लढाई मराठ्यांच्या अस्तित्वाची, शौर्य धैर्य चातुर्याच्या परिसीमेची..!!


"आसेतु हिमाचल" अर्थात काबुल पासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण हिंदुस्थान, दक्खन आणि दक्षिण आपल्या अमलाखाली आणून त्याचे इस्लामीकरण करण्याची आणि त्यायोगे रायगडाची मराठेशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुत्बशाही नष्ट करण्याची धर्मवेडी महत्वाकांक्षा उराशी बाळगून आणि असे इस्लामीकरण करून पुण्य संपादन करण्यासाठी (मूरतसम जमीरे अकसद) दिल्लीपती, मुघल सम्राट, शहेनशहा औरंगजेब आलमगीर दिनांक २२ मार्च १६८२ (जुलिअन दिनांक) रोजी औरंगाबादला डेरेदाखल झाला आणि महाराष्ट्राच्या रंग - रणभूमीवर एका महा-रणनाट्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

यातली प्रमुख पात्रे दोनच होती - एक - नुकताच छत्रपती झालेला अननुभवी २५ वर्षीय शिवपुत्र संभाजीराजा आणि दुसरा - उभ्या हिंदुस्थानचा (त्याकाळी नर्मदेच्या उत्तरेकडील भागास हिंदुस्थान संबोधिले जायचे) बादशहा, मुरब्बी राजकारणी ६४ वर्षीय औरंगजेब आलमगीर! नवे गडी, हाती घेतलेलं नवं राज्य, तरुण वय, राज्यसुद्धा शत्रूच्या एका सुभ्यापुढे टीचभर असलेलं अश्या परिस्थितीत संभाजीराजा तर कसलेले अनुभवी सेनापती, सरदार, प्रचंड सेनासागर, अगणित खजिना, पाठीशी अव्याहत रसदपुरवठा करणारे गुजरात, माळवा सारखे संपन्न सुभे असा बलाढ्य औरंगजेब आलमगीर! 
शत्रू समजून घेतल्याशिवाय आपल्या राजाच्या पराक्रमाचे श्रेष्ठत्व समजत नाही. औरंगजेब आलमगीर! मराठ्यांच्या इतिहासात तर हा शत्रू त्यांना चार पिढ्या पुरला. शहाजीराजांशी तो १६३६ मध्ये लढला, छत्रपती शिवाजी राजांशी १६८० पर्यंत आणि छत्रपती संभाजी राजांशी १६८९ पर्यंत लढला. छत्रपती शाहू राजे १७०७ पर्यंत त्याच्या कैदेत होते. अश्या चार पिढ्या औरंगजेब मराठ्यांचा शत्रू म्हणून राहिला. १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब धार्मिक आचरणाविषयी अतिशय कर्मठ होता. दरबारात धार्मिक आचरणाविषयी सतत काही ना काही फतवा असायचा. एकदा त्याचा सरदार मोहोबतखान त्याच्या तोंडावर म्हणाला "शिवाजीविरुद्ध सैन्य पाठवणे अनावश्यक आहे. मुख्य काजीने फतवा काढला की तो ताबडतोब नष्ट होऊन जाईल." 

औरंगजेब हिंदूंबरोबरच सुन्नी पंथीय नसलेल्या इतर सर्व मुसलमानांचादेखील तिरस्कार करत असे. असा हा अतिशय जिद्दी, धर्मवेडा, प्रचंड संशयी, सत्तालोलुप, त्याचबरोबर अतिमहत्त्वाकांक्षी, असामान्य धैर्याचा, अविश्रांत मेहेनतीची क्षमता असणारा, प्रचंड मोठ्या मोगल साम्राज्याचा नायक, मुरब्बी राजकारणी! छत्रपती शिवाजी राजांच्या आग्रा सुटकेने झालेली नाचक्की भरून काढण्यासाठी, बंडखोर अकबराला धडा शिकवण्यासाठी, बिगर सुन्नी असलेल्या शिया पंथीय विजापूर व गोवळकोंड्याचा खात्मा करण्यासाठी (वास्तविक ही दोन्ही राज्ये तो दक्षिणेचा सुभेदार असताना १६५६ व १६५७ मध्ये केलेल्या स्वारीत संपुष्टात यायची पण शहाजहानच्या हुकुमामुळे तह करावा लागला) आणि संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर व औरंगाबादेची लूट करून केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व एकंदरीतच मराठेशाही नष्ट करण्यासाठी महाराष्ट्राच्या रंग-रणभूमीवर दाखल झाला होता. 
वास्तविक हा संघर्ष शिवाजी महाराजांच्या १६५७ मधील नगर, जुन्नरवरील मोहिमेनंतर सुरु झाला होता. त्यानंतर मोगलांवरील मोहिमेसाठी महाराजांनी नाशिक बागलाण प्रांत निवडला. बागलाण जिंकले की खानदेश व गुजरात महाराजांसाठी मोकळे होणार होते. म्हणूनच १६७०, १६७१, १६७२ च्या मोहिमेत महाराजांनी बागलाणातील सर्वच किल्ले घेतले. शेवटी आपला दीर्घ लढा मोगलांशीच असणार आहे हे महाराजांना पूर्णपणे माहित होते आणि तसेच झाले. महाराज हयात असेपर्यंत औरंगजेब दक्षिणेत आला नाही. परंतू महाराजांच्या पश्चात संभाजीराजांना औरंगजेबाचे हे परचक्र आपल्या अंगावर घ्यावे लागले.


मार्च १६८२ मध्ये औरंगजेब औरंगाबादेस आला त्याआधी त्याने जुलै १६८० मध्ये महाराजांच्या मृत्युंनतर खानजहान उर्फ बहादुरखान कोकल्ताश यास औरंगाबादेचा सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. दक्षिणेत येताच अहिवंतगडास त्याने वेढा घातला पण पावसाळ्यामुळे तो सोडून दिला. हंबीररावांच्या बुऱ्हाणपूर लुटीच्या मोहिमेत मोगलांतर्फे बचावासाठी बहादूरखान फर्दापूर घाटाने आला पण त्याच्या सैन्याचे हाल झाले. त्याने हंबीररावांना प्रतिकार केला नाही व सर्व लूट घेऊन हंबीरराव साल्हेरकडे गेले. पुढे हा औरंगाबादच्या बचावासाठीही धावून गेला. तसेच जुलै १६८१ मध्ये बागलाणात नेतोजी पालकरांशीही ह्याच्या चकमकी झाल्या. मराठ्यांच्या सोलापूर चढाईतही बचावासाठी बहादूरखान धावून गेला. शेवटी त्याला औरंगजेबाने औरंगाबादऐवजी भीमेकाठी बहादूरगड येथे ठाणे कायम ठेवण्याचा हुकूम दिला. नोव्हेंबर १६८१ च्या सुमारास औरंगजेबाने राजपुतान्याच्या युद्धात कर्तृत्व गाजवलेल्या हसनअलीखानास चौदा हजार फौज देऊन कोकणात रवाना केले. त्यावेळी संभाजीराजे जंजिरा मोहिमेत गुंतले होते. हसनअलीखान कोकणातून तसाच पुढे रायगडावर चालून येईल असे वाटल्याने जंजिरा मोहीम सोडून संभाजी राजांनी रायगडी प्रस्थान केले. हसनअलीखान नाणे घाटातून कोकणात उतरत असता मराठ्यांनी त्याला अडविले पण त्यांना न जुमानता जाळपोळ करीत तो पुढे आला आणि त्याने कल्याण जिंकले. त्यासोबत लोदीखान, राव दलपत बुंदेला व इतर सरदार होते. परंतू तिथे टिकून राहणे त्याला जमले नाही. त्याला धान्याचा तुटवडा होत होताच वरून संभाजीराजांच्या सैन्याने त्याच्यावर तिखट प्रतिहल्ला केल्यामुळे त्याने माघार घेतली आणि १६८२ फेब्रुवारीत तो नाशिकला निघून गेला. तो निघून जाताच मराठ्यांनी कल्याण परत आपल्या ताब्यात घेतले. चार दोन खेडी जाळण्यापलीकडे हसनअलीस यश मिळाले नाही. अशी सुमारे दीड वर्षे मोगलांची संभाजी राजांमागे धावपळ चालू असताना आणि त्यातून विशेष असे काहीच साधले जात नसताना मार्च १६८२ मध्ये खुद्द औरंगजेब आला आणि त्याने सर्व सूत्रे हाती घेतली. 


या दीड वर्षाच्या कालावधीत संभाजीराजे मात्र मोगल प्रदेशात चारी दिशांनी लुटालूट करत होते. राज्याभिषेकानंतर केलेली बुऱ्हाणपूरची लूट असो की औरंगाबादची मोहीम असो, पेडगाव सोलापूर नळदुर्गाकडे घातलेला धुमाकूळ असो की अहमदनगर किल्ल्याभोवतालचे हल्ले असोत, बागलाणातील कोहोजची लूट असो की साल्हेर, मुल्हेर, पुरंदरच्या लढाया असोत संभाजीराजांनी चौफेर लुटालूट केली. दक्षिणेत येणाऱ्या अतिबलाढ्य मोगल सेनेला आणि औरंगजेबाला आपण अजिबात भीत नाही किंबहुना किती क्षुद्र लेखतो हे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता. याव्यतिरिक्त उंदेरी मोहीम, जंजिरा मोहीम, गोव्याजवळील डिचोलीस मुक्काम अशी प्रचंड धावपळ राजांनी केली होती आणि यादरम्यान औरंगजेबपुत्र, बंडखोर शहजादा अकबरास आश्रय देऊन व त्याची पाली मुक्कामी भेट घेऊन त्यांनी औरंगजेबास डिवचले होते. आणि आता या सर्वांचे पारिपत्य करण्यासाठी स्वतः औरंगजेब दक्षिणेत आला होता. लगेच त्याने शहाबुद्दीनखान व राव दलपत बुंदेला यास नाशिक बागलाणातील किल्ले काबीज करण्यास फर्मावले.

सह्याद्रीच्या कुशीतले स्वराज्य म्हणजे डोंगराळ मुलुख. तोफखाने, उंटदले, हत्तीदले घेऊन मोठमोठ्या मोहिमा काढण्यास येथे वावच नाही. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे दुर्ग हीच मराठ्यांची शक्ती आहे आणि एकदा का हे दुर्ग ताब्यात आले की मराठी राज्य उरणारच नाही या नीतीने औरंगजेबाने प्रथम सर्व किल्ले जिंकायचे ठरवले. आपल्या एकेका सरदारास पन्नास पन्नास हजार फौज देऊन पाठवले की चुटकीसरशी किल्ले ताब्यात येतील या आविर्भावात त्याने मोहिमेची सुरवात केली बागलाणातील किल्ल्यापासून, "किल्ले रामसेज" पासून.



किल्ले रामसेज - भौगोलिक
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेला किल्ले रामसेज नाशिक शहराच्या उत्तरेस शहरापासून १४ कि.मी.अंतरावर आहे. किल्ले रामसेज समुद्र सपाटीपासून ३२७३ फूट उंचीवर असून १५०० फूट उंचीवर असलेल्या जोड दरवाजातून आत जात येते. तेथे एक चोरवाट आहे. आतील सर्व बांधकामे जमीनदोस्त झाली आहेत. गडावर भवानी मातेचे मंदिर असून भवानीची मूर्ती शस्त्रसज्ज आहे. गडाच्या अत्त्युच्य भागात काही घरांचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. गडावरून उत्तरेस सातमाळा, दक्षिणेस त्रयंबकगड, पश्चिमेस भोरगड दिसतो. तेथे एक राम मंदिर आहे. वनवासात असताना प्रभू रामचंद्र येथे वास्तव्यास होते व ही त्यांची सेज (शय्या) होती म्हणून नाव रामसेज पडले अशी आख्यायिका.

किल्ले रामसेज - पूर्वेतिहास व याच गडापासून मोहीम सुरु करण्याचे काही तर्क मोगल बादशहा शहाजहान याने १६३५ मध्ये केलेल्या दक्षिण स्वारीत शाहिस्तेखानाच्या तृत्वाखाली अल्लावर्दीखानास नाशिक बागलाणात स्वारीवर पाठवले. १६३६ साली अल्लावर्दीखानाने शहाजीराजांकडून बागलाणातील सर्व किल्ले अवघ्या ४ महिन्यात जिंकून घेतले. यामध्ये धोडप, चांदवड, अंजराई (इंद्राई), राजदेहेर, कोलेर (लोकघेर), कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड, अहीवंत, अचलगड व रामसेज या किल्ल्यांचा समावेश होता. यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० ते १६७२ च्या स्वारीत बागलाणातील सर्व किल्ले स्वराज्यात आणले. 

मराठ्यांविरुद्ध एल्गार करताना त्याची सुरुवात किल्ले रामसेज ह्या छोटेखानी किल्ल्यापासून करावी याचे काही तर्क मांडता येतात ते असे. एक तर आकाराने छोटा, बागलाणातील इतर किल्ल्यांच्या मानाने उंचीस छोटा, जिंकण्यास सोपा तसेच गुलशनाबाद अर्थात नाशिक पासून जवळ असलेला हा किल्ला रसद व कुमक पुरवठ्याच्या सहज टप्प्यात आहे. मराठ्यांच्या मुख्य भूमीपासून तसा दूर असल्याने त्यांची कुमक यायच्या आधीच चटदिशी जिंकून घेता येईल ही शक्यता जास्त. वर उल्लेख केल्याप्रमाणे शहाजहान दक्खनस्वारीवर आला असता त्याने प्रथम रामसेजचाच किल्ला जिंकून मोहिमेची सुरुवात केली होती आणि अवघ्या चार महिन्यात सर्व किल्ले जिंकले होते. हा किल्ला त्याच्यासाठी शुभशकूनच ठरला होता. आणि हाच इतिहास समोर ठेवून आपल्या मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेचा शुभारंभ औरंगजेबाने रामसेजला वेढा घालून केला. नाशिक बागलाण भाग मोगलांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा होता. याच वाटेने मराठे उत्तरेकडे सुरत व गुजरात, खानदेशात जात. वेळोवेळी हक्काचा सुरक्षित निवारा म्हणून मराठ्यांना या किल्ल्यांचा उपयोग होई. याचा प्रत्यय शिवाजी महाराजांच्या सुरत तसेच जालनापुरच्या लुटीवेळी तसेच संभाजीराजांच्या बुऱ्हाणपूर लुटीवेळी आला. कोकणात उतरण्याचा राजरस्ता हाच होता. या प्रदेशाचे सामरिक महत्त्व ध्यानात घेऊन हा प्रदेश व त्यातील किल्ले ताब्यात असणं अनिवार्य होत. यामुळेच किल्ले जिंकण्याच्या मोहिमेची सुरुवात रामसेज पासून झाली.


किल्ले रामसेज - वेढा आणि युद्धेतिहास

रामसेज जिंकण्याची जबाबदारी औरंगजेबाने शहाबुद्दीनखान (थोरले बाजीरावांचा मुख्य शत्रू निजाम उल्मुल्कचा बाप) व कासीमखान किरमाणी या शूर व तडफदार सरदाराकडे सोपवली. त्यांच्याबरोबर राव दलपत बुंदेला, शुभकरण बुंदेला त्याचा मुलगा रतनसिंग रजपूत व इतर सरदार होते. या दोघांनी एप्रिल १६८२ मध्ये रामसेज जिंकण्याच्या दृष्टीने किल्ल्यास वेढा घातला.
एप्रिल - जून १६८२ - शहाबुद्दीनखानाने रामसेजला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात मराठ्यांची ४०० ते ५०० शिबंदी होती. मात्र किल्लेदार अनुभवी, बेडर, हुशार होता. बादशहाने शहाबुद्दीनखानाला ५०० बाण व ५०० मण दारू, १०० मण शिसे देण्याबाबत हुकूम केला. शहाबुद्दीनखानाने किल्ल्यासमोर लाकडी दमदमे तयार केले व किल्ल्याला मोर्चे लावले. मराठेही वरून मारा करत होते. दलपत बुंदेला या माऱ्यात जखमी झाला. खानाने एक प्रचंड मोठा लाकडी बुरुज तयार केला ज्यावरून एकाच वेळी पाचशे माणसे गोळ्यांचा वर्षाव करू शकतील. सुरंग लावणे, दमदमे तयार करणे, तोफांचा मारा, मोर्चे लावणे अशी प्रयत्नांची पराकाष्ठा तो करीत होता. पण किल्लेदाराच्या सावधगिरीमुळे त्याचे काही चालत नव्हते. किल्ल्यात मराठ्यांकडे लोखंडी तोफा नव्हत्या. त्यांनी लाकडी तोफा बनवल्या. त्यात कातडे भरून ते तोफा उडवू लागले. शहाबुद्दीनखानाने गडाच्या बुरूजाजवळच्या दरवाजावर तोफांचा मारा केला त्यामुळे भिंत कोसळली, बरेच सैनिक जखमी झाले. त्याचवेळी संभाजीराजांनी कुमक केलेला रुपाजी भोसले वेढ्यातल्या करणसिंहला भिडला. लढाई झाली. रुपजी तसेच अनेक सैनिक जखमी झाले. शहाबुद्दीनखान दरवाजाजवळ भिडला. पण यश आले नाही. याविषयीची औरंगजेब दरबारच्या अखबारातील नोंद अशी "कासिमखानाने पत्र लिहिले की तोफांच्या माऱ्याने बुरुजाची भिंत पडली होती त्या वाटेने वर बाण फेकून माणसांनी जावे. शेवटी काही लोक किल्ल्याच्या दरवाज्यापाशी पोहोचून ओरडले की 'बेलदारानी यावे'. त्या आवाजाने गनीम जागा झाला व त्यांनी दगड, बंदुकीचा मारा केला. बहुतेक सर्व बादशाही लोक कामास आले. काही प्रगती नाही." रामसेज किल्लेदाराला रसदपुरवठा (त्रिंबकगडावरून) होत होता. मोगलांनाही रसद पुरवठा होत होता. एकदा मराठ्यांनी हल्ला करून शरीफखानाची रसद मारायचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूचे असंख्य लोक कमी आले व जायबंदी झाले. यावर बादशहाने सावधगिरीने रहायचा सल्ला दिला. अशारितीने एप्रिलमध्ये वेढा घालून चुटकीसरशी रामसेज जिंकायची स्वप्न बघता बघता जून संपला तरी हा संग्राम चालूच होता. यातच मे महिन्यात बादशहाने बहादुरखानास रामसेजला जायची आज्ञा केली. याच सुमारास स्वराज्याच्या तिसऱ्या वारसाचा जन्म झाला. जेधे शकावलीतील नोंद " दुदुंभी संवत्सरे शके १६०४, वैशाख व ७, गुरुवार, संभाजीराजे यासी पुत्र झाला." तो दिवस म्हणजे १८ मी १६८२ (जुलिअन दिनांक).

जुलै - सप्टेंबर १६८२ - शहाबुद्दीनखान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. पावसाळा सुरु झाला तरी चिवटपणे झुंजत होता. त्याने ऐन पावसाळ्यात ११ जुलै १६८२ (जुलिअन दिनांक) रोजी रामसेजला वेढा घातला. किल्ल्याच्या दरवाजाला सैनिक जाऊन भिडले. मराठ्यांचा तिखट प्रतिकार असूनही मोगलांच्या चिवट झुंजीमुळे किल्ल्यात १८ जुलै १६८२ (जुलिअन दिनांक) या दिवशी चार माणसे शिरू शकली. लागलीच मराठ्यांनी त्यांना कंठस्नान घातले. मोगलांचा येणारा प्रत्येक माणूस जखमी झाला आणि हाही प्रयत्न वाया गेला. परत एकदा पराक्रमी, बेडर किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली रामसेजवरील मराठ्यांनी मोंगलांचा हल्ला परतवून किल्ला शाबूत ठेवला. मराठ्यांपुढे शहाबुद्दीनखानाचा निभाव लागत नव्हता. याचवेळी संभाजीराजांकडून १००० सैन्य रामसेजला आले. महासिंग करोदिया मराठ्यांवर चालून गेला. काही केल्या शहाबुद्दीनखानाला यश मिळत नव्हते. अखेर त्याने हात टेकले. शेवटी बादशहाने त्याला परत बोलावले आणि लिहिले "तू रामसेज घेण्याबाबत खूप कष्ट घेतलेस. स्वतःचा जीव गमवण्यास देखील मागेपुढे पहिले नाहीस. सध्या किल्ला बहादुरखानाच्या अधिकाराखाली दिला आहे. त्याजकडे तोफखाना सोडून तू अंतुरला पोहोचावे." अखेर सप्टेंबर १६८२ मध्ये शहाबुद्दीनखानाची जागा बहादूरखानाने घेतली. 


औरंगजेबाचा दूधभाऊ, खानजहान बहादूरखान रामसेजचा वेढा चालवीत होता. त्यावेळी कान्होजी दक्खनी (कान्होजी शिर्के) बादशहास भेटला. बादशहाने त्याला बहादुरखानकडे रामसेजला पाठवले. अतिरिक्त १५६५० सैनिकांची कुमक केली. बहादूरखान शर्थ करीत होता. शिपाईगिरी बरोबरच चातुर्याचीही शर्थ केली. एके दिवशी रात्री तो म्हणाला " किल्ल्याच्या एका बाजूला आपण हल्ला करणार म्हणून पुकारा करावा. तिकडे तोफा, दारुगोळा न्यावा. तोफखान्याचे माणसे, हशम, बाजारबुणगे यांनी गडबड करावी म्हणजे किल्ल्यातील माणसे तिकडे गोळा होऊन बंदोबस्त करतील. त्याच वेळी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस यॊग्य जागेवरून शे-दोनशे शूर शिपाई जे किल्ले चढण्यात पटाईत असतील त्यांनी गुचूप जावे. त्यांच्याकडे हल्ला करण्याचे सामान वा मशाली वगैरे उजेड पाडणाऱ्या वस्तू असू नयेत. त्यांनी सापाप्रमाणे जाऊन दोराच्या सहाय्याने किल्ल्यात पोहोचावे".

पण किल्लेदाराला बहादुरखानाचा हा बेत समजला. त्याने युक्ती केली. त्याने ठरवले की ज्या बाजूला मोगल मोठी गडबड करतील तेथे आपणही शिपायांना गोळा करावे आणि नगारे - नौबती - कर्णे यांचा घोष करावा. मोगलांवर वरून दगड, तेलाने माखलेले कपडे पेटवून वरून टाकावेत आणि ज्या जागी बहादुरखानाची माणसे गुपचूप चढून येतील तेथे शूर, निवडक, सर्व प्रकारची शस्त्रे घेतलेल्या शिपायांनी दबा धरून बसावे. त्यांनी कोणताही आवाज करू नये. अशारितीने मराठे त्या आगंतुक पाहुण्यांची (मिहानेंना ख्वान्दा) म्हणजे मोगलांची वाट पहात बसले.मोगलांची दोन माणसे ठरल्याप्रमाणे गुपचूप वर चढली. त्यांची डोकी दिसताच किल्ल्यातील सैनिकांनी आपल्या प्राणघातक शस्त्रांनी इतका जोराचा आघात केला की त्यांचे डोळेच बाहेर आले. मोगल मोठ्या कष्टाने वाट चढून वर आले होते. ते तिकडेच फेकले गेले. इतर माणसे जी त्यांच्यामागोमाग चढत होती, ती पण वरून पडणाऱ्या माणसांबरोबर खाली पडली. अशारितीने शौर्य थकले, चातुर्याने हात टेकले. रामसेज मात्र अढळ राहिला. 

सर्व उपाय थकले की मनुष्यप्राणी देव देवस्की, जादू टोणा अश्या मार्गांचा अवलंब करतो. ६ महिने झाले, भरपूर युद्धसाहित्य खर्ची पडले, दोन मातबर सरदारांच्या शक्ती, युक्तीची शर्थ झाली. आतातरी कोणत्याही परिस्थितीत चुटकीसरशी रामसेज ताब्यात यावा म्हणून बहादूरखानाने जादू टोण्याचा प्रयोग करून बघितला आणि स्वतःची बेअब्रू करून घेतली.

एके दिवशी बहादुरखानाचा मोतद्दार म्हणाला "भुते वंश करण्यात मी पटाईत आहे. १०० तोळे वजनाचा एक सोन्याचा नाग तयार करा. तो माझ्या हाती द्या आणि हल्ल्याच्या वेळी मला आघाडीवर ठेवा. मी तंत्र-मंत्राच्या मदतीने भूताना वश करेन आणि ह्या भुतांच्या मदतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतीही अडचण न येत जाऊ शकेन अशी मला आशा आहे. खानजहानने तसा सोन्याचा नाग तयार करून मोतद्दारला आघाडीवी ठेवले आणि हल्ला केला. तो मोतद्दार अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचला. इतक्यात किल्ल्यावरून गोफणाचा एक गोळा येऊन त्याच्या छातीवर इतक्या जोरात आदळला की मोतद्दाराच्या हातून तो सोन्याचा नाग उडाला आणि मोतद्दार खाली कोसळून पडला. बहादुरखानाचा हाही प्रयत्न व्यर्थ गेला. या घटनेआधी बहादूरखान किल्ला जिंकण्यासाठी इतका आशावादी होता की त्याने औरंगजेबाला एक मुचलका लिहून दिला होता. "रामसेजला वेढा दिला आहे. बादशाही सुदैवाने तो लवकरच जिंकून बादशाही अमलाखाली आणण्याची आशा करतो." पण मोगलांचे इतके सुदैव नव्हते.

ऑक्टोबर १६८२ - आपल्या दूधभावाच्या अचाट कर्तृत्वाच्या सुरस कथा औरंजेबास समजत होत्या. शेवटी बादशहाने बहादुरखानास वेढा उठवण्याची आज्ञा केली. बहादूरखानाने विनंती केली "मला अजून एका आठवड्याची मुदत मिळाली तर मी किल्ला बादशाही अमलाखाली आणेन." पण औरंगजेबाने याकडे बिलकुल लक्ष दिले नाही आणि बहादुरखानास रणमस्तखानाच्या मदतीस तळकोकणाच्या मोहिमेवर जाण्याची आज्ञा केली. सारांश बहादुरखानाने खूप शर्थ केली पण काही फळास आले नाही. बादशहाच्या आज्ञेनुसार तो वेढा उठवून निघाला. मोगलानी मोर्चे बांधणीसाठी आणि किल्ल्यावर चढण्याची साधने तयार करण्यासाठी खूप लाकडे जमविली होती. निघायच्या आधी बहादूरखानाने या लाकडांना गवत व पेंढा भरून आग लावून दिली. यावेळी किल्ल्यातले मराठे तटावर जमले होते आणि नगारे, चौघडे वाजवीत होते. ते तोंडाने जे म्हणत होते ते उच्चरण्यासारखे नव्हते. अश्या नामुष्कीची पाळी बहादुरखानावर आली. त्यांनतर कासिमखानाने वेढ्याचे काम परिश्रमाने पुढे रेटले पण काही पार पडले नाही. शेवटी बादशहाने वेढ्याचे काम तहकूब केले.

एका सामान्य किल्ल्याच्या मोहिमेसाठी मोगलानी मातबर सेनानी, प्रचंड दारुगोळा, खजिना ओतला. जेव्हा डिसेंबर १६८२ मध्ये या मोहिमेच्या सरकारी खर्चाची मोजणी झाली तेव्हा तो रोख व जिन्नस मिळून रुपये ३७,६३० इतका झाल्याचे बादशहास समजले. शहाबुद्दीनखान, बहादूरखान, कासीमखान, मुहंम्मद खलील, बुंदेले, करणसिंह असे कसलेले सेनापती पाठवले. पण कुणीही यशस्वी झाला नाही. याउलट मोजक्याच शिबंदीने, अपुऱ्या साहित्यानिशी, कमी शस्त्रांनिशी केवळ लाकडी तोफा, कातडी, गोफणी, तेलाची पेटती कापडे, दगड धोंड्याना आपली शस्त्र बनवून अतिशय युक्तीने रामसेजच्या किल्लेदाराने किल्ला लढवत ठेवला. संभाजी राजांचे रामसेज वेढयाकडे लक्ष होतेच. रुपाजी भोसले, मानाजी मोरे यांना ससैन्य वेढ्यात व्यत्यय आणण्यासाठी त्यांनी पाठवले होतेच. तसेच त्रिंबकगडावरून केसो त्रिमल रामसेजला युद्धसाहित्य रसद पुरवत होता. बादशहाने वेढ्याचे काम तहकूब केले थांबवले नव्हते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठे एक तोफ त्रिंबकगडावरून रामसेजला नेत असताना मुघलांनी पकडली. 

पुढे १६८४ पर्यंत रामसेज किल्ला जिंकण्याचे मोगलांचे प्रयत्न सुरूच होते. डिसेंबर १६८४ मध्ये मराठ्यांची फौज रामसेजजवळ जमली होती. हे कळताच नाशिकहून इकरामखानाने मराठ्यांबरोबर मुकाबला केला. यात मोगल विजयी झाले. अश्याप्रकारे रामसेजभागात अनेक चकमकी होत होत्या. रामसेज मात्र अढळ राहिला तो थेट १६८७ पर्यंत. रामसेजच्या किल्लेदाराने वेढा परतवून लावला म्हणून संभाजी राजांनी त्याचा खिलतीचा पोशाख, रत्नजडित कडे आणि नगद रक्कम पाठवून गौरव केला. त्याचे श्रेष्ठत्व समजून घेऊन त्याची आपल्या प्रमुख किल्ल्याच्या रक्षणार्थ बदली केली. रामसेजवर दुसरा किल्लेदार आला. 

त्यानंतर मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान याने त्या भागातील अब्दुल करीम या जमीनदारामार्फत रामसेजच्या नवीन किल्लेदाराला फितूर करून घेतले आणि अखेर मे १६८७ मध्ये तब्ब्ल पाच वर्षांच्या झुंजीनंतर, शहाजहान बादशहाचा शकुनाचा ठरलेला परंतु औरंगजेबास या शकुनाच्या किल्ल्यावर "प्रथमग्रासे मक्षिकापात:" या न्यायाने अपशकुन झालेला किल्ले रामसेज मोगलांच्या ताब्यात गेला.

"स्वराज्याच्या रक्षणास साडेतीनशे किल्ले आहेत. एक दिवस खासा औरंगजेब दक्षिणेत हे राज्य जिंकायला येईल. त्यावेळी माझा एक एक किल्ला एक एक वर्ष भांडेल. औरंगजेबास दक्षिण जिंकायला साडेतीनशे वर्षांचे आयुष्य लागेल." छत्रपतींचे हे उद्गार रामसेजने खरे करून दाखवले. भविष्यात औरंगजेबाने फितुरीचे अस्त्र बाहेर काढून, काही अपवाद वगळल्यास, स्वराज्यातले अनेक किल्ले ताब्यात घेतले.

या संपूर्ण धामधुमीच्या कालावधीत औरंगजेब प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठ्यांचे स्वराज्य जिंकू पाहत होता त्यासाठी अगणित खजिना, प्रचंड सैन्य खर्च करीत होता. नाशिक-बागलाण, कल्याण, कोकण, रायगड, औरंगाबाद, चांदा, बीदर, फलटण एवढ्या विस्तृत प्रदेशात चढाई करणाऱ्या बादशहाचा सामना संभाजीराजांनी अश्या विलक्षण हिमतीने केला की याची कोणतीच फळे बादशहास मिळाली नाहीत. उलट अनेक ठिकाणी मराठ्यांनी मोगलास गाठून त्यांचा फन्ना उडविला. 

संभाजीचे राज्य जिंकणे वाटले होते तेवढे सोपे नाही याची जाणीव बादशहाला झाली. १६८३ मध्ये तो इतका हतबल झाला की अल्प काळ मराठ्यांच्या पिशाच्च भूमीतून निघून जावे असाही विचार तो करत होता. परंतु संभाजी समोर ठासून उभा राहण्यास कुणी तयार होईना. बादशहाचे दोन्ही शहजादे मुअज्जम व आज्जम रक्ताचे पाणी करत होते आणि संभाजीराजांच्या समशेरीचा पाणी जोखत होते. तर तिसरा शहजादा अकबर संभाजीराजांच्या समशेरीच्या म्यानात अडकला होता. सर्व सरदारांना संभाजीराजांनी वेडे केले होते तर बादशहा बेचैन झाला होता. किती हे खालील इंग्रजांच्या पत्रावरून समजून येईल. ३० जुलै १६८२ (जुलिअन दिनांक) च्या पत्रात कारवारकर इंग्रज सुरतकरांना लिहितात "मोगल बादशाह संभाजीविरुद्ध इतका चिडला आहे की त्याने आपल्या डोक्यावरची पगडी ('किमॉंश') खाली उतरवली आणि संभाजीचा पाडाव करेपर्यंत त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती (डोक्यावरची पगडी म्हणजेच 'किमॉंश') डोक्यावर घालणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आहे"

छत्रपतींच्या पश्चात औरंगजेबाच्या या अजस्त्र आक्रमणास तोंड देण्यात अग्रेसर असणाऱ्या संभाजीराजे आणि हंबीरराव या सेनानायकांच्या विजिगिषु वृत्तीचेच दर्शन घडते. संभाजीपुढे आपला इलाज चालत नाही हे पाहून बादशहा नाराज झाला. इतक्या जय्य्त तयारीनिशी येऊनसुद्धा एकही निर्णायक विजय त्यास मिळाला नाही. त्याचा खर्चही फार वाढला. तेव्हा त्याने १६८५ च्या सुमारास आपले लक्ष विजापूर - गोवळकॊंड्याकडे केंद्रित केले आणि ही मोगलांच्या आक्रमणाची पहिली धार संभाजीराजांनी पार बोथट करून टाकली!


लेखक : राहुल भावे 

दिनांक : २१ मे २०१७.
सन्दर्भ : 

१. ज्वलज्वलनतेजस संभाजी राजा - डॉ सदाशिव शिवदे 
२. रणझुंजार - डॉ सदाशिव शिवदे
३. मराठी रियासत खंड २ - गो.स.सरदेसाई 
४. शिवपुत्र संभाजी - डॉ सौ कमल गोखले 
५. श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ - सेतू माधवराव पगडी 
६. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (छत्रपती संभाजी) - श. श्री. पुराणिक 
७. भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची - पराग लिमये

3 comments:

  1. राहुल, लेख अतिशय सुंदर झाला आहे. घटनांचे प्रवाही आणि गतिमानी वर्णन शब्दातून उतरल आहे. या माहितीपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन !

    ReplyDelete
  2. It's a very descriptive, informative and engaging write-up; a nicely flowing prose with a well built background that helps appreciate the significance of the events described. Kudos to the author for this historical account narrated in eloquent yet simple words.

    ReplyDelete
  3. रामशेजच्या लढाईचे यथार्थ वर्णन लेखात केले गेले आहे. सहज साध्या शब्दात गुंतागुंतीचा असा कालखंड उलगडून दाखवला आहे.

    ReplyDelete