२ मार्च १७०० रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाविरुद्ध सुरु असलेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराचे तिसरे सत्र आरंभिले. आतापर्यंतच्या अनुभवावरून बादशहाचे आकलन झाले कि मराठ्यांचे मर्म त्यांच्या किल्ल्यांत आहे. ते जिंकून घेण्यासाठी एका प्रदीर्घ मोहिमेला सन १६९९ साली वसंतगड जिंकून सुरुवात झाली व सन १७०५ साली सहा वर्षानंतर राजमाची जिंकून याचा शेवट.
या सहा वर्षात बादशाहाने स्वतः जातीने वसंतगड, सातारा, पन्हाळा, विशाळगड, सिंहगड, राजगड व तोरणा, तर त्याच्या सरदारांनी परळी, वर्धनगड, चंदन–वंदन, सामानगड, भुदरगड, कलानिधीगड, लोहगड व राजमाची हे किल्ले जिंकले. अर्थात यातील फक्त तोरणा हा प्रत्यक्ष लढाई करून, हल्ला करून तलवारीच्या बळावर जिंकून घेतला गेला, बाकी सर्व वेढा घालून मराठ्यांशी बोलणी करून, त्यांना खंडणी रुपात पैसें देऊन ताब्यात घेण्यात आले.
सन १६८२ सालापासून सुरु झालेल्या या मोहिमेत पहिली सतरा वर्षे म्हणजे सन १६९९ पर्यंत मराठ्यांनी आपले दोन छत्रपती गमावले, औरंगजेबाने लागोपाठच्या दोन वर्षात कुतुबशाही व आदिलशाही या दोन मातब्बर शाह्या गिळंकृत केल्या, मराठ्यांनी साल्हेरी अहिवंतपासून जिंजी पर्यंतच्या विस्तृत प्रदेशात बादशाहाला चिवट झुंज दिली पण त्याच्या हाती म्हणावं असं घवघवीत यश मात्र आलंच नाही, त्यापासून तो अजून कोसो दूरच होता. त्यामुळेच त्याने आता निकराचे युद्ध आरंभिले व तो मराठ्यांच्या मर्मस्थानी घाव घालू लागला. पुढील सहा वर्षात त्याने मराठ्यांचे सोळा किल्ले मिळविले. यानिमित्ताने त्याने स्वराज्याच्या गाभ्यात प्रवेश केला होता. आपली सर्व शक्ती, सैन्य बळ, दारुगोळा, खजिना, रसद त्याने याकामी वापरण्यास सुरुवात केली. मोगलांच्या नेहमीच्या युद्धतंत्रामुळे हि मोहिम अर्थातच प्रचंड वेळखाऊ झाली. मोगलांच्या सुस्त हालचाली, प्रचंड लटांबर, ढिसाळ नियोजन मराठ्यांच्या पथ्यावरच पडत होते.
या मोहिमेमुळे इतकी वर्षे सर्वदूर सुरु असणारा लढा आता स्वराज्याच्या गाभ्यात शिरला पण त्याचा दुसरा परिणाम असा झाला कि इतरत्र असणारा मोगली दाब आता कमी झाला व याचा महाराणी ताराराणी यांनी फायदा उचलला. मराठे आता मुक्तपणे चौफेर संचार करू लागले. औरंगजेबास सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अडकवून ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे सैन्य तैनात करून मराठ्यांच्या इतर तुकड्या चौखूर उधळल्या गेल्या. त्यांच्या घोड्यांच्या टापांनी नवनवीन प्रदेश पादाक्रांत करण्यास सुरुवात केली.
इकडे औरंगजेब वसंतगड जिंकत असताना संताजी घोरपडे यांचा मुलगा राणोजी घोरपडे व भाऊ बहिर्जी उर्फ हिंदुराव घोरपडे कर्नाटक प्रांती घुसले व त्यांनी हुबळी परगणा जिंकला तर उत्तरेस कृष्णा सावंत या सरदाराने नर्मदा नदी पार केली व माळवा प्रदेशातील धामुनी या भागात धामधूम उडवून दिली. १६९९ च्या ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी प्रथमच नर्मदा नदी पार करून उत्तर हिंदुस्थानात प्रवेश केला. याच भागातून मोगलांना रसद, सैन्य, दारुगोळा, संपत्ती यांचा पुरवठा होत असे. मराठ्यांनी आता त्याच्यावरच घाव घालायला सुरुवात केली. औरंजेबासमोर जणू आभाळच फाटलं होतं व या उतारवयात तो तरी किती ठिकाणी ठिगळ जोडणार होता. इतकी वर्षे मोगल महाराष्ट्रापासून दख्खन व कर्नाटकप्रांती चढाई करत होते तर मराठे त्यांचा प्रतिकार करत होते. आता बाजी पलटली होती. नर्मदा पार करून उत्तर हिंदुस्थानच्या दूर दूर पर्यंतच्या प्रांतात मराठे संचार करू लागले. मराठ्यांच्या चपळ हालचाली, सुसूत्रता, नियोजनबद्धता, वेगवान घोडदौड यापुढे बादशहा व त्याचे सैन्य हतबल होऊ लागले.
१७०० साली औरंगजेब पन्हाळ्याच्या परिसरात असताना राणोजी घोरपडे यांनी गुलबर्ग्याकडे कूच केले. त्याच्या पाठलागावर फिरोजजंग याची नेमणूक झाली. पण मराठे दाद थोडीच देणार होते. वीस हजाराच्या फौजेनिशी आदिलशाही मुलुखात एकच धुरळा उडवून दिला. १७०१ मध्ये तर मराठ्यांनी दक्खनचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या बऱ्हाणपूरवर हल्ला चढवला. तेथे लुट करून तेथील नायब सुभेदार अलिमर्दानखान हैदराबादी याला कैद केले. प्रचंड खंडणीच्या बदल्यात मराठ्यांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर मराठ्यांची वक्रदृष्टी गोवळकोंड्यावर पडली. तिथल्या मोगली सुभेदाराने देखील खंडणीच्या बदल्यात आपली सोडवणूक करून घेतली. निकोलाय मनुची म्हणतो “आपण एखाद्या जिंकलेल्या प्रदेशात प्रवेश करावा त्याप्रमाणे मराठ्यांनी गोवळकोंड्यात प्रवेश केला. खंडणी दे नाहीतर सर्व नगर बेचिराख करू अशी धमकी त्यांनी तेथील सुभेदारास दिली. मराठ्यांच्या लष्करी सामार्थ्यासमोर शरण जाण्यावाचून त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. नगरच्या रक्षणार्थ भली मोठी खंडणी देऊन त्याला मराठ्यांना परत घालवावे लागले”. मराठ्यांची एक फौज वऱ्हाडात शिरली. मोगली सुभेदार प्रतिकार करू लागला तर तुंबळ युद्ध करून सुभेदारासच अटक झाली व अर्थातच खंडणीच्या बदल्यात सुटका.
१७०३ उजाडता उजाडता सेनापती धनाजी जाधव उत्तर कर्नाटकमध्ये मुलूखगिरी करत होते. तेथील फौजदार चिनकिलीजखान याच्यावर मराठे चालून गेले. खान मुदगलच्या किल्ल्यात लपून बसला. त्याच्या मदतीला झुल्फिकारखान आला. अर्थातच धनाजीसमोर त्यांची डाळ शिजली नाही. तिकडे फेब्रुवारी १७०३ मध्ये मराठ्यांची तीस हजाराची फौज गुजरातमध्ये शिरली. मराठे खानदेशातून तापी नदीच्या खोऱ्यातून सुरत जवळ आले. त्यांनी सुरत लुटली नाही पण आजूबाजूच्या प्रदेशास उपद्रव दिला. मराठ्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्याची हि पहिलीच वेळ.
पण यावर्षीची प्रमुख स्वारी हि माळव्यावर होती. नेमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पन्नास हजारांची फौज माळव्यावर चालून गेली. यात त्यांच्या मदतीस केशव त्रिमल पिंगळे, परसोजी भोसले, पवार घराण्यातील काळोजी पवार व संभाजी पवार हे बंधू व त्यांचे चुलते केरोजी पवार व रायाजी पवार हे नामांकित सरदार होते. मराठे प्रथम वऱ्हाडात शिरले. तेथील सुभेदार गज़िउद्दिन फिरोजजंग याचा नायब रुस्तुमखान विजापुरी हा एलीचपूरहून मराठ्यांवर घाव घालण्यासाठी आला. मराठ्यांनी त्याचे दोन हजार सैनिक कापून काढले तसेच त्याचा जावई ठार केला. त्याच्याकडून भरपूर खंडणी वसूल करून त्याला मुक्त केले. यानंतर मराठे नर्मदा ओलांडून माळव्यात घुसले. त्यांनी फौजेचे द्विभाजन केले. एक तुकडी उज्जयिनीवर चालून गेली, तर दुसरी सिरोंजला वेढा घालण्यास गेली. मराठे नरवर ते सिरोंज दरम्यान कालाबागेपर्यंत गेले. त्यांनी सिरोंज लुटले. इकडे माळव्याचा सुभेदार शाहिस्तेखानाचा मुलगा अबूनसरखान हा होता. मराठ्यांची चाहूल लागताच तो किल्ल्यात दडी मारून बसला. काही प्रतिकारच केला नाही. जवळ मांडवगड हा किल्ला आहे. तेथील किल्लेदार नवाजीशखान याने सुभेदाराकडे लढण्यासाठी कुमक मागितली. त्याला तोंडदेखली साठ सैनिकांची कुमक पाठवून थट्टा आरंभली.
माळवा हा हिंदुस्थानच्या मध्यभागी वसलेला प्रांत आहे. मोगलांचे रसदिचे सर्व मार्ग येथूनच जात होते. हा औरंगजेबाच्या मर्मावर घाव होता. मराठे आता कदाचित आग्र्यावर हल्ला चढवतील याची त्यास शंका येऊ लागली. कारण मराठ्यांना प्रतिकार करण्यास उत्तरेत कोणीच नव्हते. मराठ्यांनी बुंदेलखंडात छत्रसाल याच्याशी हातमिळवणी केली. त्यांच्या मदतीने नेमाजी शिंदे यांनी संपुर्ण माळव्यात संचार करून प्रचंड लुट जमा केली. मराठ्यांच्या मागावर बादशाहाने फिरोजजंग यास पाठविले. तो मराठ्यांचा पाठलाग करत माळव्यात शिरला. तुंबळ युद्ध झाले. पण पराभव झाला असतानादेखील त्याने खोटेच वृत्तांत बादशाहाकडे पाठविले. बदल्यात बादशाहाने त्यास ‘सिपाहसालार’ हा किताब, त्याचं स्वारांमध्ये दोन हजार मनसबीची बढती दिली व वर एक लाख रुपये बक्षीस दिले. पुढे जेंव्हा सत्य प्रकार उघडकीस आला तेव्हा अर्थातच सर्व मानमरातब काढून घेण्यात आले. बादशाहाने अबूनसरखानच्या जागी बेदारबख्त याची माळव्याचा सुभेदार म्हणू नेमणूक केली तर नवाजिशखानची बदली खानदेशात केली.
दक्षिणेत मराठ्यांची बारा हजार घोडदळ व दहा हजार पायदळ अशी तगडी फौज कुतुबाशाहित शिरली. गोवळकोंड्याचा किल्लेदार आसदखान किल्ल्यात दडून बसला. मराठ्यांनी त्याच्याकडून जबर खंडणी वसूल केली. आता मराठ्यांचा मोर्चा मच्छलीपट्टणकडे वळला. मराठ्यांच्या फौजा पूर्व किनारपट्टीवर धडका देऊ लागल्या. तेथील पालाकोलू या ठिकाणी हल्ला करून मराठ्यांनी सर्वत्र चौथाई वसूल केली.
१७०४ साली इकडे औरंगजेबाची मराठ्यांचे किल्ले घेण्याची मोहिम सुरु होती तर मराठेदेखील उसंत घेण्यास तयार नव्हते. सेनापती धनाजी जाधव, हिंदुराव घोरपडे, हणमंतराव निंबाळकर यांच्या अधिपत्याखाली पन्नास हजारांची मराठा फौज कर्नाटक प्रांतात उतरली. मराठ्यांनी तीन दिशांना कूच केले. एक फळी त्रिचनापल्लीकडे, दुसरी गोवळकोंड्याकडे, तर तिसरी विजापूर भागात. त्रिचनापल्लीजवळ अर्काट येथे मोगली सरदार दाउदखान पन्नी होता. त्याने ताबडतोब पत्र पाठवून शरणागती पत्करली व दोन लाख खंडणी देऊ केली. मराठ्यांनी उलट निरोप पाठविला “आपण फिकीर करू नये, मराठे पैसा कसा वसूल करायचा ते जाणतात”. यावर दाउद खान अर्काट सोडून वेल्लोरच्या किल्ल्यात आला. मराठ्यांनी त्याला वेढा घातला व आजूबाजूचा प्रदेश लुटू लागले. अखेरीस पाच लाख खंडणी व मराठ्यांची माघार असा सौदा ठरला. मराठे पाच लाख घेऊन माघारी न येत खानच्या पाठी लागले. खान धर्मावरम इथे किल्ल्यात आश्रय घेता झाला. परत एकदा मराठ्यांनी त्याला तलवारींचे पाणी पाजले व आता सात लाखाची खंडणी गोळा केली. इतरत्र मराठ्यांचा अनिर्बंध संचार सुरूच होता, त्यातच कोप्पळ सारखा मजबूत दुर्ग नरहरी रुद्र यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकून घेतला.
१७०५ मध्ये किल्ले मोहिम आवरती घेऊन बादशहा वाकीणखेडा इथे बेरड यांच्या बंदोबस्तासाठी गेला. एक वर्षानंतर तो अहमदनगर इथे परतला तोच मुळी रुग्णशय्येवर खिळून. त्याचा मुलगा शाहजादा आज्जम हा गुजरातचा सुभेदार होता. तो बापाची चौकशी करावयास अहमदाबाद इथून नगरला आला. त्याच्या अनुपस्थित सेनापती धनाजी जाधव व सरदार नेमाजी शिंदे गुजरातेत शिरले. पंधरा सोळा हजाराची फौज तापी ओलांडून सुरतच्या आसपास आली. सुरतची उपनगरे व जवळचा प्रदेश लुटून मराठे पुढे सरकले. आता त्यांनी नर्मदा ओलांडून बडोद्याच्या दिशेने आगेकूच केली. बडोद्याहून भरपूर लुट गोळा करून मराठे माघारी फिरले. नर्मदेच्या काठी अब्दुल हमीदखान, नजरअलि खान, इल्तीफातखान यांच्या नेतृत्वाखाली वीस हजार मोगली फौज आडवी आली. ऐन लढाई रंगत आली असताना अचानक मराठ्यांनी माघार घेतली. मोगलांनी विजयी उन्माद सुरु केला. ते मराठ्यांचे गनिमी काव्याचे तंत्र विसरून गेले. नदीकाठी मोगल विश्रांती घेत असताना मराठ्यांनी अचानक छापा घातला. मोगलांना पळता भुई थोडी झाली. घोड्यांवर खोगीर चढवायच्या आत त्यांची कापाकापी केली गेली. अनेक सरदार कैद झाले. इतका प्रचंड विजय मिळाल्यावर उसंत घेतात ते मराठे कसले. दक्षिणेकडे स्वराज्यात परत येणारे मराठे पुन्हा एकदा उत्तरेकडे घोडदौड करू लागले. आता त्यांना वेध लागले गुजरात सुभ्याच्या राजधानी अहमदाबादचे. तिथे जोरदार हल्ला चढवून मराठ्यांना प्रचंड लुट मिळाली. मराठी विजयी वीर संपूर्ण गुजरातमध्ये मुक्त संचार करू लागले. इकडे दक्षिणेत हिंदुराव घोरपडे व पीड नायक बेरड यांच्या एकत्रित फौजेने पेनुकोंडा हा मातब्बर किल्ला ताब्यात आणला. विजापुरी कर्नाटक व गोवळकोंडा यांच्या सीमेवरील हा किल्ला मोक्याचा होता व दोन्ही प्रदेशात मराठी फौजेस कोणाचाच अटकाव राहणार नव्हता.
संपूर्ण हिंदुस्थान इस्लाममय करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बादशहा उतारवयात दख्खनेत उतरला. पण पंचवीस वर्षे तळ ठोकून हाती काहीच आले नाही. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी एखाद्या तरुणास लाजवेल अशा उत्साहाने तो मराठ्यांचे किल्ले काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाला, पण सहा वर्षात चौदा किल्ले हाती आले. पुढे कर्नाटकात बेरड लोकांचा बंदोबस्त करण्यास त्यास जावे लागले. तेथून वर्षभरात परत येईस्तोवर मराठ्यांनी एकेक किल्ला परत मिळवण्यास सुरुवात केली. याशिवाय मराठ्यांची भीमथडी तट्टे आता बादशाही मुलुखात चौखूर उधळू लागली. खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, कर्नाटक, गोवळकोंडा, बऱ्हाणपूर, माळवा, गुजरात सर्वत्र मराठ्यांचा अनिर्बंध संचार सुरु झाला. पुढील काही काळातच मराठे ओडिशा प्रांत ओलांडून बंगालच्या सीमेवर धडका देऊ लागले. छत्रपती शिवरायांचे इवलेसे स्वराज्य गिळंकृत करायच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात तळ ठोकून बसणाऱ्या औरंगजेबाला अशी धास्ती वाटू लागली कि माळवा काबीज करून न जाणो मराठे आग्रा दिल्लीवर आक्रमण करणार नाहीत ना !
एकीकडे मोगली सत्ता खिळखिळी होत होती, सर्वत्र भ्रष्टाचार, अनागोंदी व बजबजपुरी माजली होती, स्थानिक पुंड उठाव करीत होते, सैन्य लढण्याची उर्मी घालवून बसले होते, सरदार दरकदार यांना उत्तरेचे घरचे वेध लागले होते, अहमदनगरच्या छावणीत बादशहा औरंगजेब मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजत होता, तर दुसरीकडे मराठे शिवछत्रपतींचे आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, मातृभूमी परकीय आक्रमणाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमा उल्लंघून सबंध हिंदुस्थानभर झंझावाती घोडदौड करीत होते........
अमोल मांडके
१२ एप्रिल २०२०
संदर्भ
१. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) – छत्रपती राजाराम व ताराबाई – प्रा. श. श्री. पुराणिक
२. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध – जयसिंगराव पवार
३. औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास – जदुनाथ सरकार
४. रणरागिणी ताराराणी – डॉ. सदाशिव शिवदे
No comments:
Post a Comment