रामचंद्र पंत अमात्य

'निश्चयाचा महामेरू' असे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले आहे. या जाणत्या राजाच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या शिष्यांमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या त्यांच्या कारभाऱ्यांमध्ये देखील, राजाचा हा गुण पुरेपूर उतरला होता हे रामचंद्रपंत अमात्य यांनी केलेले कार्य अभ्यासताना आपल्याला नक्की जाणवते. 

छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर, इ.स. १६८९ ते इ.स. १७०७ या मराठेशाहीच्या अत्यंत कठीण अश्या काळात, उभ्या स्वराज्यावर प्रचंड सैन्यानिशी तुटून पडलेल्या औरंगजेबाविरुद्ध मोठ्या जिद्दीने, चिकाटीने टिकून राहून, फितुरीसारखे इतर पर्याय समोर असूनदेखील, स्वराज्य वाचवणे या एकाच ध्येयासाठी 'पर्वताप्रमाणे निश्चयी' राहून या निष्ठावान नेत्याने कार्य केले आणि शिवछत्रपतींच्या या गुणाचे पुरेपूर दर्शन घडवले. 

रामचंद्रपंत अमात्य बावडेकर घराण्याचा इतिहास – 

रामचंद्र पंत अमात्य हुकूमतपन्हा यांचे मूळ पुरुष इसवी सनाचे पंधरावे शतकात भादाणे तर्फ सोनवळे प्रांत कल्याण (कालियानी) येथे राहत होते. यांच्याकडे भादाणे, कुकसे इ. गावचे वतनी कुलकर्णीपण होते. याना सर्वजण भादाणेकर असे म्हणत. 

या भादाणेकर कुटुंबात नारोपंत व काळोपंत बंधू एकत्र राहत असत. पुढे भाऊबंदकी मुळे काळोपंत यांच्या नातवाने मुराररावाने, नारोपंत (मुराररावाचे काका आजोबा) यांचा पुत्र निळोपंत (मुराररावाचे काका) व कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केला व निळोपंतांसह (मुराररावाचे काका) पुत्र कृष्णराव (मुराररावाचा चुलत भाऊ) व एकूण १४ माणसांची हत्या केली. या हल्ल्यात केवळ कृष्णरावांची पत्नी व बारा दिवसांचा नुकताच जन्मलेला पुत्र नारोपंत (रामचंद्रपंतांचे पणजोबा) हे दोघेच वाचले. या परिस्थितीत हे दोघे पुण्यास खेडेबारे तर्फ या गावी आले व गावचा ग्रामजोशी ठकार यांच्याकडे राहू लागले. 

आई हेच सर्वस्व असलेला नारोपंत ठकारांचे घरी मोठा होत होता, शिक्षण घेत होता. याच काळात इ.स. १५८० ते १६०० च्या दरम्यान छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले शिवनेरी व चाकणचे जहागीरदार होते. त्यांच्या आश्रयास नारोपंत आईसह गेले व त्यांनी अखेरपर्यंत चाकरी करून भोसले घराण्याशी व पुढे छत्रपतींशी कायमचा घनिष्ठ संबंध निर्माण केला. 

नारोपंत शहाजीराजांच्या पदरी कारकून होते तर नारोपंतांचा पुत्र सोनाजीपंत (सोनोपंत-रामचंद्रपंतांचे आजोबा) देखील शहाजीराजांच्या चाकरीत होता. पुढे नारोपंतांच्या पदावर सोनोपंत काम करू लागला. तो शहाजीराजांच्याबरोबर अहमदनगर, कर्नाटक अश्या अनेक स्वाऱ्यात सहभागी झाला व त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांपैकी एक म्हणून नावारूपाला आला. 

शहाजीराजांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात शिवरायांसोबत जी निवडक, विश्वासू मंडळी पाठवली त्यात सोनोपंत होते. इ.स. १६४१ ते १६४५ या काळात म्हणजेच शिवरायांच्या कारभाराच्या सुरुवातीच्या काळात ते 'डबीर' होते. पुढे १६४५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले १. निळोपंत व २. आबाजीपंत वडिलांच्या अर्थात सोनोपंत डबीरांच्या बरोबरीने सतत जात असल्याने शिवरायांच्या तालमीतच तयार झाली होती आणि सोनोपंतांचे बरोबरीने शिवरायांकडे काम करू लागली होती. 

सोनोपंत डबीरांचे चिरंजीव निळोपंत हे शिवरायांचे बालपणीचे विश्वासू मित्र होते तसेच मावळचे उत्तम माहितगार होते. तळे, घोसाळे इ किल्ले घेतानाचे त्यांचे शौर्य व चातुर्य शिवरायांनी जाणले होते. अश्या ह्या कर्तबगार निळोपंतांस शिवरायांनी १६४७ मध्ये मुजुमदारीचा हुद्दा दिला. १६४७ ते १६४९ या काळात शिवराय व 'मुजुमदार' निळोपंत यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था केली. 

निळोपंत हे समर्थ रामदास स्वामींचे निस्सीम भक्त होते. ते स्वामींचे दर्शनास वारंवार जात असत. चाफळ येथे स्वामींकडून त्यांनी मंत्रोपदेश घेतला. 

निळोपंत इ.स. १६५६ मध्ये सुरनीस झाले. त्याचसुमारास शिवाजी राजांच्या विजापूरकरांशी लढाया सुरु झाल्या. राजांच्या बरोबरीने निळोपंत मोहिमेत, स्वारीत व मसलतीत भाग घेऊ लागले व स्वराज्यसेवा बजावू लागले. इ.स. १६५९ मध्ये अफझलखान संकटाच्या वेळी, जर शिवाजी राजांचे काही बरेवाईट झाले तर जिजाऊआईसाहेबांचे विचाराने निळोपंत आदी मंडळींनी पुढील कार्य करावे असे ठरले. परंतू शिवाजीराजांनी स्वपराक्रमाने हे संकट उधळून लावले. 

शिवाजीराजे व निळोपंत यांचे घराण्याचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. सुख-दुःखाच्या वेळी ते एकमेकांशी सल्लामसलत करीत. शहाजीराजांच्या पश्चात मातोश्री जिजाबाई सती जाणार होत्या त्यावेळी त्यांनी तसे करू नये म्हणून निळोपंतांनी देखील प्रयत्न केले होते. 

स्वराज्यकार्याच्या आरंभी पासून सुरु झालेल्या कार्यात तसेच महत्वाच्या अश्या अफझलखान प्रतापगड मोहीम, सिद्धी जौहर पन्हाळा-विशाल मोहीम, शाहिस्तेखान पुणे मोहीम या पाठोपाठ इ.स. १६६५ मधली दिलेरखान व जयसिंग मोहीम या प्रत्येक मोहिमेदरम्यान शिवाजीराजांनी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत अश्या खास मातबरांशी मसलत करूनच आपले पुढील धोरण ठरवले. आणि वेळोवेळी या निष्ठावान सहकार्यांनी राजांनी सोपवलेली कामगिरी चोख पार पडली व राज्याचा बंदोबस्त उत्तम ठेवला. निळोपंतांनी स्वराज्यसेवेसाठी ३२ वर्षे कार्य केले. कारकून, सरकारकून, वतनी कारभारी, सचिव, मुजुमदार असे निरनिराळे अधिकार बजावून निळोपंत इ.स. १६७२ मध्ये, आपला पुत्र 'रामचंद्रपंत' यास शिवरायांकडे स्वाधीन करून निधन पावले. 

बावडेकर घराण्याची भोसले घराण्याप्रति चार पिढ्यांची कार्यसेवा - 

नारोपंत - मालोजी भोसले व शहाजी राजे 

सोनोपंत - शहाजी राजे व शककर्ते शिवराय 

निळोपंत - शककर्ते शिवराय 

रामचंद्रपंत - शककर्ते शिवराय + छत्रपती संभाजी महाराज + छत्रपती राजाराम महाराज + महाराणी ताराबाई व शिवाजी राजे दुसरे + करवीर छत्रपती संभाजी राजे दुसरे 

रामचंद्रपंत व शिवकाल - 

रामचंद्रपंतांचा जन्म इ.स. १६५० मध्ये झाला. रामचंद्रपंत शिवरायांपेक्षा सुमारे २० वर्षांनी लहान होते. रामदास स्वामींनी रामचंद्रपंताचे नाव ठेवले व पुढे त्यांच्या सान्निध्यात रामचंद्रपंतांची मुंजही झाली. निळोपंतांच्या बरोबरीने जात असल्याने शिवाजीराजांच्या कार्यपद्धतीची ओळख रामचंद्रपंतांना अगदी जवळून होत होती. शिवाजीराजांनी देखील रामचंद्रपंतांच्या अंगचे चातुर्य, हुशारी ओळखून निळोपंतांना तुम्ही खरे भाग्यवान, हा पुढे निश्चित पराक्रमी होईल असे सांगितले. खुद्द शिवाजीराजे देखील रामचंद्रपंतांना स्वारीस बरोबर घेऊन जात त्यामुळे त्यांचा कारभारात व लष्करात राबता वाढीस लागला होता. इ.स. १६६७ साली सिंधुदुर्ग पाहण्यास शिवाजीराजे गेले असता त्यांच्यासोबत रामचंद्रपंतदेखील गेले होते. त्यावेळी राजांनी रामचंद्रपंतास किल्ल्याची वतनी सबनिशी दिली. 

निळोपंत १६७२ साली मरण पावले. त्याजागी राजांनी थोरले पुत्र नारोपंताना जरी मुजुमदार केले असले तरी ते सन्यस्तवृत्तीचे असल्याने धाकटे पुत्र रामचंद्रपंत त्यांचे काम करीत असे. शेवटी राजांनी रामचंद्रपंतास मुजुमदार केले. त्यावेळी त्यांचे वय २३ वर्षांचे होते. 

दि. ६ जून १६७४ (जुलिअन दिनांक) यादिवशी शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी रामचंद्रपंतानी, वेदमंत्रांचा घोष चालू असता, विविध तीर्थांचे उदक सिंचन केले. राज्याभिषेकानंतर नेमलेल्या अष्टप्रधानमंडळात रामचंद्रपंत निळकंठ याना अमात्य (मुजुमदार) केले आणि पुढील जबाबदारी दिली : सर्व स्वराज्यातील जमाखर्च पाहणे, लहानमोठ्या अधिकाऱ्यांच्या जमाखर्चावर देखरेख ठेवणे, दफतर व फडणिसी कामाची पाहणी करणे, संबंधित खात्याच्या कागपत्रांवर शी शिक्का करणे. या फडावरच्या कामाबरोबरीनेच युद्धप्रसंग करणे हेही काम नेमून दिले. इ.स. १६७७ मध्ये अमात्यपद हणमंते घराण्याकडे गेले. या काळात रामचंद्रपंत व अण्णाजी दत्तो यांनी महसुलाची व्यवस्था सुरळीत चालण्याकरिता 'धारेबंदी' चे नियम ठरवून दिले. या धारेबंदीने प्रजेस कोणत्याही प्रकारे तोशीस न लागत स्वराज्यातील खजिन्यात भर पडली व त्यामुळे प्रजादेखील सुखी झाली. 

सन १६७७ ते १६८० दरम्यान रामचंद्रपंत 'अमात्य' जरी नसले तरी शिवाजीराजांच्याबरोबरीने राज्यकारभारात सक्रिय होते व कृ. वा. पुरंदरे यांच्या मते 'राजाज्ञा' पदावर होते. 

दि. ३ एप्रिल १६८० (जुलिअन दिनांक) रोजी रायगडावर शिवाजीराजे निजधामास गेले त्यावेळी जी मातब्बर मंडळी तेथे होती त्यात रामचंद्रपंतदेखील होते. ज्या कर्तबगार नेत्यांकडून स्वराज्याचा भार सावरला जाईल असे भाकीत शिवाजी महाराजांनी केले होते त्यात रामचंद्रपंत देखील होते. 

यारीतीने शिवकाळातील १३ वर्षे, इ.स. १६६७ पासून इ.स. १६८० पर्यंत म्हणजेच शिवाजी राजांच्या अखेरपर्यंत रामचंद्रपंतानी अतिशय निष्ठेने, अचूकपणे व कार्यतत्परतेने स्वराज्यसेवा केली व छत्रपतींची मर्जी संपादन केली. 

रामचंद्रपंत व शंभूकाल - 

शिवछत्रपतींच्या निधनानंतर रायगडावर राजाराम महाराज याना गादीवर बसवण्याचा बेत केला गेला. यावेळी युवराज संभाजी पन्हाळगडावर होते. ही वार्ता समजताच त्यांनी रायगडावर कूच केले व १८ जून १६८० (जुलिअन दिनांक) रोजी ते रायगडी पोहोचले. वाटेत त्यांना हंबीरराव येऊन मिळाले. रायगडावर रामचंद्रपंतांच्या घरावर देखील पहारे बसवले गेले. परंतू संभाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर रामचंद्रपंतांना 'सुरनिशी' मिळाली व ते पुन्हा राज्यकारभारात सामील झाले. अण्णाजी दत्तो यांच्या पश्चात रामचंद्रपंतांना 'सचिवपद' देण्यात आले. 

इ.स.१६८१ मध्ये समर्थ रामदास स्वामी समाधिस्थ झाले. त्यावेळी संभाजी राजांनी रामचंद्रपंतांना तेथे पाठवून समर्थांचा अंत्यविधी करविला व देवालय बांधून घेतले. पुढे स्वतः संभाजीराजे रामचंद्रपंतांसह समाधी दर्शनास येऊन गेले. 

इ.स. १६८१-१६८२ मध्ये रामचंद्रपंत कुडाळ, नरगुंदच्या सुभेदारीवर नियुक्त होते. 

इ.स. १६८२ ते १६८५ या कालावधीमध्ये रामचंद्रपंतांकडे पुणे प्रांताचा कारभार सोपविला गेला. त्या कालावधीत पंत कोकणातून सिद्द्याच्या जाचाला कंटाळून देशावर आलेल्या लोकांपैकी एका इसमास राजाराम महाराजांच्या चाकरीत घेऊन राज्यकारभाराचे धडे शिकवीत होते. त्या इसमाचे नाव 'बाळाजी विश्वनाथ भट' 

इ.स. १६८० मध्ये सुरु झालेली संभाजी राजांची कारकीर्द ही अवघ्या ९ वर्षात इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर संपुष्टात आली. चार चार शत्रुंना एकाच वेळी तोंड द्यावे लागल्यामुळे घटत चाललेली सैन्य शक्ती व अर्थ शक्ती, राज्यातील जुन्या जाणित्या, बुद्धिमान, राजनिष्ठ माणसांची कमी होणारी संख्या यामुळे युद्धक्षेत्र व मुत्सद्देगिरी या दोन्ही क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला व थोरल्या छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या १५ वर्षात इ.स. १६८९ मध्ये छत्रपतींनी व त्यांच्या रामचंद्रपंतांसारख्या कर्तबगार सेवकांनी निर्मिलेले स्वराज्यच संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती तयार झाली. 

इ.स. १६८९ मध्ये संभाजी राजांच्या हत्येनंतर आता स्वराज्याची धुरा सांभाळण्यास, अनुभवी व शिवाजीराजांच्या तालमीत तयार झालेली व येसूबाईंच्या विश्वासातली एक व एकमेव व्यक्ती उरली होती ती म्हणजे रामचंद्रपंत. यावेळी पंतांचे वय ३९ वर्षे होते. या अत्यंत कठीण प्रसंगी येसूबाईंनी सर्वांशी मसलत करून राजारामास मंचकी बसवले व मोगलांशी सामना देण्यास सर्व नव्या-जुन्या कारभाऱ्यांची मोट बांधली. रामचंद्रपंतांना प्रमुख कारभारी केले. या सर्वांचा निश्चय एकच होता तो म्हणजे 'स्वराज्यरक्षण'. याबरोबरच रामचंद्रपंतांच्या खऱ्या कारकीर्दीस सुरुवात झाली. 

रामचंद्रपंत व राजाराम महाराज काल – 

इ.स. १६८९ मध्ये संभाजीराजांची औरंगजेबाकडून निर्घृण हत्या व त्याचे राजाराम महाराजांसकट राजकुटुंबास संपविण्याचे प्रयत्न यातून मार्ग काढण्यासाठी रायगडावरून राजाराम महाराजांनी जिंजीस प्रस्थान केले. या प्रसंगी येसूबाई व प्रमुख कारभारी यांनी असे ठरविले की राजाराम महाराज यांनी कुटुंबीय व निवडक लोकांसह रायगडावरून निसटून जावे व स्वराज्यरक्षण करण्यासाठी फौज, द्रव्य आदींची जमवाजमव करावी. इकडे रायगडावर येसूबाई, शाहूराजे यांनी येळी त्या प्रसंगाशी तोंड द्यावे व रायगड झुंजत ठेवावा. याप्रमाणे रायगडावरून निसटतेवेळी राजारामांनी रामचंद्रपंतास सचिवपद दिले व ते जिंजीस रवाना झाले. 

अत्यंत अस्थिर परिस्थिती स्वराज्यात निर्माण झाली होती. छत्रपती संभाजी राजांचा स्वराज्यावरील एकछत्री अंमल त्यांच्या हत्येने संपुष्टात आला होता व स्वराज्यास राजा नाही अशी स्थिती निर्माण झाली. रायगडावर महाराणी येसूबाई व शाहूराजे मोगलांच्या अटकेत गेले व राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीस जावे लागले. मराठ्यांच्या एकछत्री अंमलाचे सत्ताकेंद्र नाहीसे झाले. 

इ.स. १६८९ मधील केब्रुवारी (संभाजीराजांची अटक) ते नोव्हेंबर (राजारामराजांचे जिंजीस पोहोचणे) या ९-१० महिन्यांच्या अनिश्चित काळात रायगड व जिंजी यामध्ये पन्हाळगड-विशाळगडावर राहून रामचंद्रपंतानी संताजी-धनाजी, शंकराजी नारायण-परशुरामपंत यांच्या सहाय्याने व आपल्या खंबीर नेतृत्वाने मराठ्यांचे निशाण पक्के उभारून ठेवले होते आणि राजाराम महाराज जिंजीस पोहोचेपर्यंत समस्त मराठ्यांना ते निशाण म्हणजे मराठी सत्तेचे आशास्थान वाटत होते. 

जिंजीस स्थिर होऊन राजाराम महाराजांनी छत्रपतीपद धारण केले व अष्टप्रधानमंडळ स्थापन केले. त्यात 'श्री सचिव' असलेल्या रामचंद्रपंतांना हुकूमतपन्हा हा सर्वाधिकार देण्यात आला. याचा आशय असा की मुलुखातील सर्वानी यांचा निर्णय मेनी करावा इतकेच नव्हे तर छत्रपतिंनीदेखील मान्य करावा. 

हुकूमत म्हणजे राज्य व पन्हा म्हणजे रक्षिणे/रक्षिणारा. तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या अक्कलहुशारीने योग्य तो निर्णय घेण्यासाठी व मुख्य म्हणजे समोर असलेल्या शत्रूचा सामना करून राज्य रक्षिण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यास, छत्रपती राजाराम व रामचंद्रपंत यांच्यातील अंतरामुळे विलंब लागू नये यासाठी स्वराज्याचे अनुभवी कारभारी रामचंद्रपंतांना हुकूमतपन्हा हे पद देऊन सर्वाधिकार देण्यात आले. 

या कालावधीत ज्या चार प्रमुख खांबांवर स्वराज्याचे अस्तित्व अवलंबून होते ते चार प्रमुख खांब म्हणजे, रियासतकार सरदेसाईंनी म्हटल्याप्रमाणे, चार प्रमुख राष्ट्रचालक १) रामचंद्रपंत अमात्य - हुकूमतपन्हा २) शंकराजी नारायण पंतसचिव - मदार-उल-महाम ३) संताजी घोरपडे - ममलकतमदार ४) धनाजी जाधव - जयसिंगराव हे होत. यासर्वांचे नेते अर्थातच रामचंद्रपंत होते. शंकराजी नारायण यांना स्वराज्याचा उत्तर भाग सोपविला व धनाजी जाधव यांची ससैन्य नेमणूक केली. तर रामचंद्रपंताना बरोबर संताजी घोरपड्याना लष्करसहित देऊन स्वराज्याचा दक्षिण विभाग सोपवला. 

राजाराम जिंजीकडे जाताच महाराष्ट्रात रामचंद्रपंतांच्या नेतृत्वाखाली शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांनी मोगलांवर गनिमी काव्याचे हल्ले सुरु केले व मोगलांच्या ताब्यात गेलेले स्वराज्य परत मिळवण्याची धडपड सुरु केली. मराठे पंतांच्या नेतृत्वाखाली छोट्या तुकड्या करून हल्ले करू लागले व मोगलांना त्रस्त करू लागले. मोगलांच्या ताब्यातला प्रदेश पुन्हा मिळवू लागले. 

इ.स. १६८९ ते १६९३ या काळात सुरुवातीस चौघांनी एकत्रितपणे मोगलांवर हल्ले करून त्याना भयंकर उपद्रव दिला. संभाजी राजांना पकडणाऱ्या शेख निजामास संताजीने पराभूत केले, ऑगस्ट १६८९ मध्ये संताजीने खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, मोगल सेनापती रुस्तुम खान यास संताजीने पकडले, संताजी-धनाजी यांनी सर्जाखानाशी साताऱ्याजवळ लढाई केली, शंकराजी नारायण व रामचंद्रपंतानी अनुक्रमे मावळ व वाई, प्रतापगड भागातील किल्ले घेतले, खटावचे ठाणे घेतले. रामचंद्रपंतानी पन्हाळा घेतला, मराठ्यांनी कासिमखानाचा पराभव केला व अलीमर्दखानास पकडले, परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण याना किल्ले पुन्हा हस्तगत करण्यास रवाना केले. शंकराजींनी राजगड घेतला, मराठ्यांनी देसूर येथे मोगलांची प्रचंड सामग्री लुटली, धनाजीने इस्माईल खान मका यास पकडले, जिंजीजवळ मोगलांचा पराभव केला. 

इ.स. १६९४ मध्ये रामचंद्रपंत व संताजी यामध्ये मतभेद निर्माण झाले. शंकराजी नारायणाच्या मध्यस्थीने रामचंद्रपंतानी संताजीची समजूत कडून त्यास हिमतखानावर पाठवले. पुढे संताजीने खटाववर हला करून मोगलांशी लढाई केली, चंदनवंदन भागात लढाई केली. दुद्देरी येथे कासिमखानाचा पाडाव केला, बसवपट्टणच्या लढाईत हिंमतखानाचा फडशा पडला. इ.स. १६९६ मध्ये रामचंद्रपंतानी शाहूस सोडवण्याचा देखील प्रयत्न केला. 

रामचंद्रपंतांच्या या धडपडीमुळेच राजाराममहाराजांनी त्यांना जिंजीस जाताच "हुकूमतपन्हा" हे पद दिले. याचा अर्थ रामचंद्रपंतांचे निर्णय सर्वानी राजाज्ञा समजून पाळावेत. इतकेच नव्हे तर ते छत्रपतिंनीदेखील मान्य करावेत. यावेळी पंत विशाळगडावर होते. पंतांनी विशाळगडावरून आपल्या कार्यास सुरुवात केली. अशारितीने रायगडानंतर आता मराठ्यांचे सत्ताकेंद्र एक विशाळगड व दुसरे जिंजी असे विभागले गेले व त्यामुळे आपोआपच औरंगजेबाची शक्ती देखील विभागली गेली. 

अशातऱ्हेने रामचंद्रपंत व त्यांचे शूर सहकारी राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत पंतांच्या आज्ञेने मोगली आक्रमणाला समर्थपणे तोंड देत, त्यांच्याशी खुल्या मैदानात सामना देत गेलेले स्वराज्य पुन्हा हस्तगत करण्याच्या प्रयत्नांत होते व त्यात त्यांना यश येत होते. 

दरम्यान इ.स. १६९७ मध्ये राजाराम महाराजांनी झुल्फीकारखानामार्फत औरंगजेबाकडे तहाचा प्रस्ताव पाठवले पण औरंगजेबाने तो धुडकावून लावत उलट झुल्फीकारखानास जिंजी लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे फर्मान काढले. आता राजाराम महाराजांनी जिंजीहून निसटण्याची ठरवले व दि. २२/०२/१६९८ (जुलिअन दि) रोजी महाराज विशाळगडी दाखल झाले. 

महाराष्ट्रात येताच त्यांनी राजधानी सातारा येथे स्थापन केली. अष्टप्रधानांच्या नव्याने नेमणुका केल्या. स्वराज्यात जम बसवल्यावर त्यांनी खानदेश, वऱ्हाड, बागलाण भागात मोहीम सुरु करून ठिकठिकाणी आपल्या सरदारांच्या नेमणुका केल्या व तेथे राहून, अंमल बसवून, नियमित वसूल साताऱ्यास पाठवावा असे ठरवून दिले. यामुळे प्रत्येक सरदारास स्वतंत्र कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. 

या धामधुमीत दि २ मार्च १७०० (जुलिअन दि) रोजी, वयाच्या ३०व्या वर्षी राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले. त्यासमयी रामचंद्रपंत त्यांच्याजवळ होते. त्याआधी राजाराममहाराजांनी स्वराज्याचे कामी श्रम, साहस केल्याने व संकटकाळात एक एक प्रतिसृष्टी निर्माण केल्याने रामचंद्रपंतास 'हुकूमतपन्हा' वरून 'कुलकुल्लाह' म्हणजे सर्वाधिकारी असा हुद्दा दिला. 

छत्रपती राजाराम महाराजांचा इ.स. १६९० ते १७०० हा दहा वर्षांचा कालखंड म्हणजे रामचंद्रपंतांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळच होता. 

रामचंद्रपंत महाराणी ताराबाई व पुत्र शिवाजी राजे (दुसरे) कालखंडात - 

राजाराम महाराजांच्या निधनाने पुन्हा एकदा स्वराज्यावर मोठे संकट कोसळले. पण याहीवेळी या संकटातून अनुभवी रामचंद्रपंतानी सर्वाना बाहेर काढले. यावेळी पंतांचे वय सुमारे ५० वर्षे होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर पंतांनी लगोलग सरदारांना पत्रे पाठवली आणि स्वराज्यरक्षणासाठी लढायची निकड व्यक्त केली. पत्रात उद्देशून पंतांनी म्हटले "छत्रपती गेले. आता राज्यरक्षण करणे तुम्हाकडे. या राज्याची लाज आता तुम्हीच राखली पाहिजे." यावर पांढरे, दाभाडे, निंबाळकर, परसोजी भोसले यांची उत्तरे अशी आली "महाराजांचे ठिकाणी आपण आहात. खास स्वारी असताना कामकाज उदईक करू म्हणत होतो. सांप्रत उद्याचे आज करून आपणास निनंती लिहीत जाऊ. आपल्या हुकूमासरशी तृणवत प्राण मानून उडी घेऊ. काळजी करू नये." यावरून रामचंद्रपंतांची थोरवी समजून येते. 

यावेळी परिस्थिती अशी होती. छत्रपती राजाराम महाराज मृत्यू पावले होते. त्यांचे पुत्र शिवाजी व संभाजी लहान होते. शाहू राजे मोगलांच्या कैदेत होते. पुन्हा एकवार स्वराज्य राजाविना पोरके झाले होते. 

औरंगजेब मराठी राज्य संपवण्याची पराकाष्ठा करीत होता. आता त्याच्या हालचाली अधिक वेगवान झाल्या होत्या. पुन्हा एकवार त्याने किल्ले जिंकण्याच्या मोहिमांना नव्या दमाने सुरुवात केली होती. आणि यातच घोरपडे व जाधव यांच्यात दुहीची बीजे पेरली जात होती. 

यातच ताराबाईंनी शिवाजी राजांची मुंज व राज्याभिषेक करण्याची आग्रही भूमिका रामचंद्रपंतांपाशी घेतली. त्यावेळी "गडबड का. शाहू महाराज लवकरच येतील. ते आल्यानंतर त्यांची व यांची मुंज करू. ते (शाहू राजे) तख्तारूढ होतील व उभयता (शिवाजी राजे व संभाजी राजे) युवराजपद करतील." यावर ताराबाईंनी "यांची मुंज अगत्यमेव मला कर्तव्य" असे सांगितले. रामचंद्रपंतानी "कल्याणकर असेल ते करावे" असे म्हणताच ताराबाईंनी मुंजीचा कार्यक्रम केला. रामचंद्रपंताना डावलून निर्णय न घेता ताराबाईंनी देखील पंतांच्या कलाने घेऊन शेवटी आपला कार्यभाग साधला असे यावरून दिसते. इतके रामचंद्रपंतांचे छत्रपती कुटुंबात वजन होते. 

आता स्वराज्याचे धनी शिवाजी राजे झाले होते व कारभार ताराबाई, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम पंत, धनाजी जाधव यांचेकडे आला. सर्वानी औरंगजेबाविरुद्ध नव्याने लढा सुरु केला. हल्ले-प्रतिहल्ले, गनिमीकावा याचा पुरेपूर वापर करत या सर्वानी इ.स. १७०० ते १७०७ अशी ७ वर्षे झुंज देऊन शेवटी मोगलांना त्रस्त केले व यातच औरंगजेबाचा मृत्यू होऊन या स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती होण्याच्या दिशेने काळाचा प्रवास सुरु झाला. 

रामचंद्रपंत संभाजी महाराज काळात – 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात शाहू व ताराबाई यांच्यात सत्तासंघर्ष चालू झाला. यामध्ये बरीच मंडळी शाहू पक्षात सामील झाली. रामचंद्रपंत देखील सामील होतील या संशयावरून ताराबाईने त्यांना कैदेत ठेवले व कालांतराने सुटका करून दोन्ही मुलगे शिवाजी राजे व संभाजी राजे यांना मांडीवर बसवून राज्य रक्षण करण्याची विनंती केली. पंत पुन्हा कारभार करू लागले. 

इ.स. १७११ ते १७१३ ही तीन वर्षे कोल्हापूर (ताराबाई) वि शाहू (सातारा) यांच्यामधील युद्धाची होती. ताराबाई कारभार करीत असता त्यामध्ये राजसबाई व संभाजी राजे यांना काही स्थान नव्हते. अंतर्गत धुसफूस सुरु झाली व कोल्हापूर मध्ये इ.स. १७१४ मध्ये राज्यक्रांती घडून संभाजीराजे गादीवर बसले व ताराबाईसहित शिवाजीराजे कैदेत पडले. आता संभाजी महाराजांच्या सल्लागारांत रामचंद्रपंत इ.स. १७१४ ते १७१६ काळात प्रमुख होते. 

इ.स. १७१६ मध्ये पन्हाळगडावर पंतांनी अखेरचा श्वास घेतला. 

रामचंद्रपंतांची धोरणे व कार्य – 

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी अष्टप्रधानात रामचंद्रपंत सर्वात तरुण प्रधान होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत, कृ.वा. पुरंदरे यांनी म्हटल्याप्रमाणे रामचंद्रपंत राजाज्ञा होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात ते 'हुकूमतपन्हा' या सर्वोच्च पदावर होते. महाराणी ताराबाई - शिवाजी राजे दुसरे व करवीर राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे पहिले संभाजीराजे यांच्या कारकिर्दीत ते सर्वोच्च पदावर कार्य करीत होते. 

रामचंद्रपंतानी विशेषत्वाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्य रक्षणासाठी केलेल्या कार्यास तोड नाही. इ.स. १६८९ ते १७०७ या मराठेशाहीच्या अत्यंत कठीण अश्या पडत्या काळात रामचंद्रपंतानी मराठेशाहीस आपल्या मुत्सद्देगिरीने, तसेच पराक्रमाने सावरून धरले. छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने परंतू त्यांच्या अनुपस्स्थितीत रामचंद्रपंतानी मराठ्यांच्यात नवचैतन्य फुलवले. त्यांच्यात छत्रपतींच्या तख्ताखाली एकजूट घडवून आणली. 

सेतू माधवराव पगडी यांनी म्हटल्याप्रमाणे राजाराम महाराज जिंजीस निघून गेले. मागे रामचंद्र पंत अमात्यास 'हुकूमतपन्हा' हा हुद्दा देऊन स्वराज्य वाचवण्याच्या कामावर नेमले. रामचंद्र पंतांनी हे काम शर्थीने पार पाडले. 

या काळात रामचंद्रपंतांचे कार्य म्हणजे एकीकडे स्वतःहून तसेच सरदार-दरकदारांकरवी औरंगजेबाच्या मोगल सैन्यावर छापे टाकून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांची रसद मारणे, त्यांच्या सैन्यशक्तीचा ऱ्हास करणे व एकूणच मोगलांमध्ये दहशत निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास कमी करणे, आपल्यापाशी असलेल्या सैन्य व युद्धसाहित्यानिशी मोगलांच्या ताब्यात गेलेल्या गडकिल्ल्यांवर हल्ला करून ते परत हस्तगत करणे व स्वराज्य वाचवणे हे होय तर दुसरीकडे मराठी सरदारांत एकजूट घडवून त्यांची छत्रपतींसाठी निष्ठा कायम करणे, आहे ते सैन्य प्रसंगी गडकिल्ले मोगलांच्या स्वाधीन करून वाचवणे व नवीन सैन्य तयार करणे आणि हे सैन्य जिंजीस पाठवणे असे विस्तृत होते. 

जो किल्ला जिंकण्याचा मोगल प्रयत्न करीत आहेत त्या किल्ल्यावरील माणसांनी किल्ला सोडून द्यावा व काही काळाने फिरून पुन्हा घ्यावा पण जीवंत राहावे. औरंगजेबाचे सैन्य फार आपले सैन्य थोडे म्हणून आपला मनुष्य राखून (जपून) जाया होऊ न देता (जखमी अगर मृत) मोगलांच्या सभोवती हिंडावे. रामचंद्रपंतांच्या या धोरणानुसार मराठ्यांनी मोगलांविरुद्ध युद्ध सुरु केले. एखादा किल्ला जिंकण्यास मोगली फौज आली असता त्या किल्ल्यावरील किल्लेदाराने व सैनिकांनी तो किल्ला साधनसामग्री असेपर्यंत झुंजवायचा व मोगलांना त्रस्त करून सोडायचे. साहित्य संपावयास आले की मोगलांशी वाटाघाटी करून, द्रव्य घेऊन किल्ला मोगलांच्या स्वाधीन करायचा व आपले सैन्य राखायचे. काही काळानंतर मोगलांची पाठ वळताच पुन्हा तो किल्ला हस्तगत करायचा अशी युद्धनीती अवलंबली गेली. 

यामुळे मुख्य म्हणजे मराठ्यांचे सैन्य राखले गेले. आहे त्या सैन्यानिशी मोगलांवर गनिमी काव्याने हल्ले केल्याने, मुलुख आबाद नसताना मोगलांकडून द्रव्यप्राप्ती, रसदप्राप्ती, युद्धसाहित्यप्राप्ती होत गेली. सुरुवातीच्या मराठ्यांच्या प्रतिकारामुळे मोगलांचा वेळ, पैसा, शक्ती मोठ्या प्रमाणावर खर्च होत गेली व एकूणच त्यांचा जोर क्षीण होत गेला. म्हणूनच रामचंद्रपंत अमात्य संकटकाळात राजाराम महाराजांकडे जिंजीस सैन्य व खजिना रवाना करू शकले. 

स्वराज्यात मोगलांची ठाणी राहू देऊ नये, त्यांनी घेतलेले गडकिल्ले फिरून परत हस्तगत करावेत या पंतांच्या धोरणामुळे इ.स. १६८९ मध्ये मोगलानी आपल्या ताब्यात घेतलेला स्वराज्याचा प्रदेश, गडकिल्ले मराठ्यांनी इ.स. १६९० च्या अखेरपर्यंत बव्हंशी आपल्या ताब्यात परत घेऊन स्वराज्याचे अस्तित्व कायम ठेवले. 

स्वराज्यात वतनदारी पद्धतीचा अवलंब करण्याचे धोरण रामचंद्रपंतानी सुरु केले. तत्कालीन परिस्थितीमध्ये हे अपरिहार्य होते. याविषयी जनरल नानासाहेब शिंदे, बडोदे यांनी सरदेसाई स्मारक ग्रंथात म्हटले आहे ते असे 'मराठ्यांची आपल्या वतनावर म्हणजे जमिनीच्या तुकड्यावर अतोनात आसक्ती असते. मराठे लोक दुसऱ्या वाटेल त्या गोष्टीचा त्याग करतील परंतू वडिलोपार्जित मालकीच्या जमिनीचा त्याग ते प्राण गेला तरी करणार नाहीत.' 

मराठ्यांच्या ह्याच स्वभावाची माहिती असल्याने औरंगजेबाने महाराष्ट्रात भराभर वतनाची आमिषे देऊन त्यांना फितूर होण्यास भाग पाडले. याकारणाने स्वराज्यातील फितुरांची संख्या वाढून सरदार - सैनिकांची संख्या कमी होऊ लागली. तेव्हा पुरेशी फौज असणे मोगलांशी प्रतिकार करण्यासाठी अपरिहार्य होते. पुरेशी फौज असावी तसेच नवीन फौज निर्माण करावी, मोगलांशी लढण्यास लोकांना उद्युक्त करावे या हेतूने राजाराम महाराज व रामचंद्रपंतास हाच मार्ग स्वीकारावा लागला. 

शिवछत्रपतींनी फौजेस रोख पगार देण्याची पद्धत सुरु केली होती. परंतू मोगलांच्या आक्रमणाने कमी होत गेलेला मुलुख, ताब्यात असलेला मुलुख उद्धवस्त झालेला, खजिना रिता होत चाललेला यामुळे राजाराम महाराजांच्या काळात फौजेस रोख पगार देणे, जवळ पैसे नसल्याने बंद झाले. 

आणि म्हणूनच फौजेस लढण्यासाठी पैसा, दाणा-पाणी इ.ची सोय करणे, मोगलांकडे गेलेला मुलुख स्वराज्यात परत मिळवणे व तो आबाद राखणे, मोगलांच्या ताब्यातील गडकिल्ले हस्तगत करणे व यासाठी लोकांस स्वराज्यसेवेत परत आणण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शिवछत्रपतींनी बंद केलेली वतनाची पद्धत रामचंद्रपंतानी पुन्हा सुरु केली. या वतनासक्तीच्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला व अनेक वतनदार पुन्हा परत येऊ लागले. अश्या रीतीने औरंगजेबाची भेदनीति त्याच्यावर उलटवली गेली. 

या काळात मुलुखीं वतनी कारभारात सुधारणा करणे व लष्करी मुत्सद्देगिरीचे डावपेच आखणे या धोरणांमुळे राजाराम महाराज छत्रपती जवळ नसताना आणि तिजोरीत पैसा नसताना देखील मोगलांविरुद्ध मराठ्यांचे हे स्वातंत्र्ययुद्ध इ.स. १६८९ पासून इ.स. १७०७ पर्यंत तब्ब्ल १८ वर्षे मोठ्या चिकाटीने अव्याहत सुरु ठेवले यातच रामचंद्रपंतांच्या महान कार्याची थोरवी कळते. 

रामचंद्रपंत - एक थोर व्यक्तिमत्व - 

रामचंद्र पंत अमात्य हे असे एकमेव कर्तृत्ववान नेते होते ज्यांनी इ.स. १६५० ते इ.स. १७१६ या आपल्या ६६ वर्षांच्या जीवनकाळात मराठेशाहीतील एकामागोमाग एक पाच छत्रपतींपाशी निष्ठेने सेवा केली. 

निष्ठा हा गुण पंतांमध्ये अगदी ठासून भरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जबाबदारीचा राज्यकारभार असो की संभाजी राजांच्या धामधुमीच्या काळातील मोहीम / कारभार असो रामचंद्रपंत छत्रपतींशी निष्ठावंत होते. राजाराम महाराजांच्या काळात प्रत्यक्ष छत्रपती महाराष्ट्र नसताना व सर्व निर्णयाचे अधिकार प्राप्त झालेले असताना याच निष्ठेने पंतांनी स्वराज्यरक्षणाचे कठीण कार्य केले. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या आमिषाला व धमकीला भीक न घालता पंतांनी ताराबाईंच्या बरोबरीने स्वराज्यसेवा केली. 

मुत्सद्दीपणा. अतिशय मुत्सद्दी अश्या रामचंद्रपंतानी एकहाती नेतृत्व करून स्वराज्यातून फुटलेल्या मराठी सरदार, वतनदारांची पुन्हा फळी उभारली व औरंगजेबाविरुद्ध अव्याहत युद्ध सुरु ठेवले. त्यांनी मुत्सद्दीपणे आखलेल्या धोरणांमुळेच मराठी राज्य नष्ट न होता सावरले गेले व पुन्हा उभारी घेऊन शेवटी औरंगजेबास मृत्यू आला तरी टिकून राहिले. 

संघटनाकौशल्य. रामचंद्रपंतांचे संघटनकौशल्य जबरदस्त होते. संकटाच्यावेळी सर्व सरदार, कारभाऱ्यांनी एकत्र मोट बांधून त्यांनी कारभार केला. प्रसंगी एकमेकातले मतभेद (संताजी-रामचंद्रपंत, संताजी-राजाराम महाराज) सामंजस्याने सोडवून त्यांना पुन्हा स्वराज्यसेवेत येण्यास राजी केले व येनकेन प्रकारेण मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध सुरु ठेवले. 

रामचंद्रपंतांना सर्व छत्रपतींनी वेळोवेळी गौरविलेले आहे ते असे. 

छत्रपती शिवरायांची मर्जी फार. सभासद बखरीत म्हटलंय " धाकटा पुत्र, शहाणा, राजियांचा लोभ फार, की हा मोठा शहाणा, दैवाचा, भाग्यवंत, बापापेक्षा लक्ष गुणे थोर होईल" 

ताराबाई एका पत्रात म्हणतात "तुम्ही श्रमसाहस करून कित्येक देश दुर्गादि संपादन केले. दुर्ग पुन्हा हस्तगत केले, राज्य संपादून वरचेवरी संतोष वाढत चंदीस पाठवीत गेले.. चंदीस कैलासवासी स्वामी आसता तिकडे ताम्रची रज होऊन चंदीस परीघ पडला ते समयी तुम्ही या प्रांतीहून कर्नाटकात सेनासंभार पाठवून कैलासवासी स्वामींचे संकट निरसन केले" तसेच "मोडिले राज्य त्यांनी सांभाळून यशकीर्ती संपादली" असे गौरवोद्गार काढले. 

गुणग्राहकता. छत्रपती शिवरायांप्रमाणेच रामचंद्रपंतानी देखील अनेक लोकांना करबगारीची संधी दिली. शंकराजी नारायण पंतसचिव, परशुरामपंत प्रतिनिधी यांना स्वराज्यात मोठे होण्याची संधी पंतांनी दिली. संताजी घोरपड्याना सेनापतिपद रामचंद्रपंतांच्या शिफारशीने मिळाले. बाळाजी विश्वनाथ भट रामचंद्रपंतांच्या अखत्यारीत चाकरीत होते. 

रामचंद्रपंतानी लिहिलेले दोन ग्रंथ 'आज्ञापत्र' व 'राजनीती' हे त्यांच्या अनुभवाची व थोर व्यक्तिमत्वाची साक्ष देतात. 

हुकूमतपन्हा व कुलकुल्लाह रामचंद्रपंत अमात्य - 

श्रीशिवछत्रपतींच्या निधनानंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर व राजाराम महाराजांच्या जिंजी गमनानंतर स्वराज्यावर कोसळलेले मोगलांचे संकट हे स्वराज्याचे अस्तित्व नष्ट करण्यास सिद्ध झाले होते आणि या कालावधीत आपल्या विलक्षण कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्याचा मोडत आलेला डाव, रामचंद्रपंतांसारख्या निष्ठावंत व्यक्तीने पुन्हा नीट बसवला यातच त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचे आपल्यास दर्शन घडते. 

सत्तेची हाव भल्याभल्या नेत्यांना नारायणाकडून नराकडे असा उलट प्रवास करण्यास भाग पाडते. परंतू सतत ४०-४५ वर्षे पाच छत्रपतींपाशी सेवा बजावून, उत्तरोत्तर सर्वोच्च अधिकारपदावर राहून राज्यकारभार करणाऱ्या व मराठ्यांच्या अत्यंत कठीण काळात, जिथे मुलुखात छत्रपती नसताना व सर्वाधिकार हाती असल्याने सत्ताग्रहण करू शकत असणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील ज्यांच्या मनास असा विचारदेखील शिवला नाही व जे आमरण छत्रपतींपाशी एकनिष्ठ राहिले अश्या थोर व्यक्तिमत्वाच्या हुकूमतपन्हा व कुलकुल्लाह रामचंद्रपंत अमात्य यांना मनाचा मुजरा !!! 

-- राहुल शशिकांत भावे 

दि १४ एप्रिल २०१८ 

संदर्भ ग्रंथ ------ 

१) हुकूमतपन्हा - मु. गो. गुळवणी 

२) करवीर रियासत - स. मा. गर्गे 

३) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई 

४) प्रतापी बाजीराव - मी. श्री. दीक्षित 



4 comments:

  1. मस्तच लिहीले आहेस राहूल.

    ReplyDelete
  2. अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवते लेखन.

    ReplyDelete
  3. bavdekar gharanyachi ani ramchandrapant amatya yanchi ashi sangrahit mahiti ya lekha dware vachnyas milali. uttam lekh.

    ReplyDelete
  4. अतिशय सविस्तर आणी सखोल माहितीपूर्ण सुंदर लेख

    ReplyDelete