबासमोर एकाच मार्ग दिसत होता ते म्हणजे भेद-निती. त्याने त्याचे कपटनितीचे हत्यार उगारले. त्याने एक पत्र अकबराला लिहिले आणि ते पत्र राजपुतांच्या हातात पडेल अशी व्यवस्था केली. त्या पत्राचा साधारण आशय असा होता की, ‘तुझा आज्ञाधारकपणा मी नेहमीच वाखाणत आलो आहे. त्याच आज्ञाधारकपणे हे कार्य आता पूर्ण करणे गरजेचे आहे. उद्याच्या लढाईत राजपूत सैनिक आघाडीवर ठेव. तू पिछाडीवरून आणि मी समोरून असे या राजपुताना कोंडून यांचा पुरता बिमोड करू. असे झाल्याने तुझी इच्छा पूर्ण होईल.’ औरंगजेबाच्या योजनेप्रमाणे हे पत्र राजपुतांच्या हाती सापडले. आपण अकबराकडून फसवले गेलो आहोत याची त्यांना खात्री झाली. सर्व राजपुतांनी रातोरात अजमेर ची छावणी सोडून निघून जाणे पसंत केले. सकाळी उठून पाहतो तोवर अकबर त्याच्या छावणीत एकटा आणि काही ३०० ४०० हशम. हा सगळं पाहून चक्रावलेल्या अकबराला झालेला प्रकार समजला. त्याने तत्काळ जीव वाचवून छावणी मधून पळ काढला. अशाप्रकारे औरंगजेबाने रक्ताचा एक थेंब न सांडवता एकावर एका पत्राच्या आधाराने लढाईत बाजी मारली.

अकबराची अवस्था बिकट झाली आता त्याला कोणीही राजपूत आश्रयास घेणार नाही हे उघड सत्य होते. त्याच्या मदतीसाठी मात्र दुर्गादास राठोड आला. आणि त्यांनी राजस्थानातून पळून दक्षिणेत येण्याचा निर्णय घेतला. कारण औरंगजेबाविरुद्ध अकबराला कोणी मदत करू शकेल असे असेल तर ते होते रणझुंजार छत्रपती संभाजी महाराज. तेच या पापी औरंगजेबाला रोखण्याची टाकत ठेवतात याची अकबराला पूर्ण खात्री होती. ९ मे १६८१ मध्य नर्मदा ओलांडून अकबर महाराष्ट्राच्या वाटेला लागला. इकडे औरंगजेबाने अकबराला हर प्रकारे पकडण्याची शिकस्त चालवली होती. औरंगजेबाने दक्षिणेकडे जाणार्या मार्गावरील सर्व सुभेदार, किल्लेदार, जमीनदार वगैरे लोकांना अकबराच्या वाटा अडवून कोंडी करण्याचे हुकुम सोडले. त्यावेळी त्याची जी दैना झाली ते अकबर संभाजी महाराजांना लिहिलेल्या एका प्रत्रात कथन करतो. ११ मे १६८१ रोजी संभाजी महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात अकबर म्हणतो “ औरंगजेबाबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. मला माझ्या परिवारासमवेत मारवाडात फिरावे लागले. माझा पाठलाग करण्याच्या कामावर असलेल्या शहजादा मुअज्जम याने सर्वत्र सैन्य पसरवले..... परमेश्वरकृपेने मला राज्य प्राप्त झाले तर नाव माझे राज्य तुमचे असे राहील. आलमगीर तुमचा आणि आमचा शत्रू आहे. आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करा,...” हा त्या पत्राचा काही भाग पण यावरून स्पष्ट दिसते कि अकबर संभाजी महाराजांना भेटावयास किंवा त्यांच्या आश्रयास येण्यास किती उत्सुक होता. हे पत्र मोठे आहे येथे फक्त त्यातील काही भाग देण्यात आला आहे पण हे पत्र पहिले कि लक्षात येते उत्तरेस संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल प्रसिद्धी होती. संभाजी महाराजच आलमगीराला रोखू शकतील याचा देखील विश्वास अकबरालाला दिसत होता. 

हे पत्र आल्यावर संभाजी महाराजांनी या पत्राला लगेच कोणतेही उत्तर पाठवले नाही. कारण अनेक बाजूनी अभ्यास करून एक एक पाउल उचलणे गरजेचे होते. साक्षात आलमगीर औरंगजेबाचा मुलगा पत्र पाठवत आहे म्हणजे त्यात काही काळेबेरे असण्याचीशी शक्यता नाकारता येत नव्हती. औरंगजेबाच्या हालचाली पहाणे गरजेचे होते. आणि लगेच अकबराला पाठींबा देणेही धोक्याचे होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी या पत्राला कोणतेही उत्तर पाठवले नाही. अकबराचा दक्षिणेकडे प्रवास सुरु होता. १६ मे १६८१ ला अकबर बुऱ्हानपूर ओलांडून पुढे गेल्याचे बहादूरखान याने औरंगजेबास कळवले. किंबहुना या बहादुरखानाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अकबर नाशिक बागलाण च्या दिशेने गेला आहे हे समजताच बहादुरखानाने औरंगाबादेहून बागलाणाकडे कूच केले. परंतु अकबर तिकडून निसटून नाशिक साल्हेर मार्गे कोकणा उतरल्याचे त्याला समजले. तो निराश होऊन औरंगाबादेकडे परतला. उतावीळ होऊन संभाजी महाराजांना अकबराने पुन्हा एक पत्र पाठवले ते २० मे १६८१ चे पत्र आहे. आता मात्र संभाजी महाराजांसमोर पेच उभा राहिला. 

अकबर मराठी मुलखात येऊन दाखल झाला आहे हे कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे काही लोक अकबराच्या भेटीकरिता पाठवले परंतु सावधगिरी बाळगून ते अकबरास भेटावयास गेले नाही. सुधागड, पाली गावाजवळ धोंडसे नावाचे एक गाव आहे तेथे अकबराची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पुढे येथील अकबराच्या वास्तव्यामुळे या गावाचे नाव पातशहापूर पडले असावे. किंवा पाच्छापूर. अकबराची व्यवस्था तेथे एका सध्या घरात करण्यात आली होती. कुडाच्या भिंती, भाताच्या पेंढ्याचे छप्पर, सारवलेली जमीन असे ते घर होते. घराभोवती कापडी पडदे, जमिनीवर बसायला सतरंजी, अशी व्यवस्था तेथे करण्यात आली होती. ऐश आराम विलासी जीवन जगण्याची सवय असलेल्या या आळशी शहजाद्यास आता अशा सध्या घरात राहण्याची वेळ आली होती. अकबराजवळ त्यावेळी विशेष काही सैन्य वगैरे नव्हते. ४०० स्वार, पायदळाची एक छोटी तुकडी, ५० उंट इतकेच अकबरासोबत होते. छत्रपती संभाजी महाराजांनी ३०० पायदळ अकबराच्या संरक्षणासाठी दिमतीला पाठवून दिले. तसेच नेतोजी पालकर आणि हिरोजी फर्जंद यांना नजराणा घेऊन अकबराकडे रवाना केले.

पुढे जसे दिवसामागून दिवस सरकू लागले तसे अकबर संशयास्पद वागू लागला. त्यांनी इथे २००० पर्यंत फौज गोळा केली, त्याच्या राहण्याच्या ठिकाणी लहानसा दरबार भरवत असे, त्यांनी कारभारी नेमले, बादशाही रिवाजाप्रमाणे तो तिथून फर्माने वगैरे काढू लागला. या सर्व गोष्टीकडे संभाजी महाराजांचे बारीक लक्ष होते. महाराजांना या सर्व बातम्या मिळताच होत्या. त्यांनी तत्काळ अकबराला बजावले की या राज्यात राहायचे असेल तर त्यांनी अशी फौज जमवणे वगैरे योग्य नाही. त्यांना तसे करावयाचे असल्यास त्यांनी दुसऱ्या राज्यात जावे. 

हिंदवी स्वराज्याला गालबोट लागेल अशी एक अप्रिय घटना त्या दरम्यान घडली. संभाजी महाराज पन्हाळ्यावर असताना संभाजी महाराजांच्या विरोधकांनी त्यांच्यावर मत्स्यातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. ते अन्न एका कुत्र्यास आणि एका नोकरास खायला घालण्यात आले. काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. या झालेल्या विषप्रयोगातून संभाजी महाराज सहीसलामत बचावले. यानंतरही संभाजी महाराजांना राजगादीवरून पदच्युत करून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचे एक कारस्थान करण्यात आले. त्या कटात अकबराला सामील करून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्यांना एक गुप्त पत्र पाठवण्यात आले. त्यानुसार अकबराने जर या कारस्थानी मंडळींना सहकार्य केले तर त्याबदल्यात राज्याचा काही भाग तोडून देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. परंतु हे पत्र संभाजी महाराजांनी आपली परीक्षाच घेण्यासाठी पाठवले असेल असे वाटून अकबराने ते पत्र दुर्गादास राठोड यांच्या सल्ल्यावरून थेट संभाजी महाराजांकडे पोहोचते केले. असे केल्याने संभाजी महाराजांचा अकबरावर विश्वास बसून पुढील राजकारण अकबरासाठी सोपे होईल म्हणून दुर्गादास राठोड यांनी अकबरास हा सल्ला दिला.  या कटात अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सोमाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, सोयराबाई साहेब वगैरे मंडळी सामील असल्याचं संशय होता. या सर्व मंडळींना कैद करून कडक शासन करण्यात आले. देहदंड देण्यात आला. सोयराबाई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. अनेक समकालीन कागदपत्रात यासंदर्भात उल्लेख सापडतात. या कट प्रकरणात २५ ते ३० माणसांना शिक्षा देण्यात आल्या. बाळाजी आवजी, हिरोजी तसेच अण्णाजी यांना परळी येथे हत्तीच्या पायी देण्यात आले. शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या अष्टप्रधानमंडळात इअमाने इतबारे स्वराज्याची सेवा करणारे हे अधिकारी मंडळींची अखेर अशी व्हावी हे दुर्दैवी आहे.

संभाजी महाराजांना कटाची कल्पना अकबराने दिल्या नंतर अकबरावर संभाजी महाराजांचा विश्वास बसला आणि ते अकबरास १३ नोवेंबर १६८१ मध्ये पाली येथे जाऊन भेटले. योगायोग म्हणजे याच दिवशी औरंगजेब आपला पुत्र अकबर याच्या पाठलागावर भली थोरली फौज घेऊन बुऱ्हाणपूर येथे आला. संभाजी महाराजही या अक्राळविक्राळ मुघली आक्रमणाला तोंड देण्यास सज्ज झाले होते त्यांनी तयारी सुरु केली. त्यांनी उत्तरेत राजपूत राज रामसिंग यास पत्रे पाठवून अकबर, राजपूत आणि स्वतः औरंगजेबाला शह देण्याचा एक मनसुबा एकला यात इराणच्या शाह अब्बास याला देखील सामील करून घेण्याची धाडसी योजना बनवली होती. त्या दृष्टीने अंबरचा राजा रामसिंग याच्याबरोबर पत्रव्यवहारही झाला होता परंतु काही कारणाने हा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही. काही मोहिमांमध्ये अकबर संभाजी महाराजांबरोबर गेल्याचे दिसते. 

एकूणच दक्षिणेत अकबराचे हाल होत होते. एकूणच हा रांगडा मुलुख काही अकबरास फळला नाही असे म्हणावे लागेल परंतु या अकबरामुळे स्वराज्यावर मुघली आक्रमण मात्र झाले. अकबराला कैद करून मोहीम उरकण्याच्या बेताने आणि मराठी साम्राज्याला संपवण्याची स्वप्ने पाहून दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला ही मोहीम २५ वर्षे चालवूनही पूर्ण करता आली नाही किंबहुना त्याची कबर या मराठ्यांच्या वीर भूमीतच खोदली गेली. परंतु याची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. आपल्या शंभू छत्रपतींच्या औरंगजेबाने केलेल्या हत्येनंतर अनन्वित अत्याचार, अक्राळविक्राळ आक्रमणाला तोंड देत महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला. १७७२ मध्ये थेट दिल्ली वर भगवा दिमाखात फडकावेपर्यंत......!!

लेखन सीमा !
उमेश जोशी

संदर्भ:
१. शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले
२. राजा शंभू छत्रपती - विजयराव देशमुख
३. ज्वलज्वलंतेजस संभाजी - डॉ सदाशिव शिवदे
४. छत्रपती संभाजी महाराज - वा.सी. बेंद्रे
५. मराठी रियासत खंड २, उग्रप्रकृती संभाजी स्थिरबुद्धी राजाराम - गो. स. सरदेसाई
६. छत्रपती संभाजी व थोरले राजाराम मल्हार रामराव चिटणीस विरचित
७. मराठे व औरंगजेब - सेतुमाधवराव पगडी
८. मासीर-ए-आलमगिरी- जदुनाथ सरकार
  

4 comments:

  1. उमेश जोशी...सुंदर लेख व तितकेच उत्कृष्ट विवेचन! संभाजी महाराज व शहजादा अकबर यांच्यातील तुलना व साम्यस्थळे अतिशय योग्य पद्धतीने आपण मांडले आहे...अभिनंदन!

    ReplyDelete
  2. उमेश जोशी...सुंदर लेख व तितकेच उत्कृष्ट विवेचन! संभाजी महाराज व शहजादा अकबर यांच्यातील तुलना व साम्यस्थळे अतिशय योग्य पद्धतीने आपण मांडले आहे...अभिनंदन!

    ReplyDelete
  3. उत्तम लेख!तत्कालीन राजकारण आणि त्यातील अकबराची भूमिका उत्कृष्ट पद्धतीने मांडली आहे.

    ReplyDelete
  4. जय शिवराय जय रुद्र संभाजी महाराज

    ReplyDelete