एकामागोमाग एक येणारी संकटं माणसाला हतबल करतात आणि शेवटी त्याचे खच्चीकरण करतात. पण काही व्यक्ती याच संकटांना संधी समजून आपल्या युक्तीने, कष्टाने, कर्माने अश्या संकटांवर मात करतात आणि आपलं सामान्यत्व असामान्यत्वात परावर्तित करतात. संकटकाळात केलेल्या या असामान्य कर्तृत्वाचा ठसा इतिहासपटलावर पक्का उमटवतात आणि वर्षानुवर्षे नव्हे शतकानुशतके पुढील पिढयांना कायम स्फूर्ती देत राहतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. एकामागोमाग एक येणाऱ्या संकटांना संधी समजून आपल्या शक्ती, युक्तीने त्यावर मत करीत शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्याची अनुभूती दिली.
महाराजांनी स्थापलेले हे स्वतंत्र हिंदवी स्वराज्य दिल्लीपती, उभ्या हिंदुस्थानचा बादशहा, पातशहा औरंगजेब याला डोळ्यात खुपत होते आणि म्हणूनच महाराजांच्या पश्चात महाराष्ट्रावर आक्रमण करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य समूळ नष्ट करून मराठ्यांना पुन्हा मोगलाई पारतंत्र्यात ढकलण्याच्या उद्योगास तो लागला होता. छत्रपती संभाजी राजांना त्याने क्रूरपणे मारले होते आणि आपली अवाढव्य मोगलाई सेना चारही बाजूनी हिंदवी स्वराज्यात घुसवली होती. याचाच परिणाम म्हणून राजाराम महाराजास राजधानी रायगड वरूनच नव्हे तर महाराष्ट्रातून कर्नाटकात जावे लागले होते. आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्य औरंगजेबाच्या जबड्यात गिळले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
सन १६८९ चा हा कालावधी होता. सर्व सामर्थ्यानिशी औरंगजेब, आपल्या एका सुभ्यापुढे टीचभर असलेल्या स्वतंत्र हिंदवी स्वराज्यास मोगलाई टाचेखाली भरडण्यास सिद्ध झाला होता. "ऋणशेषश्चाग्निशेष: शत्रूशेषस्तथैवच ! पुनः पुनः प्रवर्धनते तस्मा छेशं न रक्षयेत !!" "कर्ज, अग्नी, शत्रू यांचा अवशेष जरी शिल्लक राहिला तरी तो पुन्हा पुन्हा वाढतो. म्हणूनच या त्रयीचा शेष सुद्धा बाकी राहू नये, त्यांचा समूळ नाश करावा" या श्लोकानुसार औरंगजेबाचे धोरण होते आणि तो संभाजीराजांच्या हत्येनंतर स्वराज्यावर चौफेर आक्रमण करून राजधानीसह सर्व प्रमुख किल्ले ताब्यात घेऊन राजाराम महाराजास पकडण्यास जिंजीला वेढा देऊन बसला. इतके होत असूनही छत्रपती शिवरायांनी मराठ्यांच्यात पेटकलेली स्वातंत्र्याची ज्योत विझली नाही आणि मराठ्यांनी तडफेने, चिकाटीने, पराक्रमाने, आपल्याला जमेल तसे, सुचेल तसे, आपल्या परीने औरंगजेबाशी दोन हात केले.
या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी राजांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या शिष्यांनी औरंगजेबाला आणि त्याच्या बलाढ्य सेनेला निकराची झुंज दिली आणि गिळले जाऊ पाहणारे आपले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य शत्रूच्या जबड्यातून खेचून बाहेर काढले. रणांगणावर ससैन्य विद्युतवेगी हालचाली करून, गनिमीकाव्याचा पुरेपूर वापर करून संताजी-धनाजी व त्यांच्या हाताखालच्या सरदारांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. तर रामचंद्रपंतांसारख्या कसलेल्या कारभाऱ्याने आपल्या युक्तीने आणि मुत्सद्दीपणाने मुलुखात स्थिरता आणली व राजाराम महाराजांच्या छत्राखाली मराठ्यांची एकी करून गेलेला मुलुख परत मिळवण्याची पराकाष्ठा केली. आणि औरंगजेबास पुरते नामोहरम करून टाकले.
या कालावधीत ज्या चार प्रमुख खांबांवर स्वराज्याचे अस्तित्व अवलंबून होते ते चार प्रमुख खांब म्हणजे, रियासतकार सरदेसाईंनी म्हटल्याप्रमाणे, चार प्रमुख राष्ट्रचालक १) रामचंद्रपंत अमात्य २) शंकराजी नारायण पंतसचिव ३) संताजी घोरपडे ४) धनाजी जाधव हे होत. यामधील एक शंकराजी नारायण पंतसचिव यांना राजाराम महाराजांनी 'मदार-उल-महाम' अर्थात 'दौलतीचे आधारस्तंभ' हा किताब देऊन गौरवले.
राजाराम महाराज जिंजीस गेले त्या काळापासून म्हणजेच सन १६९० पासून शंकराजी नारायण यांचे कर्तृत्व दिसून येते. पुण्याच्या जवळील आजच्या भोर या शहराचे आणि इतिहासप्रसिद्ध, ज्याला आपण स्वराज्याचा गाभा असे म्हणू शकतो अश्या 'भोर' या संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण होत.
शंकराजी नारायण हे वेरूळकडील गांडापूरच्या - आजच्या गंगापूरच्या वतनदार कुलकर्ण्यांच्या 'गांडेकर' घराण्यात जन्माला आले. हे गांडेकर घराणे शहाजीराजांच्या काळापासून भोसल्यांच्या सेवेत दाखल होते. शहाजीराजांच्या जहागिरीत पुणे तसेच वेरूळ - देवगिरी प्रांतातील मुलुख होता व या वेरूळ - देवगिरी प्रांतातील मुलुखातील घराण्यांमध्ये 'गांडेकर' घराणे होते. शहाजीराजांच्या चाकरीत जी काही कर्तबगार, विश्वासू घराणी होती त्यापैकी हे एक घराणे होते. अत्रि गोत्र व अश्वलायन सूत्र असलेले गांडेकर हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होत. वेरूळकडील कायगाव - टोक यापासून पाच कोसांवर असलेले गांडापूर - गंगापूर हे ह्यांचे मूळ गाव.
कोन्हेर विठ्ठल
हा शहाजीराजांच्या पदरी होता. त्यांच्याबरोबर बंगळूर-कर्नाटकात रवाना झाला. शहाजीराजांच्या काळात चंदावर येथे त्यास सुरनिशी म्हणजेच सचिवपद (दफतरावरील मुख्य अधिकारी) प्राप्त झाले.
नारो मुकुंद
शहाजीराजांनी बंगळूरहून सन १६४१ मध्ये दादोजी कोंडदेवाबरोबर बारा वर्षांच्या शिवबासोबत त्यांच्या मातोश्री जिजाबाईसाहेब व इतर विश्वासू कारभारी पुणे प्रांतात पाठवले. त्यांच्यामध्ये हा नारो मुकुंद - कोन्हेर विठ्ठलाचा वंशजही आला. नारोपंत सुरुवातीस शिवरायांच्या लष्करात कारकून होता. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी सुधागड ताब्यात घेतल्यावर सुधागडाची 'सबनिशी' नारोपंतास दिली. किल्ले म्हणजे शिवरायांचे श्वास असल्याने किल्ल्याची सबनिशी ही नारोपंतांसाठी महत्वाचे पद होते आणि त्याच्या कर्तुत्वामुळेच त्यास मिळाले. सबनिसाचे काम म्हणजे किल्ल्याचा हिशेब ठेवणे आणि किल्ल्यातील युधोपयोगी सामानावर देखरेख ठेवणे. शिवकाळात प्रत्येक किल्ल्यावर तीन जबाबदार अधिकारी नियुक्त केले असत. १) हवालदार (मराठा असे) २) सबनीस (ब्राह्मण असे) ३) कारखानीस (प्रभू असे)
शंकराजी नारायण
सन १६७७ मध्ये छत्रपती शिवरायांचा मुक्काम मंत्रिमंडळासकट प्रतापगडावर असता सुधागडाचा सबनिशीचा हिशेब देण्यास नारोपंत त्यास भेटायला गेले. त्यावेळी नारोपंतांसोबत लहान शंकराजी देखील होते. त्या भेटीदरम्यान पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शंकराजीस हेरले व आपल्याकडे चाकरीत ठेवले. मोरोपंतांनंतर शंकराजी रामचंद्रपंतांच्या हाताखाली गेला. लहानपणापासून मावळच्या डोंगरदऱ्यात वाढलेला, सह्यकडे लीलया चढणारा शंकराजी एक कसलेला मावळा होता. रामचंद्रपंतानी त्याची नेमणूक घोडदळात धनगरांच्या पथकावर केली. थोडक्यात मोरोपंत पेशव्यांनंतर रामचंद्रपंतानी शंकराजीस जवळ करून त्यास कर्तृत्वाची संधी दिली.
शिवरायांच्या पश्चात संभाजी राजांच्या अत्यंत धामधुमीच्या काळात शंकराजी हे रामचंद्रपंतांच्या अखत्यारीत कार्य करत होते. या काळात म्हणजेच १६८० पासून १६९० या दहा वर्षांच्या काळात, सचिवपद प्राप्तीपूर्वी शंकराजी नारायण "राजाज्ञा" होते. राजाज्ञा म्हणजे अशी व्यक्ती जी छत्रपतींची हुजुरात खाजगी फौज व खाजगी कारभार यावर देखरेख ठेवत असे. मावळ भागातील १२ महाल शंकराजी पंतांकडे होते. सन १६८२ पासून संभाजीराजांचे जे युद्धप्रसंग झाले त्यात शंकराजीपंतांचा सहभाग होता. शंकराजीपंत राजाज्ञा असेतोवर त्यांचा कारभार हा रामचंद्रपंतांच्या अनुज्ञेने चालत असे.
सन १६८९ मध्ये रायगड-प्रतापगड-पन्हाळा असा प्रवास करणाऱ्या राजाराम महाराजांना मोगल स्थिर होऊ देत नव्हते. ते पन्हाळ्यावर आल्याचे समजताच त्यांना पकडण्यासाठी मोगलानी पन्हाळगडालाही वेढा दिला. या कठीण वेळी प्रल्हाद निराजीनी जिंजी कर्नाटकात जाण्याचा व तेथून स्वराज्यरक्षण करण्याचा सल्ला दिला व तो सर्वानी मानला. जिंजीस जाताना राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील व्यवस्था रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी यांचेकडे सोपवली. रामचंद्रपंतांना सर्वाधिकारी केले व 'राजाज्ञा' शंकराजी नारायण यांना त्यांच्यासोबत ठेवले. संताजी-धनाजीस लष्करासह नेमून दिले.
या प्रसंगाचे केशव पंडित खालीलप्रमाणे वर्णन करतो :
तुच्छीकृत्य तु तान्सर्वानमहाम्लेंच्छविनाशक:
नारायणसुते श्रीमच्छंकरे लोकशंकरे !! ११ !!
राज्यकदेशम निदधे कारीदुर्गसमाश्रयम
रामचंद्र तु सकलम राज्यम विनयाय गुढधी: !!१२!!
तस्य हस्ये धनाजीकम संताजिकं च शंकरम
अश्वसेनाधिपान सर्वान तथा पत्तीगणाधिपान !!१३!!
-- सर्वाना तुच्छ लेखून म्लेच्छांचा नाश करणारा राजा लोककल्याण करणाऱ्या शंकराजी नारायण कडे कारीगडाकडील राज्याचा भाग सोपवून बाकी राहिलेले राज्य गूढबुद्धी राजाने रामचंद्रपंतांच्या ताब्यात दिले. त्याच्या हाताखाली संताजी, धनाजी, शंकराजी व घोडदळाचा सेनापतीही दिले. यासुमारास शंकराजी मल्हार हे सचिवपदी होते.
शंकराजी नारायण याच्या शब्दात : "स्वामींच्या पुण्यप्रतापेकरून देशदुर्ग काबीज होतील तेथपर्यंत स्वामींनी राज्यकारभार आमच्या स्वाधीन केलाच आहे. सांप्रत स्वामींनी आम्हास सुरनिशीचा कार्यभाग सांगितलं. रायगडापासून कोकणपट्टी स्वाधीन केली. रामचंद्रपंतास मुजमुचा कारभार सांगितलं व त्याच्या स्वाधीन कऱ्हाडपासून पलीकडे वरघाट गोकर्णपावेतोची कामगिरी केली. लष्कर दुतर्फा वाटून दिले. धनाजी जाधव यांनी आम्हाकडे असावे, संताजी घोरपडे यांनी रामचंद्रपंतांकडे असावे ऐसा तह केला."
यारीतीने रामचंद्रपंतास सर्वाधिकार देऊन "हुकुमतपन्हा" 'किताब देऊन अधिकाराने छत्रपतींच्याहून श्रेष्ठ केले व त्यांच्या बरोबर संताजी घोरपड्याना लष्करसहित दिले व महाराष्ट्राचा दक्षिण विभाग राज्यकारभाराकरता सोपवला. रामचंद्रपंतानी विशाळगडावर राहून कारभारास सुरुवात केली. महाराष्ट्राचा उत्तर विभाग शंकराजी नारायण यांचेकडे सोपवून दिमतीला धनाजी जाधव ससैन्य नेमून दिले.
राजाराम महाराजांचे जिंजीस प्रयाण होताच इकडे या चौघांनी मोगलांचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. सुरवातीस त्यांनी एकत्रितपणे हल्ले/मोहिमा करून मोगलांना त्रस्त केले. जेव्हा संताजी संभाजीराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा समाचार घेत होता त्यावेळी शंकराजी नारायणाने संगमेश्वरवर हल्ला करून तेथील मोगली ठाणे मारून काढले. तेथून सोळा मैलांवरील गुणवंतगड मोगलांकडून सर केला. पाटणच्या पश्चिमेकडील सुंदरगड, साताऱ्याच्या दक्षिणेकडील दंतपाटण काबीज केले व तेथून तो वसंतगडावर गेला. नंतर रामचंद्रपंत अमात्य, संताजी-धनाजी, शंकराजी नारायण यांनी मिळून प्रतापगड आदी किल्ले हस्तगत केले व "वाईचा कोट रगडून घेतला" पुढे सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसलेल्या सर्जाखानाचा पाडाव करून ४००० घोडी ८ हत्ती व लाख रुपये घेतले. याप्रसंगी स्वारीच्या आधी खंडभट शाळीग्राम यांचेकडून सुमुर्हत काढून मग स्वारी केली त्यामुळे सर्व ठिकाणी जय झाले अशी नोंद सापडते.
सन १६८९-१६९० सालात कारभार हाती घेतल्यावर रामचंद्रपंतांचे व शंकराजी नारायण यांचे महाराष्ट्रातले धोरण असे होते. "कारभार करता करता सर्वप्रथम मोगलांकडे गेलेला आपला मुलुख ताब्यात घ्यावा. जो किल्ला जिंकण्याचा मोगल प्रयत्न करीत आहेत त्या किल्ल्यावरील माणसांनी किल्ला सोडून द्यावा व काही काळाने फिरून पुन्हा घ्यावा पण जीवंत राहावे. औरंगजेबाचे सैन्य फार आपले सैन्य थोडे म्हणून आपला मनुष्य राखून (जपून) जाया होऊ न देता (जखमी अगर मृत) मोगलांच्या सभोवती हिंडावे. त्यांच्यावर अचानक छापे टाकून त्यांची लंगडतोड करावी. रयतेची वैरण राखून बाकी वैरण जाळून टाकावी. मोगलांची रसद मारावी."
याचबरोबर आणखी एक महत्वाचे परंतू शिवछञपतींच्या नियमाविरुद्ध असलेले धोरण आखले गेले ते म्हणजे "वतनाचे आमिष दाखवणे". वास्तविक शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील वतनदारांचे अधिकार काढून घेतले होते. अफझलखान स्वारी, शाइस्तेखान स्वारी, मिरझाराजे जयसिंगाची स्वारी अश्या कठीण प्रसंगी वतनदार स्वराज्याशी, छत्रपतींशी एकनिष्ठ न राहता गनिमांकडे चालते झाले. हा अनुभव असल्यानेच महाराजांनी मुलुखाची 'बटई' करून वतनदारांचे रयतेवरचे हक्क संपवून त्यांना स्वराज्य चाकरीत समाविष्ट केले होते. संभाजी राजांच्या कारकिर्दीतही हेच धोरण चालू राहिले. पुढे औरंगजेबाच्या आक्रमणात संभाजी राजांचा टिकाव लागत नाही असे वाटल्याने स्वार्थ साधण्यासाठी अथवा सूड उगवण्यासाठी वतनदार, देशमुख, कुलकर्णी, देसाई मोगलांना मिळू लागले. संभाजी राजांच्या हत्येनंतर व राजाराम महाराजांच्या पलायनानंतर तर महाराष्ट्रावर पारतंत्र्याची मोगली छाया पडू लागली व ही मोगली छाया तशी पडू नये म्हणून रामचंद्रपंत व शंकराजीपंत यांनी वतनाची आमिषे दाखवणे सुरु केले. या वतनासक्तीच्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला व अनेक वतनदार पुन्हा परत येऊ लागले. अश्या रीतीने औरंगजेबाची भेदनीति त्याच्यावर उलटवली गेली.
मोगलानी जिंकलेले गड-कोट, मुलुख याच वतनदारांचा होता. हे सर्व फिरवून पुन्हा हस्तगत करण्याच्या हेतूपायी त्या त्या वतनदारांना वतनाचे आमिष दाखवले व त्याप्रमाणे ही वतनदार मंडळी भराभर किल्ले घेऊन दाखवू लागली. हेच धोरण अनुसरून शंकराजी नारायणांनी मावळातील देशमुखांच्या मदतीने पुरंदर, रोहिडा, राजगड, तोरणा असे मावळातील महत्वाचे किल्ले काबीज केले.
राजाराम महाराजांनी जिंजीस सन १६९० मध्ये 'छत्रपतीपद' धारण केले आणि 'राजाज्ञा' पदावरून शंकराजी नारायण 'सचिवपदी' आरूढ झाले. याआधीचे सचिव शंकराजी मल्हार होते ते आपला कारभार व अधिकार सोडून काशीस निघून गेल्याने व शंकराजी नारायण याने मावळातील महत्वाचे किल्ले स्वराज्यात आणण्याची कामगिरी केल्याने त्यांना रिकामे झालेले 'सचिवपद' मिळाले व आता 'राजाज्ञा' शंकराजी नारायण हे 'शंकराजी नारायणपंत सचिव' झाले.
शंकराजी नारायणपंत सचिव यांनी दोन मुद्रा केल्या. एक मोठी व एक लहान. मोठी संस्कृत असून छोटी मराठी आहे.
१) मोठी संस्कृत मुद्रा -
श्रीराम भजनासक्त नारायण तनुजने: !
शंकरस्य शुभा मुद्रा पूर्णेदुरीव राजते !! ( शिक्का )
पत्रावधिरयं भाती ( मोर्तब )
२) छोटी मराठी मुद्रा -
श्री
शंकराजी
नारायण
(अष्टकोनी लंबवर्तुळाकार)
पत्रा
वधिरयं
भाती ( मोर्तब )
(अष्टकोनी लंबवर्तुळाकार)
शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या अखत्यारीत कृष्णेच्या उत्तरेकडचा घाटमाथा ज्यात सुभा मावळ, पुणे, सुपर प्रांत, करडे-रांजणगाव प्रांत, वाई व उत्तर कोकण व या सर्व प्रांतातील किल्ले तसेच राजमाची किल्ल्याच्या पूर्वेची मावळे .. थोडक्यात रांगणा, विशाळगड, पन्हाळा व दक्षिण प्रदेश सोडून बाकी सर्व मोठा प्रदेश होता. एवढ्या विस्तृत प्रदेशाची राखण, त्याचा कारभार, त्याचे संरक्षण औरंगजेबाशी सामना देऊन शंकराजी नारायण पंत सचिव यांनी केले. या मुलुखातील किल्ले घेण्यासाठी त्यांनी सरदारांप्रमाणेच वतनदारांचीही समजूत घातली. नाईलाजाने शिवछत्रपतींचा दंडक मोडून मावळ भागातील देशमुखांना वतने देऊन त्यांच्याकरवी मोगलानी घेतलेले प्रदेश व त्यातील डोंगरी किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले. हे कार्य शंकराजी नारायण पंत सचिव यांनी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत अविरत केले आणि मावळची सत्ता छत्रपती राजाराम महाराजांना परत देवविली.
शत्रूविरुद्ध चढाई करून मुलुख काबीज करणे इतकेच नाही तर अंतर्गत वादविवादही सोडवण्याची यशस्वी कामगिरी शंकराजी नारायण पंत सचिव यांना करावी लागली. शंकराजी नारायण पंत सचिव यांनी राजाराम महाराजांवर नाराज झालेल्या संताजी व बहिर्जी घोरपडे यांची समजूत घातली आणि महाराज स्वामीजवळ हुज्जत घालू नये. मर्यादेने रहावे. बेईमानी करू नये असे शपथपूर्वक वदवून घेतले व घोरपडे बंधूना पुन्हा स्वराज्याच्या कार्यात गुंतवले.
सन १६९४ सालात शंकराजी नारायण पंत सचिव यांनी आंबेघटाचे रक्षण करणारा पौड मावळातील कोरीगड हस्तगत केला.
शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मुलुखातील कार्याने संतुष्ट होऊन राजाराम महाराजांनी त्यांना 'मदार-उल महाम' म्हणजे 'दौलतीचे आधारस्तंभ' हा किताब सन १६९४ साली बहाल केला. त्याचबरोबर त्यांना 'साहोत्रा, दाहोत्रा व कऱ्हाड प्रांताची देशमुखी अशी वतने करून दिली.
छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकला. जुलिअन दिनांक ८ ऑक्टोबर १६९९ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "तुम्ही स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहिला. स्वामी कर्नाटक प्रांती गेले तेव्हा तुम्ही या प्रांती राहून, ताम्रानी आक्रमिलेले राज्य पुनरुक्त हस्तगत केले. शत्रू पराभवाते पावविला व स्वामींच्या संकटसमयी सैन्यसंभार पाठवून स्वामींचे संकट निरसन केले. स्वामींच्या राज्यनिमित्त श्रमसाहस अतिशयेसी करून स्वामीस संतोषी केले" असे म्हणून वतने करून दिली.
दरम्यान सन १७०० मध्ये राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधी झाले आणि मराठेशाहीची धुरा महाराणी ताराबाई यांनी स्वतःकडे घेतली. तिने मराठी राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली आणि औरंगजेबाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुढे चालविले. महाराणी ताराबाईसमवेत रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंत सचिव, धनाजी, खंडोबल्लाळ, परशराम त्रिम्बक, गिरजोजी यादव, खान्देराव दाभाडे इ मंडळींनी मोगलांना त्रस्त करून सोडले. पुढे तीन वर्षात ताराबाई व रामचंद्रपंतांचे बिनसले व रामचंद्रपंत राजसंन्यास घेऊन निघून गेले. शंकराजी नारायण पंत सचिव मात्र औरंगजेबाशी दोन हात करीतच होते.
आता मराठ्यांनी वेगळे धोरण अवलंबले. मोगलांना कोणताही किल्ला भरपूर सैन्यानिशी वेढा दिल्याशिवाय जिंकता येत नव्हता. त्याउलट मराठे तेच किल्ले एका रात्रीत आपल्या ताब्यात घेत होते. त्यामुळे एखादा किल्ला जिंकण्यास मोगल आले की त्यांना तिखट प्रतिकार करायचा. त्यांच्या सैन्याचे, युद्धसाहित्याचे नुकसान करायचे आणि शेवटी भरपूर द्रव्य घेऊन आणि किल्ल्यातील माणसांचे प्राण रक्षून तो किल्ला मोगलांच्या स्वाधीन करावयाचा. त्या किल्ल्यावर मोगल जरा स्थिर होत नाहीत तोच अकस्मात एका रात्रीत तो फिरून घ्यावयाचा असा गनिमीकावा मराठ्यांनी सुरु केला. आणि हा सर्व प्रकार शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या अखत्यारीत मुलुखात चालू होता. मराठ्यांनी औरंगजेबास अगदी हैराण केले. याच पद्धतीने शंकराजी नारायण पंत सचिव यांनी सातारा, परळी, पन्हाळा, चंदन, वंदन, नांदगिरी, खेळणा, सिंहगड, राजगड, लोहगड, शितगड असे किल्ले पुन्हा ताब्यात घेतले. याच सुमारास १७०२ सालात मराठ्यांनी प्रथमच नर्मदेपार जाऊन मोगलांची रसद मारली आणि १७०३ साली याही पेक्षा मोठी चढाई मोगली मुलुखात नर्मदा ओलांडून केली.
आता बादशहा औरंगजेबाचा अंतकाळ जवळ येत चालला होता. १६८२ पासून तो महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता तरीही हर तऱ्हेचे प्रयत्न करूनही मराठेशाहीस संपवण्याची त्याची जिद्द पूर्ण होऊ शकली नाही आणि १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. हे कळताच आज्जमशहा परत आला व सिंहासनी बसला व लगेचच झुल्फिकारखान व राजा शाहू समवेत कूच करून दिल्लीस जाऊ लागला. आज्जमशहा जाताच शंकराजी नारायण पंत सचिव यांनी मावळातील एकूण एक किल्ले घेण्यास सुरुवात केली व एक मुख्य रायगड सोडला तर महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले. रायगड व कोकणातील काही किल्ले जंजिरेकर सिद्दीने ताब्यात घेतले.
याच सुमारास मोगलानी राणी येसूबाईस ओलीस ठेवून राजा शाहूची सुटका केली. परंतू त्याची सुटका करताना काही अटी घातल्या जेणेकरून मराठ्यांचे स्वातंत्र्य नाहीसे होईल.यामुळे आता मराठेशाहीत यादवी सुरु झाली. शाहू राजा महाराष्ट्रात येताच त्याला सेनापती धनाजी जाधवांसकट अनेक सरदार येऊन मिळाले आणि इकडे महाराणी ताराबाई पक्षात चलबिचल होऊ लागली. त्यातच शाहू राजे व ताराबाई यांच्या पक्षात खेडकडूसची लढाई झाली ज्यात ऐन वेळी सेनापती धनाजी जाधव तटस्थ राहिल्याने शाहू राजांचा पक्ष विजयी ठरला. या काळात शंकराजी नारायण पंत सचिव आपल्या मावळ प्रांतात कायम होते आणि आता ते एकटेच ताराबाईंच्या पक्षातील जबाबदार अधिकारी उरले होते.
यानंतर शाहू राजांनी शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मुलुखात प्रवेश केला आणि पंतांना भेटण्याची आज्ञा केली. परंतू ज्या शंकराजी नारायण पंत सचिवांनी मराठेशाहीच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले, छत्रपतींच्या गैरहजेरीत औरंगजेबाशी शीर तळहातावर घेऊन सामना केला त्या पंतांनी मराठेशाहीचे निर्भेळ स्वातंत्र्य गमावणाऱ्या शाहू राजास भेटण्याऐवजी देहविसर्जन केले.
ज्यावेळी शाहूचे सैन्य राजगडापाशी आले त्यावेळी शंकराजी नारायण पंतसचिवांचा मुक्काम रोहीड्यास अगर राजगडास होता. त्यांनी लगेच सर्व सोडून देऊन ते श्री क्षेत्र आंबवडयास निघून गेले.
शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान कार्तिक शुद्ध १२ शके १६२९ (जुलिअन दिनांक २७ सप्टेंबर १७०७) रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथील जंगलात श्री नागनाथाचे शिवस्थान आहे त्याच्या नैऋत्येस पंचगंगा तीर्थात झाले.
रियासतकार सरदेसाईंनी शंकराजी नारायण पंतसचिवांचे असे वर्णन केले आहे : रामचंद्रपंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल्याशिवाय देशमुख, कुलकर्णी समजत नाहीत व मुलुख आबाद होत नाही हे जाणून वतने देण्यास सुरुवात केली.
मराठेशाही समूळ नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे अखेर नमते घ्यावे लागले आणि त्याच्या पश्चात मराठ्यांनी दिल्लीपावेतो धडक मारून मोगलांनाच आपले अंकित बनवले.
या कर्तबगारीसाठी शंकराजी नारायण पंतसचिव यांना मानाचा मुजरा !!
- राहुल भावे
दिनांक : १९ फेब्रुवारी २०१८
संदर्भ -
मराठी रियासत खंड २ - गो. स. सरदेसाई
शंकराजी नारायण पंतसचिव - कृ. वा. पुरंदरे
मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर उत्तरार्ध - श. श्री. पुराणिक
No comments:
Post a Comment