किल्ले रायगडावर सर्वत्र आनंदी वातावरण होते. आजचा प्रसंगच तसा होता. फाल्गुन वद्य दशमी शके १६०१, १५ मार्च १६८० (ज्युलिअन दिनांक), आज छत्रपती शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम यांचे लग्न होते. वधू होती स्वराज्याचे माजी सरनोबत कैलासवासी प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी. सर्व सोहळा यथासांग पार पडला. पण महाराज आतून कुठेतरी खिन्न होते. या आनंदाच्या प्रसंगी स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हजर नव्हते. ते होते दूर पन्हाळ्यावर. साडे तीन वर्षापूर्वी १६७६ च्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर राजे दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाबाहेर पडले होते. संभाजीराजेही त्यांच्या समवेत बाहेर पडले व शृंगारपूर येथे रवाना झाले होते. गृहकलह टाळण्यासाठी महाराजांनी हे पाऊल उचलले होते. तेव्हापासून संभाजीराजे रायगडावर परतले नव्हते.
मधल्या काळात महाराजांची दक्षिणेची मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. महाराष्ट्रातील स्वराज्याइतकाच किंबहुना त्याहून जास्त मुलुख सुदूर कर्नाटक प्रांतात जिंजीपर्यंत काबीज झाला होता. ही मोहीम म्हणजे महाराजांच्या दूरदर्शीपणाचे समर्पक उदाहरणच होय. महाराज पूर्ण जाणून होते कि स्वराज्याचा खरा व अंतिम सामना औरंगजेबाशीच होणार. त्याच्या आक्रमणाला तोंड देताना यदाकदाचित माघार घ्यावी लागली तर आश्रयासाठी हक्काचा प्रदेश पाहिजे. कर्नाटकातील विस्तीर्ण व संपन्न मुलुख काबीज करून महाराजांनी तशी सोय करून ठेवली होती. पण या सामन्यापेक्षा मोठं द्वंद घरात सुरु होतं. युवराज संभाजी व महाराणी सोयराबाई यांच्यात गृहकलह सुरु होता. सोयराबाईची इच्छा होती कि त्यांच्या पुत्रास राजारामास गादी मिळावी. इकडे संभाजी राजे व मंत्रिमंडळातील काही जेष्ठ मंत्री यांच्यात खटके उडू लागले होते. तेही राजारामाचा पक्ष धरून होते. दक्षिण दिग्विजायावरून महाराज परत आले तेंव्हाही संभाजी राजे शृंगारपूर येथे वास्तव्य करून होते. त्यांना समर्थांचा उपदेश मिळावा याकरिता सज्जनगडावर रवाना केले गेले. पण तिथून समर्थांच्या अनुपस्थितीत संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले. याचा महाराजांना फार मोठा मानसिक धक्का बसला. हर प्रकारे यत्न करून व शेवटी संभाजी राजांना उपरती होऊन वर्षभराच्या अंतराने संभाजी राजे स्वराज्यात परतले. विजापूर जवळच्या जंगलातील मोगली छावणीतून निसटून ते स्वराज्यात पन्हाळ्यावर दाखल झाले (डिसेंबर १६७९). महाराजांना अतिशय आनंद झाला व ते समाधान पावले. उभयतांची भेट पन्हाळगडावर झाली (फेब्रुवारी १६८०). स्वराज्याच्या पुढील वाटचालीबाबत पितापुत्रांमध्ये काही बोलणी झाली. राजारामाची मुंज व लग्न या कार्यांसाठी राजे रायगडी परतले होते. वाटेत येताना त्यांनी सज्जनगडी समर्थांचे आशीर्वाद घेतले.
पण नियतीच्या मनात काही औरच होते. या लग्नानंतर काही दिवसांनी सूर्यग्रहण होते. त्यानंतर दोन तीन दिवसातच महाराज आजारी पडले. आजार बळावत गेला. विषमज्वर व रक्तातीसार यामुळे महाराज अंथरुणासखिळले व चैत्री पौर्णिमा, हनुमान जयंती शके १६०२, ३ एप्रिल १६८० (ज्युलिअन दिनांक) या दिवशी दोन प्रहरी दुपारी बाराच्या सुमारास महाराजांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचे सूर्यग्रहण आता संपूर्ण स्वराज्याला लागले होते. महाराजांचे निधन वयाच्या पन्नासाव्या वर्षी तसे अकालीच होते. स्वराज्याच्या पुढील व्यवस्थेबाबत काही स्पष्ट निर्देश नव्हते. रायगडावर मोठा गंभीर प्रसंग उद्भवला होता. वारसाने, कायद्याने, धर्माने जेष्ठ पुत्र म्हणून युवराज संभाजी राजांचा गादीवर हक्क होता. युवराज पन्हाळ्यावर होते तर सेनापती हंबीरराव मोहिते कराडजवळ होते. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे व सचिव अण्णाजी दत्तो हे देखील गडावर नव्हते. महाराजांचे अंत्यविधी त्यांचे चुलते साबाजी भोसले यांनी केले. काही दिवसांनी मोरोपंत व अण्णाजी दत्तो गडावर परतले. गडावरील काही जेष्ठ व मातब्बर मंडळी यांचा संभाजी राजांना विरोध होता. सर्वांनी एकमताने निर्णय घेउन राजारामाला ‘राजा’ म्हणून घोषित केले. पुढे २१ एप्रिल १६८० (ज्युलिअन दिनांक) रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राजारामांचे ‘मंचकारोहण’ झाले. तत्पूर्वी रायगडावर असा कट शिजला कि पन्हाळ्यावर संभाजी राजांना अटक करायची व तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी बाहेर फुटू द्यायची नाही. या कटात सेनापती हंबीरराव मोहिते आपल्याच बाजूने असतील असा त्यांचा कयास होता. कारण ते सोयराबाईचे बंधू व राजारामाचे सख्खे मामा होते. त्याप्रमाणे संभाजी राजांना खुशालीची पत्रे रवाना झाली व पन्हाळ्याच्या किल्लेदाराला विशेष जासुदामार्फात वेगळे पत्र रवाना झाले कि पुढील आज्ञा मिळेपर्यंत संभाजी राजांना गडावरून खाली उतरू दिले जाऊ नये.
पण इकडे संभाजी राजांकडे ही निधनाची बातमी पोहोचलीच व त्यांना कटाचा देखील सुगावा लागला. त्यांनी पन्हाळ्यावर स्वताला ‘राजा’ म्हणून घोषित केले. आता या शह काटशहामध्ये सेनापतींची भूमिका निर्णायक ठरणार होती. त्यांनी आपला कौल संभाजी राजांच्या पदरात टाकला कारण संभाजी राजे हे प्रजेत व खासकरून लष्करात अत्यंत लोकप्रिय होते. संभाजी राजांनी दमदार पावले टाकायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी पन्हाळ्याचा किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर (मुरारबाजींचा नातू) व इतर मंडळींना अटक करून गडाचा ताबा घेतला. सैन्याची जमवाजमव सुरु केली. विविध सरदार त्यांना येऊन मिळू लागले. तिकडे राजारामांच्या मंचकारोहणानंतर रायगडावरून निघालेले मोरोपंत व अण्णाजी दत्तो यांना वाटेत कराड इथे हंबीरराव मोहित्यांनी अटक केली व पन्हाळ्यावर हजर केले. हळूहळू संभाजी राजांचा जम बसला. ते पन्हाळ्याहून निघाले. प्रतापगडावर जाऊन त्यांनी भवानी देवीचे आशीर्वाद घेतले व जून १६८० मध्ये ते रायगडावर दाखल झाले, कोणताहि विरोध न होता रायगड सहज त्यांच्या ताब्यात आला. त्यांनी कटात सामील असलेल्या सर्व व्यक्तींना अटकेत टाकले व राजारामांना नजरकैदेत ठेवले जेणे करून त्यांच्या संगनमताने अधिकारी वर्गाने पुन्हा काही गडबड करू नये. रायगडावर आल्यावर महाराजांचे विधी संभाजी राजांनी पुन्हा एकदा शास्त्रवत करून घेतले. ते समयी २७ जून १६८० (ज्युलिअन दिनांक) रोजी पुतळाबाईसाहेब सती गेल्या.
पुढे २० जुलै १६८० (ज्युलिअन दिनांक) रोजी नागपंचमीच्या मुहूर्तावर संभाजी राजांचे ‘मंचकारोहण’ झाले. याप्रसंगी त्यांनी रायगडावरील सर्व संपत्तीची मोजदाद करून घेतली. या ‘मंचकारोहण’ निमित्ताने आप्त व मुत्सद्दी मंडळींच्या विनंतीवरून अटकेतील सर्वांना सोडून देण्यात आले, तसेच सर्व प्रधानांना त्यांचे पूर्वीचे हुद्दे व दर्जा कायम करण्यात आला. ऑक्टोबर १६८० मध्ये मोरोपंतांचे निधन झाले. त्याजागी त्यांचा पुत्र निळोपंत यास पेशवाई दिली गेली. संभाजी राजांनी या निमित्ताने खूप दानधर्म केला. त्यांचे राजापूरच्या बाकरे शास्त्री यांस दिलेले संस्कृत दानपत्र याच कालखंडातील आहे. तसेच प्रतापगडच्या भवानीला शृंगारलेला हत्ती व वीस हजार होनांचे दान दिले व चाफळच्या रामनवमी उत्सवासाठी उत्पन्न लावून दिले गेले. केळशीच्या याकुब बाबांच्या दर्शनासाठीही ते जाऊन आले.
दिनांक १४ जानेवारी १६८१ (ज्युलिअन दिनांक), माघ शुद्ध सप्तमी शके १६०२ ये दिवशी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी पूर्वीचेच अष्टप्रधानमंडळ कायम ठेवले. केवळ अण्णाजी दत्तो यांना सचिव पदाऐवजी मुजुमदार हे पद दिले. त्याचबरोबरीने कवि कलश यांच्या साठी ‘छंदो गामात्य’ हे पद निर्माण करण्यात आले. तत्पूर्वी दक्षिणेत जिंजीचे कारभारी रघुनाथपंत हणमंते यांना कैद केली गेली व त्या प्रांताचा कारभार शिवाजी महाराजांचे जावई व संभाजीराजे यांचे मेहुणे हरजीराजे महाडिक यांना सोपविला गेला. त्यांच्या बरोबरीने शामजी नाईक पुंडे यांचीही रवानगी दक्षिणेत केली गेली. अशाप्रकारे शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वर्षभराच्या आतच महाराष्ट्रातील सत्तांतर पूर्ण झाले. संभाजी महाराजांनी वयाच्या २३-२४ व्या वर्षी अत्यंत सावधपणे पण अतिशय धोरणीपणाने एकेक खंबीर पाऊल टाकून संपूर्ण राज्यकारभार सुरळीतपणे हाती घेतला. यात त्यांना विरोध करणाऱ्यांना त्यांनी अटकही केली पण पुढे उदार मनाने त्यांना क्षमा करून त्यांची सुटका देखील केली. इतकेच नव्हे तर त्यांची पूर्वीची पदेही त्यांना सन्मानपूर्वक बहाल केली. या संपूर्ण कालखंडात स्वराज्याच्या कारभारात कुठेही ढिलाई पडली नव्हती. सर्वत्र चोख बंदोबस्त होता. अशातच उंदेरी किल्ल्यावर सिद्दीचे लोक हालचाली करत होते. मुंबईतील इंग्रज त्यांना मदत करत होते. एका रात्री मराठ्यांच्या २०० सैनिकांच्या तुकडीने रातोरात उंदेरीवर हल्ला चढवला आणि सिद्दी व इंग्रज या दोघांनाही वठणीवर आणले.
या सबंध कालखंडात औरंगजेब उत्तरेत रजपुतांविरुद्धच्या मोहिमेत गुंतला होता. महाराष्ट्रात मोगल आघाडीवर शांतता होती. औरंगाबादेत बहादूरखान हा सुभेदार होता. पण मराठ्यांविरुद्ध त्याच्या विशेष हालचाली नव्हत्या. या निमित्ताने संभाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला, तो म्हणजे बुऱ्हाणपूरवर हल्ला करायचा. बुऱ्हाणपूर हे खानदेश सुभ्याचे राजधानीचे ठिकाण होते. तापी नदीच्या किनारी हे सुंदर शहर फारुकी नवाबांनी वसविले होते. जवळच अशिरगड हा बुलंद किल्ला होता. हे शहर म्हणजे दख्खनचे प्रवेशद्वार होते. अकबराने संपूर्ण उत्तर हिंदुस्थान काबीज केला व आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याने बुऱ्हाणपूर जिंकून दख्खनेत चंचूप्रवेश केला होता. पुढे शहाजहानच्या कालखंडात संपूर्ण दख्खन पठार मोगल साम्राज्याला जोडले गेले. बुऱ्हाणपूर शहराच्या वेशीबाहेर नवाबपुरा, बहादूरपुरा, करणपुरा, खुर्रमपुरा, शहाजंगपुरा असे वेगवेगळे सतरा पुरे वसविले होते. त्यातील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता. सोने, चांदी, हिरे, मोती, दागदागिने, जड’जवाहिरे, उंची वस्तू, वस्त्रे, अत्तरे आदीच्या श्रीमंत व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. सर्व सतरा पुऱ्यामध्ये श्रीमंती, ऐश्वर्य ओसंडून वाहत होते. बुऱ्हाणपूरला खानजहान हा सुभेदार होता व काकरखान अफगाण हा त्याचा सहायक अधिकारी होता.
३० जानेवारी १६८१ (ज्युलिअन दिनांक) रोजी हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरावर अचानक झडप घातली. सुभेदार खानजहान हा औरंगाबादेत मुक्कामाला होता. काकरखानाकडे २०० माणसांनिशी बुऱ्हाणपूराच्या रक्षणाची जबाबदारी होती. समोर मराठ्यांची सेना होती वीस हजारांची. मराठ्यांनी पहिला छापा थेट बहादूरपुऱ्या वर घातला. तेथील दुकानातील लक्षावधी रुपयांचा माल मराठ्यांच्या हाती आला. छापा इतका अनपेक्षित होता कि पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैदेखील हलवता आली नाही. पुऱ्यात आगी लावण्यात आल्या. त्याचा धूर वरपर्यंत गेल्यावर शहरात पत्ता लागला कि मराठ्यांचा हल्ला झाला आहे. ताबडतोब शहराचे दरवाजे बंद केले गेले. दुसरा पर्यायच नव्हता. २०० माणसे वीस हजार फौजेचा मुकाबला कुठून करणार? एकेक करत मराठ्यांनी सर्व सतरा पुरे यथेच्छ लुटले. तीन दिवसांपर्यंत हि लुट सुरु होती. शहरातून प्रतिकार असा झालाच नाही. मराठ्यांनी वेशीला शिड्या लावून शिरण्याचा प्रयत्न केला पण हा हमला कारीगर झाला नाही. खबर मिळताच खानजहान औरंगाबादेहून त्वरित निघाला, पण तो मराठ्यांना गाठू शकला नाही. मराठे चोपड्यामार्गे चार पाच दिवसातच साल्हेरकडे निघून गेले. सोबत प्रचंड लुट होतीच.
बुऱ्हाणपूरचे प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला, मौलवी, विद्वान यांनी बादशाहाला विनंती केली कि ‘काफारांचा जोर झाला. आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट झाली. यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल’ यावर बादशाहने खानजहानला चिडून पत्र लिहून पाठविले कि ‘दक्षिणच्या काफरांचा बीमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे’ औरंगजेबाने खानजहानला बुऱ्हाणपूरच्या सुभेदारीवरून हटविले व ईरजखान यास नेमले. यानंतर मराठ्यांची वक्रदृष्टी पडली ती औरंगाबादेवर. औरंगाबाद हि मोगलांच्या दख्खनच्या सहा सुभ्यांची राजधानी होती. हे शहर स्वतः औरंगजेबाने वसविले होते. इथला सुभेदार होता औरंगजेबाचा मावस भाऊ खानजहान बहादूरखान कोकलताश. शिवाजी महाराज यास पेंडीचा गुरु म्हणून संबोधत. याचा मुक्काम यावेळी शहरापासून ३२ मैलांवर बाभूळगावं इथे होता. फेब्रुवारी १६८१ मध्ये मराठ्यांची एक तुकडी अचानक औरंगाबादेवर चालून आली. शहराच्या बंदोबस्तावर राजा अनुपसिंह होता. पण मराठ्यांच्या दहशतीमुळे त्याचे मराठ्यांवर चालून जाण्याचे धाडसच झाले नाही. मराठ्यांनी लुटालूट सुरु केली. बहादूरखान येईतोवर मराठ्यांनी हाती येईल तितकी लुट गोळा करून माघार घेतली. मार्च-एप्रिल १६८१ मध्ये मराठ्यांचा मोर्चा वळला सोलापूरजवळील नळदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठ्यांनी लुटला. किल्लेदाराने निकराची झुंज दिली. बहादूरखानाने रणमस्तखानास मराठ्यांवर पाठविले. नळदुर्गपासून ६ मैलांवर दोन्ही सैन्याची गाठ पडली. लढाईत बरेच सैनिक कामी आले. किल्ल्यातील बराच दारुगोळा नष्ट करण्यात मराठ्यांना यश आले. संभाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध मोठी आघाडी विस्तृत प्रदेशावर उघडली. तिकडे रजपूतमोहिमेत राजस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा औरंगजेबाचा इरादा होता. उदयपुरचे राज्य खालसा करण्याच्या कामी त्याने शहजादा अकबर यास नेमले. मारवाडचा राणा जसवंतसिंह राठोड हा पेशावर इथे मोहिमेवर असताना वारला. त्याचा मुलगा अजितसिंह हा अल्पवयीन असल्याच्या सबबीवर औरंगजेबाला हे राज्य खालसा करायचे होते. त्याने आपल्या मर्जीतील इंद्रसिंह यास राणा म्हणून घोषित केले. पण जसवंतसिंहाचे कुटुंब व प्रजा यांचा त्याला विरोध होता. जसवंतसिंहाच्या दिवाणाचा मुलगा दुर्गादास राठोड याने अजितसिंहास मोगलांच्या तावडीतून सहीसलामत वाचवून जोधपुर इथे आणले. जसवंतसिंहाच्या राणीने अजितसिंहास गादीवर बसविले व सर्व जबाबदारी दुर्गादास राठोडवर सोपविली. याच काळात औरंगजेबाने हिंदुंवर जिझिया कर लावला त्याविरोधात सर्व रजपूत राजे एकत्र होऊन उदयपूरचा राणा राजसिंहाच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाशी लढाईस तयार झाले. औरंगजेब जातीने हे बंड मोडून काढत होता. याकामी त्याचे पुत्र शहाआलम, मुअज्जम, अकबर, हे त्यास मदत करत होते.
औरंगजेबाने शहजादा अकबर यास उदयपूरच्या मोहिमेवर मुक्रर केले. सोबत चाळीस हजाराची मनसब दिली. पण रजपुतांनी अकबराशी संधान बांधून हा डाव उलटविला. त्यांनी अकबराच्या मनातील सुप्त इच्छेस खतपाणी घातले व त्याजकडे उलट प्रस्ताव पाठविला कि आम्ही तुला बादशाह करतो व तुला सहाय्य करून आपण एकत्र होऊन औरंगजेबाचा खातमा करूयात. पूर्वी अकबर बादशाहने राजपुतांशी चांगले संबंध ठेवले होते तसेच तुम्हीही ठेवा व त्याबदल्यात आम्ही तुला मदत करतो. या सर्वात प्रमुख होता तो दुर्गादास राठोड. शहजादा अकबराने आपल्याच बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले व स्वतःची नाणी पाडून घेतली. हा घटनाक्रम आहे जानेवारी १६८१ चा. यावेळी अकबराचा प्रमुख सरदार होता तहव्वूरखान. याच्या जीवावरच अकबराने इतकी मोठी मजल मारली. आता अकबर रजपुतांच्या मदतीने औरंगजेबावर चालून गेला. पण या प्रवासात त्याने निष्कारण दिरंगाई केली व त्या अवधीत औरंगजेबाला सैन्य गोळा करता आले. अजमेरजवळ दोन्ही सैन्य समोरासमोर ठाकली होती. पण एकंदर रजपूत व अकबराचा जोर जास्त होता. त्यापुढे औरंगजेबाचा निभाव लागणे कठीण होते. जर अकबराने त्वरित पूर्वीच कारवाई केली असती तर अत्यंत तुटपुंज्या सैन्यामुळे औरंगजेबाचा पराभव कधीच झाला असता.
समोरासमोरील लढाईत औरंगजेबाचा निभाव लागणे कठीण होते. त्यामुळे त्याने कपटनीती हे आपले आवडते हत्यार बाहेर काढले. युद्धाच्या आदल्या रात्री त्याने कूटनीतीचा लबाड डाव टाकला व युद्ध न करताच विजय मिळविला. त्याने तहव्वूरखानास पत्र पाठविले कि त्याने बादशहास येऊन मिळावे, त्याचे सर्व गुन्हे माफ होतील अन्यथा त्याच्या स्त्रियांची जाहीर विटंबना करण्यात येईल व त्याच्या मुलांना गुलाम म्हणून विकण्यात येईल. या पत्रामुळे तहव्वूरखान गोंधळला व अकबर आणि दुर्गादास यांना न कळवताच मध्यरात्री बादशहाच्या छावणीत दाखल झाला. थोड्याच वेळात त्याची गर्दन मारण्यात आली. त्याचवेळी औरंगजेबाने एक बनावट पत्र अकबराच्या नावाने लिहिले. पण ते पत्र अकबराच्या हाती न पडता रजपुतांच्या हाती पडेल अशी व्यवस्था त्याने केली, त्यात त्याने बंडाचे ढोंग करण्याबद्दल अकबराचे अभिनंदन केले व आपल्या पूर्वनियोजित योजनेनुसार रजपुतांना माझ्या तावडीत आणल्याबद्दल धन्यवाद दिले. आता उद्याच्या युद्धात तू राजपुतांना आघाडीवर ठेव म्हणजे समोरून माझ्या हल्ल्यामुळे व मागून तुझ्या हल्ल्यामुळे रजपूत चिरडले जातील. अशाने आपण आपला सूड उगवू व राजपुतांचा बिमोड करू. दुर्गादासाच्या हाती हे पत्र पडल्यावर तो तडक अकबराच्या भेटीस गेला. पण शहजादा अकबर यावेळेस गाढ झोपला होता व आपणास कोणी उठवू नये अशी सक्त ताकीद त्याने नोकरांना देऊन ठेवली होती. म्हणून दुर्गादासाने तहव्वूरखानास बोलावणे धाडले, जेणेकरून त्याच्याकडे जबाब मागता येईल. तो त्याला कळले कि तहव्वूरखान मध्यरात्रीसच बादशहाच्या छावणीत गेला आहे. सर्व प्रकार ध्यानात आल्यावर पहाटेपूर्वी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सर्व रजपूत सैन्य छावणी सोडून निघून गेले. जाताना त्यांनी अकबराची संपत्ती देखील लुटून नेली. सकाळी अकबर जागा झाल्यावर त्याचे धाबे दणाणले. रातोरात त्याचे सैन्य पसार झाले होते. काही सैन्य तहव्वूरखानामागे शाही छावणीत गेले होते. तुटपुंज्या सैन्यानिशी अकबरपण रजपुतांच्या मागोमाग गेला. अकबराच्या मागावर औरंगजेबाने शहाआलमला पाठविले. दुसऱ्या दिवशी दुर्गादासाला सर्व प्रकार ध्यानात आला व त्याने अकबराला आश्रय दिला. पण मोगलांनी अकबर व दुर्गादासाचा पाठलाग सुरूच ठेवला. आता दुर्गादासाला राजपुतान्यात सुरक्षित वाटत नव्हते, कारण मोगली फौज सर्वत्र पसरली होती. म्हणून त्याने निर्णय घेतला तो मराठ्यांकडे आश्रय मागायचा. कारण उभ्या हिंदुस्थानात मोगलांचा सामना करणारी एकच शक्ती होती ती म्हणजे मराठे.
अकबर व दुर्गादास यांच्या जवळ ४०० रजपूत स्वार व ५० उंट इतकाच सरंजाम होता. त्याने आडमार्गाने नर्मदा ओलांडली व तो बागलाणातून साल्हेर – नाशिक – त्र्यंबक मार्गे कोकणात उतरला. मराठ्यांशी संधान बांधून त्याला पाली गावानजीक सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी धोंडसे गावाजवळ एका खेड्यात आश्रय मिळाला. पुढे हेच गावं पातशहापूर किंवा पाच्छापूर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याची व्यवस्था भाताच्या पेंढ्याचे छप्पर, कुडाच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन अशा साध्या घरात करण्यात आली. संभाजीने त्याच्या रक्षणासाठी ३०० मावळ्यांची एक तुकडी तैनात केली. नेतोजी पालकर यांच्याकडे त्याची व्यवस्था होती. हिरोजी फर्जंद अकबराकडे नजराणा घेऊन गेले. जून १६८१ मध्ये अकबर पालीजवळ मुक्कामी आला.
संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठी राज्य स्थिरस्थावर झाले होते, तोच पूर्वीच्या गृहकलहाने पुन्हा एकदा डोके वर काढले. यावेळी संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना मस्त्यातून विष देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु एका लहान सेवकाने ते अन्न खाण्यापासून परावृत्त केले. ते अन्न एका नोकरास व कुत्र्यास घालण्यात आले. थोड्याच अवधीत ते दोघे मेले. या कटातील काही व्यक्तींना पंडित यांना बेड्या घातल्या गेल्या तर काही संशयित व्यक्तींना ठार मारण्यात आले.
यापुढे मजल मारली जाऊन संभाजी महाराजांना ठार मारण्याचा कट करण्यात आला. स्वराज्यातील काही मातब्बर व्यक्तींचा यात पुढाकार होता. या मंडळींनी अकबराशी संधान बांधून त्याला पत्र पाठविले कि आम्ही तुम्हास मिळतो. आपण संभाजीस ठार मारून राजारामास गादीवर बसवू. राज्याचा मोठा हिस्सा तुम्हास देतो तर आमच्याकडे लहान हिस्सा राहिल. हे पत्र म्हणजे अकबरास एक नामी संधी वाटली. त्याने दुर्गादासाचा सल्ला मागितला. दुर्गादासाला संशय आला कि संभाजीनेच आपली परीक्षा पाहण्यासाठी हे पत्र पाठवले असेल तर? कारण त्या वेळेपर्यंत संभाजीने अकबरास भेट दिली नव्हती. केवळ आश्रय दिला होता. कशावरून संभाजी आपली परीक्षा पाहत नसेल? एकंदर सारासार विचार करून दुर्गादासाने ते पत्र संभाजीकडे रवाना केले. कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराज भयंकर संतापले. त्यांनी कटात सामील असलेल्या सर्वांना देहांताची शिक्षा फर्मावली. त्याप्रमाणे काही व्यक्तींना पाली जवळील परळी व औंढ्या गावाजवळ ठार करण्यात आले तर काहींना हत्तीच्या पायी देण्यात आले. एकंदर २५ ते ३० लोकांना प्राण गमवावे लागले. हा सर्व प्रकार ऑगस्ट, सप्टेंबर १६८१ च्या दरम्यान घडला. २७ ऑक्टोबर १६८१ (ज्युलिअन दिनांक), अश्विन शुद्ध एकादशी ये दिवशी सोयराबाईचे रायगडावर निधन झाले व या गृहकलहावर कायमचा पडदा पडला.
झाल्या सर्व प्रकारचा संभाजी महाराजांना बराच पश्चाताप झाला. खासकरून महाराणी येसूबाईंनी त्यांची कानउघडणी केली. बाळाजी आवजी चिटणीस यांच्या मृत्यूबद्दल येसूबाई यांना बहुत कष्ट झाले. त्यांच्या मुलाचा खंडो बल्लाळाचा त्यांनी पुत्रवत सांभाळ केला व खंडो बल्लाळ यांनीहि अखेरपर्यंत स्वामीनिष्ठा दाखविली. कटात सामील बऱ्याच व्यक्ती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झाल्या होत्या. त्यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा वादातीत होती. परंतु पूर्व ग्रहांमुळे हा प्रकार घडला गेला असावा. शिवाय यातील कवि कलशाच्या वर्तणूकीबाबत फार कागदपत्रे उपलब्ध नाहीत. कदाचित त्यानेच हा बनाव घडवून या हत्या करविल्या असाव्यात असाही तर्क मांडता येतो. समर्थ रामदास स्वामींनी देखील संभाजी महाराजांना उपदेशपर पत्र पाठवले व त्यांना त्यांच्या अधिकाराची, कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यातील काही ओळी अशा
अखंड सावधान असावे | दुधित कदापि नसावे |
तजवीजा करीत बैसावे | येकांत स्थळी ||
काही उग्रस्थिती सांडावी | काही सौम्यता धरावी |
चिंता लागावी परावी | अंतर्यामी ||
मागील अपराध क्षमा | कारबारी हाती धरावे |
सुखी करून धाडावे | कामावरी ||
बहुत लोक मेळवावे | एक विचारे भरावे |
कष्ट करुनी घसरावे | म्लेंच्छावरी ||
आहे जितुके जतन करावे | पुढे आणिक मिळवावे |
महाराष्ट्रराज्यचि करावे | जिकडे तिकडे ||
शिवराजासी आठवावे | जीवित्व तृणसमान करावे |
इहलोकी परलोकी राहावे | कीर्तिरूपे ||
शिवराजांचे आठवावे रूप | शिवराजाचा आठवावा साक्षेप |
शिवराजाचा आठवावा प्रताप | या भूमंडळी ||
शिवराजाचे कैसे बोलणे | शिवराजाचे कैसे चालणे |
शिवराजाची सलगी देणे | कैसी आहे ||
सकळ सुखाचा त्याग | करूनि साधिजे तो योग |
राज्य साधावया लगबग | तैसी करावी ||
याहूनच करावे विशेष | तरीच म्हणावे पुरुष |
याउपरी आता विशेष | काय ल्याहावे ||
संभाजी महाराजांनी १३ नोव्हेंबर १६८१ (ज्युलिअन दिनांक) रोजी पातशहापूर येथे शहजादा अकबराची भेट घेतली. दुर्गादास राठोडहि यावेळेस उपस्थित होता. झाला प्रकार औरंगजेबरुपी नागाला डिवचण्यासारखा होता. बंडखोर मोगली शहजाद्याला आश्रय देऊन मराठ्यांनी मोगलांचे आक्रमण स्वतःहून ओढवून घेतले होते. अर्थात आज ना उद्या औरंगजेब दख्खनेत उतरणारच होता. ज्या दिवशी पालीजवळ हि भेट झाली योगायोगाने त्याच दिवशी औरंगजेब आपल्या पुत्राचा पाठलाग करीत करीत दख्खनचे प्रवेशद्वार असलेल्या बुऱ्हाणपूरात दाखल झाला. तिथे तीन महिने तळ ठोकून सर्व साहित्य व सैन्याची जुळवाजुळव करून २८ फेब्रुवारी १६८२ (ज्युलिअन दिनांक) रोजी त्याने बुऱ्हाणपूर सोडले व मजल दरमजल करीत तो २२ मार्च १६८२ (ज्युलिअन दिनांक) रोजी औरंगाबादेस पोहोचला व खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात डेरेदाखल झाला.
भावी काळात झडणाऱ्या प्रदीर्घ संघर्षाची हि जणू नांदीच होती. पुत्राचा पाठलाग करीत दक्षिणेत उतरणे हे एक तत्कालिक कारण होते. औरंगजेबाची संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान इस्लाममय करण्याची सुप्त इच्छा या निमित्ताने पूर्ण होणार होती. शिवाजी महाराज जिवंत असे पर्यंत औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला नव्हता. तो आपल्या सरदारांना पाठवीत असे. आता तो जातीने सर्व दक्षिणेवर मोगली वरवंटा फिरवण्यास उत्सुक होता. त्याच्या पाठीशी मोगलांचे बलाढ्य साम्राज्य होते. पश्चिमेस काबुल कंदाहारपासून पूर्वेस बंगाल आसामपर्यंत तर उत्तरेस काश्मिरपासून ते दक्षिणेस वऱ्हाड, औरंगाबादपर्यंत अवाढव्य भूप्रदेशावर त्याची हुकुमत होती. त्याच्या साम्राज्याचे बावीस सुभे होते. मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य त्याच्या एकेका सुभ्यापुढे टीचभर वाटावे असे होते. अगणित संपत्ती, शाही खजिना, संपन्न भूप्रदेशातून रसदीचा सातत्याताने येणारा ओघ, दारुगोळा, तीन लाख घोडदळ, चार लाख पायदळ, ५० हजार उंट, तीन हजार हत्ती, उत्कृष्ट तोफखाना, पाच लाख नोकर चाकर, व्यापारी, बाजार बुणगे अशी प्रचंड साहित्य संपदा त्याच्या हाताशी होती. औरंगजेब स्वतः, त्याचे तीन शहजादे, नातू, पणतू, शेकडो सरदार, दरकदार, मनसबदार, जहागीरदार, उत्तमोत्तम कसलेले रणनिपुण सेनानी यांची हि वावटळ सबंध महाराष्ट्रभर व दख्खनच्या पठारावर पसरणार होती.
या सगळ्याला धैर्याने तोंड देण्यासाठी दख्खनेत तेंव्हा कोण कोण होतं? खिळखिळी झालेली विजापूरची आदिलशाही, आपल्यातच मश्गुल झालेली गोवळकोंड्याची कुतुबशाही, दक्षिणेतील पाळेगार व नायक मंडळींची छोटी छोटी विखुरलेली राज्ये, सूरत व मुंबईत तग धरून राहणारे इंग्रज, जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने धमकावणारा मोगलांचा मांडलिक सिद्दी, गोवा व उत्तर फिरंगाणात धार्मिक उच्छाद मांडणारे पोर्तुगीज, पोंडीचेरीचे फ्रेंच आणि स्वतंत्र पण लढाऊ बाण्याचे मराठे. या मराठ्यांशीच औरंगजेबाचा मुख्य संघर्ष होणार होता. इतर शत्रू मोगली वावटळीसमोर पाल्यापाचोळ्यासारखे उडून जाणारे होते. पाय रोवून भक्कमपणे उभे राहणारे, जीवावर उदार होऊन लढणारे एकटे मराठेच होते. शहजादा अकबराला आश्रय देऊन मराठ्यांनी आपणहून हा रणसंग्राम ओढवून घेतला होता. कशाच्या बळावर मराठे हा लढा देणार होते? सैन्य, खजिना, साधन संपत्ती, दारुगोळा, रसद सर्वच बाबतीत औरंगजेब मराठ्यांच्या वरचढ होता. दोघात तुलना करणे हेच खुळेपणाचे लक्षण होते. पण मराठ्यांच्यापाशी होती जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, मातृभूमीचा अभिमान, प्रखर धर्माभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, मनाची अन मनगटाची ताकद, सह्याद्रीचा डोंगराळ, बिकट अन अवघड मुलुख, त्याआधारे खेळले जाणारे गनिमीकाव्याचे अद्वितीय युद्धतंत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मनामनात रुजवलेली, जागवलेली हिंदवी स्वराज्याची प्रेरणा...
या बळावर मराठे उभ्या जगाशी दावा मांडू शकणार होते. महाराष्ट्राच्या रंग-रणभूमीवर न भूतो न भविष्यति असे एक प्रदीर्घ व जगाच्या इतिहासात एकमेव ठरणारे रणनाट्य घडणार होते. सर्व पात्रांची सिद्धता झाली होती आणि काळरूपी नियती पडदा उघडण्याची वाट पाहत बसली होती........
लेखक: अमोल मांडके
दिनांक १० मे २०१७
संदर्भ:
१. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे
२. शिवपुत्र संभाजी – डॉ. सौ. कमल गोखले
३. छत्रपती संभाजी – एक चिकित्सा - डॉ. जयसिंगराव पवार
४. औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास – डॉ. जदुनाथ सरकार (अनुवाद – डॉ. ष. गो. कोनारकर)
नकाशे: उमेश जोशी
एवढा इतिहास छोट्या स्किनवर एका बैठकीत पाहणे, वाचणे आणि त्यातले बारकावे लक्षात राहणे अवघड वाटते. हा इतिहास ऐकायला मिळाला तर (ऑडिओ) जास्त समर्पक वाटेल. तो देखील एका पेक्षा अनेक लहान लहान प्रकरणांच्या स्वरूपात. उदा.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर यांची दैनंदिन प्रवचने. मानस शास्त्रा प्रमाणे मनुष्य सामान्यतः जास्तीत जास्त 4.5 मिनिटेच एकाग्रतेने ऐकू शकतो (effective hearing), तसेच वाचताना देखील 2 ए4 साईज मजकूर व्यवस्थित वाचून लक्षात ठेव शकतो.(effective reading). व्हिज्युअल संदेश मात्र तो २ तास पाहून व्यवस्थित ग्रहण करू शकतो.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद. आपण आमच्या channel वरील काही videos जरूर पाहू शकता.
Deletehttps://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खूप सुंदर आहे लेख ! सहसा या स्वातंत्र्यलढ्याविषयी फारसं लिखाण होत नाही. शिवछत्रपती महाराजांच्या नंतरचा आणि पेशवाई कालखंडाच्या आधीचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगणं खूप गरजेचं आहे, आणि हेच काम या ब्लॉगमार्फत हाती घेतलेलं पाहून आनंद झाला खूप.. मनापासून शुभेच्छा !!
ReplyDeleteवाह कौस्तुभजी आपल्यासारख्या अभ्यासाकाकडून आणि मोडी लिपी तज्ञा कडून झालेले कौतुक हि आम्हाला आणि आमच्या लेखकांना मिळालेली पावती आहे.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद.
मागे फेसबुकवरती लिहिताना मी म्हंटले होते - "१६३० ते १६८० म्हणजे "शिवाजी" नव्हे; तर १६८२ ते १७०७ म्हणजे "शिवाजी" "
ReplyDeleteऔरंगजेबाच्या आक्रमणामुळे एकंदरच भारताचे कल्पनेच्या बाहेर आर्थिक नुकसान झाले. औरंगजेबाच्या उत्तरकालीन राजकारणात बुंदेलखंड, राजपुताना, बंगाल, महाराष्ट्र, विजापूर, हैदराबाद ते अगदी जिंजीपर्यंतचा भाग हा युद्धजन्य आहे हे लक्षात घ्यायला हवे हा साधारण २० ते २५ वर्षांचा कालखंड आहे. एखादा देश आणि एखादा ठराविक प्रदेश इतका काळ युद्धजन्य राहिल्यास व्यापार, कला, गावगाडा मोडून पडतात. लेखमालिकेत आर्थिक आणि सामाजिक बाबींवरही प्रकाश टाकावा अशी विनंती.
या उपक्रमास मनापासून शुभेच्छा!
क्या बात है !! सुंदर.
ReplyDeleteWhat an excellent article! Amol dada has produced a really fine one here. An educative yet pleasurable read with lovely language accompanied by good illustrations by Umesh dada. A befitting opening for the blog. Thanks a lot for this.
ReplyDeleteउत्तम लेखन. महाराजांच्या मृत्यूनंतर उद्भवलेली परिस्थिती, आशा परिस्थितीतदेखील मराठ्यांच्या मनातील स्वराज्याप्रती असणारी आस्था, संभाजी महाराजांचे धारिष्ट्य, रामदासांचे मार्गदर्शन आशा सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून या लेखाचे केलेले लिखाण सर्वसामान्यांना नक्कीच समजेल असे आहे. अमोलदादा तुझे याकरिता नक्कीच आभार.. आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!
ReplyDelete