काळ आला होता पण..... छत्रपती संभाजी महाराजांची गोवा मोहीम अर्थ "व्हडले राजिक"

हिंदुस्थानात पाश्चात्य देशांतून येऊन सत्ता स्थापन करणाऱ्यांपैकी सर्वात जुने म्हणजे पोर्तुगीज. मराठी कागदपत्रांमध्ये यांचा उल्लेख फिरंगी म्हणून येतो. त्यांच्या पाठोपाठ इतर पाश्चात्य राजवटी जशा कि फ्रेंच, इंग्रज, वलंदेज (डच) या आल्या. ई.स. १४९७ च्या अखेरीस वास्को द गामा हा केप ऑफ गुडहोपला वळसा घालून पुढील वर्षी कालिकत इथे आला. त्यापुढील काही वर्षातच पोर्तुगीज व अरब यांच्यात संघर्ष होऊन भारताची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. त्यांचे समुद्रावरील वर्चस्व वादातीत होते. सतराव्या शतकाच्या मध्यास पोर्तुगीजांची सत्ता प्रामुख्याने पुढील प्रदेशात होती.


उत्तर विभाग – दीव, दमण, दमणच्या उत्तरेकडील पार नदीपासून दक्षिणेस उरणजवळील करंजापर्यंतची किनारपट्टी व लगतचा काही प्रदेश. यातील मुंबई बेट त्यांनी १६६४ साली इंग्रजांना आंदन दिले. करंज्यापासून दक्षिणेकडील अलिबागच्या जवळील अष्टगराचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता, अपवाद अष्टगाराच्या दक्षिणेकडील चौल, रेवदंडा, कोर्लई. हा भाग पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. या भागाचे प्रमुख केंद्र होते वसई. हा संपूर्ण प्रदेश उत्तर फिरंगाण म्हणून ओळखला जाई. वसईचा प्रमुख गव्हर्नर किंवा जनरल म्हणून व्यक्ती असे.

दक्षिण विभाग – उत्तरेस मांडवी व दक्षिणेस जुआरी नदी यांनी वेढलेले गोवा (तिसवाडी) हे मुख्य बेट, मांडवीच्या उत्तरेकडील बारदेश व जुआरीच्या दक्षिणेकडील साष्टी हा प्रदेश तसेच दक्षिणेत कर्नाटकातील कारवार, अंकोला, होनावर, भटकळ येथील तुरळक व तुटक प्रदेश यांनी मिळून दक्षिण फिरंगाण होते. गोवा हि पोर्तुगीजांच्या पौर्वात्य साम्राज्याची राजधानी होती. इथला व्हाईसरॉय हा प्रमुख असे. त्यास मराठी कागदपत्रात विजरई म्हणत. संभाजी महाराजांच्या स्वारीच्या वेळी कोंत दी आल्व्हर हा विजरई होता.

दोन्ही प्रदेशात ठिकठिकाणी मोक्याच्या जागी समुद्रात व खाड्यांच्या मुखावर किल्ले बांधून मजबूत संरक्षण व्यवस्था उभी केली होती. जेसुइट पाद्री व ख्रिश्चन मिशनर्यांच्या सहाय्याने या भागात मोठ्या प्रमाणावर बळजबरीने धर्मांतर व अनन्वित धार्मिक अत्याचार सुरु होते. शिवाजी महाराजांनी १६७५ मध्ये गोव्याच्या आजुबाजुकडील प्रदेश स्वराज्यात आणला व पोर्तुगीजांच्यावर आपली जरब बसविली होती. त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी पन्हाळगडावरील आपल्या मुक्कामातच पोर्तुगीजांशी आपले संबंध प्रस्थापित केले होते.

इ.स. १६८२ मध्ये पोर्तुगीजांनी गोव्याच्या दक्षिणेकडील अंजदीव हे बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधला. या आगळीकीमुळे संभाजी महाराज अस्वस्थ होते. पुढे औरंगजेब दक्षिणेत येताच त्याने मराठ्यांना घेरण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने मराठ्यांच्या शेजारील इंग्रज, सिद्दी, पोर्तुगीज या शत्रूंशी संधान बांधण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या वकिलाने शेख मुहम्मद याने गोव्याच्या विजरईची २० जानेवारी १६८३ रोजी भेट घेतली. तत्पूर्वीच १६८२ मध्ये औरंगजेबाचे पत्र विजरईला गेले होते. त्यातील मजकूर असा होता.

“बादशाहने संभाजीराजांशी युद्ध पुकारले आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा साम्भाजीशी युद्धास सिद्ध व्हा. आमच्या सैन्याची रसद घेऊन तुमच्या प्रदेशातून सूरत ते मुंबई अशा जाणाऱ्या तारावांना आणि काफिल्यांना तुम्ही प्रतिबंध करू नये.”

विजरई हा पेचात होता. त्याला मनापासून दोघांनाही मदत करणे टाळायचे होते. पण त्याचबरोबर असेही वाटत होते कि मोगलांकरवी मराठ्यांचा कट काढला गेल्यास उत्तम. मोगली आक्रमणापुढे मराठे टिकाव धरणार नाहीत. या धामधुमीत आपणही राज्यविस्तार करून घेऊ. यानिमित्ताने दक्षिण कोकणचा सुपीक प्रदेश बळकावण्याची संधी त्यास खुणावत होती. तो बादशहाच्या वतीने या प्रदेशावर हुकुमत करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने बादशहाच्या मराठ्यांविरुद्ध युद्ध हि विनंती सोतून इतर सर्व मागण्या मान्य केल्या. संभाजी महाराजांचा वकील येसाजी गंभीरराव हा पोर्तुगीज दरबारात हजर होता. त्याने पोर्तुगीज मोगल तहविरुद्ध विजरईची भेट घेऊन आपली नापसंती व्यक्त केली. पोर्तुगीजांचे धोरण दुटप्पीपणाचे होते. ते एकाचवेळी मराठे व मोगल दोघांनाही झुलवत होते.

पोर्तुगीजांनी औरंगजेबाला आपल्या प्रदेशातून धान्य विकत घेण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर मोगलांचे सैन्य, आरमार, दारुगोळा, रसद यांची ने आण सुलभतेने पोर्तुगीज प्रदेशातून होऊ लागली. मोगलांच्या फौजा उत्तर कोकणात कल्याण भिवंडी परिसरात उतरल्या होत्या. त्यांना मोठ्या प्रमाणात कुमक व रसद मिळू लागली. या हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी संभाजी महाराजांनी पारसिक येथे किल्ला बांधावयाची योजना आखली. परंतु या बेताचा पोर्तुगीजांना सुगावा लागला व त्यांनी हा भाग स्वतःच्या काबाज्यात घेऊन त्वरित पारसिक येथे किल्ला बांधला. याशिवायही पोर्तुगीजांकडून काही आगळीकी घडल्या होत्या. जव्हारजवळील रामनगरचा राजा नारायणदेव याचा बराच प्रदेश मराठ्यांनी जिंकला. पोर्तुगीज त्यास चौथाई कर देत. पण आता त्यांनी मराठ्यांना तो कर देण्यास नकार दिला. चौलजवळ आपले ठाणे उभारण्यास मराठ्यांना जागा देण्यास विजरईने नकार दिला. याशिवाय गोव्यात व वसई प्रांतात पोर्तुगीजांच्या सक्तीच्या धर्मांतर व धार्मिक छळाच्या कथाही संभाजी महाराजांच्या कानावर येत होत्या. संभाजी महाराजांच्या वेंगुर्ल्याच्या व्यापाराचे कर्नाटकातून येणारे तांदुळाचे पडाव व मचवे पोर्तुगीजांनी गोव्यात पळविले. तसेच मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याच्या घरावर पहारे बसविले. यासगळ्यामुळे मराठ्यांना फिरंग्यांच्या विरुद्ध आघाडी उघडणे क्रमप्राप्त होते.

मराठ्यांनी प्रथम चौलवर मारा केला. तिथला पोर्तुगीज कप्तान होता दोम फ्रान्सिस्को द कोस्त. त्याचबरोबर डहाणू, वसई व तारापूर या ठिकाणावर मराठ्यांनी हल्ला चढविला. अनेक ठिकाणी जाळपोळ केली व काही जेसुइट पाद्र्यांना कैद केली. तारापूरचा हवालदार इमन्युअल अल्व्हारीस याने आठ दिवस मराठ्यांचा प्रतिकार केला. २२-२३ जुलै १६८३ रोजी मराठ्यांनी रेवदंडाच्या कोटावर हल्ला केला. संभाजी महाराज स्वतः नेतृत्व करीत होते. त्यांच्यासमवेत २००० घोडदळ व ६०० पायदळ होते. ८ ऑगस्ट रोजी मराठ्यांनी चौलला वेढा घातला. मराठे शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश करू पाहत होते. पण पोर्तुगीज कप्तानाच्या सावधगिरीमुळे हा हल्ला कारीगर होऊ शकला नाही. वसईला दोमानुयल लोबूदसिन्हैर हा पोर्तुगीज जनरल होता. चौल, वसई ते दमण हा भाग त्याच्या अधिपत्याखाली होता. त्याने मराठ्यांविरुद्ध जंजिर्याच्या सिद्दी याकूतखानाची मदत मागितली. सिद्द्यांचे ४०० सैनिक चौल रेवदंडा परिसरात आले. याचवेळी मराठ्यांनी खाडीपलीकडील कोर्लईच्या किल्ल्यावर देखील हल्ला केला. पोर्तुगीज शर्थीने झुंज देत होते. काहींनी पलायन करून मुंबई बेटावर इंग्रजांकडे आश्रय घेतला. मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने वसई परिसरात हल्ला करून जाळपोळ, लुटालूट सुरु केली. पारसिक किल्ल्यावरील पोर्तुगीजांनी मराठ्यांचा पाठलाग सुरु केला. मराठे गनिमी काव्याने त्यांना पालवत आपल्या तळाजवळ घेऊन आले. आता उलट फिउन त्यांनी पोर्तुगीजांवर प्रतिहल्ला केला. पोतुगीजांचे चार पाच सैनिकच परत जाऊ शकले. उर्वरित कापले गेले. 

संभाजी महाराजांनी आता उत्तर फिरंगणाची आघाडी पेशवे निळो मोरेश्वर यांच्याकडे सुपूर्द केली. मराठ्यांची फौज या प्रदेशात धुमाकूळ घालत होती. पोर्तुगीजांनी गोव्याकडे मदतीची याचना केली. त्याचप्रमाणे मोगल व इंग्रज यांच्याकडे कुमक मागितली. पण त्यांची चहूबाजूने कोंडी झाली होती. मराठे गोव्याजवळ साष्टी, बारदेश प्रांतात शिरजोरी करत असल्याने विजरई उत्तरेकडे मदत पाठविण्यास असमर्थ होता. पावसाळ्यानंतर निळो मोरेश्वरने जवळजवळ संपूर्ण उत्तर फिरंगाण उध्वस्त केले होते. अनेक किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले होते.

इकडे गोव्याचा विजरई कोंद दी आल्व्हार याने संभाजी राजांना पकडण्याचा धाडसी बेट आखला. मांडवी नदीच्या उत्तर तीरावर भातग्राम जवळ नार्वे हे ठिकाण आहे. येथील सप्तकोटीश्वर देवस्थानाचा जीर्णेद्धार स्वतः शिवाजी महाराजांनी केला होता. येथे गोकुळअष्टमीस मोठा उत्सव व यात्रा भरते. त्यावेळी येथील पंचगंगा नदीत स्नानासाठी असंख्य भाविक जमतात. संभाजी महाराजदेखील स्नानास येणार असल्याची खबर विजरईस १२ ऑगस्ट १६८३ रोजी कळली. त्याचवेळेस त्यांच्यावर छापा घालून अटक करण्याची योजना आखली गेली. पण संभाजी महाराजांचा बेट रहित झाल्यामुळे विजरईचे स्वप्न भंगले.

उत्तर फिरंगाणातील हा मराठ्यांचा वचक कमी करण्यासाठी विजरईस त्वरील हालचाल करणे भाग होते. त्याच्याजवळील सैन्य तुटपुंजे होते. त्यामुळे उत्तरेस मदत पाठविली असती तर गोवा हातातून जाण्याचा धोका होता. त्यासाठी त्याने दक्षिण कोकणात मराठ्यांविरुद्ध आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यास आणखीही काही करणे होती. यानिमित्ताने गोवा, साष्टी, बारदेश यांचे रक्षण करण्यासाठी बांद्यापासूनचा कोकण प्रांत काबीज करणे. सुपीक व भरपूर उत्पन्नाचा हा भाग पुढे मागे मोगलांच्या ताब्यात जाण्यापूर्वी आपल्या कबज्यात आणणे.

१६८३ च्या पावसाळ्यानंतर विजरईने तयारीला सुरुवात केली. त्याच्याजवळ ६०० पगारी सैनिक, ३०० नाविक, ३०० निवृत्त सैनिक, साष्टीतील २५०० कानडी बंदुकची व कुदळी टिकाववाले होते. तसेच सहा तोफा होत्या. या सर्व साहित्यानिशी त्याने मराठ्यांच्य फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे ठरविले. संभाजी महाराज यावेळेस राजापूर इथे होते. त्यांनीही १५००० सैन्यानिशी फोंड्याकडे कूच केले. फोंड्याचा किल्ला अतिशय मजबूत होता. त्याच्या भिंती रुंद व जाड होत्या. भोवती खंदक होता. वर्तुळाकार बुरुजांवर सहज मारा करणे शक्य नव्हते. १६ मे १६७५ रोजी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध हा किल्ला जिंकून घेतला होता. त्यामुळे अंत्रुज, अष्टगर, हमाडबार्से, बाळी, चंद्रवाडी, कोकाडे, सांगे, केपे, काणकोण हे महाल स्वराज्यात आले होते. किल्ल्यात ब्रांझ व लोखंडी तोफा होत्या. आत ४०० शिबंदी होती. शिवाय बाहेरील रानात ३०० सैनिक दबा धरून राखण करीत होते. त्यांचा सरदार होता येसाजी कंक व त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक.

२४ ऑक्टोबर १६८३ रोजी विजरई दुर्भाट या बंदरात आला. दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. इथला मराठी अधिकारी दुलबा नाईक फितूर होऊन फिरंग्यांना जाऊन मिळाला. मराठ्यांचा इथला पहिला हल्ला परतवून लावला गेला. १ नोव्हेंबर १६८३ रोजी विजरई फोंड्याजवळ आला. त्याने किल्ल्यासमोरच्या टेकडीवर तोफा गोळा केल्या. तीन दिवस तोफांची सरबत्ती सुरु होती. पण पोर्तुगीजांना तटबंदी फोडण्यात यश येत नव्हते. शेवटी तोफा टेकडीवरून काढून किल्ल्याच्या जवळ रस्त्यावर आणल्या गेल्या. इथून केलेल्या माऱ्यात एका बुरुजाला भगदाड पडले. पण तिथून मराठ्यांचा प्रतिकार बंद झाला. पोर्तुगीज आनंदी होऊन जवळील खंदक बुजवायला लागले. त्यावरून ते भगदाडापर्यंत पोहोचले. पोर्तुगीजांनी तटाला शिड्या लावल्या व ते आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. इतका वेळ शांत बसून राहिलेल्या मराठ्यांनी आता तुफान चढाई सुरु केली व पोर्तुगिजांचा हल्ला परतवून लावला. 

पावसाचे थैमान सुरु होते तरीही विजरई लढा देत होता व मराठे चिवटपणे प्रतिकार करत होते. सततच्या अपयशाने विजरई निराश होत होता. त्याचवेळेस त्याला बातमी मिळाली कि संभाजी राजे मोठी कुमक घेऊन येत आहेत. आता माघार घेणे इष्ट होईल असा सल्ला कप्तान दाम राद्रीगो द कास्त याने दिला. पण पाद्र्यांनी तो मानला नाही व तोफांचा मारा सुरु राहिला. तोफांच्या आकाराच्या मानाने गोळे लहान होते व ते वर्मी बसत नव्हते. संभाजी महाराज ८०० घोडेस्वार व पायदळ घेऊन फोंड्याजवळ आले व गडाच्या मागच्या बाजूने ६०० घोडेस्वार किल्ल्यात शिरले पण पोर्तुगीज त्यांना रोखू शकले नाहीत. विजरईने माघारी वळण्याचा निर्णय घेतला व १० नोव्हेंबर १६८३ रोजी त्याने वेढा उठवला. परत चाललेल्या पोर्तुगीज फौजेवर छापा घालून मराठ्यांनी ३०० पोटी तांदूळ, २०० बैल व इतर चीजवस्तू लुटल्या. फोंड्याच्या वेढ्यातील लढाईत येसाजी कंक व कृष्णाजी कंक यांना भयंकर जखमा झाल्या. यातच कृष्णाजी यांचा मृत्यू झाला. संभाजी राजांनी त्यांना यथोचित बक्षिसी दिली.

१३ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज सैन्य दुर्भाट येथे आले. येथील एक टेकडी घेण्याचा विजरईने हुकुम दिला. पोर्तुगीज टेकडी चढून गेल्यावर मराठ्यांनी तुफान हल्ला केला. थोडावेळ लढत दिल्यावर मराठ्यांनी पळून जाण्याचा बहाणा केला व पोर्तुगीज त्यांचा पाठलाग करू लागले. काही अंतरावर मराठ्यांनी मागून पुढून पोर्तुगीज सैन्यावर हल्ला केला. अनेक सैनिक मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाखाली तुडविले गेले. पोर्तुगीज पायदळाचे एकूण एक सैनिक कामी आले. टेकडीवरील चकमकीत विजरई पण जखमी झाला. मराठ्यांनी त्याला भाला व तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला पण तो थोडक्यात बचावला. दोन वेळा तो मराठ्यांच्या तावडीतून सुटला. नदी ओलांडताना अनेक पोर्तुगीज सैनिक प्राणास मुकले. विजरईस राजधानीत परत आल्यावर मठात दडी मारून तोंड लपवायची वेळ आली. चार दिवस तो दडी मारून बसला होता.

इकडे संभाजी राजांनी फोंडा किल्ल्याच्या पडझडीची पाहणी केली व जुना किल्ला पाडून टाकण्याची आज्ञा केली. त्याच दगडमातीचा उपयोग करून त्यांनी नवा किल्ला बांधला व त्यास ‘मर्दनगड’ असे नाव दिले. आता संभाजी महाराजांनी साष्टी बारदेशवर हल्ला करायचा निर्णय घेतला. विजरईची अपेक्षा होती कि मराठे परत जातील. 

जुन्या गोव्याजवळ मांडवी नदीत जुवे नावाचे बेट आहे. ओहोटीच्या वेळी इथे पायी जाता येते. या पायवाटेच्या संरक्षणार्थ जुवे बेटावर सांत इस्तेव्हाव नावाचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. २४ नोव्हेंबर १६८३ च्या रात्री मराठे या बेटावर शिरले. किल्ल्यातील प्रतिकार मोडून काढत मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्यातील तोफांच्या माऱ्याने गोवे शहरातील लोकं जागे झाले. घंटा वाजवून पाद्र्यांनी लोकांना व शस्त्रांना गोळा केले. विजरई धावजी गावाजवळ येऊन थांबला. मांडवी नदीला यावेळेस भरती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ४०० लोकांनिशी विजरईने बेटावर हाल केला, किल्ल्याजवळ पोहोचेपर्यंत १०० सैनिकांना मराठ्यांनी ठार केले. मराठ्यांची ३०० घोडेस्वारांची तुकडी दुसऱ्या बाजूने किल्ल्यावर आली. त्यांचा सामना करताना पोर्तुगीजांना पळता भुई थोडी झाली. पोर्तुगीज उतारावरून नदीकडे धावत सुटले. विजरईच्या आर्जवांना कोणी दाद देईना. मराठ्यांनी दगडांचा मारा सुरु केला. लोकं सैरावैरा पळत नदीत उद्या टाकत होते. दीडशेच्या वर सैनिक मारले गेले अथवा बुडाले. उरलेले सर्व जण जखमी अवस्थेत माघारी आले. खुद्द विजरईचा चार मराठे घोडेस्वारांनी पाठलाग केला. त्यांच्या तडाख्यातून तो कसाबसा वाचला. विजरईच्या दंडात गोळी लागली तर दोम दी रोद्रिगो कास्तच्या चेहऱ्यावर गोळी लागली. दोघांचेही घोडे मराठ्यांनी ताब्यात घेतले. दोघेही छातीभर पाण्यात उतरले आणि मचाव्यात कसेबसे घुसून पळाले. भरतीमुळे पाणी जास्त होते. त्यातच आजूबाजूच्या शेतातील बांध फोडल्यामुळे नदीचे पात्र आणखी रुंद झाले. सर्वत्र पाणी पसरले गेले. अनेक सैनिक चिखलात अडकले अथवा बुडून मेले. मराठ्यांचे नेतृत्व स्वतः संभाजी महाराज करीत होते. मराठे पाठलाग करीत कापाकापी करत नदीत शिरले. संभाजी महाराजांनीही आवेगाच्या भरात नदीत आपला घोडा घातला. पण पाण्याला ओढ फार होती. त्यांचा घोडा पहुणीस लागला. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व संभाजी महाराजांना तीरावर आणले. महाराजांनी त्यांचा सन्मान करून बक्षीस दिले. बखरकार म्हणतो ...

“ते दिवशी गोवे घ्यावयाचे, परंतु फिरंगियाचे दैव समुद्राने रक्षिले”

काही दिवस मराठे जुवे बेटावरून गोव्यावर हल्ला करीत राहिले पण त्यांना गोवे घेता आले नाही. इकडे शेवटी मराठ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून विजरई कोंत दी आल्व्हार सेंट झेविअरच्या चर्चमध्ये गेला. त्याने झेविअरकडे करुणा भाकली. सर्वांनी मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची पेटी उघडली. विजरईने आपला ‘राजदंड’ व ‘राजचिन्हे’ झेविअरच्या पायाशी ठेवली. पोर्तुगालच्या राजाच्या वतीने स्वलिखित अर्ज झेविअरच्या पेटीत ठेवला. त्या अर्जात राजाच्या नावाने प्रार्थना होती कि राजसुत्रे हाती घेऊन सेंट झेविअरने गोव्याचे रक्षण करावे. याविधींच्या वेळी पुढे मराठ्यांना बातमी आली कि मोगलांची मोठी फौज औरंगजेबाचा मुलगा शहजादा शहाआलम याच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोकणावर चालून येत आहे. ते भीमगडामार्गे फोंद्यावर येत होते. त्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली. मराठ्यांचे संकट टाळल्यामुळे सेंट झेविअरचा उत्सव सुरु झाला. विजरई सेंट झेविअरच्या नावाने राज्य करू लागला. मोगलांकडील बातमीने मराठ्यांनी माघार घेतली, पण मुख्य गोवा ताब्यात आले नसले तरी ११ डिसेंबर १६८३ रोजी संभाजी महाराजांच्या सैन्याने साष्टी व बारदेशवर एकाच वेळी हल्ला केला. पुढे २६ दिवस मराठे या भागात मुक्त संचार करून जाळपोळ, लुटालूट करीत होते. बारदेशमधील ४६ तोफा मराठ्यांच्या हाती लागल्या. विजरईने आपली राजधानी जुन्या गोव्यातून मुरगावला हलविण्याचा निर्णय घेतला. मुरगाव बंदरातून वेळप्रसंगी पळून जाणे सोपे होईल असे त्यास वाटले. १० जानेवारी १६८४ रोजी राजधानी हलविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

संभाजी महाराज कोकणात मोगलांशी झुंज देण्यास माघारी वळले. त्यांनी पोर्तुगीजांशी तहाचे अधिकार कवि कलश व शहजादा अकबर यास दिले. हि गोष्ट पेशवे निळो मोरेश्वर यांस पसंत नव्हती. कवि कलशाचे प्रस्थ हळूहळू वाढीस लागले होते. तिकडे उत्तर फिरंगाण व कोकणच्या भागात मराठे, पोर्तुगीज, मुघल यांच्यात जोरदार लढाया सुरूच होत्या. फिरंग्यांचा मोठा मुलुख ताब्यात आणून त्यांना केवळ दमण – वसई – चौल या किनारपट्टीच्या प्रदेशात अडकविण्यात मराठ्यांना यश आले. २५ जानेवारी १६८४ ते ४ फेब्रुवारी १६८४ च्या दरम्यान फोंड्याजवळ भीमगड येथे मराठे व पोर्तुगीज यांच्यात तह झाला. तहनाम्यावर कवि कलश, शहजादा अकबर व अल्बूकर्की सारव्हीया यांच्या सह्या झाल्या. या तहाची कलमे पुढील प्रमाणे

१) संभाजीने पोर्तुगीजांचे जे प्रदेश व किल्ले हस्तगत केले असतील, ते तेथील तोफा व हत्यारे यांसह परत करावे.
२) युद्ध सुरु झाल्यापासून व त्यापूर्वी जी एकमेकांची जहाजे एकमेकांनी घेतली असतील, ती त्यातील सामानासह एकमेकांस परत करावी.
३) उभयतांनी पकडलेले कैदी सोडून द्यावेत. 
४) वसईच्या मुलुखातील गावखंडी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे रामनगरच्या राजाला देत असत त्याप्रमाणे संभाजी राजास पोर्तुगीजांनी द्यावी आणि त्याच्या बदल्यात संभाजीने त्या प्रदेशाचे रक्षण करावे.
५) उभयतांना एकमेकांच्या मुलुखात पूर्वीप्रमाणे व्यापारास मोकळीक असावी व एकमेकांच्या प्रदेशातून व्यापारानिमित्त सामानासह जाण्यायेण्यास कोणतीही अडचण असू नये.
६) पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील तोफखान्याच्या संरक्षणाखाली धान्य सामुग्री घेऊन मुघल फौजेकडे जाणाऱ्या जहाजांना पोर्तुगीजांनी परवानगी देऊ नये. पण ज्या प्रदेशात पोर्तुगिजांचा तोफखाना नसेल तेथे हे कलम लागू होणार नाही. 
७) संभाजी राजांनी कोला (Colla) येथे सुरु केलेले गडाचे बांधकाम थांबवावे.
८) जे कोकणातील देसाई संभाजी विरुद्ध बंड करून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयास राहिले होते त्यांस माफी देण्यात यावी.
९) दुसऱ्या कलमान्वये पोर्तुगीजांच्या मुलुखाच्या सीमांशेजारी संभाजीने किल्ला बांधू नये.

तह झाला पण तो कोणीच मनापासून पाळला नाही, खास करून मराठ्यांनी. पुढे दोन वर्षे या तहावर वाटाघाटी सुरु होत्या. पोर्तुगीज वकील मार्च १६८४ मध्ये रायगडावर येऊन गेले. तसेच मराठ्यांचे रंगाजी लक्ष्मीधर व सिधोजी फर्जंद हे वकील डिसेंबर १६८४ मध्ये गोव्यास जाऊन आले. 

गोवा स्वारीचा लेखाजोखा मांडताना बरेच पैलू लक्षात घ्यावे लागतात. मोगलांशी संधान बांधून दक्षिण कोकणचा प्रदेश जिंकण्याचा पोर्तुगिजांचा मनसुबा होता. संभाजी महाराज जातीने फोंडागडाच्या रक्षणास गेल्याने हा बेत हाणून पाडला गेला. उलटपक्षी गोवेच पोर्तुगीजांच्या हातून जाते कि काय अशी स्थिती निर्माण झाली. साष्टी, बारदेश प्रांतात मराठ्यांना भरपूर लुट, दारुगोळा, तोफा मिळाल्या. गेलेला मुलुख दोन अडीच वर्षांनी पोर्तुगीजांना परत मिळवता आला. दक्षिण कोकणच्या आपल्या प्रदेशात मोगली सरदार शहाआलमच्या फौजेला टक्कर देऊन ते आक्रमण थोपविण्यात मराठ्यांना यश आले. शहाआलमची मोहीम पूर्णपणे फसली. योग्यवेळी गोव्यातून माघार घेऊन संभाजी महाराजांनी रायगड गाठला व एकाच वेळी मोगलांशी उत्तर व दक्षिण कोकणात तिखट प्रतिकार केला. त्याचवेळेस पोर्तुगीजांशी तहाचे बोलणे लावून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले. मराठ्यांना खऱ्या अर्थाने तह करावयाचाच नव्हता, पण वाटाघाटी लांबवून त्यांनी एक आघाडी शांत करून घेतली व आपले बळ मोगलांविरुद्ध एकवटले. तसेच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगिजांचा बराचसा मुलुख ताब्यात आणून मोगलांशी लढा देण्यास त्याचा उपयोग करून घेतला. गोव्यावरचे हे आक्रमण पोर्तुगीजांनी अनुभवलेले सर्वात प्रखर असे आक्रमण होते. त्यांना राजधानी बदलण्याची वेळ यावी यातच या मोहिमेचे यश दडले आहे.

अमोल मांडके

१९ जून २०१७

संदर्भ

१. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे
२. शिवपुत्र संभाजी – डॉ. सौ. कमल गोखले




1 comment:

  1. पोर्तुगीज मराठा संघर्ष उत्तमरीत्या मांडला आहे. मराठा आणि पोर्तुगीज परस्पर संबंधातले अनेक कांगोरे उलगडून दाखवले आहेत.

    ReplyDelete